उपरा,लक्ष्मण माने.(भाग १५).

उपरा,लक्ष्मण माने..

घालायच्या . कळवंडी लागल्यात म्हणून . कुंडल्या म्हनला , ‘

आपुन पवायला जाऊ . येताय का ? ‘

मला पवायला येत नव्हतं . मी रेंगाळलो . तशी सारी गावडी माघारी आली . माझी दोस्ती करीत कुंडल्या म्होरं आला . मी पागाळलो . घरात सांगितलं न्हाय . न्हाईतर जाऊ दिलं नसतं . तसाच पोरांच्या संगं हिरीवर पवायला गेलो . मी आयला हिरीच्या काठाला बगाडाजवळ बसलो व्हतो . सारी पोरं पवत व्हती , उड्या टाकीत व्हती . कुंडल्यानं , बाळ्यानं , भान्यानं कापडं काढून नागव्यानं उड्या मारायला सुरुवात केली . कुंडल्यानं पाण्यातनं भान्याला खुनीवलं . काय काय पान्यात बोलले . बाळ्या हिरीतनं वर आला . मुतायला गेल्यावानी गेला आन् मी हिरीत बगतुया असं बगून कापडासकट मला हिरीचं पानी दावलं . मला पवायला येत नव्हतं . मी पाण्यात गेलो , वर आलो . नाकातोंडात पानी जात व्हतं . जीव गुदमरत व्हता . वरडत व्हतो . पन समजत नव्हतं . गटकाळ्या खात व्हतो . कुंडल्या , बाळ्या , भान्या फिदीफिदी दात काडीत व्हते . आता आपुन मरनार म्हनून जाम घाबरून गेलो व्हतो . बऱ्याच गटकाळ्या खाल्ल्यावर कुंडल्यानं पान्यात उडी मारली . माझ्या पायाला धरला . हातपाय हलत व्हते . मी कसाबसा पायरीवर आलो . पायरीवरनं वर चढत व्हतो . तेवढ्यात भान्यानं पुना पान्यात ढकाललं . मी पुना बुडाय लागलो . पुना कुंडल्यानं काडला . मी मोठ्यांदा रडायला लागलो व्हुतो . आपल्याला ही पोरं जिवं मारनार , असं वाटत व्हतं . मला असं चार – पाच येळा पान्यात टाकलं म्हनून कपाटीला धरून चियचिऱ्यानं वर चढलो . बगाडाच्या लाकडाला मिठी मारून बोंबललो , तशी पोरं गोडीला आली .

‘ वरडू नगं ! न्हाईतर , व्हंकाड्या , पुना पान्यात टाकू ! ‘ असा दम देऊ लागले .

मी मुकाट्यानं गप्प झालो . अंगातली पैरण , चड्डी भिजली हुती. तसाच वल्या अंगानं पळत सुटलो . वरडत आरडत घर गाठलं.

उनं उतारली हुती . लिंबाच्या पारावर आई वाट बघत बसली व्हुती . आईला बघितल्याबरोबर रडायचा आपुनच थांबलो . ह्यातलं घरी काय सांगायचंन्हाय … ..कुंडल्या म्हनाला व्हता . अंगात भिजकी कापडं बगून आई मारंल म्हणून तिला बगल दिऊन घराकडं निगालो हुतो . आईनं वळाकलं व्हतं .

‘ आरं , मुडद्या ! कुठं निगालास … तुझी डुळी मी सिनगारली ! म्हणत ती आली , तसा पळालो . म्होरं मी आन् मागं आई पळत व्हती . तिनं मला गाठला , हात धरला . चार – पाच कानसुलात बसल्या . ‘ पवायला जातुयास व्हय ? ‘ म्हनत हानत व्हती . कापडं काढीत व्हती . ‘ तुझ्या बापाला सांचं सांगून तुला टांगायलाच लावती का न्हाय बग ‘ म्हनत दम देत घरी आणलं , तवा मनातनं आधीच भ्यालाला मी आनकीनच हबकून गेलो व्हतो . पन आईनं मातुर बाला कायबी सांगितलं नव्हतं .

गावात कुणाचं लगीन निघालं की बिनभिकारांची तारांबळ उडायची. मधल्या आळीच्या तानाजी पाटलाचं लगीन असंच गाजलं . मोठ्याचं लगीन असलं, की आईला कामच काम असायचं . सारा मांडव आन् आसपासची जागा लोटायची . केरं भरायची . मी तिला मदत करायचो . त्या दिशी घरात चूल पेटायची न्हाय . दिसभर दाताचं पाणी गिळत बसायचं . कवा पंगती बसत्याल असं हुयाचं . सारकं ध्यान तिकडंच असायचं . कुणीतरी पंगती बसल्या म्हणून कैकाडवाड्यात सांगायचं, आन् आमच्या हातातल्या जरमली ताटल्या , धडपी उडवीत आमी पळत लगीनघराकडं पळायचो . लगीनघराजवळ गेल्यावर पंगतीचा पत्त्या नसायचा . पुना मान मिरवीत मागारी यायचे . आखीर पंगती बसायच्या . आमी उकिरड्याच्या कडंला लांब येगळी पंगत धरायचो . आमच्या बैत्याचं घर असलं , की आमी मालकावानी मिरवायचो . आमच्या बैत्याचं घर नसलं की दुसरं कुनी तरी मिरवायचं . वाडपी वाढत यायचे . आमी कालवा करायचो , वाढपी निगून जायचा . लई कालवा झाला , की कुनीतरी ह्यांच्या आईला झवलं म्हनत अंगावर धावून यायचा . आमची रेटारेटी हुयाची . आमी पळत सुटायचो . त्यो मानूस गेला की पुना जमायचो . ‘ दादा वाढ रे , बाबा वाढ रे ‘ म्हनत असायचो. एकांदा पोक्त मानूस आनून वाढायचा. मग पितळीत लापसी , लाडू , भात , असंल ते मिळंल तेवढं घ्यायचं आन् पुना वाढ म्हनून बसायचं . पुना कुनीतरी शिव्या घालायचं.

सारं ध्यान पंगती उठण्यावर असायचं . एकदम पंगत उठायची . पत्रावळ्यांचा ढीग व्हायचा . आमच्या उड्या पडायच्या . आमी पत्रावळ्यांवर धावून जायचो . मिळेल त्यो जिनस धडप्यात घालायचा . कुत्री पत्रावळ्या चाटायच्या आत सारं उरकायचं ! जमल्यालं खरकाटं धडप्यात बांधून आपसांत शिवीगाळ करीत मागारी यायचं .

दोन दिवस त्येच . दुसऱ्या दिवशी राहिलेली आमटी , भात मागायला जायचं . लापशी , भात उनात वाळवायचं . वाळून चांगलं कडंग झालं , की दोन – तीन दिस खायचं. लगीनसराईत लई येळा सयपाक व्हायचा न्हाय. साऱ्याला आवतनं असायची. आपल्याला का न्हाय मनात यायचं . पन उत्तर म्हाईत नसायचं.

जमल , मिळंल ते खायचं . मिळंल तवा काम करायचं. असं करीत आकाड कवा सरला ते समजलं न्हाय . बा – आई सारकं राबायचे . पै – पैका गाठीला मारायचे . समीचं लगीन ठरल्यालं. फलटणकरनीनं तगादा लावल्याला. लगीनसराई संपली. सारीकैकाडी रिकामी झाली आन् बानं लगनाची तीत धरली.

लगीन जवळ आलं , तसं सारी नात्यागोत्याची मानसं जमाय लागली . गाढवाच्या दिंडीच्या दिंडी यायला लागल्या. सारा कैकाडवाडा मानसांनी भरला . लगीन आठ दिवस म्होरं हुतं, फलटणकरनीचं व – हाड येऊन बसलं व्हतं. पावण्याचं जेवणखाण सुरू झालं हुतं.

बघता बघता हळदी लागल्या. हळदी लागताना बरीच बाचाबाच झाली . आमचा मामा आडून बसला हुता , त्याच्या फारदुटाचा सुल्ला मांडाय उशीर व्हत व्हता. चौदा रुपये नवऱ्याचं मालकानं मावळखंड मांडायचं. त्यो मांडल्याशिवाय हळद लागायची न्हाय . असा नेम हुता .

हळदी झाल्या . लग्नाचा दिस उजाडला . सकाळच्या पारी गुळाचा खडा , बुकी वाजवत नेली. आन दिस कासराभर आल्याबरूबर फलटणकरनीनं ११ पायल्या फुटुल वाजवीत मांडवात आनला . नवऱ्याच्या मालकानं दोन रुपये आन् फुटुल माल गहू , तांदूळ , दाळ आणून मांडली . पंच म्होरं झालं . त्यांनी नवऱ्याच्या मामाकडनं, नवरीच्या मामाकडनं नवऱ्याच्या बापाकडं आन् नवरीच्या बापाकडं काटनमाडा , आवनमाडा , कुडतनमाडा , ” म्हनत म्हनत ५ रुपयांपास्नं ५० रुपयांपोतुर पैसं घेतलं . ते पंचांनी आपल्याजवळ ठेवले .

हळदी दिवशी नवऱ्याच्या मालकानं तेलच्याचं जेवान दिलं व्हतं . लग्नाच्या दिशी नवरीच्या मालकानं फुटुल आल्यावर जेवान द्याचं . साड्याच्या दिवशी पुन्हा नवऱ्याच्या मालकानं जेवान द्याचं . सारा दिस समी बाशिंग बांधून बसली व्हती . तिला लुगडं नेसिवलं व्हतं . तिला ते झेपत नव्हतं . गुंडळून गुंडळून ने सिवल्यालं लुगडं पायात अडकायचं . मला कुरवल्याचा मान व्हुता . नुसता मिरवीत व्हुतो . साऱ्यान्ला नवी कापडं घेतली व्हुती . आप्पा , तात्या , बा लागंल त्याला दारू , बिड्या , पान , सुपारी देत व्हते . चिंचखाली , लिंबाखाली ओक चाललं होतं . ओकाळे थळभरणी घ्यायाचे . पंचांची चंगळ असायची . कुनाचा कज्जा आसला की बैठक बसायची . पैसं वसूल करायचे . दारुड्यान्ला ऊत आल्याला .

लगनाची येळ झाली तरी देवाक गेलं नव्हतं . सारीजन पिऊन ल्हास व्हते . आईचा जीव तुटत व्हता . पन बाबी मानसात नव्हता . आकीर देवाक आन् नवरदेव एकदमच देवाला गेलं . मारुतीच्या देवळाच्या म्होरं नवऱ्याला खांद्यावरनं न्हेला व्हता . भाईरनंच पाया पडून खांद्यावरनं मिरवत त्यो मांडवात आनला . आकशीदा वाटल्या . बामन मांडवाच्या भाईर उभा राहून बडबडत व्हता . लोक तांदूळ टाकीत व्हते . बामनानं खुनीवलं . तसं बेंड वाजला . लोकांनी टाळ्या वाजिवल्या . तवा तीनसांज टळून गेली व्हती .

कपाळाला बासिंग बांधून समी आन् वश्या मोठ्या मानसावानी गपचीप बसली व्हती .

समी मला जवळ बसवत व्हती . ‘ दादा, मला लई भूक लागलीय … उपास कवा सोडायचा ?

‘ मी पोक्त मानसावानी तिला समजावीत आईकडं गेलू . तिचा उपास साडं लागल्यावर सुटनार व्हता . साडा लागायला लई रात झाली व्हती . ती कवा जेवली कुनास ठावं ? मी मातर पंगतीला बसून जेवलो व्हतो . पाच – पाच दहा – दहा जनं एका – एका परातीत पोळ्या गुळवनीत कुस्करून हानत व्हतो . सारी बडाबडा करीत व्हती . घाण वड्यार वास येत व्हता . शिरप्या तर सारका वकत व्हता . आन् तरी बडबडत व्हता . ‘ लाल्याला शिकवीन ! आसंल ते सारं इकीन पन लाल्याला शिकवीन ! ‘ असं बडबडायचा .

बा म्हणायचा ,

‘ आरं शिऱ्या , शिकीव , शिकीव लेका ! माझा वाग आवंदा पास झालाय . आता कागूद , पतार वाचील .

‘ दोगं मांडवाच्या मेडीला टेकून बोलत बसलं व्हतं . जेनवार जेवत व्हती . आप्पा , तात्या हाय – नव्हं बघत व्हते . आन् बा ल्हास झाला व्हता . त्यो सांगत व्हता ,

‘ दगड्या म्हाराचं टपाल आलं म्हून त्यो काकाकडं गेला , तर काकानं ते पतार घेतलं . आन् वाचून बाजूला ठिवलं . दगड्याला म्हनतू कसा – दगड्या , तेवढी लाकडं फोडून दे . दगड्यानं सारी लाकडं फोडली आयघालीत , तवा पतार वाचून दाकिवलं . आन् टपालात लिव्हलं व्हतं , त्याची मावशी मेलीया म्हनून . आला घरी बोंबलत , आन् काय !

‘ शिऱ्या उचक्या देत हुंकारत व्हुता . बा म्होरं बोलत व्हुता ,

‘ मी आमच्या दहिगावकरनीचं टपाल आलं , म्हनून रावसाब धन्याकडं न्हेलं व्हुतं ,तर माजाकडनं धन्यांनी ढिगभर वैरण कापून घालाय लावली, तवा टपाल वाचलं. लई वंगाळ आसत्यात ही कुणबाट . तू लाल्याला शिकीव, झ्याटमारी ! ‘ आन् असंच माझं बा सांगत व्हुता . कवाकवा शिव्याबी देत व्हता . ऐकत ऐकत एका रकट्यावर कवा झोप लागली , ती समाजलीच न्हाय .

दुसऱ्या दिवशी पंचांनी जमल्याल्या पैक्यातनं शालगुन्ना ९२ आनला व्हता. त्याची मेजवानी झाली. दारूचा पूर आला होता. तांदळातला खडा निवडावा तसा बिन- पेलेला मानूस सोदायचा. येवढा पैका घालविला, पन आईच्या म्हातारीची पोटझाकणी काय बगडीनं आनली नव्हती. दुसऱ्या का तिसऱ्या दिसी व – हाड गेलं . पण व – हाडासंगं समी गेली, तवा कितीतरी वेळ चिंचखाली मी हामसून हामसून रडत व्हतो.

आता खानारं एक त्वांड कमी झालं हुतं . पावसकाल म्हंजी जीवावरचं दुकनं . त्यात लग्नात बानं हौवसमवज केल्याली. कर्जाचा ढीग झाल्याला . घरात दान्याचा कन नसायचा . आई – बा मिळेल ते काम करायचं . मूठभर मिरच्यांसाठी दिसदिस मिरच्या तोडायची . येताना ढेसं आनायची . ढेसं उकडून खायाचं . मागून आनल्यालं , खरकाट – मारकाटं खायाचं . बाचा जीव कळवळायचा , पण पाटी – पुस्तकं घेता येत न्हवती . आकुबा मास्तरानं कुनाची तरी जुनी पुस्तकं दिली हुती . तीच घिऊन आसंल तर खाल्लं , नसंल तर मिठाचा खडा घालून पानी पियाचं . साळंत जायाचं .

आई – बा बरोबर फिरत फिरत आज हितं … उद्या तिथं करीत चौथी कसातरी पास झालो . आता चांगलं समजत हुतं. आई – बासंगं फिरायचं , तर शाळंचं नुकसान हुयाचं. म्हन मी आईमागं सारकं टुमनं लावलं हुतं . मी येकलाच घरी हातू . तुमी जावा , पोट भरायला . बाला पटत न्हवतं . आकीर रामभावनं बाला सांगितलं ,

‘ माझ्या जीवावर त्याला हाऊ दे . मी ध्यान ठिवीन . लागलं – सवरलं बगीन .

‘ आसं जवा म्हनलं, तवा बा तयार झाला.

आई – बा पोट भरायला गेलं . मला जवारी , तिकाट , मीठ ठिवलं . गावात मानसास्नी सांगितलं . मला बैजवार ताकीत दिली . ‘ घरी कुनी न्हाय … पोरांच्या कळवंडी काडू नगं … न्हायतर मारून टाकत्याल . म्हन … ‘ आई सारकं सांगीत हुती . मला रडायला यायचं , पन दाबून धरायचो . रामभावचा मोठा आदार वाटायचा . आईनं , बानं मन दगडावानी केलं … आन् पोट भरायला गेले .

मी नेमानं शाळंत जात व्हतो . शाळंत कांबळेमास्तर हायाचा . शाळा सुटली , तरी मास्तरसंग बोलत बसायचो . ते हातानं करून खायचे . मला कोरचतकूर मिळायची . कवाकवा घरात भाकरी करायचो . भाकरी कराय नगं वाटायचं . पण भूक लागली की करायचो . लइ येळा तर बाहीरच भागवायचो . बा कुनाकडनं तरी टपाल लिव्हायचा .

क्रमशः
स्रोत:(पद्मश्री लक्ष्मण माने यांच्या उपरा या कादंबरीतुन )

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading