दिनांक १५ जून, श्रीगोंदा:
तालुक्यातील राजापूर येथील संतोष शिंदे या आंबेडकरी कार्यकर्त्यावर राजकिय दबाव वापरत जातीयवादी भूमिकेत बहिष्कृत करण्याच्या उद्देशाने दाखल करण्यात आलेले खोटे गुन्हे मागे घेण्यासाठी, काल दिनांक १४ जून रोजी श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर पुरोगामी चळवळीच्या विविध संघटनांच्या माध्यमातून धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामध्ये शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. नमूद प्रकरणी योग्य तपास करून कारवाई करण्यात येईल, असे पोलीस उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब जाधव यांच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलकांनी त्यांचे आंदोलन थांबवले.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, दिनांक २८ मे रोजी सामाजिक कार्यकर्ते संतोष शिंदे यांच्यावर बेलवंडी पोलीस स्टेशनचे (पोलीस निरीक्षक) संपतराव शिंदे व फिर्यादी राजाराम ढवळे यांनी संगनमताने दरोडा व भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हा दाखल केला होता. हा गुन्हा राजाराम चंदर ढवळे यांच्या सांगण्यावरून आर्थिक संबंध जोपासत दाखल केल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे.
संतोष शिंदे यांच्यावर गट नंबर १४०(राजपूर) मधील माती पिस्तुलचा धाक दाखवून उचलून नेल्याचा आरोप करण्यात येत आहे. पण, घटना घडली त्यावेळी संतोष शिंदे घटनास्थळी नव्हते. ज्या ठिकाणी ते होते तेथील व्हिडिओ फुटेज तसेच, पोलीस निरीक्षक व राजाराम ढवळे यांच्यात गुन्हा दाखल करण्यासंदर्भात झालेला वार्तालाप हे आर्थिक तडजोडी संदर्भात असल्याचेही कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.
संतोष शिंदे यांच्यावर (पोलीस निरीक्षक, बेलवंडी) संपतराव शिंदे व फिर्यादी राजाराम ढवळे यांनी बेबनाव करून, त्यांच्या वैयक्तिक स्वार्थापोटी गुन्हा दाखल केला आहे. एका आंबेडकरवादी कार्यकर्त्याला गावातुन बहिष्कृत करीत, स्वतःचे हित जोपासण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप याठिकाणी करण्यात आला. माती चोरल्यानंतर लावलेला दरोड्याचा गुन्हा व घटनास्थळी उपस्थित नसतांना भारतीय हत्यार कायद्यानुसार केलेली कारवाई असंविधानिक असून, हा खोटा गुन्हा मागे घ्यावा, यासाठी हे आंदोलन करण्यात आले. परंतु, पोलीस उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब जाधव यांनी नमूद प्रकरणी चौकशी करून, सबंधितांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल. असे आश्वासन असणारे लेखी पत्र आंदोलकांना दिले.

या आंदोलनाची दिशा तीव्र करून, स्थानिक प्रशासन प्रमुख (प्रांताधिकारी) स्वाती दाभाडे यांना कार्यालयातून बाहेर जाऊ न देता त्यांची गाडी अडवत मागणी पूर्तता होईपर्यंत आंदोलन करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला होता. तसेच, (पोलीस अधीक्षक, अहमदनगर) मनोज पाटील यांना भेटून या प्रकारणाबरोबरच स्थानिक प्रशासनाची वास्तविक परिस्थिती व परिसरात चाललेला अनागोंदी कारभार लक्षात आणून देण्याचे आंदोलकांनी ठरवले होते. मात्र, वेळेत प्रशासनाने दखल घेत कार्यकर्त्यांना अपेक्षित उत्तर सादर केल्याने, आंदोलन स्थगित करण्यात आले. the- agitation- to- withdraw- false- charges- against- ambedkarite- activists- was- postponed- after- a- written- letter- from- dysp
या आंदोलनामध्ये लोक अधिकार आंदोलनचे अध्यक्ष अरुण (आबा) जाधव, (बहुजन समाज पक्षाचे) जिवाजी घोडके, (ऑल इंडिया पॅंथर सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष) अमर घोडके, भूषण घाडगे, शुभम घोडके, (वंचित बहुजन आघाडीचे) महेंद्र थोरात, संतोष जोंजाळ, राहुल छत्तीसे, सोमनाथ धुळे, विजय जोंजाळ, (बहुजन मुक्ती पार्टीचे) संजय सावंत, (रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (अ)चे विशाल घोडके, संतोष भोसले, प्रमोद काळे इत्यादींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी स्थानिक पोलिस व महसूल प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी आंदोलनाला भेट देऊन त्यांच्या भावना समजून घेतल्या.
स्त्रोत: (धरणे आंदोलन व उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांचे पत्र)
