दिनांक ३ सप्टेंबर २०२४,कोळगाव, श्रीगोंदा:
श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय श्रीगोंदा व अनुराधाताई नागवडे विचार मंच यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शहीद स्मरण यात्रेच्या निमित्ताने अहमदनगर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा अनुराधा नागवडे यांनी कोळगाव येथे शहीद जवानांच्या कुटुंबीयांचा सन्मान करताना, सध्याच्या पिढीने मागील पिढीने देशासाठी दिलेल्या बलिदानाचे स्मरण ठेवणे आणि देशसेवेत योगदान देणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले.
श्रीगोंदा तालुक्यात विविध लढायांमध्ये शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचा सन्मान करण्यासाठी तसेच त्यांच्या बलिदानाची आठवण आणि संवेदना जागृत ठेवण्यासाठी श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय व नागवडे विचार मंच यांच्या वतीने शहीद स्मरण यात्रेचे आयोजन करण्यात आले होते.
शहीद स्मरण यात्रेच्या कार्यक्रमात बोलताना नागवडे म्हणाल्या, “कोळगाव ही वीरांची भूमी आहे. येथील असंख्य सैनिकांनी देशासाठी आपल्या प्राणांची बाजी लावली आहे. काहीजण पहिल्या महायुद्धात, काहीजण दुसऱ्या महायुद्धात, तर काहीजण कारगिल युद्धात शहीद झाले. या शहीद जवानांनी दिलेल्या बलिदानाचे स्मरण करून त्यांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना जागवणे आपले कर्तव्य आहे. सध्याच्या पिढीने शिस्तबद्ध जीवन जगत सैन्यात भरती होऊन देशासाठी योगदान दिले पाहिजे. माझी स्वतःची इच्छा आहे की मला तिरंगा ध्वजामध्ये लपेटून मरण आले पाहिजे; परंतु हे भाग्य काहींच्याच वाट्याला येते.”
नागवडे यांनी पुढे सांगितले की, स्वर्गीय बापूंच्या विचारांनी प्रेरित होऊन, त्यांच्या वारशाचा सन्मान राखत, राजेंद्र नागवडे यांच्या मार्गदर्शनाखाली समाजाच्या सेवेसाठी अधिकाधिक चांगली कामे करण्याचा प्रयत्न केला जात आहे. श्रीगोंदा येथे शहीद जवानांच्या स्मारकासाठी जागा उपलब्ध करून दिली असून, स्मारकाचे कामकाज सुरू झाले आहे. नागवडे कुटुंब दिलेला शब्द पाळते आणि काम पूर्णत्वास नेते, असेही त्यांनी नमूद केले.
शहीद स्मरण यात्रा २ सप्टेंबर रोजी सकाळी सात वाजता श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय श्रीगोंदा येथून सुरू झाली. ती कोळगाव, उक्कलगाव, मुंगुसगाव, चांभूर्डी, राजापूर, एरंडोली, घारगाव, लोणी व्यंकनाथ, चिंभळे, लिंपणगाव, अजूनज मार्गे जाऊन चांडगाव येथे समारोप झाला.
कोळगाव येथे शहीद स्मरण यात्रेचे आगमन झाले असता, कोळगावच्या आजी-माजी सैनिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी, कोळगाव ग्रामपंचायत व सोसायटी यांनी यात्रेचे उत्साहात स्वागत केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सोसायटीचे चेअरमन हेमंत नलगे यांनी केले, तर आभार कोळगावचे लोकनियुक्त सरपंच पुरुषोत्तम लगड यांनी मानले. या प्रसंगी, आजी-माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष विश्वनाथ लगड, ज्ञानदीप शिक्षण संस्थेचे इन्स्पेक्टर सचिन लगड, श्रीगोंदा कारखान्याचे संचालक आप्पासाहेब काकडे यांनी आपली मनोगते व्यक्त केली. सूत्रसंचालन प्राध्यापक योगेश शेलार यांनी केले.
शहीद स्मरण यात्रेत कोळगावमधील कारगिल युद्धातील शहीद जवान सचिन साके, भाऊसाहेब तळेकर, भारत-पाक युद्धातील श्रीपती कलगुंडे, पहिल्या महायुद्धातील श्रीपती लगड यांचा उल्लेखनीय सन्मान करण्यात आला. तसेच मारुती केरबा नलगे, संजय विनायक देशमुख, सुभाष श्रीरंग लगड यांना कर्तव्य बजावत असताना वीरमरण आले होते. या शहीद जवानांच्या कुटुंबीयांचा शाल, श्रीफळ, मिठाई व पुष्पगुच्छ देऊन आदरपूर्वक सन्मान करण्यात आला.
शहीद जवान भाऊसाहेब तळेकर यांच्या मातोश्री आणि सचिन साके यांच्या भगिनी यांच्या डोळ्यांत अश्रू अनावर झाले, ज्यामुळे उपस्थितांच्या डोळ्यांत पाणी आले. शहीद स्मरण यात्रेचा समारोप कोळगावच्या वीर शहिदांच्या कुटुंबीयांच्या सन्मानाने भावपूर्ण वातावरणात पार पडला.

स्रोत:(पत्रकार महेश शिंदे)







