उपरा,लक्ष्मण माने..
(लक्षा , तुला काय करायचं , ते कर , पन अशी डोस्क्यात राख घालून येड्यावानी करू नगं . घरी चल मुकाट्यानं .)
रातची रात बगडीकडं राहिलो . समी , आई , बा , बगडी , सारी बोलत बसली . बा म्हनत व्हुता ,
‘ निरगुडी सोडली ह्याच्या पायात …. ह्यो कुठंबी नीट व्हाईना …. बागडे , गू खावा असं केलंया ह्यानं . कंच्या आईझवीच्यानं बुद्ध्या दिली आन् म्या शाळंत घातला ! नसता शिकवला , तर … जाऊ दे , आई काळुबाई त्याचं नीट करू दे ! म्हनून सारा जीव तुटतुया . ह्याचं एकाचं दोन झाल्यालं बगितलं आसतं , तर ह्यो आसं करतुया !
‘ बगडीनं सारी रात भावाला ग्यान शिकीवलं . मी आपला डाराडूर झोपलो . बा आता लगीन करीत न्हाय , ह्याचाच आनंद दांडगा व्हता .
दुसऱ्या दिशी नाइलाजानं आई – बासंगं माघारी सोमंथलीला गेलो … आता सोमंथलीत पोरं वळकीची झाली . लगीनसराय संपत आली व्हती . बानं मावळणीला , त्याच्या भइनीला निरूप धाडला . आवंदाच्या वरीस लगीन रहित केलंया . वहिनीनं कुरकूर करीत टपालानं कळिवलं … झालं … आवंदाचं साल तरी लगीन व्हत न्हाय .
आता घरातलं कुनी बोलत नव्हतं . मारत नव्हतं . मी गाढवं राकायचो , जळाण येचायचो . आईसंग इकायला जायचो . येताना येत्याल तेवढ्या फोका आनायचो . साऱ्याला वाटत व्हुतं , आता ह्यो सुदीवर आलाय . बानं तर त्या दिसापासून मारायचं सोडलंच व्हुतं . आता बितारला , मंजी डोळं मोठं करायचा .
एका राती आमी शाळंच्या म्होरं झोपायला गेलो व्हतो . बारंगात येऊन यद्या मांगाला सांगत व्हता …
‘ आरं , यदू , निरगुडी सोडली , ती बरं झालं . न्हाईतर माज्या लेकराला गावात काट्यावर धरला व्हता . मला मारला . च्या आईला ती मन्हाट्याची माणसं . आपुन भिकारी ! कुठं बराबरी करतूस ? माझ्या कारट्याला न्हाय समजत .
‘ यदू म्हनत हुता ,
‘ आरं , काय झालं ? का मारलं ? … कायतरी अन्याव घडला आसंल का नसंल …
‘ बा म्हनला ,
‘ व्हय . सांगतो की , ह्यो परक्षाला गेला हुता . गावातल्या पाटलाची पोरगी बी परक्षेला हुती , फुटू काढला म्हनत्यात . पर मला समाजलंय त्ये न्यारंच हाय .
‘ ‘ त्या पाटलाच्या पोरीसंगं त्यांच्यातलाच एक पोरगा व्हता . त्याचं आन् त्या पोरीचं जमत नव्हतं . आन् त्ये पॉर तर तिला धरीन म्हणून बसलं व्हुतं . पोरगी मीठ घालू देत न्हवती .तवा तिला एकतर निजवीन न्हायतर उठवीन म्हणून त्ये बसलं हुतं .निजलं तर न्हाय , पन तिला उठवायची , तर काट्यानं काटा काढावा . म्हजी आपुन आलगत भाईर पडू . म्हनताना माझ्या लेकरावर आळ घेतला की , कैकाड्याच्या लक्षानं त्याला सांगितलं की , फुटू काढताना म्या तिच्या गळ्यात हात घातला आसता तर ती माझी बायकू झाली आसती , आन् मी तिला धरली आसती . आता , यदूदा , तूच सांग , ह्या पोराला काय समजतंय धरायचं ? पोरगी माप वापला आली व्हती .१०१ पर सोबल ते तरी बोलावं का न्हाय ? त्या पोरांनी सांगितलं आन् ह्याच्या त्याच्या तोंडानं ते पाटलापातुर गेलं . आन् पाटील आमच्या जिवावर उठला . आई काळुबाईनं वाचिवलं , न्हाईतर ह्यांचा झाला व्हुता ख्येळ आन् आपुन गरीब मरायचं आलं आसतं आता ह्ये पोराला नीट जगू द्यायचे न्हाईत . सारक्या कुरापती काढत्याल , कुठवर बगावं ? पोटाला काडी लावू का ह्याचं निस्तरू ? म्हूनशान गाव सोडलं .
‘ यदू हुंकारत हुता . मी झोपचं स्वांग घिऊन घिऊन गप निजलो हुतो , बा सांगत हुता , ‘
पाच – पन्नास घराचा कैकाडवाडा निरगुडीस व्हुता , आता तितं दोन – तीन घरं राहिल्यात . बाकी साऱ्यांनी घरंदारं सोडली आन् पॉट निईल तकडं गेल्याती . कोन हाईल आसल्या आगीत ? आन् लक्षाचंबी चुकलं . त्यानं तरी कशाला उटाच्या गांडीचा मुका घ्यायला जायाचं ? पन ह्ये बेनंच लई आरवाळी १०२ हाय.
‘बोलत बोलत विषय माझ्यावरनं देवावर … त्यांच्या अंगातल्या काळुबाईवर दोघं गडी बाता मारत व्हते . मी आपली दिली तानून . मला एका नव्या गोष्टीची जान होत होती …. पोरगी – निजनं – धरनं – असलं काय काय इचार करतच झोप लागली व्हती .
आता मनात सारकं हुतं , मी सातवीला नापास झालो व्हतो . पण फॉर्म परीक्षेला पास झालो व्हुतो , म्हनून आठवीला जाता येत व्हतं . गावातली काय काय पोरं सांगवीच्या शाळेत गेलीबी व्हुती . शाळा सुरू होऊन बरंच दीस झालं व्हतं . मी बाला सांगितलं –
तसं बाम्हनाला ,
‘ काय आय घालायची , ती घाला . आमाला नीट मानसावानी जगू द्या . तुमी आन् तुमचं नशीब ! कसं व्हईल , तसं बगा !
‘ मी सांगवीला गेलो , आप्पा संगं आला . हायस्कुलाची चौकशी झाली . पन प्रवेश मिळाला न्हाय . पुना उदास झालो . आता फलटणला हायस्कुलात नाव घालतो , म्हनून फलटणला निगालो . तर बा म्हनाला ,
‘ लक्षा , आता शाळाबिळा बास झाली . आपलं घरपरपंच बग . पोटापुरतं झालं … बास झालं .
‘पण मनात सारकं असायचं . आपुन शिकू न्हाय , असं ह्या लोकान्ला वाटतंया . बाला पाटलानं मारल्या . काय वाट्टेल त्ये झालं , तरी शिकायचं . म्हराठ्याच्या पोरीसंगं गटायचं . पण शिकल्याबिगार जमायचं न्हाय . सांगवीचं जमलं न्हाय म्हनताना फलटणला गेलू . पाटलाची पोरगी आन् तिच्या जातीची पोरं मुधोजी हायस्कूलला गेलीत , मला कुनाकडं तरी समाजलं … मी आपला बाकीच्या भानगडी उभ्या नगं म्हणून श्रीराम हायस्कुलात प्रवेश घ्यायचा , असं ठरीवलं . कुनीच संगं आलं न्हाय . आईनं हिरव्या मिरच्याचा खरडा आन् भाकरी बांदून दिली . चालत फलटण गाठलं . गावातली पोरं श्रीराम हायस्कूलला हायती . त्यांच्या संगं हायस्कुलात गेलो . ना.मा. भोसले हेडसर व्हते . त्यान्ला सांगितलं …. एकीकडं रडत व्हतो . दुसरीकडं सांगीत व्हतो . सर ऐकत हुते . त्यांनी चष्मा काढून डोळ्याच्या कडा पुसल्याचं अजून ध्यानात आहे . त्यांनी शिपायाला बोलावून सांगितलं … मी शिपायासंगं हापिसात गेलो . फॉर्म भरून दिला . सरांनीच फॉर्मचं पैसं दिलं . पाठीवर हात ठेवला आन् सांगितलं ,
उद्यापासून ये . मी पुस्तकं , वह्या घिऊन देतो .
‘माझ्या आनंदाला सीमा नव्हती . हात आभाळाला लागल्यागत चालत पळत घरी केव्हा आलो , समाजलं न्हाय , आई पाट्या वळत बसली व्हती . बा घरी नव्हता , आईला सारं सांगितलं . पैसं लागलं न्हाईती आन् पुस्तकांची बी सोय हुतीया म्हटल्यावर आईला गहिवर फुटला . ती लई उशीर रडली . मला तिनं आतल्या अंगानं परवानगी दिऊन टाकली .
बा सांचं आला . त्याला आईनंच सारं सांगितलं . बा गप्प झाला व्हता . तो म्हनला ,
“ लक्षा , तू शिकावं नगं , असं मी म्हनतुया . ही सात – आठ पोरं संबळू , का तुला शिकवू ? मी काय तुला देनार न्हाय . तू फलटणला जायाचास , माझ्याच्यानं निबायचं न्हाय . तुजंतू बग , आन दुसरंबी वैऱ्यावानी मनात येतंया . ततं निरगुडीची मानसं सारकी आसत्यात … तुजं कमीज्यास्त झालं , तर कुणाला इचारू ? कोण दाद घील ? आपलं कोण हाय त्याला इचारू ? सांग .
बा बोलत हुता … सारी गप्प झाली व्हुती . बाच्या डोळ्याला धारा लागल्या व्हत्या . त्याचं काळीज काळजीनं फाटत व्हतं .
मी म्हनलो ,
” भाऊ , काळजी करू नगंस . मी कायबी करनार न्हाय , काय पायजे ते करीन , पण शिकीन … वाईट कायबी करायचा न्हाय !
‘ दुसऱ्या दिवशी बा फलटणला संगं आला . मास्तरला भेटला . सरांनी सारं ऐकून घेतलं . ‘ मी बगीन . तुम्ही निष्काळजी व्हा ‘ , म्हनाला . येवढा मोठा मानूस हे बोलत व्हुता . बा खाली वाकला … मास्तराच्या पाया पडला . म्हनला ,
‘ गुरुजी , मी आसा पोटामागं जानार … गरिबाच्या पोराची तुमीच आई आन् बाप , काय चुकलं , तर संबळून घ्या . लई केलं , पर ह्यो शिकायचंच म्हनतुया . माजी ताकद न्हाय . पन काय करू पोटात गोळा फिरतुया . सकाळपासनं घरात दान्याचं कण न्हाय , आमी जिवलूदिकान न्हाय .
सरांनी शिपायाला कायतरी सांगितलं . ना.मा. भोसले म्हंजी देव माणूस . आमाला त्यांचा डबा खायला दिला . दोगं बापल्याक पायरीवर बसून जेवलो . कॅनॉलवर पानी पेलो आन् बा घराकडं निगून गेला .
सोमंथली – फलटन पाच मैलाचं अंतर … रोज जाऊन यिऊन दोन – तीन महिनं शाळा केली . कंटाळा यायला लागला . त्यात मराठी शाळेपेक्षा सारंच नवं . गाव नवं . शाळा नवी . मास्तर नवे . आमचं आपलं खेड्यात एकच मास्तर सारं शिकवायचा . हितं प्रत्येक विषयाला मास्तर आन् त्याचा वेगळा तास , जमत नव्हतं . वळकीचं कुनीच न्हाय . शाळा सुरू होऊन बरंच दिस झाल्यालं . मी आपला साऱ्यांच्या मागं बसायचो . कवा येकदा घंटा होते , असं व्हयाचं . पन पोरं चांगली वाटायची . व्हंकाड्या , मैकाड्या , कैकाच्या पोटच्या कैकाड्या , असलं कुनी काय म्हणत नव्हतं , का छळत नव्हतं . तेवढंच समाधान व्हतं . सारी आडनावानं बोलवायची . आता पातुर लक्षा’च होतं . आता सारी माने म्हणायची . बरं वाटायचं . एक नवंपण नवा जन्म घिवून आल्यागत वाटत व्हतं . हेटाळणी थांबली हुती , रोज चालत जाऊन – येऊन कंटाळा याचा . पण गावात व्हंकाड्या म्हणून घ्यायचं … सारकं तुटक वागायचं ; शाळंत त्याच्यापेक्षा बरं वाटायचं .
पैले चार – पाच महिने जाऊन – येऊन केलं . आता तर फलटणात माहिती झाली हुती . गावात समी व्हती . पन बा म्हनला व्हुता ,
‘ पावन्या , रावळ्याला तरास देयाचा न्हाई . त्यांच्या दारात जायाचं न्हाय .
त्यांची चूल पेटत न्हाय . निरगुडीची माझ्या वर्गातली बरीच पोरं मुधोजी हायस्कूलला होती . त्यांची फलटणात गाठ पडायची . आता तीबी जरा बदालल्यावानी वागत – बोलत व्हुती . एका दिवशी चार – पाच जण भेटले . त्यांनी खोली भाड्यानं घेतली व्हती . फलटणात कुणी वळकीचं नव्हतं . एकांद्या दिवशी उशीर झाला , तर त्यांच्या खोलीवर मुक्काम कराय लागलो . आता निरगुडीची पोरं लई गोड बोलत व्हुती . हितंच व्हा . घरनं भाकरी मागीव , नसली , तर आमी देतो . असं संप्या म्हणत व्हता . तसा त्यो एकला चांगला हुता , मला चालायचा कंटाळा व्हुताच . बाला रामभावनं बाजारात समजावलं . आता पुन्हा निरगुडीची संगात सुरू झाली . पोरीचा विषय सोडून बाकीचं बोलायचो . त्यांच्यात व्हायचो , पन भाजीभाकरीला शिवायचं न्हाय . भाजीभाकरी आली न्हाय , तर वरनं देत्याल ती खायचो . पन वळकी होस्तंवर भागच हुतं म्हनून दिवस काडत व्हुतो . वर्गातली पोरं , त्यांच्या खोल्या माहीत करून घेत व्हुतो .
हिकडं बा बाजाराला आला , की त्याला न्यारंच समजत व्हतं . बा बोलत न्हवता ,पन लक्षान ठीक वाटत न्हवतं . त्याचं असं झालं … मी निरगुडकराच्या खोलीत मुक्कामाला असायचो. त्या पोरांच्या भाकरी सकाळी यायच्या. आमी सारीजनं शिगरेटी वडायचो . च्या – पानी झालं की हे येताना शिगरेटी आणायचे, सारीजण वडायचे . मातर एक बात व्हुती… रस्त्याकडंच्या खिडकीच्याम्होरं त्ये मला कधीच बसू द्याचं न्हाईत. वळीत झुरकं मारायचं, आन् खिडकीम्होरं बसलेल्याला रस्त्यावरचं दिसायचं. रस्त्यावरनं डबावाला आला, की त्ये खिडकीम्होरच्याला दिसायचं . त्यानं खुनवायचं आन् शिगरेट माझ्या हातात यायची . मी शिगरेटीचे एक – दोन झुरके मारले , की दारात गावातला डबावाला असायचा . मी बिगी – बिगी सिगरेट इजवायचो . पण वडताना घावायचो . बोंब मातर माजी व्हायची . हे त्यावेळी ध्येनात येत न्हवतं . बाला सारं एकाचं दोन करून समजायचं ,
‘ हे कसलं शिकतंया ! लेका , गाढवाला आन् घोड्याला काय बराबरी आसतीया व्हय ? … आमची पोरं येवढी शिकवली तर नोकऱ्या न्हाईत्या . आन् तू कशाला ह्या फंदात पडतूस ? ‘
बाला भरवायचे . बा वैतागायचा . रामभावला सांगायचा – रामभाव धीर द्यायचे . असं एक वरीसभर शिगरेटी , सिनेमे , बाया , पोरी , कितीतरी किटाळं झाली . मी आठवीला मातूर पास झालो .
चैती आली , की कुरवलीची जत्रा असायची . तिगा भावांची तीन बकरी . पाच – सहा कोंबडं दरसाल असायचं . जत्रा भरली , की सारी जमात जमत होती . आता चांगलं समजत व्हतं , मी पास झालो की देवाला पेढे वाटायचो . ‘ दर साल पास हुऊ दे , तुला म्होरल्या वर्षीबी पेढे वाटीन ‘ म्हनून नवस बोलायचो .
आता आईला पयल्यासारखी कामं होत नव्हती . तिला सून यावी , असं सारकं वाटत व्हतं . तिनं माज्यामागं सारकं टुमनं लावलं हुतं . मावळणीची पोरगी किती चांगली हाय ते सांगायची . मीबी कदी कदी पागळायचो . पण का कुनाला ठावं , लग्नाला मातूर तयार होत नव्हतो . सारी नात्याची मानसं नावं ठेवायची . शिनंच्या समद्या मुलांची लग्नं झाल्याली . ती चिडवायची . मावळण तर जीव की परान करायची , आत्या जतरंत लई पैसं खायला द्याची . त्यात आता बेंडात ढोल वाजवीत होतो . ढोल वाजिवताना रंगून जायचो . ती आमची जन्मजात कला व्हुती , बाज्यांच्या व्हडाचढी असायच्या . पालकी निगाली , की म्होरं पालकीला लागून आसंल , त्यो सगळ्यात भारी बाजा . त्याच्यासाठी मारामाऱ्या हुयाच्या . मी बडा , का तू बडा … तट पडायचे . कितीकदा रक्ताचं सडं पडायचं . देवाच्या देवळात गोळ्यांच्या साक्षीनं झाल्याली भांडनं पंचात जायची … पंचात गेल्यावर सुटायची .
वैशाखात बाजे ठरायचे . सुपाऱ्या धरायच्या . तिथी असत्याल , तसं भाव कमी जास्त हुयाचे .. एका – एका तिथीला जेवनावारी वाजवायचं , तर ज्या तिथीला लई…
क्रमशः
स्रोत:(पद्मश्री लक्ष्मण माने यांच्या उपरा कादंबरी तुन)
