दिनांक १३ फेब्रुवारी, श्रीगोंदा
छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्ताने विचार प्रबोधन सप्ताहाच्या दुसऱ्या दिवसीच्या विचार मंथनात विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाचे उद्घाटक प्रा. राधाकृष्ण बाचकर तर, अध्यक्षस्थानी हभप बाप्पू महाराज शिंदे होते. विचार मंचकावर दिव्यांग संघटनेचे पदाधिकारी राजेंद्र भोपळे हे उपस्थित होते. याठिकाणी प्रमुख वक्ते हभप गणेश महाराज फरताळे (वढू बुद्रुक) यांनी आपले विचार व्यक्त केले.
त्यांनी नमूद केले की,आपनाला छत्रपती शिवाजी महाराज म्हटले की, महाराष्ट्र आठवतो आणि मागील वीस वर्षांपूर्वीचा इतिहास पाहिला. तर, सर्वसामान्यांच्या मनामध्ये छत्रपती शिवाजी महाराज हे धर्माची लढाई लढत होते, ते मुसलमान समाजाच्या विरोधात होते, मुस्लिमांचा द्वेष करत होते, एवढाच खोडसाळ इतिहास महाराष्ट्रात काही लोकांकडून सांगितला जात होता. शिवाजी महाराजांवर कवन आणि पोवाडे गायले जात होते. परंतु,, छत्रपती शिवाजी महाराजांवर सर्वात प्रथम नऊशे ओळींचा पोवाडा लिहणारे खरे शिवशाहीर महात्मा ज्योतिराव फुले असल्याचे फरताळे यांनी येथे नमूद केले. सर्वात प्रथम रायगडावर शिवाजी महाराजांची समाधी शोधून दहा-दहा दिवस गावोगावी शिवजयंती साजरी केली गेली व आजही केली जाते. याचं सर्व श्रेय महात्मा ज्योतिराव फुले यांना जात असल्याचे ते म्हणाले. त्याच महात्मा फुलेंनी लेखणी उचलली आणि बहुजनांच्या मुलांना जाग करण्याचं काम केलं. छत्रपती शिवाजी महाराजांच नुसतं उदोउदो करू नका. तर, त्यांना बहुजन प्रतिपालक, राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज असे म्हणा.. असेही फुलेंनी सांगितल्याचे दाखले फरताळे यांनी उपस्थितांना दिले.

या विचारांच्या कडीतील महामानवांचे नाते सांगायचे झाले तर, अण्णाभाऊ म्हणतात ‘जग बदल घालुनी घाव सांगून गेले मला भीमराव’, बाबासाहेब गुरु असल्याचे अण्णा भाऊ सांगतात. महात्मा फुलेंच्या मृत्यूनंतर एक वर्षांनी बाबासाहेबांचा जन्म झाला. तरीही बाबासाहेब म्हणतात, महात्मा फुले माझे गुरु आहेत याचा मला अभिमान वाटतो आणि फुले म्हणतात की, मी ज्यांच्या प्रेरणेतून घडलो, ते माझे गुरु छत्रपती शिवाजी महाराज आहेत. छत्रपती शिवाजी महाराज तुकाराम महाराजांना गुरु मानतात, तुकाराम महाराज नामदेवांच्या विचारांमुळे पुढे गेले आणि तथागत गौतम बुद्धांच्या समतेच्या विचारांमुळे नामदेव प्रेरित झाले. अशी ही महामानवांच्या विचारांची अतूट शृंखला असल्याचे हभप गणेश महाराज फरताळे यांनी यावेळी उपस्थितांना सांगितले.
छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीही अंधश्रद्धा मानली नाही. त्यांनी केलेले सर्व युद्धही अमावस्येच्या रात्री केल्याचे फरताळेनीं नमूद केले. शेतकऱ्यांचे कर्ज आणि गहाणखत सर्वात प्रथम संत तुकाराम महाराजांनी माफ केले, जिजाईचा जन्म झाल्यानंतर वयाच्या सातव्या वर्षापासून घोडा चालवणे, दांड पट्टा व तलवार चालवणे या सर्व युद्धकौशल्याचे डावपेच त्यांना म्हाळसा राणीनीं शिकवले, गुलामगिरीतून मुक्त करण्याचा मार्ग जिजाईला वडीलांनी वयाच्या सातव्या वर्षी दाखवला, तो आजन्म जिजाईने मनात बाळगला आणी महाराष्ट्राला गुलामगिरीतून मुक्त केले. आजची तरुणाई आणि महिला, मुली या टेलिव्हिजन मधील अनाठाई मालिका पाहून विचारापासून भरकटत आहेत. असेही त्यांनी सांगितले.
जिजाईने सती प्रथेविरुद्ध प्रथम बंड पुकारला. मनुस्मृतीतील जाचक चालीरीतींना येथील बहुजन समाज बळी पडला होता. मात्र, बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला. त्यांनी बनवलेल्या संविधानामुळे या मनुस्मृतीचा नायनाट करून, सामान्य माणसाला जगण्याचा अधिकार त्यांनी निर्माण करून दिला. यावर स्वातंत्र चळवळीतील उदाहरण देताना गणेश फरताळे यांनी सांगितले की, एकदा बॅरिस्टर जीना, डॉक्टर आंबेडकर व गांधी यांना भेटण्यासाठी इंग्रज अधिकारी आला होता. यांना उशिरा भेट देण्यासाठी आला असताना, गांधी व जिना हे झोपले असल्याचे समजले. मात्र, अपरात्री बाबासाहेब जागे असल्याने त्यांने बाबासाहेबांची भेट घेत प्रश्न केला की, तुम्ही जागे का? त्यावर बाबासाहेबांनी गांधी आणि जिनाचा समाज जागृत असल्यामुळे ते झोपले आहेत. माझा समाज झोपलेला (अज्ञानात) असल्यामुळे मला जागृत राहणे गरजेचे असल्याचे सांगितले. अशा विविध ऐतिहासिक संदर्भातून ह-भ-प गणेश फरताळे (महाराज) यांनी या व्याख्यानमालेत उपस्थितांचे प्रबोधन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष इथापे व प्रदीप खामगळ यांनी केले. कार्यक्रमांमध्ये प्रस्तावित ऍड. संभाजीराव बोरुडे यांनी केले. तर, आभार प्रदर्शन मुकुंदराव सोनटक्के यांनी मानले.
या कार्यक्रमासाठी विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यामध्ये मच्छिंद्र काका सुपेकर, हभप बाळासाहेब धोत्रे महाराज, निसार भाई बेपारी (नगरसेवक) संभाजी ब्रिगेडचे अरविंद कापसे, नानासाहेब शिंदे, वैभव सोनटक्के, ad. महेश लोणकर, बापूराव माने, जावेद सय्यद, पत्रकार राजू शेख, पत्रकार शकील भाई शेख, अमीन भाई शेख, राजेंद्र औटी, (प्रहार संघटनेचे) वामन भाऊ भदे, बाळासाहेब दांडेकर, सुरज घोडके, प्रशांत लांडगे, हनुमंत माने, सह संत शेख महंमद बाबा ट्रस्ट, सामाजिक ऐक्य परिषद, सावित्री फातिमा विचार मंच, फुले – शाहू – आंबेडकर विचार मंच, प्रहार संघटना तसेच संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
स्त्रोत:(दिनांक १३ फेब्रुवारी रोजी आयोजित कार्यक्रम)
