दिनांक – १० सप्टेंबर २०२५, श्रीगोंदा:
श्रीगोंदा तालुका आणि परिसरातील काही लोक नेपाळमध्ये गेल्यानंतर आंदोलन, हिंसाचार आणि जाळपोळाच्या पार्श्वभूमीवर अडकून पडल्याची माहिती समोर आली होती. सोमवार दिनांक ८ सप्टेंबर रोजी पर्यटनासाठी नेपाळमध्ये गेलेल्या या पर्यटकांना स्थानिक प्रशासनाने घातलेल्या निर्बंधांमुळे परत भारतात येता आले नाही. त्यामुळे श्रीगोंद्यातील या पर्यटकांची मोठी अडचण निर्माण झाली होती.

श्रीपाद कवास्टे आणि त्यांचे मित्र सोमवारी काठमांडू येथील पशुपतिनाथ देवस्थानाच्या दर्शनासाठी पोहोचले होते. मात्र तेथील आंदोलन आणि अस्थिर परिस्थिती पाहता ते अत्यंत चिंतेत सापडले. स्थानिक परिस्थिती एवढी गंभीर होती की नियोजित हॉटेलमधून बाहेर पडणेही कठीण झाले होते.

कवास्टे यांनी स्थानिक माध्यमांशी बोलताना सांगितले की, “आमचे घरचे खूप काळजीत आहेत. परतीचे मार्ग सध्या बंद आहेत. आज दुपारी आमची भारतात येणारी फ्लाईट रद्द करण्यात आली आहे. आम्ही भारतीय दूतावासाशी सतत संपर्कात आहोत. तसेच नागरी विमान वाहतूक मंत्री श्री. मुरलीधर मोहोळ यांच्याशी फोनवर चर्चा केली असून त्यांनी सुरक्षित स्थळी थांबण्याचा सल्ला दिला आहे. भारत सरकार लवकरच आम्हाला सुरक्षितपणे परत आणेल असे आश्वासन दिले आहे.”

दरम्यान, आज उशिरा प्राप्त झालेल्या माहितीनुसार भारत सरकारने नेपाळमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांच्या परतीसाठी दोन विमानांची तरतूद केली आहे. त्यामुळे श्रीगोंदा तालुका आणि परिसरातील पर्यटकांसह सर्व भारतीयांचा भारतात परतीचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे.
स्रोत:(अधिकृत माहितीनुसार)


Advertise…
