श्रीगोंदा: संत रविदास व छत्रपती शिवाजी महाराज संयुक्त जयंती उत्साहात साजरी.. महापुरुषांच्या विचारमंथनातून संविधानाची निर्मिती: साहित्यिक लहू कानडे..

दिनांक १७ फेब्रुवारी २०२५, श्रीगोंदा:

शहरातील संत शेख महंमद बाबा दर्गा समोरील पटांगणात सावित्री फातिमा विचार मंच, फुले-आंबेडकर विचार मंच आणि ॲड.संभाजीराव बोरूडे यांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून संत रविदास आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची संयुक्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

महापुरुषांचे विचार समाजापर्यंत पोहोचवण्याचा निर्धार

या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून अरुण जाधव यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, “गुलामीच्या विचारसरणीतून समाजाला बाहेर काढण्यासाठी अनेक महापुरुषांनी संघर्ष केला. त्यांचे विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणे हे आपले कर्तव्य आहे. ही भूमी विचारांची भूमी असून, छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा वारसा लाभलेली आहे.”

संत रविदासांचा समतेचा संदेश महत्त्वाचा – माजी आमदार लहू कानडे

प्रमुख वक्ते माजी आमदार आणि साहित्यिक लहू कानडे यांनी संत रविदास आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांवर प्रकाश टाकला. ते म्हणाले, “संत रविदासांनी ‘मै चाहु ऐसा राज जहा हो छोटा बडा एक समान’ असे म्हटले होते. हीच समतेची संकल्पना शिवरायांनी त्यांच्या राज्यकारभारात अमलात आणली.”

ते पुढे म्हणाले, “महापुरुषांना व्यवस्थेने नेहमीच दडपण्याचा प्रयत्न केला. संत ज्ञानेश्वरांना कोवळ्या वयात समाधी घ्यावी लागली, संत तुकाराम महाराजांना सदेह वैकुंठगमन करावे लागले. पण, त्यांच्या विचारांचा प्रभाव अद्याप कायम आहे.”

बुद्धांचा विज्ञाननिष्ठ विचार आणि संविधानाचा महत्त्वपूर्ण दस्तावेज

कानडे पुढे म्हणाले, “भगवान बुद्ध हे पहिले महापुरुष होते, ज्यांनी विज्ञानवादी विचारांचा पुरस्कार केला. त्यांचा ‘चरयेती चरयेते चरे’ हा संदेश म्हणजे सातत्याने प्रगतीशील राहण्याची शिकवण आहे. संत कबीर, संत रविदास, संत तुकाराम, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आणि अण्णाभाऊ साठे यांच्या विचारसरणीच्या मंथनातून भारतीय संविधान तयार झाले. संविधानाने समता, स्वातंत्र्य आणि लोकशाही या मूल्यांवर आधारलेली नवी संस्कृती निर्माण केली.”

संविधान टिकवणे नवीन पिढीचे कर्तव्य – ॲड. वैशाली डोळस

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेल्या ॲड.वैशाली डोळस यांनी संविधान व महापुरुषांच्या विचारांवर भाष्य केले. त्यांनी सांगितले, “नगर जिल्ह्याला सत्यशोधक आणि पुरोगामी विचारांचा वारसा लाभला आहे. सामाजिक परिवर्तनासाठी महापुरुषांनी कठोर संघर्ष केला. त्यामुळेच, त्यांचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.”

कार्यक्रमास विविध मान्यवरांची उपस्थिती

या जयंती उत्सवाला प्राध्यापक बाळासाहेब बळे, अनिल ठवाळ, ॲड. प्रदीप खामगळ, बापू माने, संदीप उमाप, ॲड. वसंत शिंदे, सौ. अनुराधा ठवाळ, सौ. मनीषा घोडके, सौ. अंजली माने, सौ. रेश्मा घोडके, आमीन शेख, सौ. सुनीता दरोडे, शिवाजी ताडे, आप्पा मखरे तसेच फुले-शाहू-आंबेडकर विचार मंचचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्रोत:(जयंती उत्सव)

उपस्थित जनसमुदाय…

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading