श्रीगोंदा: पिंपळगाव पिसा बाजारात चप्पल विक्रेत्या महिलेला जातीवाचक शिवीगाळ व मारहाण.. ॲट्रॉसिटी चा गुन्हा दाखल करण्यास प्रशासनाकडून विलंब..?

दिनांक ३सप्टेंबर २०२४,श्रीगोंदा:

जाहिरात…

तालुक्यातील पिंपळगाव पिसा येथे ३० ऑगस्ट २०२४ रोजी आठवडे बाजारात चप्पल विक्री व्यवसाय करणाऱ्या महिलेसह तिच्या पतीला मारहाण व जातीवाचक शिवीगाळ केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

घटनेच्या दिवशी नमुद महिला व तिचे पती पिंपळगाव पिसा येथील आठवडे बाजारात चप्पल विक्रीसाठी दुकान लावून होते. सायंकाळी ७:३० च्या सुमारास, बाजार आवरत असताना चंदु आप्पासाहेब पंधरकर नावाच्या व्यक्तीने आपल्या मोटारसायकलवरून जात असताना त्यांच्या दुकानात थांबून, “तुझ्या पालाचा खिळा माझ्या गाडीला लागून मी पडलो असतो” असे म्हणून त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. पुढे चंदु पंधरकर यांनी “चांभारांनी येथे दुकान लावायचे नाही” असे जातीवाचक अपशब्द वापरले व “तुमची औकात काय आहे इथे दुकान लावायची?” असे म्हणत धमकी दिली.

या हल्ल्यात चंदु पंधरकर याने महिलेच्या पदराला हात घालून त्यांना ओढले, तसेच पीडित महिलेच्या पतीने हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला असता, त्यांना देखील मारहाण करण्यात आली. चंदु पंधरकर यांनी त्यांच्या पॅन्टची चैन काढून अश्लील शिवीगाळ करत सदरील दांपत्याचा अपमान केला.

या घटनेनंतर घाबरलेल्या पीडित कुटुंबाने तातडीने पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तर या गंभीर घटनेबाबत पोलिसांनी अदाखलपात्र गुन्ह्याची नोंद केली. मात्र ३१ ऑगस्ट २०२४ रोजी काही मध्यस्थांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला व तक्रार न देण्याची विनंती केली. तसेच, तक्रार दिल्यास खोट्या केसांमध्ये अडकवण्याची धमकी दिली. या घटनेचा सर्वांगीण विचार करून, यांनी अखेर बेलवंडी पोलिस ठाण्यात हजर होऊन आपली फिर्याद दाखल केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा ॲट्रॉसिटी नुसार गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू आहे.

परंतु या प्रकरणी गुन्हा दाखल होण्यासाठी स्थानिक पोलीस प्रशासनाबरोबर संघर्ष करावा लागला. ॲट्रॉसिटी सारखा गंभीर प्रकरणांमध्ये तात्काळ गुन्हा दाखल करण्याची तरतूद असताना गुन्हा दाखल करण्यासाठी स्थानिक प्रशासन विलंब करत असल्याचे या प्रकरणातून समोर आले आहे. तसेच या पीडित कुटुंबाला न्याय देण्याच्या भूमिकेमध्ये श्रीगोंद्यातील सामाजिक कार्यकर्त्या व उपविभागीय दक्षता व नियंत्रण समितीच्या सदस्य मीराताई शिंदे यांनीही मदत केली व पाठपुरावा करून सदर कुटुंबाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे.

स्रोत:(फिर्याद)

जाहिरात…

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading