काट्यावरची पोटं, उत्तम बंडू तुपे..
” सायेब , आम्ही कष्टाची कामं करतो . अंगाचं मास झिजतंय . त्यात या गरिबीनं चांगलं कसाचं खायालाबी भेटत न्हाय . ” ” बंडूनाना , तुमच्याकडं शेरडं , गाई आहेत. त्यांचं दूध रोज खाता . मग याची काय गरज ? “
” त्येचं असं हाय सायेब, कितीबी वडा वडला तरी परपंच्याला पुरत न्हाय. तवा कोर चतकोर भाकरी नि पितळीभर डल्ल्यावर वक्त काढावा लागतो . ” ” बरं , आज कुणी कुणी आणलंय ? आणि हे बघा उत्तमला बोलू नका. पोरगा चांगला आहे. खरं बोलतो. ” त्येला काय बोलत न्हाय. ” काका निघून गेलं. दादानं चांगली करांडी काढली. केली सुरुवात. मोठ्यानं रडायबी येईना झालं . तोंड दाबून बुक्क्यांचा मार .

कसं कुणाला ठावं ; काका फिरून आलं. तेवा माझी सुटका झाली. काकानं मला संगतीला घेटलं . नेलं आपल्या खोलीवर. अंगातली पैरन काढली. या ऽ बोटागत वळ उठलेलं, कसला मलम लावला. काकाबी झिटलून गेला. त्येंनी दादाला बोलावलं. तर दादाबी रडतेला. दादा आल्या आल्या मला पोटूशी धरून रडाय लागला. जन्म दिला हुता न्हवं ! हे बघून काकालाबी कसं गलबलून आल्यासारखं झालेलं . ” बंडूनाना , मुलाला शिक्षा करावी मूल चुकलं तर. उत्तमचं काय चुकलं नव्हतं . त्यानं मला पाच – सहा दिवसांपूर्वी सांगितलं होतं . कबूल केलं होतं डल्ली दाखवीन म्हणून. बोलल्याप्रमाणं त्यानं प्रामाणिकपणानं आपलं काम केलं. त्याची त्याला ही बक्षिसी मिळाली.
आत्ता तुम्ही मला शब्द दिला होता मारणार नाही म्हणून. पण तुम्ही तो पाळला नाही. या वयातच मुलांच्या मनावर काही संस्कार होतात तशीच ती फुडं वागतात. उत्तम प्रामाणिक आहे, हुशार आहे. त्याला असं मारून वाईट मार्गाला लावू नका. तुम्ही जे करताय ते चुकीचं करताय आसं तुम्हाला वाटत नाही, नि मला पण वाटत नाही. पण बाहेरून येणारी मराठा समाजाची मुलं तुमच्या मुलांना शिवून घेत नाहीत. ते तुम्ही हे खाता म्हणून. ” १९५२-५३ साली ही शिक्षणाची पायरी चढलो असावा. पहिल्या बुकाचं शिक्षण झालं हुतं . एक एक माणूस फड्यात पडत हुता . मला मात्तर अक्षरांची संगत जडली हुती. एक एक अक्षर मनात कोरलं जात हुतं . एकीकडं आई – दादाची धावपळ वाढत हुती.
भाऊ गावातल्या शाळंत जात हुता . तो धोतर नेसायचा . दादा, आई मातर फाटल्यालं शिवून सांदून नेसायचे. शिवाय दोरा आसला तरी सुई नसायची. सुई, दोरा आसला तर वेळ नसायचा. मग तशाच गाठी मारून अंग झाकायचं. वेळ तरी कसा मिळायचा ? आईला शेरडा – म्हसरांची भारी हौस. शेरडं, एक गाय नि कोंबड्या ही होतीच. फडं चिरता चिरता ही जितराबं सांभाळावी लागायची . त्यांची उसतपास .
क्रमशः
स्रोत:(उत्तम बंडू तुपे यांच्या काट्यावरची पोटं या कादंबरीतुन)
