दिनांक २४ एप्रिल,श्रीगोंदा:
अनेक कोव्हिड पेशंट रेमडीसिव्हीर अभावी जीवन-मृत्यूशी संघर्ष करीत होते. प्रशासनाकडून मात्र उपलब्ध रेमडीसिव्हीर वितरणाची परवानगी वेळीच मिळत नव्हती. अर्ध्या तासात रेमडीसिव्हीर न दिल्यास ती ‘लुटून’ रुग्णांना देण्याचा इशारा राष्ट्रवादी युवकचे जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण शेलार यांनी दिला. यावेळी त्यांच्यासोबत युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ऋषिकेश गायकवाड, शाम जरे व राजेंद्र काकडे उपस्थित होते. त्यानंतर सदरील रेमडीसिव्हीर वितरित करण्याचे आदेश प्रशासनाने दिल्यावर रुग्णांचा जीव भांड्यात पडला.

या संदर्भात श्री.शेलार यांनी माध्यमांशी बोलताना दिलेली माहिती अशी,”रेमडीसिव्हीर इंजक्शनचे साठ नग काल रात्रीपासून येथील एका मेडिकल मध्ये उपलब्ध होते. औषध निरीक्षक व जिल्हाधिकाऱ्यांनी नेमलेले अधिकारी यांच्या परवानगी शिवाय त्याची विक्री करता येत नव्हती. या बाबत प्रशासनाने सदरील मेडिकलला विक्री बाबत सूचना दिल्या नव्हत्या. म्हणून, औषध विक्रेता सदर इंजेक्शन रुग्णांना देत नसल्याची बाब समोर आली. त्यावर शेलार व गायकवाड यांनी तहसीलदार पवार यांच्याशी संपर्क केला. ही बाब आपल्या अखत्यारीत नसल्याने आपण रेमडीसिव्हीर विक्रीचा आदेश देऊ शकत नसल्याचे म्हणत, त्यांनी हात वर केले. त्यानंतर नगरच्या औषध निरीक्षक व जिल्हाधिकारी कार्यालयातील संबंधित अधिकाऱ्यांना फोन केला. आपण मिटिंग मध्ये असून, नंतर या बाबतचे आदेश देऊ, असे म्हणत टोलवाटोलवी केली. यावर शेलार भडकले व त्यांनी प्रशासनास अर्धा तासाची मुदत दिली. या कालावधीत जर रेमडीसिव्हीर विक्रीचा आदेश न आल्यास सदर इंजेक्शन मेडिकल मधून ‘लुटून’ ते रुग्णालयात गरजूंना देण्याचा इशारा त्यांनी दिला. आमच्यावर हवे ते गुन्हे नोंदवा, असे आव्हान देखील त्यांनी दिले. त्या नंतर अर्ध्या तासाच्या आत प्रशासनाने हालचाल करून इंजेक्शन विक्रीचा आदेश काढला. अन हे साठ इंजेक्शन शहरातील विविध रुग्णांना देण्यात आले. अशाप्रकारे या नाट्यावर पडदा पडला.
🔶पाच रुग्णाच्या मृत्यूस कोण जबाबदार ?
रेमडीसिव्हीर इंजेक्शन उपलब्ध असतानाही केवळ आदेश नसल्याने २४ तास वाट पाहावी लागली. या दरम्यान पाच रुग्ण दगावले. वेळीच इंजेक्शन भेटले असते. तर, त्यांचे प्राण वाचले असते. या मृत्यूस जबाबदार कोण ? असा सवाल शेलार यांनी विचारला आहे. आदेश देण्यास विलंब करणाऱ्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करण्याची मागणी करणार असल्याचे ते म्हणाले.

🔶रुग्ण मरत असताना बैठक महत्वाची !
वरील प्रकरणात रेमडीसिव्हीर साठी संबंधित अधिकाऱ्यांकडे संपर्क केला असता दोघांनी देखील आपण बैठकीत असल्याचे सांगितले. औषधा अभावी रुग्ण मरत असताना बैठक महत्वाची होती का ? अधिकाऱ्यांनी आपल्यातील ‘माणूस’ मरू देऊ नये, अशी तिखट प्रतिक्रिया राजेंद्र काकडे व शाम जरे या कार्यकर्त्यांनी वरील प्रसंगी व्यक्त केली.
स्रोत:(प्रसिद्धीपत्र)
प्रतिकात्मक फोटोचा वापर करण्यात आला आहे.
