उपरा,लक्ष्मण माने.(भाग १८).

उपरा,लक्ष्मण माने..

व्हता . त्याच्या चांदवीला उतारलो तितंच न्हाईलो . बेंडाचा तापा जमला . वाजवायला जायाचो . चांगल्यापैकी ढोल वाजवीत हुतो . रंगून जायाचो . तात्या कलाट वाजवायचा . चुलते – पुतने रंगात यायचो . भजनात भज्यानं म्हनत हुतो . गावात लई घरं म्हंजी धनगरांची , बेलदारांची . मराठ्यांची घरं थोडी . गमत व्हतं . पायरीनं हात व्हुतो .

एकदा सांगवीत वाजवीत व्हतो . नवरदेवाला वाजवीत गडांगणाला नेला . जानवस घरी आन् आमी बाजूला सपराच्या चांदवीला टेकलू व्हतो . इतक्यात शेंबडं पॉर आलं . त्ये व्हतं लाडकं . सारकं म्हनायचं , वाजीव ! ‘ झक मारीत वाजवायचो . त्ये नाचायचं . त्येच्या बाला लई बरं वाटायचं आन् आमचा जीव जायाचा .

बाजा वाजवून वाजवून तान लागली , पान्याचं पिंप भरलं व्हतं , तितं पोरं पान्यात हात घालून खेळत हुती . वराडणी बाया टिपातलं पानी घेत हुत्या . मी पानी मागत व्हतो . कुनी पानी वाढत नव्हतं . आकीर वैतागून गेलो . बानं पानी मागितलं . वरनं पानी प्यालो . हाताच्या वंजळीनं तान भागली न्हाय . अंगावर पानी उडतंय म्हणून मागं सरलो , तसा तोल गेला आन् टिपाला शिवलो . तसी एक बाय वराडली ,

‘ आरं , आरं … मुडद्या ! बाटीवलंस … का पानी आता ?

काय तुझं मडं प्यावं का ? ‘ झालं , बगता बगता सारी चवताळली . बँडवाल्याचं पोर टिपाला शिवलंय . जाहिरात झाली . वर – बापानं टिपाड वतून दिलं . गाडी जुपली आन पानी आनायला पिटाळली . बा नुसता धुसमुसत व्हता .

‘ जितं जाईल , तितं ह्यो आई घालतुया . सुदीनं वागंना झालाय . कपाळात आंड गेल्यागत करतुया . मला तर नुसतं गूखाल्ल्यागत केलंया !

‘ झालं . पास – नापास समजलं . मी एका ठिकाणी वाजवीत व्हुतो . तितं ‘ सातवीचा रिजर्ट लागलाय …. पेपर आलाय ! ‘ म्हनून माणसं बोलत व्हुती . मी ढोल गवयाला दिला आन् पेपर वाचाय गेलो . साऱ्या पेपरात पोरांची नावं छापली व्हती . पण माझं नाव दिसंना . पुना पुना वाचीत व्हुतो . नाव काय दिसत नव्हतं . आपुन नापास झाल्या ही कल्पनाच भयान वाटत हुती . पास झालो असतो तर निदान फुडं शिकलो असतो . आता आपल्याला शाळा न्हाई . शिकशान बंद . तसाच जरा वेळ गेला आन् तिकडं बँड वाजाय लागला .

मुकाट्यानं पेपर व्हुता त्याला दिला आन् वाजवायला लागलो . मनानं कवाच घेतलं हुतं की आता फोका , पाट्या , कुडीक , उपन्या , कनगी आन् पॉट भराय फिरायचं , बास ! बा म्हनल तसं वागलं पायजे . आता आपुन शानं झालं पायजे . पायरीनं हायाचं . घरी साऱ्याला समाजलं हुतं . मी मनातनं झुरत व्हतो . आपल्यामुळं बाला मार बसला . गाव कायमचं सोडावं लागलं . तसं आपल्याला गाव न्हाईच , पर वाडवडील तितं पाऊसकाळात न्हायचे , म्हनून आपलं गाव . आन् त्येबी आपुन सोडलं .

बगता बगता लगीनसराय संपली . तसा एका दिशी बा म्हनला ,

‘ मी आकाकडं जाऊन येतो .

‘चार – पाच दिस त्यो त्याच्या भईनीकडे गेला . मागारी आला , त्यो पोरगी पास करूनच . आईला म्हनला ,

‘ लक्षाचं यंदा ठिवायचं न्हाय . रिन काढू . कुनाचा गू – मूत उचलू . पन आवंदा लगीन ठिवायचं न्हाय !

‘ आईलाबी कामाला हाताखाली सून ईल ह्याचा आनंद व्हुता आन् ‘ माझ्या सिनंच्या साऱ्याची लग्नं झाल्यात . आता ह्याचंबी करू .

झालं … पावनं आलं . बाच सारं लगीन करून देनार व्हता . सुपारी फुटायची व्हती . सारी मानसं जमली व्हती . मी मारुतीच्या देवळाम्होरं इटीदांडू खेळत व्हतो . मला किसन्यानं सांगितलं ,

” दादा निना कनाला कुडसातीरगा ” (दादा तुजं लगीन जमवाय लागल्याती .)

मी ऐकलं . मनात नेमकं काय आलं , सांगता येत न्हाई , पन लगीन करायचं न्हाय . मराठ्याच्या पोरायेवढा झाल्यावर बगू , आसं सांगायचं ठरवून बिराडावर आलू . पन तवर सुपारी फुठली हुती . आन् म्होरची बोलनी चालली हुती .

‘ नवरदेव आला , नवरदेव आला ‘ म्हनत साऱ्यांनी म्होरं घेतलं . कुंकू लावलं . मनात , मोठ्यानं वरडून सांगावं आसं वाटत हुतं , पन त्वांड उगाडलं न्हाय .

सांच्याला जेवनं झाली . मी जेवलो न्हाय . लई इनत्या केल्या . पर जेवलो न्हाय . बा पावन्यामहोरं काय बोलला न्हाय .

दुसऱ्या दिवशी पावनं गेलं . आता तिथी काडायच्या ठरल्या . अर्धं लगीन झाल्यालंच … काय करावं , सारका इचार करीत हुतो . जगात मानसं हायेत … आपुन सारं सोडावं … पोटापुरतं मिळवायला यील असा इचार केला आन् एका रातीला घर – गाव – आई – बाप – बहिणी – भावंडं सोडली आन् रातचाच निघालो . काळूक पडला हुता . किती रात व्हती , म्हाईत न्हाय . पण ठेचा खात रडत आगतत घर सोडलं .

घर सोडून आलू . मनात सारकं भ्या वाटत हुतं . त्यात रातचा एकलाच चाल्यालो . मागंम्होरं मानूस न्हाय . एकांदी मोटार आली , की वाटच्या कडंला जात व्हतो . कुठं जावं , इचार करीत व्हुतो . त्येवढ्यात एकादं पाकरू वराडलं , न्हाईतर कसला आवाज झाला , की उभा राहून मागंम्होरं बगत व्हुतो . पुना चालत व्हतो . चालत – चालत बराच लांब आलो आन् गाप दिसनी उभा राहिलो .

वाटत म्होरं वडा आला व्हुता . वड्याच्या कडंला भुतं असत्यात … कापरं भरलं व्हुतं . वडा कसा वलंडावा , इचारात पडलो . एक मन म्हनत व्हुतं , बा सांगतुया तसं कर – म्होरं जाऊ नगं … मागं जा … .आईचं , किसन्याचं काय व्हईल … ? बा तरास करल . ‘ आन् दुसरं मन म्हनत व्हतं … ‘ लगीन व्हईल . गाढवावानी वझी ..नुसत्या भ्यानंच वाह्या लागत्याल . फोका कापाव्या लागत्याल . वळावं लागंल . इकावं लागंल . आन बावाणी सारं करावं लागेल . ते बरं न्हाय . आपल्याला ये हाल जमायचं न्हाईत . कामाला टिकायचा न्हाईस . सारी म्हनत्यात , आपुन खरंच मरून जाऊ … ‘ असं . मनाचा इचार होत नव्हता . घर सोडून आलो व्हतो . बराच उशीर उभा व्हतो .

तेवढ्यात मागनं एक ट्रक आला . त्यो वड्यातनं गेला . उजेडात सारा वडा बघून घेतला . मोकळा वडा बघितला … जिवाचा दगूड केला आन् म्होरं निघालो . वडा जाता जात नव्हता . धूम ठोकली . त्यो दुसऱ्या कडला आलो . मनातल्या मनात काळुबाईचं नाव घेत हुतो . ‘ सुखरूप पोचव . पाच आन्याचं पेढं वाटीन ‘ म्हणून नवस केला व्हता . फलटण जवळ यायला लागलं , तवा झुंजूमुंजू झालं व्हतं .

फलटणात घुसतानाच माकडवाल्यांची घरं लागत्यात . माकडवालीबी आमच्यातलीच . बा सांगायचा ,

‘ माकडवाले सिंदीचं फड कापत्यात . सिंदीच्या फडाबिगार त्ये कशाला हात लावीत नाहीत . आन् आपुन सिंदीला हात लावीत नाहीत . त्ये किरसुन्या करतात . शेन इकत्यात . आपुन ते करीत न्हाय . पन त्ये आपलं भावबंद हाईत . त्यांची आन् आपली भाषा एकच हाय . रोटी येव्हार व्हुतुया . बीटी येव्हार होत न्हाय ..

जरा येळ तिथं थांबलो , पन कुनीच जागं झालं नव्हतं . पाव – बटरवाला तेवढा ‘ पाव बटर … ‘ करीत वरडत निघाला व्हता . मी केनालवर गेलू . कापडं काढली आन् आंगूळ केली . कुनी बगायच्या आत फलटण सोडायचं , असं ठरवून गावात गेलू .

तवा सारं फलटण म्हाईत नव्हतं . बारामती चौक तेवढा समजत होता .

सकाळची वर्दळ चालू झाली व्हुती , हाटिलात कपबश्या वाजत व्हत्या . उगीच्या उगी घुटमळलो . तेवढ्यात केऱ्या वडारी दिसला . त्यो मागंदी निरगुडीत व्हता . त्याला उगंच्या उगा पोक्त मानसावानी का रं , काका ? फलटनाला आलायास ? ‘ म्हणून इचारलं . तसं त्यानं वळाकलं .

” आरं , निरगुडी सोडलीसा म्हनत व्हुती बगडी .

” ” व्हय ” , मी हुंकारा दिला .

त्यानं बाकीची बिराडं कुठं उतरली हाईत ते इचारलं . तसा मी बावरलो . तत … पप करायला लागलो . त्याचा चेरा एकदम गंभीर झाला . त्यो म्हनाला ,

‘ लक्षा , कुनासंगट आलायास ?

‘ मी रुसून आलोय हे समजल्यावर त्यो म्हनतो कसा ,

‘ हात पेनसुन्या , आसं लेका रंडीवानी पळून व्हय येतुयास ? चल बगडीकडं न्हेतो . ‘ त्याला गुंगारा देऊन पळणार हुतो . पन तवर त्यानं मनगट धरलं व्हतं . मी रडायला लागलो . तसं त्यानं समजावलं . हाटिलात न्हेलं . मिसळ दिली . त्यानं पाव , मिसळ , च्या घेतला . भाईर येऊन , पान खाल्लं आन् त्याच्या घरी घिऊन गेला .

केऱ्याला सारं सांगितलं . त्यानं तानीला त्याच्या भाषेतनं सारं सांगितलं . आन् ‘ न्हावू दे ह्याला – आपुन सांगू त्याच्या बापाला ‘ म्हनाली . ‘ तू लगीन करनार न्हाईस न्हवं … नगं करू … पर , लेका , आसं कराव व्हय ? रांडच्या ! बा काय म्हनत आसंल ? … ‘ म्हनून चार समजुतीच्या गोष्टी सांगितल्या . मला घरात ठिवला … घर मजी पत्र्याची कोप , शेजारी कसाबखाना … वासानं जीव जायला झाल्याला . पळून जावं , असं वाटत व्हतं . पन काय करणार ? पोटाला भूक लागली व्हुती . त्याच्या पोरांत जेवलो . त्यानं गाढवं जुंपली . गोनी घातल्या . गाढवाला कळव घातलं . घम्याली , खुरी , टिकाव – सारं गाढवावर लादलं आन् गाढवं निगाली .

केऱ्या म्हनाला ,

‘ लक्षा , चल . ‘ मी आपसुक चालाया लागलू .

‘ गावच्या भाईर लांब – बानगंगला गाळ खांदायला जायाचंया . सांचं बगडीकडं न्हीऊन सोडीन ‘ म्हनत व्हुता .

मी गाढवं हाकत व्हतो . तानीनं पोर पाठीला बांधलं , तिची दोन – तीन पोरं दोन – तीन पोरी आन् मी – सारी नदीच्या कडला आलो . तानीनं माती बघतली . आन् केऱ्याला गाढवं थांबवायला लावली . केऱ्यानं गाढवं थांबावली . सरीनं काष्टा घातला . तान्या पोराला खाली जमिनीवर झोपावलं . त्याच्याहून मोठ्या पोरीला पोराजवळ बसवलं आन् टिकावानं खांदायला लागली . केय ‘ आता येतू ‘ म्हनून कुठं गेला व्हुता , त्यो बराच येळ आला न्हाय .

मी तानीकडं बगत व्हतो . ती खाली मान घालून खांदत व्हुती . घामानं सारं अंग निवाळलं व्हतं . आजून केय आला नव्हता . ती चिडली व्हुती . गाढवं एका जागी बांधल्यावानी उभी व्हुती . ती दमून खाली बसली असल – नसंल , तेवढ्यात केऱ्या आला . धोतराचं खोच खवत आपल्या बरबर बोलतच जवळ आला . आन् तानीला बसल्याली बगितली तसा इन यामान द्यांगा ‘ म्हनत वडारी भाषेतनं शिव्या देऊ लागला .

‘ गांड माजलीया व्हई गा , बसलीयास ते ? ‘ … तानी आदी कावली व्हतीच . तिनंबी शिव्या द्यायला सुरुवात केली . गडी लई रागात आन् ‘ कैकाड्याच्या पोराम्होरं पानउतार करती ‘ म्हनून कलागतीला आला . मी गाडवं लांब गेल्याली हानून आनली . त्यानं तवर तिच्या पाठीत , ढुंगनावर चार – पाच खोऱ्याची दांडी हानली व्हती , तिच्या आवाजानं कालवा झाला व्हता . उनं वर येत व्हती . त्यो कामाला लागला . भराभर घमेली भराय लागला . मी तानीला घमेली उचलाय लागलो . तसं ती म्हनाली ,

‘ आंडात आव न्हाय आली तुज्या . तूबी तसलाच .

‘ मी मागं झालो . तिनं भरारा गाढवाच्या पाठीवर गोन्या भरायला सुरुवात केली .

केय पिऊन आला व्हुता . कामाला लागला . तसा राकिसावानी खांदायला आन् भरायला लागला . सात – आठ गाढवं भरली . त्याच्या थोरल्या पोरानं आन् तानीनं गाढवं हाकीत कुंबाराच्या भट्टीवर न्यायची . ती मायलेकरं निगाली , तसं मीबी त्यांच्यासंगं भट्टीपतुर गेलो . मी भट्टी बगितली . वाटंत गाढवं हानत हामत तानीला इचारलं ,

‘ केवढ्याला एक खेप करता ?

‘ ती म्हनाली ,

‘ पंचीस रुपयाला शंबर गाढवं . मंजी एका खेपेला किती , ती तूच सांग !

‘ मी आपला हिशोब कराय लागलो . एका येळी सात गाढवं … लई हेलपाटं होत असत्याल . मनातनं हागाटलो व्हतो . च्या आईला ! म्हंजी आपलं आन् ह्याचं कामच न्यारं हाय . दिवसभर गाढवासंग हेलपाटमारून मारून पायात गोळं आलं व्हुतं . दुसऱ्या खेपेपासन तानी बंद झाली … आमच्या खेपा संपल्यावर त्यानं एक रुपाया दिला . च्या दिला . सांचं बगडीकडं घिऊन गेला . समी दारातच व्हुती . रडून रडून तिचं डोळं लाल झालं व्हुतं , मला बगताच सारी कैकाडं आली … जागी झाली . सारा कालवाच झाला . बा , आई , तात्या , आप्पा सारी येऊन गेली व्हती . सारी समस्या पावण्या रावळ्यांच्याकडं हुडकायला गेली व्हुती .

केऱ्यानं सारं सांगितलं . बगडीनं जवळ घेतलं . वश्या , लाल्या , पळालं . बगडी म्हणाली ,

‘ आरं , बापूदाला सांगा जा .

‘ समीनं जेवायला वाढलं . जेवलो . साऱ्यांनी सुस्कारा सोडला व्हुता .

‘ लई आवखळपणा करतुयास … मुडदया ! आईचा जीव कासावसा झालाया . रातचाच घर सोडून आलास ते .

‘ कोन काय काय बोलत व्हुती . कुनी जाऊ द्या , भगवंताला काळजी , त्याला चांगली बुदया दिली आन् केऱ्या देवावानी उबा राहिला , न्हाईतर कसं झालं असतं ? … म्हनून केऱ्याची वाहवा करीत व्हती .

मनातनं तसा आनंद झाला व्हुता . कशी जिरली बाची ? लगीन करतुयास व्हय ! … आता कशी खोड मोडली . आन् तेवढ्याच जोरात दुसरं मन म्हनायचं , आयला , बा बिगाडला तर आता धडगत न्हाय . जीव जास्तवर मारल . पर येवढी मानसं हायती . उगाच आपुन भितुया . बा मारायचा न्हाय . म्हून बरंबी वाटायचं .

रातचं आठ – नऊ वाजल्या असतील … समीनं रकटं घालून दिलं . त्याच्यावर जाऊन झोपलो व्हतो . तेवढ्यात बा , आई , आप्पा , तात्या , लाल्या , वश्या सारी आली . मी हाय ह्याची आईनं खात्री केली . बाला गप्प बशिवला . माझ्याजवळ आली . आन् जवळ घिऊन रडाय लागली.

‘ लक्षा , हाडाचं काडं करून जगीवतुया आन् परमिसरानं ह्ये कसं तुझ्या डोक्यात घातलं ! ‘ म्हनून थाड थाड हानून घियाला लागली . मी चांगलाच नरामलो व्हुतो . खाली ध्यान घालून जमिनीची माती उकरीत बसलो व्हुतो . आई , बा सारी मानसं रडत व्हुती .

बा म्हनाला,

‘ लक्षा, निकमिदा शायीराट् कीर राई पन हिना या यानगत राईमान ‘

क्रमशः
स्रोत:(पद्मश्री लक्ष्मण माने यांच्या उपरा कादंबरीतुन)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading