दिनांक २४ फेब्रुवारी २०२५,श्रीगोंदा:
तालुक्यातील पाझर तलाव व गाव तलावांमधून होणारा अनधिकृत पाणी उपसा आणि बेकायदेशीर विहिरींच्या उत्खननामुळे पाण्याची पातळी घटत आहे. यामुळे उन्हाळ्यात तीव्र पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष शाम जरे यांनी प्रशासनाकडे अनधिकृत पाणी उपसा थांबवण्याची मागणी करत निवेदन दिले.
या मागणीची दखल घेत उपविभागीय जलसंधारण अधिकारी, जि.प. ल.पा. उपविभाग श्रीगोंदा यांनी तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींना अनधिकृत पाणी उपसा तात्काळ थांबवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच पाझर तलाव व गाव तलावांमध्ये बेकायदेशीर विहिरींचे उत्खनन व डी.पी. बसवण्यावरही बंदी घालण्यात आली आहे.
शासनाच्या परिपत्रकानुसार पाझर तलावांची जबाबदारी ग्रामपंचायतींची असून अनधिकृत उपशामुळे पाणी टंचाई निर्माण झाल्यास त्याची जबाबदारीही ग्रामपंचायतीवरच राहील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
शाम जरे यांनी पाझर तलावातील पाणीसाठा संरक्षित ठेवण्याची मागणी करत अनधिकृत उपशावर त्वरित कारवाई करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले.
स्रोत:(निवेदन)





Advertise..
