उपरा,लक्ष्मण माने..
आमी खारपाड्यात . पोट भरायला बिनभिकारांची कोकणात गर्दी उसाळली व्हती . आमच्या बिराडाशेजारी जोश्यांचं बिराड उतारलं व्हतं . नवरा , दोन बायका असा तिगांचा संसार फिरत व्हता . रोज सांची तिगांची भांडनं ठरलेली असायची . नवरा रोज बेवडा हानत होता आन् रात जागवीत व्हता . बाया डोस्क्यावर पाटीत जरमलीची भांडी भरत होत्या . साकरंवर मोडतोड करीत सारा दिस उनातानात पायात भवरा बांधून हिंडत होत्या .
ह्यो गडी नेमानं सकाळी आंघूळ करायचा आन् कपाळाला गंद लावून ‘ भविष्य सांगनार … जोतीस सांगनार ‘ करीत हिंडत व्हता . सांचा बासंगं बसायचा . बा त्याला भविषी सांगायला लावायचा . त्यो हसायचा आन् खुशीत आला की म्हणायचा . ‘ आरं बापुदा , आसं भविस सांगता आलं आसतं तर पारी आन् सरी कवर मला टाळत्यात , तेच मला सांगाया आलं असतं की . आरं , तू वळतुयास कशासाठी ? पोटासाठीच , का न्हाय ? आमी पोटासाठी सुताला धरून सरगाला जातो . मानसाच्या चेऱ्यावरनं हेरायचं . फसतंय , आसं ध्यानात आलं , की फसवायचं . तू कशी कांबीवर कांबी रचीत जातूस , तसंच हाय . घरात गेल्याबरूबर दारात बसायचं , पानी मागायचं . पानी आनायला बाई गेली , की घर निरकायचं . घरात चेंडू आसला , इंटीदांडू असला , वलणीवर बारक्या पोराची कापडं आसली , मोठ्या मानसांची कापड वाळाय घातल्याली आसत्यात , त्याच्यावरनं घरात मानसं किती आसत्याल ? लहान मुलगा , का मुलगी आसंल … घरात फुटू आसत्यात , त्येंच्यावरनं नवरा , बायको आन् आनकीन किती मानसं आसत्याल … सारं हेरायचं . जाळं लावायचं . फसतंय आसं धेनात आलं , की दोऱ्या आवळत जायचं . घरची कळा धेनात आली की बोलायचं . परतेकाच्या जलमात एकदा तरी आजार आसतोच . घरात कुरकूर आसतीच . ह्याच्यावरनं म्होरं जायचं . मानसाच्या बोलण्यातनं सारं समाजतंय . त्याला धरून बोलायचं . आमच्यातबी लई जाती हायत्या .
‘ आन् असंच काय काय सांगीत बसायचा . सयपाक झाला , की पारी – सरी हाका मारायच्या , मग ‘ रांडा बोलावत्यात . घटकाभर बसू द्याच्या न्हाईत . ‘ करीत उठायचा . सारका बिड्यावर बिड्या फुकायचा . खोकल्याची उबळ आली , की छाती दाबायचा . खोकत खोकत उठायचा आन् जाऊनशान लवंडायचा . आई – भनीवरनं सारकं शिव्या द्याचा . पचापच थुकत राह्यचा . बाया लई राबायच्या .
आमी पेनंत राहत व्हतो . रस्त्याच्या कडंला वडाचं मोठं झाड व्हतं . त्या झाडाखाली आमची बिराडं उतारली व्हती . आमच्या मागून आलेली चार बिराडं आमच्याच जातवाल्यांची व्हती . आई – बा त्या बिराडातल्या मानसांसंगं बोलत बसायचे . मला खेळायला दोस्त मिळाले . लई आनंद झाल्याला . पन ही मानसं कोन लागत्यात , ते माहीत नव्हतं . मी आईमार्ग चिमट लावली व्हती . सारी मंडळी आईकडं नात्यातली व्हती . त्यानं बाच्यावर आईचा लई ऊर भरून आला व्हता . ती लाडानं मला एकाएकाची वळक सांगत व्हती . कुनी मामा , कुनी काका , काकाला स्वाटू आन् … काकीला स्वाडमा … म्हनायला आईनं सांगितलं . आन् बगताबगता ती आल्याली नवी बिरार्ड निरगुडकरांच्या बिराडतलीच झाली ; आन् कैक दिस ती संगट फिरली .
त्यात मारतीमामा एक माझा मामा व्हता . गडी तरणाबांड केळीच्या खुटावानी आन् देकना बी तेवढाच . मला वाटायचं , आयला , ह्यो मानूस काय आपल्यातला दिसत न्हाय . पण मामाच लागतुया तवा … लई बरं वाटलं . त्याची नजर तर कावळ्याच्या नजरंवानी सारकी कायतरी हुडकत असायची . मी आपसूकान त्येच्याकडं बगत बसायचो ! त्यो फोका चिरत बसला , वळत बसला , की मी तिथं जायचो पण त्यो लई हिडीसफिडीस करायचा .
त्याची बायकू पारी . मी तिला पारुमामी म्हनत व्हतो . आता ती समीपेक्षा माजा लाड करायची . त्यानं ती मला आवडायची . बाई भयान देकनी व्हती . गुरीपान , उभ्या चवळीच्या शेंगेवाणी . नुसती वाऱ्यागत चपळाईनं हलायची . माझ्या आईला आठ आठ दिस अंगाला पानी मिळायचं न्हाय . पण पारुमामीमातर रोज आंगुळ करायची . तिनी सांजा न्हायतर फटफटीत व्होताना . रस्त्याच्या कडेलाच न्हायची . ती न्हाया बसली की घारी – गिदाडावानी तरनी पोरं उगाच आमच्या बिराडाकडनं हुंगायची . ह्याचा भाव काय ? आन् ह्याची किंमत काय ? बा लई चिडायचा . चिडला की म्हनायचा ,
‘ देनं कुसळाचं आन झवनं मुसळाचं … तुला घ्याचं , तर बोल . न्हायतर मी रिता न्हाय . जा …
बाबा , जा ! म्हनून हाकून लावायचा . ती तर आंगूळ कराय लागली की मारतीमामा नुसता दातव्हट खायाचा .
‘ अय निन गांमक खेदचा ह्याचा ! ‘ ( ये , तुझ्या आईला गाढव लावला , तू बामनीन हाईस का आंगाला गू माखलाय , सारकं आंगूळ करतीयास ते.)
म्हणून लई शिव्या द्यायाचा .
असंच एकदा तिनं आंगूळ केली आन् बिराडातला आरसा घिऊन केस इचरत व्हती . मारतीमामा असला , की ती नुसती केसाचा बुचडा बांधायची . पन त्यो नसला की फनीनं केस इचरायची . आईबी तिला लई नावं ठेवायची .
‘ आपुन गरीब माणसं , कुठंबी हानारी . ही बाय आपल्या भावाच्या जिवाला तात लावल , ४ तवा हाईल . ‘ असं काय काय म्हनायची . मला कायच समजत नव्हतं . ती केस इचारती हे लांबनंच मारतीमामानं बघितलं आन् गड्यानं , कुत्र्यानं झेप घालावी , तशी झेप घेतली आन् पारुमामीला खाली पाडून तो तिच्या उरावर बसला . हातातल्या आरशानं तिचं त्वांड – त्वांड हानायला लागला . आरशांच्या फुटक्या काचा हाय . लागून तिच्या गालाला रक्ताचा लोट लागला . ती बोंबलत व्हती . आई – बा आन् सारी मानसं मदी पडली . सोडवलं . तिला लई लागलं व्हतं . नवरा – बायकोची भांडणं . कोन काय करणार ? तो म्हणत होता .
‘ कांट आरकाकी , काटं कापून ठेवणं … लई वाणी उदमीन झाली व्हय ? ‘ आन् असंच काय काय . त्यो तिला आंगूळ करू देत नव्हता . केस इचरू देत नव्हता . ‘ घानीत राह्याचं . घानीवानी हावा . लई तालीवारावानी करू नगं . रस्त्यावरची माणसं आपून , कुनीबी येत्यात – जात्यात , कुनाचं ध्यान गेलं तर ?
त्यांची दोगांची सारकी भांडणं चालायची . मामा काय मामीला नजरंआड करायचा न्हाय . ती धुवायला गेली , तर ह्यो मागं हायच . फोकाला जाताना संगं … इकायला जाताना संग … एवढंच काय , ती लगवीला गेली , आन् जर येळंवर आली नाय , तर ‘ हिच्या आईची गांड ही कुठं जाऊन बसली ‘ म्हणत लगीच जायचा . आई त्याला म्हनायची ,
” मारतीदा , आव सग्गरक होना की निन त्येनी येतक्युनी होग्य बा ! ”
(ती हागायला गेली की तू पानी घिऊन जात जा . आरं , ती कलीत ३५ लाज आबरूची हाय . एवढं तिला सोनं लागलं व्हय , ते खुडून खात्याल ?) आन् सारी हसायची . मामा जरा नरमायचा . पण जरा कुठं गेली की गडी लगीच कावरायचा .
आमची बिराडं चार – दोन दिसांत हलणारच हुती . मारतीमामा आन् मामी दोगंबी मागारी जाणार हुती त्येच्या गावाला . आन् एका रातीला पारुमामीच्या अंगावर आभाळ कोसळून पडलं . आमी सारीजनं जेवून झोपलू होतो . निमी रात झाली आसंल . काळूक पडला व्हता , आन् पारुमामी आरडत – वरडत – बोंबलत पळत येत हुती . सारी बिराडं जागी झाली . ‘ अलयदग्यो ‘ ( आरं ! उठा उठा ) म्हनत सारी भराभरा उठलो . एकच कालवा झाल्याला . ‘ अल् मिदास ( काय झालं – काय झालं ? ) एकच गलका . पारुमामीचं त्वांड धडप्यानं बांधल्यालं व्हतं . ती सांगत – बोलत नव्हती , नुसता जिवाचा आकांत मांडला व्हता . जमिनीवरची माती तोंडात घालीत व्हती . पायाच्या टाचा घाशीत व्हती . डोस्क्याची केसं तोडत व्हती . तोंडानं मारून घेत व्हती . साऱ्यास्नी वाटत व्हतं , मारत्यानंच हानलीया वाटतं , पण त्यो तर नुसता भात करापल्यागत उभा व्हायला व्हुता . कुनी तिला शिवतबी नव्हतं . तिला शिवायचं नव्हतं . ती आज एकलीच झोपली व्हुती . शेजारीच मारतीमामा झोपला व्हता . त्याला काय म्हाईत नव्हतं . आन् ही बया नुसतीच बोंबलत व्हती . आकीर आई आन् सरीनं तिला धरली . आन् आमच्या भाषेतनं इचाराय सुरुवात केली . साऱ्या बिराडातल्या बायांनी तिला बाजूला नेली . सारे बापे एका बाजूला बसले . तिला भुतानंच धरलं आसंल , असा बाचा कयास व्हुता . मी आईच्या पदराला धरून बायकांत बसलो व्हुतो .
लई येळ गेला आन् पारुमामीचं वराडनं संपलं . मुस्करत – सुस्कारत तिनं सांगितलं . भेदारली व्हतीच . हातापायांचं कापरं झालं व्हतं . ती म्हटली ,
‘ मी पोत्यावर झोपली व्हती . झोप चांगली लागली व्हती . आन् काळानं डाव साधला …
‘ आन् पुन्हा रडायला लागली . बाया पुन्हा खोदून इचारायच्या . ती पुन्हा म्हटली , ‘ म्या बाहेरची हाय म्हटलं , तरी सोडली न्हाय …
पुन्हा रडू लागली .
‘ दोग – चौगंव्हतं … म्हाईत न्हाय . झोपंतच मला उचाललं आसंल . मी जागी झाली . तवा माझं त्वांड बांधल्यालं व्हतं . आन् मला दोगा – चौगांनी उचलून चालवलं व्हतं …
‘ आन् पुन्हा रडायला लागली . त्या तिकडं अंधारात बोट दाखवून ती सांगत व्हती …
‘ लई जुलूम झालं , गो ! आला गावा मितशय्योट ! ‘ ( आरं , बाबा . आता काय करू ) म्हणून रडाय लागायची .
‘ लई कळा सोसल्या … लांडग्यांनी सोडली न्हाय . देह्याचं फुटाणं झालं ! ‘ असं काय काय म्हणायची आन् भवतल भवतलून रडायची .
आता साऱ्यासनी समाजलं व्हुतं . तिला बायांनी धरून ठेवली व्हती . ती सारका म्हणत व्हती ,
‘ नांक सागोटगू ‘ (मला मरू दे . आता देह्याला ठिवाचं न्हाय.) आन् उठून पळायची . बाया धरायच्या . तिला गडी कोन व्हतं , माहीत नव्हतं . सांगता येत नव्हतं .
आईनं येऊन बाला आन् मारतीमामाला सांगितलं , तसा मारतीमामा गडाबडा लोळाय लागला .
‘ रांडंच्या गांडीनं तमाशा केला . मला वाटतच व्होतं … ही शिंदळ नांदायची न्हाय . आपलं नाक कापलं ‘ आन् रडाय लागला .
त्याला बाप्यांनी धरला . समजावला .
दोगांनी आक्की रात जागवली .
मामाचा लई दिसांचा संशय होता . ‘ देकनी बाईल नव्हं आपली ‘ , म्हणून फडाफडा तोंडात मारून घेत हुता .
कैकाड्यांच्या बिराडावर लई कालवा झाला . मानसं जमाय लागली . फटफटीत झालं होतं .
‘ आता हितं राहण्यात सानपन न्हाय ‘ … बा म्हणत होता , ‘ ह्यास्नी सोडून चालायचं न्हाय . काय करावं ?
सकाळ झाली , तसं मारतीमामा मामीकडं बघून म्हनला,
आता आपल्या वाटा वायल्या झाल्या . तुजं त्वांड कुठंबी काळं कर . माजा संबंध न्हाय . सारी आबरू नाशिवलीस . आता देसूधडीला लागल्याच . तूबी लाग . ‘ म्हनत बिराड बांदाय सुरुवात केली .
पारुमामी उठून निगाली . आता काय करतीया , हे बगायला आई – बा मागं मागं गेलीत . आमी बिराडावर बसलो . सारी मोठी माणसं दोगांच्या मागं गेली व्हती . मामानं पारुमामीला नेहली न्हाय . भोग , रांडं , कर्माचा भोग ! म्हनत गाडीनं निगून गेला .
पारुमामी येड्यावानी धा – पाच गावं आमच्या बिराडासंगं फिरली . जेवायची न्हाय . खायची न्हाय . जवा बगावं , तवा रडायची . आई – बा तिच्यासंगं फटकून वागायचे . एका रातीला ती निगून गेली . कुठं गेली , कुनाला ठावं ? चुकल्या – चुकल्यासारखं वाटत व्हतं . आई तिला लई निसूकः ७ शिव्या द्यायची . काय झालंय , ते समजत नव्हतं . पन काय तरी वाईट झालं , येवढंच समजलं .
म्होरं बऱ्याच दिवसांनी काळुबायच्या जत्रंत पारुमामीचा बा आईला म्हनत व्हता ,
‘ ती माझ्याकडं आली व्हती . पन तिला याड लागलं व्हतं . आणि त्यातच ती खितपून खितपून मेली . मरतानासुदा सारकं बडाबडा करीत व्हती . नुसत्या शिव्यांचा तडाका लावायची . मी पंचात मारत्याला वडनार हाय !
‘ मारतीमामानं दुसरं लगीन केलं व्हतं . पण आई म्हनायची , ‘
भिकारानं गरतीवानी व्हावं. तमाशातल्या नाचनारनीवानी नट्टापट्टा करून वागू न्हाय . न्हाईतर पारीवानी व्हतं .
‘ आन् खरंच आईनं डोक्याला कदी फनी लावल्याचं मी पाहात नव्हतो . बा तेवढं नेमानं आंगूळ करायचा . त्येला देवाला पानी घालायचं असायचं . आन् त्यानं आंगूळ केली नसली , की मला आंगूळ करून देवाला पानी घालावं लागायचं .
असंच कोकणातनं घराकडं जायची तयारी सारीजण करीत व्हते . आपल्या जवळचं तांदूळ इकून पैका करत व्हते . आन् चार – दोन गावं करून निगायचं होतं . भाताची खाचरं रिकामी झाल्याली , सुगी संपत आल्याली . गिराईक इचारत नव्हतं . परतेकाचं ध्यान घाटावर लागलं व्हतं . बिराडं मागारी फिरनार व्हती .
आमच्या बिराडापासनं बरंच लांब एक देऊळ व्हतं . त्या देवळाच्या आडूसाला एक पिंगळा जोशी राहात होता . पिंगळा वराडल्यावानी त्यो वराडायचा . पण दिवसाचं वरडायचा न्हाय . एका हातात खंदिल घेतलेला आन् दुसऱ्या हातात घंटी घेतलेली , घंटी वाजवत निम्म्या रातचं त्यो बाहेर जायचा . झुंजमुंज होताना ह्यो ज्याला दिसंल , त्याला चांगला दिस जायचा . दिस चांगला जावा म्हून ह्या पिंगळ्याला भेटंल त्यो पैसं द्यायचा . कुळवाडी धान्यबी द्यायचे . ह्यो त्याला बरकत येऊ दे ‘ म्हनत आवकश चिंतत म्होरं जायचा. मधीच पिंगळ्यावानी वरडायचा .
ह्या जातीच्या नशिबाला लई भटकंती असायची. आमी निदान चार – दोन दिस
क्रमशः
स्रोत:(पद्मश्री लक्ष्मण माने यांच्या उपरा कादंबरीतुन)
