उपरा,लक्ष्मण माने..
दुसरा दिवस उजाडला . आज देवाचा रथ . सारी मांगं , म्हारं , धनगर , कैकाडी माकडवाले , जोशी , डवरी , मुरळ्या , कळवातनी , जत्रा कशी गच्च भरली होती . कळवातनीचा तमाशा लागला होता .
फिरस्त्यांची पालं , बिहाडं खडं इस्काडल्यागत पडली होती . पालाम्होरं पोरं खेळत होती . मानसांची वर्दळ वाढली होती .
गावात कळवात्याच्या पोरी नट्टापट्टा करून तालासुरात चालत होत्या . नाचे हातवारं करीत होते . तमाशाचा फड उभा राहणार होता . सारी माणसं लिंबाखालच्या वड्याकडं चालली होती . फुगंवालं , भेळवाले फिरत होते . मनातनं फुगं घ्यावं … भेळ खावी असं असायचं , पण बाला पैसं मागता येत नव्हतं ! मागितलं तर मार , नाहीतर ‘ निन गाम कुही ‘ तुझ्या आईची … शिवी . म्हणून मी पैसे मागत नव्हतो . पण त्याचा सोगा धरून मागं मागं फिरत होतो .
बा आन् जयसिंग्या शिरपा वडारासंगं बोलत होते . शिरपा वडार मलवडीतच कायमचा राह्यलाय . गावात चार – पाच डुकरं सोडली होती … त्याची आता पाच – पंचवीस झाली होती . गाढवं दोन होती , त्याची आता आठ – दहा गाढवं झाली होती . शेजारपाजारच्या गावात शिरपा मातीचं काम घेतुया . बक्कळ पैसा मिळतुया . बा म्हणत होता , आरं , शिरपा आपण भावबंद गाढव गुती . वरसातनं इतुया . खंडुबारायानं तुझं चांगलं केलं . आमी पोटासाठी गावगन्ना पसाकुडता करत पोटामागं फिरतुया . रांडंच्या , काय काळ्ळबिळं दिसील , जनावरं मारचील का न्हाय ?
तसं शिरपा म्हणतुया कसा ,
‘ बापू , निन क्याल इडाकीरा ( बापू , तू दगड मारतुयास . ) आरं , आज , रथ हाय . उद्या बघू . नानीला सांगितलाय . दर वर्षाला काळ्ळं पाजल्याशिवाय बापूयाना , बज्या , जयसिंग्या जानार न्हायत . एक ‘ डुक्कर ‘ मारतो . आशी वरसातनं येणार तुमी , काय रोज रोज येताय व्हय ?
‘ तसा बा खुल्ला . तमाकू खाल्ली . म्हंजे आमचा मुक्काम वाढला , येवढंच समजलो .
बा तिथनं कळवातनीच्या पालाकडं गेला . एक कोट घातलेला म्हातारा गुनगुनत बसला होता . डोंबारी जातीचा . लहान पोरीला डोक्यावर उभं करून काहीबाही सांगत होता . बानं खापरी काढली . त्यात तमाकू भरली . म्हाताऱ्यानं काडी चेतावली आन् दोघं धूर काडाय लागलं .
बानं खुशाली इचारली . सारं बेस हाय म्हनला , बापू , शारदी मेली रं ‘ म्हणून डोळ्याला धारा लागलेल्या . त्याला काय बोलाय सुचना , बानंच इचारलं …
‘ आरं , शंकरदादा ! काय झालं , ते सांगतुयास का ! रडायलाच लागलास ! काय , झालं काय सारदीला ?
‘म्हाताऱ्यानं डोळं पुसलं . म्हनला ,
“ बापू , पोरगी कशी चवळीच्या शेंगंगत वाकत हुती . व्हट पिळलं असता तर दूध निघालं असतं , रं ! म्हातारपणात हे वाट्याला आलं , न्हाईतर आज जत्रा कमावली असती .
बा गप बसून धूर सोडीत ऐकत होता .
म्हातारा सांगत होता ,
‘ त्या खोकड्यात बिहाड हुतं . दिवसभर गाव मागितला . लई नाचली . दोरीवर उड्या मारल्या . केसानं दगूड उचलला . रातीला घरी आलू – शारदीनं दामटं केलं . धाकलीला निजावली . म्या चिलीम वडली आन् ताणून कवा झोपलू , कळलंच न्हाय . रातीला जागा झालू तर शारदी न्हाय . बापू रातभर हिंडलो … साऱ्या गावातनं ऊर बडवून गेत हिंडलू , पर शारदी गावली न्हाय . फटफटीत झालं . शारदी वड्याच्या वाळूत गावली . नुसती धुगधुगी …
म्हातारा सांगत होता . बा खिन्न होऊन ऐकत होता . डोळे पुशीत हुता . जत्रा जोमात आली होती . रथाला माणसं वडीत होती . भांडारा , खोबरं उधळीत होती . ‘ चांगभलं’चा जयघोस चालला हुता आन् म्हातारा सांगत हुता ,
‘ बापू , सारं आंग रक्तानं माकलं हुतं . तिनं डोळं उघडलं पर बोलली न्हाय . सांगितलं न्हाय . काय झालं आसंल , बापू ? दोन दिस ती जगली . पाण्याचा घोट नरड्याखाली गेला न्हाय , बापू . तिनं कसं कसं सोसलं आसंल …
‘ म्हातारा पुन्हा रडू लागला .
‘ बिराड हलवायचं म्हणत हुतो , पर हिचा नेम नव्हता , गेली माझी बया , गेली . बापू , ह्या दिसांत काय खाऊ ? हे बारकं कसं जगवू ?
‘ बानं चिलीम इजवली . राक झाडली . उठला ….
म्हाताऱ्या , तू माझ्याबर चल . आरं , उगावतु त्यो चारा दिल्याबिगार मावळत न्हाय .
‘ म्हातारा खुरटत खुरटत बराच आला . बाचा निरोप घेतला .
बा , ऊन झालं म्हणून , मला बिहाडाकडं लावत व्हता . कळवातनीचा तमाशा रंगात आला व्हता . जत्रा फुलली व्हती . मानसाला मानूस भिडलं व्हतं . मुरळ्या नाचत व्हत्या . येळकोट जयमल्हार ! वाघे टमकीच्या ठेक्यात शिव्या देत होते . सवाल – जबाब झडत होते . नोटा सुटत होत्या . तरण्या तरण्या पोरांच्या मिशा ताठ झाल्या व्हत्या . तमासगिरनीसंगं ते रंगात आले होते .
देवाचा रथ पोचला . तशी जत्रा फुटली . माणसं पांगू लागली . आमी बिहाडावर आलो . जयसिंग्या बाला म्हणत होता ‘
बापुदादा , माझी सिंगी ( गाढवाची मादी ) इकली . तीन , दहा आन् दोन रुपयाला दत्त्या बेलदाराला . हातंच उद्या निम्मं पैसं देतुया आन् काळुबायला निम्मं .
‘बानं हुकारा भरला . दिवसभर फिरत व्हता . जत्रा म्हणजी फिरस्त्यास्नी गाठी पडायचा , बोलाचालायचा दिवस . मानसाचा काय न्योम , आज हाय , उंद्या न्हाय .
जत्रा भरली तशी पांगली . शिरपा वडाराकडं काल – आज गुन्ना होता . सारी बिनभिकार , दोन दिवस हाणार . शिरपानं एक जनावर धरलं . साऱ्या गावात शिरपा , बा , जयसिंग्या , तान्या कोलाटी सारी फासं घिऊन पळत हुते . जनावर धरलं , चारी पाय बांदले , मुसकी घातली आन् गावाच्या लांब खालती नेलं , पाला पेटीवला . जनावराच्या छातीत लाथा मारून मारून त्याचा जीव घेतला . डुकराला कापायचं नसतं . आन् मग आगीवर धरलं . नुसतं त्याल गळत व्हतं . लई माजल्यालं जनावर . शिरपा वरसातनं एकदा मारायचा .
तरवाडाचं ढाळं तोडून पसारलं . बानं दगडानं त्याचं कातडं खरडलं , तसं आत खरपूस भाजल्याची ‘ वार ‘ – जाड कातडी – निघाली . ती चिरली , टुकडं केलं आन् सगळ्यांनी वाटून खाल्ली . मी , खग्या , इंद्या , म्हाद्या आन् लई पोरं व्हुती . साऱ्यान्ला फडावरच ‘ वार ‘ खायला मिळाली . बायका कुनीच नव्हत्या .
गुन्नाचं मटन म्हंजे साऱ्यांचा जीव की प्राण झालं . मटन तोडून टुकडं केलं . घमेल्यात भरलं . दोन घम्याली भरली व्हती . त्याच्यावर तरवाडाचा पाला घातला . आन् सारी फडातनं गावात आलू . सारी मानसं मारक्या म्हशीसारखी बघत हुती . थुकत होती . आमचा कालवा फुडं फुडं चालला व्हता . आईला , समीला , पुष्पीला , लीलीला , किसन्याला वार मिळाली नव्हती . मला वाईट वाटलं , पर काय करनार ? वार आत आनता येत न्हाय . खाऊन हाईली ती शिरपानं मातीत पुरली . आनू दिली न्हाई .
सांच्याला बा , आई सगळीजनं शिरपाच्या घरी जेवायला गेलो व्हतो . बा , जयसिंग्या आन् मोठी मानसं बाटल्यातली ‘ काळ्ळं ‘ पीत व्हुती . मटन खाऊन झालं . सारी मोठी माणसं बडबड करीत हुती . कुणाचं कुणाला समजत नव्हतं .
शिरपा म्हणत व्हता ,
‘ आमी काळुबायला आलो , तर रांडच्यांनो , आसं झालं पायजे आवंदा !
‘ जळजळीत मटनाच्या पितळ्याच्या पितळ्या रिकाम्या होत व्हत्या . भाकरी चुरून फुरकं मारले जायचे . कुत्री मधेच एकमेकांवर गुरगुरायची . मी आईच्या फुड्यात खात व्हतो . बारक्या पोरांस्नी दिली नव्हती . मोठी काय काय म्हनत्यात , कळत नव्हतं .
दुसरा दिवस उजाडला त्यो कळसकरांच्या वाडीजवळ , रात्री जेवता जेवताच पेंगत हुतो . म्होरं काय झालं , कुणास ठावं . जागा झालो तवा … राधीच्या पाठीवर बांधून घातलं हुतं .
नीट जागा झालो . सारी गाढवं वळीनं पांदीनं चालत व्हती . चारी बाजूला डोंगर , खडक आन् मोठं गोटं . मधेच एखादं बाभळीचं न्हाईतर बोरीचं झाड दिसायचं . बा म्हणत व्हता ,
‘ कळसकराच्या वाडीचा डोंगूर चढायचा हाय . नीट बसा .
आमी सावद बसलो … हा … चा … चा करीत आई , बा , पारी , जयसिंग्या चालत हुते . डोसक्यावर वझी होती . पसा – कुडता धान्य होतं . सारं बि – हाड गाढवांवर घातलं व्हतं . आन् गाढवं धापा टाकीत डोंगर चढत होती . पायावर सपासप फोकाचं वळ उठत होतं . गाढवं चालली होती .
डोंगर संपला आन् माथा आला . आईनं हरभाऱ्याचं डहाळं उपटून हंड्यात घातलं व्हतं . मी त्वांड न धुताच सुरवात केली . समी कुरकुरायला लागली . बानं तिला गाढवं हानत , हाकत दोन डहाळं दिलं . ती गप झाली . दिवस बराच वर आला हुता . अजून दोन डोंगार उतरायचं व्हतं .
बा म्हणत व्हता ,
‘ ह्यो वाडीचा डोंगर उतरू , गडावर जाऊ . तिथं पोरं कोरकोर भाकर खात्याली . ‘ वाडीचा डोंगर उतरलो , त्यो मुठीत जीव धरून . पायवाटेनं गाढवं उतरत व्हती . खाली खोल दऱ्या दिसत व्हत्या . डोंगरावर उघडीबोडकी झाडं आन् कुसळं दिसत व्हती . डोंगरात चिटपाखरू नव्हतं . न्हाय म्हनाय लिवगुंड , करवंदीची झाडं कुठं कुठं हिरवी दिसत्याल , तेवढीच . बाकी सारं हिरवं गवात मेल्यागत . गाढवाचा पाय घसारला , न्हाईतर तोल गेला , तर … जीव नको व्हायचा …
मी चालाय रडायचो .
बा म्हणायचा ,
” खान्नी मुकाट्यानू . निक गालकराद आमराद इल्ला .
(बस मुकाट्यानं . तुला चालायला व्हायचं न्हाय.)
मला भ्या वाटतंय म्हटलं की म्हणायचा ,
‘ का कुत्रीचं दूध पेलास व्हयं ? चिकटून बस . ‘ मनातनं त्योबी काळजीतच असायचा . गडावर आलो . गाढवांच्या वरच्या कंठाळ्या खाली घेतल्या . आंब्याच्या मोठ्या झाडाखाली … सारी बसलो . हातावरच भाकरी घेतल्या , चटणी घेतली आन् टोटरं बसत हुतं , पन गिळायला लागलो .
जेवता जेवता जयसिंग्या बाला म्हणाला ,
” बापूदादा गडम्हीनी नांबराद येत वांदीचंळा ” ( बापुदादा , गडावर आपलं कोन आलं हुतं , रं ? )
भाकरीचं तुकडं गिळत बा सांगत व्हता ,
‘ आपलं घरान्यातलं कुनीतरी हिथं आलं व्हतं . तवा ह्या वारूगडावर मुसलमानांचं राज होतं . मुसलमान साऱ्यास्नी बाटवत व्हतं . तवा ह्या वारूगडावर आपली माणसंसोंग घेऊन यायची . बाकीच्यान्ला फलटन दरवाजा बंद हुता . पारा असायचा . शिपाई असायचे . तवा फलटनच्या राजानं ह्यान्ला खबर आनायला गडावर सोंग घिऊन पाठिवलं हुतं .
‘ आपली मानसं वैदाचंसोंग घिऊन आली . आन् हितल्या मुसलमान राजाच्या आपल्या इळ्यानं हितल्या हितं खांडुळ्या केल्या . आन् वैदाच्या सोंगानंच गड उतरून खाली गेलं . ते गिरवीला गेल्यावर मागं बोंब झाली , पर गडी घावलं न्हाईत . लई पराकरमी इर व्हुते . गिरवीला इनाम दिलं व्हतं , पर गावानं पचू दिलं न्हाई . फलटनच्या राजानं दिलं . पर गाव म्हनाला , ह्येच्या आईला ! ही कैकाडी त्या मुसलमानांना क्वयत्यांनी कापत्याती . ही ब्याद आपल्या गावात नगं ! म्हणून हाकून लावलं . तवा निरगुडीच्या पाटलानं आपल्या वाड्याच्या राखनीसाठी आपल्या घराला जागा दिली , तवापासनं आपुन निरगुडीचं वतनदार झालू . न्हाईतर कुठलं आपल्याला घर आन् दार !
‘ बाचं जेवून झालं . गाढवांवर वझं घातलं , कंठाळ्या घातल्या . आम्हाला बसवलं आन् वारूगडाचा अवघड घाट , गाढवं म्होरच्या पायावर वझं तोलत मुंगीच्या गतीनं डोंगर उतरू लागली . निम्म्या डोंगरात आलू आसंल , तिथं इसावा होता . इसाव्यात पानी प्यायला थांबलो . बा म्हनत व्हुता ,
‘ वर गडावरल्या राजांच्या टाकीत लिंबू टाकलं , तर ते ह्या इसाव्यात येतं . लई मोठं भुयार हाय . माणसं पैली चालत जायची . हितनं राजाच्या महालात जाता येतं , पर आता सारं पानीच हाय . हिरवंगार पानी , शेवाळलेलं , आळ्या पडलेलं .
‘ इसाव्याला पानी पिऊन गाढवं राहिलेला अर्धा घाट उतरायला लागली . फलटन दरवाज्यातनं सारं कसं लांबपोतुर निळंझार आभाळ आन् करंगळीयेवढी मानसं , कुरवलीचं धराण , काड्यापेटीसारखी घरं , आन् मदीआदी हिरवी शेतं , लई भारी दिसत व्हतं . बा म्हनत व्हुता ,
‘ आनकीन एक वळान झालं , की उतारलूच !
‘ गाढवं दमानं उतरत हुती . खग्या ज्या गाढवावर बसला हुता , ते सिंगरू हुतं . त्याचा पाय चिपंवरनं घसरला . तसं गाढव माटकन् खाली बसलं . खग्या बोंबालला . पर लागलं नव्हतं . गाढवाला जयसिंग्यानं उठवलं . त्याचे पाय थडाथडा उडत व्हते . घामानं त्याचं सारं अंग निथाळलं व्हतं .
‘ आग , झा – झा … ‘ करीत मोठी माणसं गाढवामागं चालत व्हती . गाढवं उतरत होती .
अखेर पायठा आला . सिंगरं पळायला लागली . पायऱ्यांना दगडांचा , गोट्यांचा ढीग लागला व्हता , तिथं बा गेला आन् त्यानं साऱ्यानूला पाच – पाच दगड त्या ढिगावर टाकायला सांगितलं .
‘ का दगडं टाकायची ?
बा हासला आन् म्हनाला, ….
क्रमशः
स्रोत:(पद्मश्री लक्ष्मण माने यांच्या उपरा या पुस्तकातुन)
