दिनांक १२ नोव्हेंबर, श्रीगोंदा:
मल्हारराव पर्वती घोडके (मा.सभापती जि.प.समाजकल्याण समिती अ.नगर)यांच्या निधनाने श्रीगोंदा तालुक्याचा चालता बोलता इतिहास काळाच्या पडद्याआड गेला.जुन्या पिढीतील एक महत्वाचा दुवा निखळला.नव्या पिढीला त्यांच्या कार्यकर्तृत्वाची फेर ओळख असायला हवी,म्हणून हा पंक्ती प्रपंच.
‘साहेब’किंवा ‘चेअरमन’ या नावाने ते निकटवर्तीयांत परिचित.तरुणपणी ते मुंबईत कामाला होते.तेथे आंबेडकरी चळवळीशी त्यांचा सम्बन्ध आला.ते उत्तम शाहीर होते,कवी अन लेखक होते.संगीताची त्यांना उत्तम जाण होती.मुंबई सोडून ते १९५६ च्या सुमारास मायभूमीत आले.प्रथम ते ग्राम पंचायत सदस्य झाले.नंतर पंचायत समिती सदस्य.अन पुढे ते जिल्हा परिषद सदस्य.तत्पूर्वी ते श्रीगोंदा पंचायत समितीचे सभापती होते.तेव्हाचे सभापती कुंडलीकराव जगताप यांच्या विरोधात बाबासाहेब भोस यांनी अविश्वास ठराव आणला होता,सदस्य पळवा पळवीच्या प्रयत्नांत श्री.घोडके यांच्यावर हल्ला झाल्याची अफवा गावात पसरली अन एकदम तणाव निर्माण झाला.नंतर गोळीबार झाला.तालुक्यातील ती पहिली राजकीय दंगल.भोस विरुद्ध जगताप या संघर्षातून झाली. घोडके तेव्हा उपसभापती होते.पुढे ते मांडवगण जि.प.राखीव मतदार संघातून विजयी झाले. मा.केंद्रीय मंत्री पदमभूषण बाळासाहेब विखे यांच्या मुळे ते जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण समितीचे चेअरमन झाले.तब्बल बारा वर्षे ते या पदावर होते. १९८५ ला कर्जत-जामखेड राखीव विधानसभा मतदार संघातून त्यांना काँग्रेसची उमेदवारी जाहीर झाली होती.विद्यमान आमदार निकाळजे गुरुजी यांना तिकीट नाकारण्यात आले .आकाशवाणीवर तशी बातमी प्रसारित झाली.मात्र तेव्हाचे मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी जोरदार ताकद लावून ही उमेदवारी दिल्लीश्वरांना बदलण्यास भाग पाडले.विठ्ठलराव भैलूमेना उमेदवारी मिळाली व ते निवडून आले. श्री.घोडके यांच्या हाता तोंडाशी आलेला आमदारकीचा घास काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजीने हिरावला गेला. पुढे मांडवगण जिल्हा परिषद गटातून उमेदवारी साठी अनेक स्पर्धक तयार झाले. बाळासाहेब चव्हाण हे रिपब्लिकन पक्षाचे (आठवले गट) यांनी बाजी मारली व घोडकेसाहेब निवडणुकीच्या राजकारणातून बाहेर पडले ते कायमचे.
समाजकारण व राजकारणात मात्र ते सक्रिय होते.विशेष म्हणजे ज्येष्ठ नेते बाळासाहेब विखे जिकडे असत तिकडे ते आपसूक खेचले जात.प्रदीर्घकाळ सत्तेत राहून देखील त्यांनी साधन-संपत्तीचा मोह अन संचय केला नाही.या अर्थाने ते पक्के निर्मोही अन विरक्त त्यागमूर्ती होते.

श्रीगोंदयात सामाजिक अन धार्मिक सद्भाव कायम रहावा म्हणून त्यांचे खूप मोठे उपकार या भूमीवर आहेत.ज्येष्ठ नेते मुरलीधर (अण्णा) होनराव अन घोडके साहेब यांनी येथे धार्मिक ऐक्याची पताका येथे रोवली ती उंचावली अन टिकवली.शहरात जेव्हा कधी धार्मिक ताण-तणावाचे प्रसंग उभे राहिले ते निवळण्यात या दोघांचा सिंहाचा वाटा असत.त्यांच्या शब्दाला सर्व समाजात वजन होते. काही अप्रिय घटनांमुळे श्रीगोंदयात २००१ च्या दरम्यान जेव्हा गावबंद व आंदोलन झाले तेव्हा भैरवनाथ मंदिरात ग्रामस्थांची मोठी बैठक सुरू होती.तरुण वर्ग संतप्त होता.केव्हाही मोठा भडका अन उद्रेक होईल असे चित्र होते.गावकऱ्यांच्या या गर्दीत तेव्हा दोन जण दुसरी बाजू मांडण्यास आले.त्यांना पाहून गर्दीचा नूर पालटला.या दोन व्यक्ती म्हणजे एक दिवंगत डी.एम.भालेराव अन दुसरे मल्हारराव घोडके.गर्दीतून कोणी त्यांना ब्र उच्चारला नाही.इतक्या कठीण प्रसंगाला सामोरे जाण्याचे नैतिक अन सामाजिक बळ त्यांच्या अंगी होते.मी स्वतः याचा साक्षीदार आहे.
काहीकाळ ते पाथर्डी पंचायत समितीचे सभापती होते,हे अनेकांना खरे वाटणार नाही.तेथील रिक्त सभापतीचा पदभार जिल्हा परिषद सदस्य म्हणून घोडके साहेब यांच्या कडे होता.माजी केंद्रीय मंत्री पी.शिवशंकर यांचे त्यांच्याशी घनिष्ठ नाते. माजी मंत्री एकनाथ गायकवाड (नामदार वर्षा गायकवाड यांचे पिताश्री) हे त्यांचे जिवलग मित्र.रुपवते पिता-पुत्र,एन.एम कांबळे, एन.के पी.साळवे (ऍड.हरीश साळवे यांचे वडील) मा.उप मुख्यमंत्री रामराव आदिक,एस.एम.आय. असिर आदी नेत्यांशी त्यांचा खूप जिव्हाळा होता. सत्तेच्या वर्तुळात दीर्घकाळ वावर असून देखील त्यांचे पाय जमिनीवर होते.गोरगरिबां विषयी तळमळ अन जिव्हाळा मनात शेवट पर्यंत होता. माझ्या लेखाचे ते चाहते होते, अन माझ्यावर त्यांचा विशेष अनुग्रह देखील होता. त्यांची भेट म्हणजे एक वैचारिक मेजवानी असत.आज आम्ही या वैचारिक भरण-पोषणाला कायमचे मुकलो आहोत. आयुष्यात अनेक संकटे ,वारा-वादळे अंगावर घेणारे ‘साहेब’ त्यांचे धाकटे सुपुत्र मानव घोडके यांच्या आकस्मिक निधनाने पूर्ण खचले होते.त्यांना भेटल्यावर हे वारंवार जाणवायचे.आज त्यांची प्राणज्योत मालवली,अन श्रीगोंदयाचा चालता बोलता इतिहास काळाच्या पडद्या आड गेला.
त्यांच्या स्मूर्तींना भावपूर्ण आदरांजली…
जब तू आया जगत मे जग हंसा तू रोये..
ऐसी करणी कर चलो,तू हसे जग रोये…
( संत कबीर)
आरीफ शेख (मुक्त पत्रकार-लेखक)
बहुजन समता पत्र वृत्तपत्रातर्फे दलित मित्र मल्हाराव घोडके यांना भावपूर्ण श्रद्धांजली💐
