दिनांक १८ जानेवारी २०२५, श्रीगोंदा:
श्रीगोंदा तालुक्यात रात्री गोळीबार झाल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई सुरू केली. पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांनी तातडीची बैठक घेऊन स्थानिक गुन्हे शाखेला सक्रिय केले. मात्र, पहिल्या टप्प्यात गोळीबाराचे नेमके ठिकाण व प्रकाराचा उलगडा झाला नाही.

सकाळी गुप्त माहितीच्या आधारे, गोळीबाराचा प्रकार काष्टी येथील शिवराज हॉटेलमध्ये झाल्याचे समोर आले. हॉटेल मालक सुभाष पाचपुते यांच्या सांगण्यानुसार, रात्री जेवणासाठी आलेल्या दोन गटांमध्ये सिगारेट बिलावरून वाद झाला. या वादातून वैभव चौधरी आणि साई मदने यांनी गावठी पिस्तुलातून गोळीबार केल्याचे निष्पन्न झाले. या घटनेत कोणी जखमी झालेले नाहीत.

गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या आरोपींवर गुन्हे दाखल..
वैभव चौधरी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर १६ गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. साई मदने यांच्यावर देखील ३ गुन्ह्यांची नोंद आहे. या घटनेत चौधरी आणि मदने यांच्यावर खुनाचा प्रयत्न व भारतीय हत्यारबंदी कायद्याच्या कलम ३/२५ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सहआरोपींच्या सहभागाची शक्यता वर्तवली जात असून तपास चालू आहे.

पोलिसांची तातडीची कारवाई:
पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने ही घटना उघडकीस आणली. यामध्ये पीएसआय निमकर, पीएसआय कन्हेरे, पोना गोकुळ इंगवले, संदीप शिरसाठ, संदीप राऊत, अरुण पवार यांचा समावेश होता. आरोपींना अटक करण्यासाठी विशेष मोहीम राबवण्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले.

पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांनी नागरिकांना आवाहन केले की, या गुन्हेगारां विरोधात पुरावे किंवा माहिती असल्यास ती पोलीस ठाण्यात द्यावी. तसेच यापूर्वी कोणी पीडित यांच्यापासून दबावाखाली असल्यास त्यांनी पोलिसांना माहिती द्यावी. स्थानिक प्रशासनाने गुन्हेगारी टोळ्यांविरोधात कडक पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे.
स्रोत: (अधिकृत माहिती)

जाहिरात..
