श्रीगोंद्याच्या शैक्षणिक क्षितिजावर सुगंधी फुलांचा दरवळ.. जिल्हा सत्र न्यायाधीश मुजीब शेख यांचे गौरवोद्गार..

दिनांक २२ जुन २०२४, श्रीगोंदा:

श्रीगोंद्याच्या शैक्षणिक क्षितिजावर सेवानिवृत्त गटशिक्षणाधिकारी अनिलराव शिंदे यांनी दीपस्तंभाची कामगिरी बजावली आहे. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे आणि अग्नीपंख फौंडेशनच्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठीच्या निस्वार्थ सेवेमुळे श्रीगोंद्याच्या शैक्षणिक बागेत चांगली फुले उमलू लागली आहेत. हे गौरवोद्गार जिल्हा सत्र न्यायाधीश मुजीब शेख यांनी श्रीगोंदा येथे बोलताना व्यक्त केले.

शनिवारी महादजी शिंदे विद्यालयात अग्नीपंख फौंडेशनच्या वतीने गटशिक्षणाधिकारी अनिल शिंदे यांच्या सेवानिवृत्तीच्या निमित्ताने एम.पी.एस.सी. व एन.एम.एम.एस. परीक्षेत गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात मुजीब शेख प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

अनिलराव शिंदे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “श्रीगोंदा तालुक्यात २७ वर्षे सेवा करण्याचे भाग्य लाभले आणि शिक्षकांचे लाख मोलाचे सहकार्य मिळाले.”

नगरपालिकेच्या मुख्याधिकारी पुष्पगंधा भगत यांनी आपला अनुभव सांगताना म्हटले की, “माझ्या दहावीला ४८ टक्के गुण होते, मी फार हुशार नव्हते, पण एम.पी.एस.सी. परीक्षेचे ध्येय निश्चित केले आणि अभ्यास करून ते गाठले.”

अग्नीपंखचे कोषाध्यक्ष संजय लाकूडझोडे यांनी भविष्यात श्रीगोंदा शहरात एक प्रशस्त वाचनालय सुरु करण्याचा मानस व्यक्त केला.

यावेळी प्राचार्य डी.डी. भुजबळ, नवनाथ खामकर, मुख्याधापिका गीता चौधरी यांची भाषणे झाली. प्रास्ताविक नवनाथ दरेकर यांनी केले.

कार्यक्रमाला निळकंठ बोरुडे, अंकुशराव घाडगे, गोपाळराव डांगे, अनिल ननवरे, भाऊसाहेब वाघ, बी.बी. गोरे, एन.टी. शेलार, संतोष होले, विकी शिवले, विजया लंके आणि मनीषा काकडे उपस्थित होते. सूत्रसंचालन दत्ताजी जगताप आणि विलास लबडे यांनी केले. तर, आभार प्रा. संजय लाकूडझोडे यांनी मानले.

स्त्रोत:(प्रसिद्धी पत्र)

जाहिरात…

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading