औटेवाडीत नागवडे यांची ग्वाही: आमदार झाल्यावर मूलभूत प्रश्न सोडवू:- अनुराधा नागवडे यांचे आश्वासन..

दिनांक १३ नोव्हेंबर २०२४,श्रीगोंदा:-

शहराजवळील औटेवाडी परिसरातील नागरिकांना विकासाच्या नावाखाली केलेल्या दूजाभावाचा त्रास सहन करावा लागत आहे. विजेचे दिवे आणि इतर विकासकामांमध्ये यापूर्वीच्या लोकप्रतिनिधींनी केलेली दुर्लक्ष पोटतिडकीने मांडत महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ. अनुराधा नागवडे यांनी औटेवाडीतील नागरिकांना आश्वासन दिले की, आपण आमदार झाल्यास या भागातील सर्व मुलभूत समस्यांवर समाधान करण्यासाठी काम करू. त्यांच्या मते, आमदार म्हणून कार्यभार सांभाळताना सर्वांना समान न्याय देणे आवश्यक आहे.

यावेळी नागवडे म्हणाल्या, “या परिसरात सणवार, उत्सव आणि सुखदुःखाच्या प्रसंगी नेहमीच उपस्थित राहिल्याने येथील लोकांशी माझा सुसंवाद झाला आहे. औटेवाडीतील लोकांना माझ्या स्वर्गीय सासरे शिवाजीराव नागवडे यांनी केलेल्या कामांची चांगली माहिती आहे. येथील नागरिकांनी अनेकदा आपल्या समस्या लोकप्रतिनिधींना मांडल्या; परंतु त्यांना केवळ आश्वासने मिळाली. मी मात्र त्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करीन.”

या प्रसंगी सुनंदा पाचपुते यांनी देखील नागवडे यांच्या गटाच्या बाजूने आधार व्यक्त केला. त्यांनी सांगितले की, स्व. सदा अण्णा पाचपुते यांनी या भागात अनेक समाजोपयोगी कार्ये केली असून, त्यांच्या आठवणी आजही लोकांच्या मनात जिवंत आहेत. “सदा अण्णा यांनी नागवडे गटाला दिलेला शब्द आम्ही पूर्ण करत आहोत,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

या भागातील नागरिकांनी यावेळी त्यांच्या समस्यांचा पाढा वाचत पाणीटंचाई, तलावांचे दुर्लक्षित व्यवस्थापन, आणि अपूर्ण विकासकामांचा उल्लेख केला.

माजी उपनगराध्यक्ष राजू दादा गोरे यांनी, नागवडे कुटुंबाची कामगिरी दाखवत, यशवंतराव चव्हाण आणि वसंत दादा पाटील यांच्या योगदानाची तुलना केली. त्यांनी आवाहन केले की, “जेवढे पायाभूत सुविधा शिवाजीराव नागवडे यांनी दिल्या त्याचा फायदा आजही जनतेला होतो. त्यामुळे नागवडे कुटुंबाला मदत करणे हे सर्वांच्या हिताचे आहे.”

सभेत संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अरविंद कापसे, माजी नगराध्यक्षा सौ. सुनीता शिंदे, एम. डी. शिंदे, शिवाजी शेळके, अशोक आळेकर आणि इतर कार्यकर्ते तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्रोत:(प्रसिद्धी पत्र)

जाहिरात..

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading