नागरिक आणि वाहनांच्या ये- जा करण्यावर प्रतिबंध.
जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी केले आदेश जारी.
दिनांक १४ मे,अहमदनगर:
अहमदनगर शहराच्या काही भागात कोरोना रुग्ण आढळून आल्याने,या परिसरातील कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरु केल्या आहेत. यात, शहरातील रामचंद्र खुंट, पोखरणा हॉस्पिटल, झेंडीगेट चौक, मनपा प्रभाग कार्यालय शाळा क्र.4, आंबेडकर चौक, जुने तालुका पोलीस स्टेशन, जिल्हाधिकारी कार्यालय उत्तर-पश्चिम बाजू, हॉटेल कल्याण, डावरे गल्ली, नालबंद खुंट व रामचंद्र खुंट हे क्षेत्र हॉटस्पॉट पॉकेट म्हणुन व या क्षेत्राच्या मध्यबिंदु पासुन जवळपास २ कि.मी चा परिसर हा कोअर एरिया म्हणून घोषित करण्यात आला आहे.
जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी यासंदर्भात आदेश जारी केले आहेत. या क्षेत्रातील सर्व आस्थापना, दुकाने, अत्यावश्यक सेवा, वस्तु विक्री इत्यादी दिनांक १४ मे रोजीच्या सकाळी ०६ वाजेपासून ते दि.२७ मे, २०२० रोजी रात्री १२ वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. या क्षेत्रात नागरिक आणि वाहनांच्या ये-जा करण्यासही प्रतिबंध करण्यात आला आहे. कोव्हीड 19 चा प्रार्दुभाव रोखण्यासाठी सर्व उपाययोजनांच्या सनियंत्रणाचे कामकाज जिल्हाधिकारी यांचे नियंत्रणाखाली जिल्हाधिकारी कार्यालय येथून करण्यात येत असल्याने,जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर हा या प्रतिबंधातून वगळण्यात आला आहे.
राज्य शासनाने कोरोना विषाणूचा (कोव्हीड 19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथ रोग अधिनियम 1897 दिनांक १३ मार्च २०२० पासून लागू करुन खंड २,३,४ मधील तरतुदीनुसार अधिसुचना निर्गमित केलेली आहे. त्याअन्वये जिल्हाधिकारी हे त्यांचे कार्यक्षेत्रात कोव्हीड-19 वर नियंत्रण आणण्यासाठी व त्यांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या उपाययोजना करणे आवश्यक आहे.त्या करण्यासाठी सक्षम प्राधिकारी घोषीत करण्यात आलेले आहेत. त्यानुसार हे आदेश जारी करण्यात आले आहेत.
या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी स्थानिक प्रशासनाने खालील प्रमाणे कार्यवाही करावी, असे आदेशित करण्यात आले आहे. यात, सार्वजनिक ध्वनिक्षेपकाद्वारे हा आदेश उद्घोषित करण्यात यावा.
कंट्रोल रुम स्थापन करुन 24 x 7 कार्यरत ठेवावी. त्याठिकाणी ३ ते ४ अधिकारी / कर्मचारी यांची नेमणूक करण्यात येवून प्रत्येक शिफ्टमध्ये कार्यरत अधिकारी / कर्मचारी यांचे मोबाईल क्रमांक प्रसिध्द करण्यात यावेत. कंट्रोल रुम मध्ये रजिस्टर ठेवून त्यामध्ये नोंदी घेण्यात याव्यात व नागरीकांना आवश्यक त्या जिवनावश्यक वस्तु सशुल्क पुरविण्यात याव्यात. तसेच,प्राप्त होणा-या सर्व तक्रारींचे निरसन करण्यात यावे. सदर क्षेत्रातील रहिवाशी यांना आवश्यक असणा-या बाबी जसे दुध, भाजीपाला, फळे, किराणा, औषधे इत्यादी बाबी योग्य ते शुल्क आकारुन शासकीय यंत्रणेमार्फत पुरविण्यात याव्यात. त्याकामी जिवनावश्यक वस्तुंचे व्हेंडर निश्चित करुन, पथके तयार करुन खरेदी व विक्री, वाहतुक इत्यादी बाबींचे सुक्ष्म नियोजन करावे.
अहमदनगर शहरातील रामचंद्र खुंट, पोखरणा हॉस्पिटल, झेंडीगेट चौक, मनपा प्रभाग कार्यालय शाळा क्र.४, आंबेडकर चौक, जुने तालुका पोलीस स्टेशन, जिल्हाधिकारी कार्यालय उत्तर-पश्चिम बाजू, हॉटेल कल्याण, डावरे गल्ली, नालबंद खुंट या ठिकाणी आयुक्त, मनपा अहमदनगर हे सनियंत्रण अधिकारी म्हणून कामकाज पाहतील. या क्षेत्रातील सर्व बँकांनी बँकींग सुविधा बॅंक प्रतिनिधीमार्फत उपलब्ध करुन द्याव्यात. पोलीस विभागाने सर्व पर्यायी रस्ते बंद करुन एकच रस्ता मुव्हेबल बॅरिकेडस द्वारे खुला ठेवावा. सदर क्षेत्रामध्ये सेवा देणा-या सर्व शासकीय कर्मचारी यांना संबंधीत सनियंत्रण अधिकारी यांनी ओळखपत्र द्यावेत. प्रतिबंधीत भागामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव अधिक असल्याचे निदर्शनास आल्याने येथील नागरीकांच्या हालचालींवर निर्बंध आणने आवश्यक ठरले आहे. त्यामुळे सदर भागातील नागरिकांना विविध कारणांसाठी शासकीय आस्थापनांकडून देण्यात आलेल्या वाहन वापर व वाहतुकीची सवलत रद्द करण्यात येत असल्याचे आदेशात म्हटले आहे.
या क्षेत्रातील इतरत्र कर्तव्यार्थ असलेल्या व्यक्तींना प्रतिबंधीत क्षेत्रातून कर्तव्याच्या ठिकाणी जाणे आवश्यक असल्यास, अशा व्यक्तींची त्यांच्या कर्तव्याच्या ठिकाणी वास्तव्याची सुविधा संबंधीत आस्थापनांनी उपलब्ध करुन दयावी. जेणेकरुन कोरोना संक्रमणशील क्षेत्रातील त्यांच्या हालचालींवर निर्बध घालणे शक्य होईल.
कोणतीही व्यक्ती/संस्था/संघटना यांनी उक्त आदेशाचे उल्लंघन केल्यास ते भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) च्या कलम 188 नुसार दंडनिय / कायदेशीर कारवाईस पात्र राहतील, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
(वृत्तसंस्था)
