उपरा, लक्ष्मण माने.(भाग १०).

उपरा, लक्ष्मण माने.

घेतल्याली . त्या गावात झापपाटीपास्नं ते कनगीपातुर बैत्यानं द्यायचं . नुसती उरफोड . सुगी झाली की खळ्यावर जायचं . कुनबी दील ते घ्यायचं . वरीसभर काम फुकट करायचं . कवा हिरव्या मिरच्या , कवा शेंगा , कोरड्याला काय बाय . असं बलुतं मिळायचं . बलुत्याच्या गावात गेलं , की आई मला कुनाच्यातरी वसरीला बसवायची . गावातनं आयाबाया कोरकुटका , कोरड्यास द्यायच्या . मी , तिनं कुणाच्या तरी पडवीत बसून खायचं . पानी वरनं वाढायचं . दोन्ही हातांची वंजळ तोंडाला लावायची . पानी प्याचं . आई मालाची घासघीस करायची . पन फुकापासरी द्यावं लागायचं . आई चुटपुटायची . मिळंल ते घ्यायची . भाकरी फडक्यात बांधायची … शेरमापटं मिळालेलं गठुडं घ्यायची . आन् येता येता कुनाच्या तरी कडंला ( वड्याच्या कडंची हद्द ) फोका कापायची . कुनब्यानं बघितलं , तर शिव्या द्यायचे . कवा कवा लई बाका परसंग यायचा . कुळवाडी झिपऱ्या धरून मारायचे . बा असला तर त्यालाबी मार पडायचा . त्यातून निभावलं तर बरं , न्हायतर कोर्टकचेऱ्या कराव्या लागायच्या .

एकदा असंच झालं . भल्या सकाळी आई – बा इकायला गेलं व्हतं . आमी पोरं घरी व्हतो . येळ ऐन उनाची आसंल . घरातनं त्वांड भाईर काढवत नव्हतं . गाव मरून पडल्यागत ओस पडलं व्हतं.चिटपाखरू दिसत नव्हतं . मी शिळी भाकरी चिंचंच्या पाण्यात भिजायला घातली व्हती . पोटात आग पडली व्हती . बाहेरच्या आगीत आतली आग धुमसत व्हती . डोळ्यांतनं पान्याच्या धारा लागल्या व्हत्या . घरात काईबी न्हवतं , सारी घाईकुतीला आले व्हुतो . आई – बाची पाखरागत वाट बघत व्हुतो . आता आईईल … आता बा ईल , येताना भाकरी आनत्याल , पण त्यांचा पत्त्या नव्हता . किसन्यानं – सगळ्यात धाकला – त्यो ज्यो रडाय लागला , त्यो काय केल्या ऐके ना . त्याला समी पानी पाजीत व्हुती . पॉर आलंबालं ५ व्हतं . आई – बाला मनात शिव्या देत व्हतो . आन् एकाएकी कालवा वाढला . बा सगळ्यांच्या म्होरं व्हता . त्याच्या मागं आई . आईच्या अंगात चोळी नव्हती . बाचं आंगारकं घातलं हुतं . लुगड्याच्या चिंध्या लोंबत व्हत्या . बा नुसत्या धोतरावर व्हता . साऱ्या अंगावर काळंशार वळ उठलं व्हतं . त्याच्या मागं चार पाच बापे होते . आई बोंब मारत व्हती . बा तिला गप्प बसायला सांगत व्हुता .

आमचा कालवा झाला . आमी रडत आडवं पळत गेलो . आईनं किसन्याला उचलून पोटूशी धरला . त्याच्या डोस्क्यावरनं हात फिरवाय लागली . मी आईजवळ गेलो . तिचं दोन्ही हात रक्ताळलं व्हतं . डोक्याच्या खाली सारं त्वांड सुमारलं व्हतं . मी रडून रडून कालवा करू लागलो . बाचं हात बांधलं व्हतं . बानं खाली मान घातली व्हुती . आईला – बाला घरी आनलं न्हाय . चावडीम्होरं नेलं . तवर बघ्यांची गर्दी झाली . माझ्या आईची अब्रू … बाच्या अंगारक्यात झाकली हुती . मी मनात पेटलो व्हतो . वय फार नव्हतं . पर कळत चांगलं व्हुतं . आई चावडीवरनं ‘ घरी जाऊ दे ‘ म्हणून कुळवाड्यांच्या पाया पडत व्हती .

त्यो म्हणत होता ,

‘ कशाला ह्यालपाटायला गेली व्हतीस ? तुझ्या … पाय घातला.

मला काय करावं , सुचत नव्हतं . बघता बघता साऱ्या गावभर वारं गेलं . गाव चावडीम्होरं जमलं . आमच्या आळीतल्या म्हाताऱ्याकोताऱ्यांनी पदर पसरला . दंड बांदा म्हनले . पण गावाला चेव आला व्हता .

‘ आयला , ह्यांच्या लई माजल्याती !! बांधाला हिरवा ढाळा ठिवनाती का रानात कणसं ठिवनाती . बघता बघता उचलत्याती . काय म्हन ठिवायची सोय न्हाय . बांदा भडव्याला झाडाला आन् वता गुळाचं पाणी !

‘ सारं गाव बेभान झालं व्हुतं . कुनी काय , कुनी काय . चोरीपास्नं आईचं कुणीसंग लफडं हाय , हितपातुर चाललं व्हुतं . सारा कैकाडवाडा गयावया करीत व्हुता . पर कुनाला पाझर फुटत नव्हता .

हे सारं चाललं व्हुतं . आमचा कालवा चालला व्हुता . बा खाली मान घालून पायानं माती टोकरीत व्हता . पाटील आलं . पंच जमा झाले . ती बाहेरगावी सोनवडीची कुळवडी म्हणत व्हती…

‘ चार दिस झालं . गावात एक बाबळीचा फेस राह्यला नाय . रातचं येत्याती आन् बाभळीचं फॉक आन् काट्याचं फॅस उचलून नेत्याती . आज ह्या दोगान्ला धरलं . पळून चालली व्हती . ह्यो आयघाल्या निसटला व्हता … त्यातनंबी , पर ह्या रांडंच्या गांडीचं लुगडं फेडल्यानं बघितलं , तसा ह्यो मागारी पळत आला . लई मारलं न्हाय . तुमापतुर आनलंय . काय ते तुमीच ठरवा . पुना आमच्या शिवेच्या आत पाय ठेवणार न्हायती , ते बघा . न्हाय तर जिती सोडणार न्हाय ! पुना म्हणाल , आसं तसं झालं … ह्याच्यासाठी आपल्यात वाकुडपणा नगं !

‘ ह्यांची घरं पाडून टाका . ह्या चोरट्या पोटच्यान्ला आपल्या गावातनं हाकला . यांच्यापायी सोनवडीकरांनी आमची आबरू घेतलीया . आताच्या आता ह्यान्ला हात दाखवा !

‘ एक एकाचा हात मिशावरनं फिरत व्हता . आता आपल्याला गाव सोडावं लागतंय , आपल्या आई – बाला जिवं मारत्यात , ह्या इचारात मी बोंबलत हुतो . जयसिंग्या , पारी , तात्या , आप्पा सारी माणसं मयतीला गेल्यागत सुतकी तोंडं करून बसली व्हती .

हे सारं एक तरणाबांड , लालबुंद चेऱ्याचा पोरगा ऐकत व्हता . ठुनगुसा , चेऱ्यावर तेज व्हतं . मिशांचा झुबका , पायजमा , सदरा , डोक्याला भांग पाडलेला , शिकल्या – सवरलेला मुलगा . रामभाऊ त्याचं नाव . तिरमिरीत उभं राह्यला . तसं बोलणारांचं नरडं आवळलं . सारीजनं रामभाऊकडं बघाय लागली . रामभाऊ तरातरा चालत गेला , आईचं हात सोडलं . आईच्या अंगावरील कळा बघून त्यानं डोळं पुसलं . आन् घोगऱ्या आवाजात त्यो म्हणला ,

‘ आनवरी , तू जा . मी सोडलंया तुला . तू जा ‘ आई जीव मुठीत घिऊन उभी राहिली . सारी भुतं शांत . पन सारी बगाय लागली . पाटलाचा चेहरा लाल व्हुता .

‘ रामभाऊ , तुमी काय केलंय , समाज हाय का तुमाला ? तुमी सरकारी कामात आडकाठी करताय . तुमाला मला वरदी दिऊन अटक करावी लागेल .

‘रामभाऊ रागानं उसळून म्हणाला, ‘ त्या आनीच्या आबरूपेक्षा तुमच्या भनीला असं उभं केलं असतं , तर तुमी ते सोसलं असतं का ? तुमालाबी आया – भईनी हायेत , का न्हाय ? मी दितो तुमच्या काठ्या . किती काठ्या आनल्या सोनवडीच्या ? आन् काठ्यापायी शिक्षा करायचा तुमाला कुनी अधिकार दिला ? तुमी वरदी द्या . तुमच्या बायलीला हिथं चावडीवर आनल्यावर कसं हुईल ?

‘ पाटील चिडला . त्यानं रागानं पायातली वहान काढली आन् रामभाऊच्या अंगावर फेकली, तसं रामभाऊची भावकी उसळली . कलागत वाढत गेली . माणसं चावडीकडनं गावात पळत सुटली . आन् , काय झालं , म्हणून गावातली चावडीकडं.

‘ काय झालं , काय झालं ?

‘ रामभाऊला मारलं , ‘. ‘… एकच बोंब सुरू झाली . रामभाऊची भावकी काठ्या घिऊन पळत चावडीवर आली . साऱ्या गावात दंगल हुनार म्हून . इट्या म्हार फलटणला पळाला . धराधरी … मारामारी … कोण कुणाला मारत व्हतं समजत नव्हतं . एक दुसऱ्याच्या बोकांडी बसत हुता . निमित कैकाड्याचं आन् भांडान गावाचं . म्हारवाड्यात बातमी समजली , रामभाऊला मारला . खालच्या आळीत म्हारं हातात दिसंल त्ये घिऊन पळत आली . मांग आली , रामूशी आले . आन् वरच्या आळीनं माघार घेतली . पाय लावून पाटील आदीच पळाला व्हुता .

रामभाऊला बरंच लागलं व्हतं . डोस्क्यातनं रक्त वहात होतं . आईनं अंगातलं राहिलेलं खमीस फाडलं आन् डोस्क्याला बांधलं . तिचा नुसता कालवा झाला व्हता . शान्यासुरत्या मानसांनी भांडान थांबावलं . मंडळी आपल्या आपल्या घरी घालावली . सारं शांत झालं .

आई , बा , तात्या , आप्पा , सारी रामभाऊच्या वाड्यात आसऱ्याला गेली . सोनवडीकर कुठं गेलं , समजलंच न्हाय .

सारं शांत झालं . आन् पुलिसांची गाडी गावात आली . आठ – दहा जण असत्याल . पाटलानं साऱ्या चुगल्या केल्या होत्या . पोलिस रामभाऊच्या वाड्याम्होरं आले . रामभाऊ जखमी अवतारात आले . पोलिसांचं , त्यांचं काय बोलणं झालं, यास – फ्यास करीत पुलिस काय काय बोलले कळत नव्हतं. रामभाऊ, आई – बा , पाटलाकडची चार – पाच मानसं असं आठ – दहा जनाला पिंजऱ्यात बसावलं आन् मोटर फलटणला गेली .

मी , समी , पुष्पी , किसन्या , लाली आप्पाच्या बिराडात गेलू . नानीनं आमाला पोटाशी धरलं . रडाय लागली . ‘ कशाला काडी लावायला फेस आनायला गेलं ‘ म्हून आई – बाला शिव्या दिऊ लागली . आप्पा , तात्या , जयसिंग्या , सद्या , चंदन्या , मारत्या , सारीजणं पायपाय फलटणला निघाले . रामभाऊच्या भावकीतली शानीसुरती फलटणला गेली . बायका म्हणत व्हुत्या , रामभाऊला काय पडलं व्हुतं ? ह्या व्हकांड्यांच्या नादाला कशाला लागावं ? आपली पायरी रामानं सोडली . असंल काय पानी मुरत …

कैकांची तोंडं जे पायजेल ते बोलत व्हुती. माझा जीव खालीवर व्हत व्हता . इठ्या म्होरं कोतवाल . त्यो म्हनत व्हुता ,

‘ त्यास्नी काय व्हुयाचं न्हाय . जामिनावर सोडत्याली . बापूवर आदी केस न्हाय . रामभाऊ हायती . तुमी गप्प बसा .

कालवा इरत गेला .४७ सकाळपास्नं तोंडात पाण्याचा थेंब गेला नव्हता . नानीनं ( आप्पांची बायको ) लाली , पुष्पी , समी , मी , साऱ्यानला क्वॉर क्वॉर भाकरी दिली . गावाकडं बघून नि थुकत थुकत नि शिव्या देतच व्हती . तोंडाला इल ते वळावळा करीत व्हती .

रात अंधाराच्या डव्हात बुडाली व्हती . नानीनं साऱ्यान्ला झोपावलं . तिला झोप लागत नव्हती . सारका कानुसा घेत व्हुती . मी डोळं मिटलं व्हतं पण डोळ्याम्होरनं आई – बा हालत नव्हते . निनती पोरं ” झोपली . मला झोप येत नव्हती . आपुन आई संग गेलो न्हाई याचं वाईट वाटत व्हतं . सारी दुपार एका घुसमटीत गेली व्हती . माणसांच्या नजरा जाळत व्हत्या . आपल्या आईनं असं काय केलं ? फेस , फोका रोज आनत्यात . मग आजच त्यान्ला का मारलं ? आपल्याला बा मारतुया , पर पुलिस कदी आला न्हाई . ही मानसं का भांडली ? का मारलं आईला ? … प्रसंग डोळ्याम्होरनं हालत नव्हता . डोळ्यान्ला धारा लागल्या व्हत्या . कूस बदलत व्हतो . तळमळत व्हतो .

दुसऱ्या दिवशीची सकाळ झाली . आई – बा राती मागारी आलं असतील , म्हणून उठल्याबरबर घर धुंडलं . नानीला विचारलं . कुनीच आलं नव्हतं . दुपार झाली . ध्यान सारं सडकला व्हतं . दुपार टळून गेली . मन काळवांडलं व्हतं . आता आपली आई – बा येत नाही म्हणून राहून राहून रडत व्हतो . अखेर देवाच्या टोपल्याम्होरं गेलो . गुलाल घातला . पाया पडलो . आई – बा येऊ दे म्हणून कितीतरी येळ उभा व्हतो .

सांज झाली . आई , बा , सारी मानसं आली . आल्या आल्या आईनं साऱ्यान्ला जवळ घेतलं . आळंबाळं घेतलं . ती रडत व्हती . मी विचारलं ,

” आई निक लगव इड्डचनगा हाई ? ” (आई तुला लई मारलं का ग ?)

आईनं माननंच नाई म्हटलं . जवळ घेतलं . फुडं काय झालं … कसं मिटलं … कुणाला ठाव … मी पुन्हा इचारलंच न्हाई . सारं इसरून गेलो .

चार – आठ दिस बा बोलायचा न्हाई . आई कधी हसल्याली म्या बघितली न्हाई . दिस जात व्हतं . उपासमारीची सवय झाली व्हती. कोरड्यास नसायचंच, मिठाच्या पाण्यात नाहीतर चिचणीत भाकरी चुरून खात व्हतो .

बानं सुपाऱ्या घेतल्या व्हत्या . बेंडाच्या ताफ्याची कामं सुरू झाली . पाच – पाच दहा – दहा मैल चालायचं. उनाचा तरास व्हुयाचा. वाजवायचं. गेल्याबरूबर बाजा करायचा . बाजा झाला की , चार – दोन गानी वाजवायचो . मग हाळदी लागायच्या . मांडवात नवरा – नवरीला हाळद लागायला लागली की , आम्ही वाजवायची . हाळदी लवकर संपू दे , म्हणून देवाला मनातल्या मनात इनवायचो . डोळे झाकायचं . पण बेंड वाजायचा .

हाळदी झाल्या की उकिरड्याच्या कडला मांडवाच्या लांब बाहेर झुनकाभाकरी खायचो . पोरांच्या पातळ हाग्यासारखा झुनका … अर्ध्या – कच्च्या भाकरी . घरी त्याबी नसायच्या .

मी इतक्या लहान वयात बाज्या वाजिवतोय , ह्याचं मानसं कवतुक करायची . घुगऱ्या छान तालात वाजवायचो . लग्नाच्या दिवशी सारा दिस शेंबडं पॉर पण ‘ वाजवा ‘ म्हटलं की वाजवायचं . लग्न लागलं की जरा इसावा असायचा .

साऱ्यांची जेवणं झाल्यावर आमची बाजावाल्यांची पंगत असायची . लांब मांडवाच्या बाहेर . चाला आमच्याजवळ भांडी असायची . त्यातनं चा प्याचो , पण जेवायला पत्रावळी – दुरून असायचा. जेवणं झाली की पानं आमालाच उचलाय लागायची. हाका मार मारून वाढून घ्यावं लागायचं .

वरातीला सारी वाजवायला जायची. मी, दत्तूचा इठल्या झोपायचो . पंधरा – पंधरा दिस घरी नसायचो. आईची आठवण हुयाची . पर लाडू खायला मिळायचे . घरी उपास त्या परीस ही भटकंती बरी असायची . सारी जमून निघायचो . आई घर चालवायची . आमी घरी गेलो की , चिडलेली असायची , मग बा चार – दोन रुपये हातावर ठिवायचा . तेवढीच मदत .

लगीन सराय संपली . वाटण्या झाल्या . एकवीस रुपये मला वाटून आलं , असं बा म्हनत व्हुता . बानं पाटी , पुस्तक , पेन्सिल , कापड , सारं पैक्यातनं केलं . शाळा सुरू झाल्या व्हुत्या .

आठ – आठ एका दिशी बा घरी आला … साळंची येळ झाली व्हती . बानं हाताला धरलं . पाटी , पुस्तक , पेनसल दिली … साळंत घिऊन गेला . कुरकूर चालली होती . पण शाळा कशाला म्हनत्यात माहीत व्हतं . त्यात गावातली शाळा . मास्तरबी वळकीचा ,

क्रमशः
स्रोत:(पद्मश्री लक्ष्मण माने यांच्या उपरा कादंबरीतुन)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading