दिनांक २३ जुलै,श्रीगोंदा:
श्रीगोंदा तालुक्यामध्ये विद्रोही कवी, मूर्तिकार व फुले/आंबेडकरी विचारांचे प्रचारक असणारा पुरोगामी चळवळीतील सच्चा आंबेडकरवादी कार्यकर्ता जालिंदर तात्या घोडके यांच्या रूपाने आज हरपला. वयाच्या ६५ व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून ते मधुमेह व हृदयरोग सारख्या आजाराने त्रस्त होते.
मागील अनेक दशकांपासून सामान्य, वंचित आणि उपेक्षितांच्या व्यथा व त्यांवर होणारे अन्याय अत्याचाराविरोधात आवाज उठवण्यासाठी तालुका कार्यक्षेत्रात कार्यरत असणारे नाव म्हणजे जालिंदर (तात्या) घोडके. आपल्या कवितांसह मूर्तिकलेच्या माध्यमांतून समाजामध्ये आंबेडकरी विचार पोहोचवण्यात त्यांचे मोलाचे योगदान आहे. काही दिवसांपूर्वी त्यांच्या पत्नीचेही अल्पशा आजाराने निधन झाले होते. तेंव्हापासून ते सतत चिंतेत व विचारात मग्न असत. काही दिवसांपूर्वी अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना दवाखान्यात भरती करण्यात आले. एक महिन्यापेक्षा जास्त काळ तात्या दवाखान्यात उपचार घेत होते. त्यांच्या निधनाने तालुक्यासह कार्यक्षेत्रात, मित्रपरिवारात व नातेवाईकांमध्ये शोककळा पसरली आहे.
दगडांतून आणि लाकडातून निरनिराळे शिल्प घडवणे हा त्यांचा छंद होता. मुर्त्या बनवताना ते ध्यानस्थ बुद्ध, भिक्षापात्र हातात घेतलेला बुद्ध, कमळातील बुद्ध, डॉक्टर आंबेडकरांच्या मूर्ती असे निरनिराळे शिल्प त्यांनी साकारले.
नुकतेच तालुक्यातील प्रिंट व इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी त्यांची दखल घेत, त्यांना दगडातून शिल्प घडविणारा अवलिया अशी उपाधी दिली होती. त्यातून ते चांगलेच चर्चेत आले. लहानपणापासून मुर्त्या घडवण्याचा त्यांना छंद लागला होता. अनेक सामाजिक विषयांत ते अग्रणी असत. दलित, आदिवासिंच्या अन्याय अत्याचारां विरोधात पुढाकार घेत निषेधाच्या सभा गाजवत. सभेमध्ये बोलतांना प्रशासकीय अधिकारीही त्यांना टरकुन असत.
सामाजिक संघटनासह आंबेडकरी विचारांच्या संस्थांबरोबर तात्यांनी काम केले आहे. मानवाधिकार आंदोलन, लोकाधिकार आंदोलन, फुले – आंबेडकर विचार मंच सह राजकीय भूमिकेत प्रकाश आंबेडकर यांच्या विचारांशी ते एकमत राहिले. अनेक कालखंड त्यांनी कार्यक्षेत्रात प्रकाश आंबेडकर यांच्या सोबत चळवळीचा प्रचार आणि प्रसार करण्याचे काम केले. अंगावर कोणताही पोशाख असो गळ्यामध्ये निळा पंचा घालने ते कधीच विसरणार नाही. किंबहुना ती त्यांची एक प्रकारची ओळख होती.
त्यांनी त्यांच्या विद्रोही कवितांतून समाजाला जागृत करण्याचे काम केले.”भीमा नंतर जे कुणी क्रांती कराया ठाकले. तीन पैशांच्या पुढे वेडे गडी ते वाकले.” अशा साध्या शब्दांमधून ते चळवळ व बाबासाहेबांची महती सांगत. त्याचबरोबर राजकीय भूमिका मांडत असताना, “कसं होईल देशाच बरं.. आमदार झाला की मोटारगाडी.. खासदार झाला की बंगला अनं माडी”… कसं होईल देशाचं बरं… ही कविता प्रचारक म्हणून त्यांनी चौकाचौकातून आणि गावागावांतून म्हणतांना प्रत्येकाच्या ओठांवर तरळल्याचे सर्वश्रुत आहे. भाषण करतांना नेहमी श्रोत्यांतुन स्त्री भ्रूण हत्या संदर्भातील कविता म्हणावी असा आग्रह धरला जाई.
अशा आंबेडकरी विचारांच्या कार्यकर्त्याचे निधन पंचक्रोशीत सर्वांच्या मनाला चटका लावून गेलं आहे. राजकीय, सामाजिक क्षेत्रातून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत असून, सच्चा आंबेडकरवादी हरपल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली आहे. तात्यांच्या पश्चात दोन मुलं आणि दोन मुली असा त्यांचा कुटुंब विस्तार आहे. आज संध्याकाळी श्रीगोंदयातील स्मशानभूमीत तात्यांवर अंतिम संस्कार करण्यात आले.
‘बहुजन समता पत्र’ परिवारातर्फे तात्यांना भावपूर्ण श्रद्धांजली….
स्रोत:(कालकथीत जालिंदर तात्या घोडके यांच्या विषयी मिळालेली माहिती)
