उपरा,लक्ष्मण माने.(भाग १७).

उपरा,लक्ष्मण माने..

जात हुतो . आईबरूबर इकायला जात हुतो . घरी पोरं संबळत हुतो आन् साळाबी शिकत हुतो . अजून नापास झालो नव्हतो . बा आता पैल्यावानी मारत नव्हता . चिडला की , शाळंवर उठायचा .

‘ नापास तर हू , मंग बग तुझी शाळाच बंद करतू का न्हाय ते . ‘ ही भाषा सारकी येत व्हती . ऐकेनासा झाला , की शाळा बुडवून जगायला त्याच्यासंगं जात व्हतो . आता मोठा झालो हुतो . बाच्या वज्यातलं वजं घेत हुतो , मूठमूठ फोका कापीत हुतो . चिरून देत हुतो . एकाला दोन – दोनाला तिगं कमवायला लागलो . तसं बाला सारकं वाटत व्हुतं की शाळंचा नाद सोडावा . पोटापुरतं बास झालं . आन् असं करीत पाचवी पास झालो .

” आयला ! पोरगं कामबी करतंय , वाजवतंयबी आन् पासबी होतंय . आता ह्याची शाळा बंद कशी होणार ? हे लई शिकलं तर ? त्याच्या आयला नगंच . हेला नापास झालं , की काडूनच टाकतो ! ‘ असं सारखं बडबडायाचा . मी सहावीला आलो म्हनल्यावर आता जाऊ दे त्याच्या आयला ! सातवी येवढी झाली , की पुरं झालं . ह्या इचारात सहावीचं वरीस घरीच राहिलो . बानं खळखळ केली न्हाय . पन समज चांगली आली व्हती . रामभावपण बाला मदनं – आदनं सांगीत व्हतेच .

सहावीत आलो , तसे गावातल्या मानसांनीबी ‘ आतापातुर , आयला , कैकाडवाड्यात तूच शिकतुयास गड्या ! ‘ असं कौतुकानं म्हनायचे , ते सोडलं आन् , ‘ लेका , गाढवाला आन् घोड्याला काय बराबरी असतीया व्हय ? ‘ म्हणून हिनवायला सुरुवात केली व्हती . कुनीच जम बसवून घेत नव्हतं . कितीबी शान्यासारखा वागलो , तरी किटाळ उभी राह्यचीच .

असंच एकदा पोरांच्या नादानं जकतापांच्या लग्नाला व – हाडासंगं जिंतीला गेलो व्हतो . जाताना बैलगाड्यातनं गेलो , पर लई गर्दी झाली , की चालत बी व्हतो . लव्हाराच्या बाज्याच्या गाडीत बसून गेलो व्हुतो . साऱ्या लग्नात नाचत – बागडत गावातल्या पोरांच्यात खेळत व्हुतो . सारी पोरं साळंतलीच असायची . गावची पोरं परगावात लई चांगली वागायची . चांगलाच मिसळून गेलो हुतो . लग्नाच्या पंगती बसल्या . मी आपला पोरांच्या नादानं पंगतीत आगदी मांडवात जेवायला बसलो . आता वराडाच्या पावन्यातला , कश्याला कोन काय म्हनतंय . आन् येवढ्या मानसांत कोन वळाकतंय , म्हनून पोरांनी आगरेव केला आन् मी पंगतीत जेवायला बसलो . जेवान बरंच झालं हुतं . वाढपी वाढत हुते . पंगतीला सारी मराठ्याची पोरं हुती आन् एक वाढपी आला त्यो आमच्या वराडातला आन् लगीनघरचा पावना . त्यानं डोळं मोठं केलं . खाली वाकला , माझा कान धरला आन् म्हनला ,

‘ व्हंकाड्या , काय समजतं का न्हाय ? चल , निग हितनं !

‘आन् भरल्या ताटावरनं उठलो . कुनी काय बोललं न्हाय . जीवाला लागलं हुतं . जवळनं निरा नदी वहात हुती . पान्याचा शांत प्रवाह चालला हुता . डोळ्यांच्या टिपानी सदरा वला झाला हुता . मुकाट्यानं जाऊन जानवस घरी झोपलो . कुनी इचारलं न्हाय , की पुसलं न्हाय , आता गावात गेलो , की आपलं मराण जवळ येणार , येवढाच इचार सारका मनात असायचा . आन् राहून राहून डोळ्याला पाणी याचं .

आन् झालंबी तसंच . आता बाचा मार चुकला व्होता , पण घरी वराड आलं आन् जकतापानं बाला बोलावून लेकाला सांग ! सारी पंगत बाटिवली ! आम्ही म्हून गप्प बसलू . गावात असता , म्हंजी समाजलं आसतं ‘ असा दम भरला , तर त्याच्या थोरल्या लेकानं असलं बेणं कुठं काढलं व्हतंस , रं .. , बाप्या . लेका , ते चार बुकं शिकलं … अजून नाकाचा शेंबूड निगंना , आन् गांड धुवायला यीना , तवर थेर करायला लागलंय . संबळून आस . परिनाम लई वंगाळ व्हत्याल !

‘ बा घरी आला तो धुमसतच . मी दारात उसाचं टिपर खात बसलू हुतो . आला तसा ‘ निन गामक खेद्या हेचा मिसेक मुतुर कुडीकिरक हुगीना हाला नाई ‘ ( तुझ्या आईला गाढव लावला ! कशाला मूत प्यायला गेला व्हतास रं , लग्नाला ? ) म्हनत पायातली नालाची व्हान काढली आन् राग शांत होईस्तोवर मारीत सुटला . मी गप्प सोसत हुतो . डोळ्यातनं रक्ताची धार लागली व्हती . आई मधी पडली , तर तिलाबी चार – पाच रट्ट बसलं .

‘ रांडं , तूच डाळ नाशिवलीयास . ह्याला आपली जात समजत न्हाय का गोत समजत न्हाय . आपुन काय खरकाट मारकाट खानारी मानसं ! आपल्या पायरीनं वागल्यालं वंगाळ म्हनतुया . आन् , रांडं तूच तेला नासविलीयास ! ‘ म्हनत बडबड करीत राहिला .

गावातली मानसं आन् पोरं जवानी जमली व्हुती . रामभाव बावर बिगाडला हुता .

‘ आरं , पॉर हाय ते ! त्येला काय समजतंया ? ‘ आसं म्हनत व्हुता . पण बाकीच्यांनी बाचीच रीग वढली व्हुती .

आता , काम केलं … म्होरं म्होरं करून बाचं काम वढलं , तर त्यो चांगलं बोलायचा . खुशीत असला , तर नीट मोकळं बोलायचा … न्हाय तर सदा तिरसिंगराव झालेला असायचा . आळीतली मानसं , ‘ बाप्याचं पॉर शिकतंय , हे काय चांगलं न्हाय . त्यानं हे आसलं म्हारलार्ड बंद कराय पाहिजे . आपल्यात आसलं बरं न्हाय . खरूज नासल . व्हत्याचं नव्हतं व्हईल ‘ म्हणून बाला बगलं बगलंनं बोलत हुते . आन् मी आता घरात जेवन्यापुरता आन् कामापुरता असायचो . बाकीचा सारा येळ रामभाऊ जितं आसंल , त्यांच्या मागंमागं न्हाईतर आकुबा मास्तरच्या मार्ग , न्हाईतर कांबळे , गायकवाड , भंडारे मास्तर ह्यांच्या मार्ग असायचा . ते बोलत आसलं , की मी मन दिऊन ऐकत हुतो . शिकल्यावर आसं बोलायला ईल , मास्तर होता ईल , म्हनून जीवाचा कान करून त्यांच्या गप्पा ऐकत व्हतो . वाढत व्हुतो वयानं . आकलंनं , अनुभवानं घडत होतो … गाढवामागं तंबाकू खायला कवा लागलो , हे सांगता यायचं न्हाय , पण तलाप झाली म्हंजी बाकडं मागूनबी खात व्हतो . आता आई तंबाकूला दोन आनं देत व्हुती . पुडी आन् डबी मागं लागली , ती कायमची .

सहावी पास झालो ते काठावर – कसातरी . खरंतर , आकुबा मास्तर होता म्हनूनच पास होत होतो .

सातवीला आलो , तवा माझी पुस्तकं , वह्या , कापडं , सारं माझ्या बेंडाच्या पैश्यातनंच झालं व्हतं . बा पोट भरायला गेला , तरी मी गेलो न्हाई . लई उचलआपट झाली . घरात आदीच चार – चार दिस चूल पेटायची न्हाय . त्यात आता कुनाच्या दारात भीक मागायला नगो वाटायचं . कापडं धूत होतो . साबन नसायचा . हिंगणबिटक्या लावायच्या आन् आंगारकं , चड्डी धुवायची . बदलायला दुसरं नसायचं . उवा व्हायच्या . तसंच चाललं व्हतं . बानं आता सारकं काट्यावर धरलं होतं . आई तळमळायची . चोरून दानं पाठवायची . हातानं – परहातानं जेवढं जमल तेवढं करायची . बासंग सारका कज्जा करायची . मार खायाची .

माझी शाळा चालली व्हती . बंद पडली नव्हती . मनात अनेकदा अनेक इचार यायचे , पण टिकून व्हतो .

बगता बगता सातवीचं वर्ष संपत आलं . अभ्यास मन लावून करीत होतो . त्या वर्षी बानं मढीला नेलं व्हतं . ‘ जात जमती . आता तुला नेलं पायजी ‘ म्हणून नेलं . बाकी जत्रा लई मोठी , पर धेनात एकच गोष्ट राहिली . पंचाम्होरं ओक चालला व्हता . गुन्हेगाराच्या डोक्यावर गू – घाणीनं पाणी भरलेला डेरा भरून दिला होता . त्यो देवाला फेऱ्या घालीत व्हता . आन् बाकीच्या पंचांनी एक – एक खडा त्या डेऱ्याला मारायचा . डेऱ्यावर दगडाचा खडा बसला , की डेयाला भॉक पडायचं . भोकातनं घाण अंगावर सांडायची . भळाभळा वाहात राह्याची . गडी उभा नहाला व्हता . मनातनं त्याच्या जाग्यावर मीच उभा राहिलोय असं वाटायचं . जत्रा संपून कैक दिस झालं , पण ते धेनातनं जात न्हाय .

परीक्षा केंद्रावर होती . फलटणला परीक्षेला जायचं . चार – पाच दिवस फलटणला राह्याचं . मनातनं आनंद झाला होता . कसं का आसंना , आपुन सातवीपतुर आलो , आभाळाला हात पोचल्यावानी वाटायचं .

परीक्षा जवळ येत हुती , मन लावून अभ्यास करत हुतो , पन काय आभ्यास करायचो ते समजायचं न्हाय . त्यात गावात एक नवंच स्वांग आलं हुतं . ग्रामपंचायतीच्या निवडणुका आल्या हुत्या . गावात ज्यो त्यो उठायचा आन् मतांचं बोलायाचा . सगळ्या गावाला याड लागलं हुतं . आमची आळी , खालची आळी , वरची आळी , मदली आळी , म्हारवाडा आन् व्हलारवाडा म्हंजी आमचं गाव . आळीगणिक उमीदवार उभं राह्यलं . रामभावचा एक पॅनाल आन वरच्या आळीचा एक पॅनाल . रामभावासंग लाल्या म्हार , मद्या रामूसी आन् बब्या मांग उभं राहिल्यालं . रोज सांचं मानसं बोलाय बसली , की गरामपंचातीशिवाय दुसरं बोलत नव्हती . आमी पोरंबी त्यात उतारल्यालो . मास्तर वरडायचा . पन साळंतबी आळीगणिक पोरांच्या पाटा पडल्याल्या . मी मनापासनं रामभाव निवडून यावा म्हनून काम कराया लागलो . आई आन् साऱ्या कैकाडवाड्यातल्या बायान्ला खुना सांगत हुतो . वरच्या आळीच्यान्ला हे दिसत हुतं . बाप्याचं पॉर लई प्रचार करतंय म्हनं … बाला शिव्या बसायच्या … बा बोंबलायचा , पन मी काय ऐकत नव्हतो . सारा म्हारोडा , मांगोडा , रामोसवाडा – सगळ्यांना खुना सांगीत हुतो . परीक्षा जवळ आल्याली . पर ते डोक्यात बसत नव्हतं .

बालाबी मनातनं रामभाव निवडून यावा आसं लई आसायचं . पण त्यो मला दटवायचा . ‘ आपलं काम नव्हं . जीव घेत्याल . घर पेटीवत्याल ! गावात न्हाऊ द्यायचे न्हाईत . पान्यात न्हाहून माशासंगं वैर बांधू नगं ‘ म्हणून बोलायचा . पन मी घरात फारसा नसायचोच .

आन् आकीर निवडणूक झाली . आमचा सारा पॅनल पडला . त्या रातीला लई उशीर जागलो . पुस्तक काय हातात नव्हतं . सारकं भ्या वाटायचं . आयला ! ह्या म्हारांनी तर रामभावाला मतं द्यायची . सारकंडोस्कं सनकायचं . पर दिसत हुतं … चुली पेटत नव्हत्या . रोज बांदाला जायचं . सेजला देल , त्यो बाजंला घ्येल … रामभाव काय देनार हाय ? त्येला का निवडून द्याचा ?

परीक्षेला जायाचं , तर पोरांतनी गट पडल्यालं. मी गांगारलो व्हतो . आईला सारकं भ्या वाटायचं . ह्यो नीट जगू द्याचा न्हाय. म्हनून रोज डूली सिनगारीत हुती . सारी पोरं निगाली . चार दिस फलटणात व्हायचं . जेवनं घरनं आनायची हुती . माजं जेवान कोन आनील ? आई जेवान कुठनं आनील ? कोन जेवायला देल ? एक भोकपडका पैसा जवळ न्हाय . बानं ठेका धरला हुता . आईनं दोन रुपयं दिलं . जेवान पाठवीन म्हनाली . मी परीक्षेला गेलो . साऱ्यांचं डबं आलं , की आकुवामास्तर मला भाकरी देत हुते . मी खायचो . पेपर लिव्हायचो . पर मनात सारकं असायचं , आपलं जेवान का न्हाय ? ढसाढसा पानी प्याचं आन् वाचायाचं . यील तेवढं लिवायचं .

पेपर सुटला , की पोरं कायबाय घिऊन खायाची . कुनी दिलं , तर … दिलं न्हाय तर गलासानं पानी पियाचं आन् पेपर लिव्हायाचं . पेपर झालं . आता घरी जायचं , तर मास्तर म्हणाले , ‘ फुटू काडायाचाय . ‘ काय असतू फुटू ? कसा काढत्यात ? … कवा फुटू काढत्याल ? असं झाल्यालं . पन मास्तरानं वर्गनी जमवायला सुरुवात केली आन् माझं त्वांड कोरडंफट पडलं . मी गप बसलो व्हुतो . मास्तरनं मला वर्गनी मागितली न्हाय . आमी एका माडीवर गेलो . फुटू काढाय वळीत बसवायचं . मास्तर सांगल , तशी पोरं बसली . मला बसावलं तितं बसलो .माझ्या शेजारी गावातली पोरगी बसली . दिसायला लई देकनी व्हती . गोरीपान . नाकाडोळ्यानं तरतरीत . एकाच वर्गात पन आख्ख्या वर्गात मी जवळ कदीच गेलो न्हाय . तिला माझ्याजवळ मळमळल्यावानी वाटत व्हतं . ती उठून पल्याड जायला लागली . पन फुटू काढनारा मानूस खेकासला . ती बसली , बटान दाबलं आन् आमी सारी उठून आलो . झालं , मी इचारलं न्हाय , पुसलं न्हाय . मास्तरनं सांगितलं , ‘ घरी जायाचं . ‘ आमी आपलं चालत घरी मागारी आलो .

दोन – चार दिस गेलं असत्याल . मी उसाच्या फडात टिपऱ्या येचत हुतो . दुपारची वेळ असंल . आई घाबऱ्या घाबऱ्या येत हुती . मला वाटलं , हानली असंल बानं . ती जवळ आली . तिनं मानसातनं बाजूला नेलं आन् म्हनली ,

‘ असाच फलटनाला जा . घरी येऊ नगं . घरी आलास , तर कुतरी रगात पेत्याली . ‘ मला समजेना … आपुन तर कायबी केलं न्हाय . मी आईला खोदून खोदून इचारलं . तवा ती म्हणाली ,

‘ आरं … तू त्या रांडला काय म्हनलास ? … आन् फुटू काढताना तिचा हात धरलास व्हय ?

‘ मी देवाची , आईची शपथ घिऊन तिला सांगत हुतो . ती ऐकत नव्हती … ती म्हनत व्हती …

‘ तिचा बा आला व्हता . तुज्या बाला मारलाय . मानसांनी सोडिवलाय . लई मारला , म्हनत व्हुता … तुजी सून घिऊन जा, म्हून . ‘ आईनं समजावलं . डोळ्यांतनं पान्याच्या धारा वाहात हुत्या . आईनं आळंबाळं घेतलं . दोन रुपयं हातात ठिवलं आन् म्हणाली ,

‘ सोमवारी न्हायतर आईतवारी आमी बिराड घिऊन फलटनला येतुया . तुझ्या बानंच सांगितलंया . तू गावात येऊ नगंस … फलटणात बगडाकडं न्हा , ह्यो गाव सोडायचा . कायमचा . पुना हितं यायचं न्हाय .

आई रडतच मागारी गेली .

मी रडत रडत वाटनं चाललो हुतो . मनातनं चडफडत हुतो की असं काय झालं व्हुतं ? साऱ्या वाटनं इचार करीत हुतो . का असं झालं ? बाला लई लागलं असंल . त्यांनी डाव साधला हुता . मी हात चोळत हुतो .

दोन – तीन दिसांनी सारी उस्तवारी करून बानं बिराड बांधलं . आन् फलटणात आला .

शेरात निभायचं न्हाय, म्हणून सोमंथलीला बिराड गेलं. बिराडासंगं जात हुतो. पन बाच्या बोलन्यात फरक व्हुता. आईच्या बोलन्यात फरक हुता . जीव द्यावा , असं सारकं वाटत हुतं, पन पाय वडत वडत मार्ग चालत हुतो,

शाळा आता सुटलीच व्हती. पास – नापास समजायचं व्हतं . बानं सोमंथली सांगवी धरली हुती. नेवरती नायकाच्या चांदवीला बिराड लावलं व्हतं. नायकानं आसरा दिला…

क्रमशः
स्रोत:(पद्मश्री लक्ष्मण माने यांच्या उपरा कादंबरीतुन)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading