उपरा,लक्ष्मण माने..
लग्नाची गर्दी असंल , त्या तिथीला लई पैसे घ्याचं . कधी – कधी दोन – दोन लग्नांच्या सुपाऱ्या घ्यायच्या . मालकाला टांग मारायची . ज्याला कायच वाजवायला येत न्हाय असल्या मानसाला चार रुपयं दिऊन नुसतं हत्यार दिऊन उभं करायचं , चार मानसं चांगली वाजवनारी आन् बाकी चार – पाच नुसती उभी करायची . जवळ – जवळ लग्नं असली , तर एकाच्या हळदी लावायच्या आन् दुसऱ्याचं वराड आत घ्याचं . न्हाईतर एकाची लग्नं लागली , की दुसऱ्याची वरात वाजवाची . ह्यानं एकाच तिथीला दोन – दोन लग्नं वाजवायची . मालकानं हौसेनं बेंड लावल्याला . ‘ नीट वाजवा की ! ‘ मालक बोंबलायचा .
एकदा तर लईच बाका प्रसंग आला .
आमी लगीन वाजवत व्हतो . सांगवीत . लगीन मोठं व्हतं . त्याच्या हळदी लावल्या आन् कांबळीसरांच्या खलाट्यांच्या घोड्यावरनं रावसाब खलाटा आला . आला त्यो आमी वाजवत व्हुतो तिथंच . गडी उंचापुरा भरल्याला अंगाचा . डोक्यावर हिरवागार पटका कोसा . अंगात नेहरू शर्ट , पांढरं धुवाट धोतर , गळ्यात उपारनं आन् पिऊन ल्हास झाल्याला . हातातल्या घोड्याला मारायचा चाबूक हवेत उडवून म्हणाला ,
‘ ऐ ! बंद करा आईनिजव्यांनो . तुमचा बाप आलाय . ह्या हातातल्या हासुडानं कातडं लोळवीन .
‘ बा उठला , ‘ काय झालं ? ‘ म्हून इचाराय लागला , तसं घोड्यावरनंच खलाट्यानं हासुडाचा कडाका वडला , तसं बा वरडला . बेंड बंद झाला . तवर खलाट्यानं दोघा – चौघांना हानलं व्हुतं . वरडावरड झाली . तशी आमी बोंबलाय लागलो . कुनीतरी खलाट्याला धरला व्हता . त्यो सुटायचा प्रयत्न करीत व्हुता . आई भनीवरनं शिव्या देत व्हता . ह्या कैकाड्यांची घरंच पेटवून देतो , ह्यांच्या आईला झाडाला बांधून झवीन ! ह्यान्ला दाकीवतोच . लोकाचं आनिक असतंया आन् माजी कणीक असतीया . माजं पैस टाका आदी . बाचं देनं व्हुतं व्हय ? ह्या ह्या भाड्यानं इसार घेतलाय . आन् चार पोरं पाठिवल्यात वाजवायला आन् ह्ये हिथं आई घालत बसल्यात वाजवीत ! ‘
दत्त्या कैकाडी सपशेल पालथा पायावर पडला.
‘ मालक, चुकलं लेकराचं . आता मारू नगं . आमी निगतुया ‘ म्हनत नाक घाशीत व्हुता .
खलाटा शांत झाला . साऱ्यान्ला म्होरं घातलं. चला म्हनला . तसं सांगवीकरानला आपला अपमान झाला, असं वाटून त्यांनी आमची सनगं १०३ हिसकावून घेतली. माझ्या खांद्यावरचा ढोल कवाच गायब झाला व्हुता . मानसांची ही ऽ गर्दी झाल्याली . बा कवाच पळून गेला व्हुता . दत्त्या पाया पडत व्हुता . पैसं मागारी देतो म्हणत हुता . सांगवीकरांनी खलाट्याला आन् आमा सगळ्यान्ला हानलं व्हतं. आता कांबळीसरकर आन् सांगवीकर यांच्यात जुंपली व्हती. खलाट्यानं घोड्याला दारू पाजली व्हती . त्यो घोड्यावर बसला आन् घोडीला टाच दिली , तसं घोडी वाऱ्यासारखी सुटली . त्याच्या मागं माणसं पळत व्हुती . आन् बगता बगता त्यो दिसंनासा झाला . आमच्यापैकी ज्याला दिसलं तिकडं त्यो त्यो दडला व्हता. मी, इठल्या आन् आपा एका हाटिलात बसलो व्हुतो . आप्पा आन् आमी सारीच म्होरं काय व्हुतंय … तेच्या काळजीत व्हतो. तेवढ्यात गरामपंचातीचा माणूस आला.
‘ देन्या , लेका हितं हाईस व्हय ? बाकीची कुठं गेलंती ? चल . सरपंच , पाटील आन् सारी मानसं चावडीवर जमल्यात , वरसीगं मामा आल्यात . बोलीवलंय .
‘ आता मातर आमची पाचावर धारण बसली . आप्पा मला आन् इठल्याला म्हनला .
‘ अल यालगू . इगून त्तिगं रंड्यारू सोमंथलीक हुंगो ” (चला रं ! निगा तुमी दोगं सोमंथलीला जा , मी चावडीवर जातो.)
आन् त्यो त्या मानसासंगं चावडीवर गेला .
मी आन् इठल्या निरा नदीत आलो . आरं , काय काय चावडीवर व्होतया ते बगू . न्हायतर आता बाजे गेल्यातच . आपुन मोकळंच हाय . आपुन वळकाय याचू न्हाय , बाकीची आपली मानसं कुठं हायती , ते माहिती न्हाय . असा इच्यार करून आमी दोगं मागं फिरलो . आत पंचायतीम्होरं गेलो .
पंचायतीम्होरं माणसांचा पूर आला व्हता . बरीच मोठी मानसं म्होरं बसली व्हती . कुनी काय कुनी काय बोलत व्हुती . सारा राडा झाला व्हता . मामा मधी बसलं व्हतं . जवळच दत्त्या बसला व्हता . शिऱ्या , नाम्या , शिरप्या मयतीला गेल्यावाणी खाली माना घालून बसलं व्हतं . बा कुठंच दिसत नव्हता . त्यानंच खलाट्याचा इसार घेतला व्हुता . एकशेपंचवीसचं काम व्हतं . सात गडी देयाचा ठराव झाला व्हता . आन् चारच मानसं खलाट्याला दिली व्हती . त्यो म्हनूनच आग्या बोंडावानी झाला व्हता . इसार बानं घेतला व्हुता . त्यो नव्हता . किती मानसं ठरली , कुनाला माहिती नव्हतं . पंचांनी कैकाड्याला जोरात तंबी दिली . बिराडं घालवून द्या , सनगं नदीत टाकून द्या , हितपासनं ते जातच हलकट म्हणून नावं ठेवत व्हते . मामांनी सारं निस्तारलं . दत्त्याला आताच्या आता जाऊन बारामतीनं न्हाईतर जगातनं कुठूनबी मानसं आन् , कांबळीसरकरला ठरल्यापरमानं मानसं दे म्हनून फर्मावलं . हितलं माणसं हितंच राहू दे , म्हून हुकूम दिला . आन् पंचात मोडली .
दत्त्या वैतागला हुता . दोनी सुपारीचं सारं पैसं दिलं तरी मानसं मिळणार न्हाईत , हे त्याला समजत होतं . अप्पा आन् त्यो फलटणच्या घडश्याची पोरं बगायला गेलं . सारं शांत झालं.
चार दिवस वाजिवलं . दोनी सुपाऱ्या बोंबालल्या. पाच – पन्नास रुपये वसूल झालं न्हाईत. मातर फलटणच्या घडश्यान्ला दोनशे रुपये मोजाय लागले . त्यानं बाचा पर काटा बसला. बाज्यातील बाकीची बावरच वरदळीला आली. आई भन निघाली . आणि सारी सराईची वाटणी एका चुकीसाठी फुकापासरी वाटून दिली.
माझ्या वाटणीला आल्या पैशातनं रीनपानी फेडलं . मला कापडं घेतली . वह्या , पुस्तकं , पेन सारं घेतलं . आन् मी पुना हायस्कुलात जाया लागलो . आता सोमंथळीची पोरं बराबर असायची . समज चांगली आली हुती .
आमच्यात एक छब्या म्हणून पोरगा व्हता . त्यो आन् मी मिळूनच फलटणला जायचो . चार – पाच मैल संगतीनं असायचं . एकाच वर्गात . त्याला लई पैका मिळायचा . माझ्याहून त्यो थोर हुता . दिसायलाबी मोठाच . लई उलाढाल्या करायचा .
सोमंथळीच्या दोनी अंगाला दोन वडं. करंजवड्याला कावळीची जाळी लई . जाळीतला मानूस दिसायचा न्हाय . ह्यो गडी जाळीत रसायन भिजत ठेवायचा . डबं लागलं , की रविवारी शाळंला सुट्टी असली की स्टो , डबं , पायपा , कनीक सारं घिऊन यायचा . नवसागर आन् हिवराची साल , नासका गूळ येवढंच भांडवल . पाच – पन्नास रुपयांच्या भांडवलावर शे – दोनशे रुपये कमवायचा . त्यानं गडी चैनीत असायचा . कदी कदी मी जायाचो . त्यो पयल्या धारंची हातभट्टीची दारू पितळीनं प्याचा . मी लांब राकत बसायचो . कुणी आलं की शीळ घालायचो . शीळ घातली की , का हो स्टो बंद करून जाळीतनं पसार हुयाचा . समजा रिड पडली , तर माल जाईल … आपल्यावर काय बेतायचं न्हाय . ह्यो डाव , त्यासाठी मला रोज फलटणला गेलं , की हाटिलात स्पेशल मिसळ आन् चा असायचा . आभ्यासाच्या नावानं बोंब . ह्याचं आपलं त्यातच सारं ध्यान असायचं . वर्गात टवाळ्या करायचा .
ह्याच्या नादानं एकदा एका पोरीची टिंगल केली , म्हनून पोरांची भांडनं झाली हुती . दोगान्ला जबर मार बसला व्हता . पर ह्याची खोड जात नव्हती .
हिवराची साल मिळत नव्हती . ह्यो मला सुट्टी आसली , की हिवराची साल आन म्हनायचा . हिवराची साल दिली की चार – पाच रुपये मिळायचं . दोगं चैनीत हुतो . पान , शिगरेट , हाटेल , शिनेमा .
दिस चैनीत जात हुतं . घरी खायाची बोंब असायची . छब्याकडं गिळायला मिळायचं. आन् हायस्कुलात नेमानं जायाचं. आताशा मी घरात काय बगत नव्हतोच. पॉर शिकतंया ….. म्हनून घरची मानसं सारं बगत हुती . मी पोळावणी हिंडून खात हुतो . बा चिडायचा , वैतागायचा . एकांद्या दिवशी शिवीगाळ करायचा . पन आता मार चुकला हता .
एक दिवस छब्या आन् मी दारूचं फुगं घिऊन फलटनला कडूसं पडताना निगालो व्हुतो . कुणीतरी चाडं झालं व्हतं. आमाला म्हाईत नव्हतं. रबरी फुगं सायकलला बांधल्यालं व्हतं. काकंतल्या रेडिओवर गानं लागलं व्हतं , ‘ हस्ता हुवा नूरानी चेहरा , काली जुल्फे रंग सुनेहरा ‘ आमी तालात आलो व्हुतो . आन् म्या म्होरं लांब पोलिसांची गाडी बघितली … छब्याला गाण्याच्या मुडमदनं जागा केला … इशारा दिला . छब्यानं सायकल थांबवली . मी खाली उडी मारली आन् दात्याच्या उसात घुसलो . त्यो मात्र वाड्याकडं पळाला . तंवर पोलिसांची गाडी येऊन धडाकली . दोगं – तिगं पोलिस आन् एक सायेब व्हुता – मी तर चड्डीत मुतलोच व्हतो . उसाच्या सरी पालता पडलो व्हुतो . पोलिसांनी सायकल , माल आन् छब्याला धरला . छब्या दिमाकात . म्होरं चालत आला . माझा जीव हिकडं मेल्यागत झाला व्हता . आता ह्यो आपलं नाव सांगनार . आन् आपुन तुरुंगात जाणार . ह्या भ्यानं घामानं उभा न्हालो व्हते . पन काय झालं , कुनास ठावं ? गाडी म्होरं निगून गेली . छब्यानं सायकल आन् फुगं घेतलं . गाडी लांब गेल्याली बगितली अन् मला ‘ ये कैकाड्या , लेका बांगड्या भर , बांगड्या ! ‘ म्हनून हाक मारली . मी जाम घाबरलो व्हुतो . मनातनं छब्याच्या पराक्रमाची आन् आपल्या भित्रेपणाची एकाच वेळी तुलना करीत व्हतो . मनातनं भ्या खाल्लं व्हतं . आता काय वाटल त्ये झालं , तरी पुना ह्या रांडच्यासंगे ह्यो धंदा करायचा न्हाय , असं एक मन म्हणत व्हुतं . दुसरं मन मिसळ , पाव , शिनेमा , पान , शिगरेट , दावीत व्हतं . मी चाचरतच छब्याजवळ आलो . त्यो खुशीत व्हता .
‘ हात् दळ्या ! लेका , त्ये काय राकीस हायेत व्हय का मानसं खाऊन हाडं हागत्यात ? आरं , तीबी मानसं . त्यान्लाबी पोटं हायती . दिली एक नोट सारून , की गांडीत शेपूट घालून म्होरं जात्याती . मी ह्या शिपुरड्यान्ला कवाच भेत न्हाय .
‘ मी ऐकत व्हुतो . छब्याची सायकल आन् टकळी चाललीच व्हुती . मी धास्तावलो व्हतो . अगादूरच बा शिकवत नव्हता . नगं नगं ते निमित्त बगून शाळा सोड म्हनत व्हुता . त्यात मला जर ह्या पोलिसांनी धरला असता तर , आमची शाळा बोंबललीच असती. आई काळुबाईनं सोडावलं व्हतं.
सायकलीवरनं मंगळवारात फुगं पोचवलं . आन् छब्याची संगतबी सोडली . कायमचीच .
म्होरं त्यो काय शिकला न्हाय . पन खडी फोडायला मातर गेला . त्यो खडी फोडायला गेल्याचं समाजलं , तवा मी दगडावानी गप्प होऊन आई काळुबायचं आभार मानीत व्हुतो .
तीच ग्यान देतीया . जवाजवा संकट येतं तवातवा तिची ढाल आपल्याला संबाळती म्हनून आई सांगायची . त्ये खरं वाटून रोज सांज – सकाळ तिला भजत व्हतो .नववीची पाच – सहा महिनं फलटण – सोमंथळी यिवून – जाऊन केलं . दसरा झाला आन् बानं बिराड पोट भराय हलवलं . तसा मी तुकड्याला महाग झालो . आता घरी जायचं कारण नव्हतं . खिशात पैसा नव्हता . तंबाकूसाठी पोरांची चमचेगिरी करीत व्हुतो . नुसतंच पाणी पिऊन कितीदातरी सावता माळ्याच्या देवळात नाहीतर एस.टी. स्टँडवर झोपत व्हतो . लई भूक लागली की समीकडं जावं वाटायचं . पन त्यांचीबी बिराडं पोट भरायला गेल्याली . सारी कैकाडआळी वस पडल्याली असायची .
सावता माळ्याचं देऊळ तसं फार चांगलं . झोपायला मोठी ढेलज .१०८ देवळाच्या म्होरच्या बाजूला दादा कर्त्यांचं ‘ संतोष भुवन ‘ हॉटेल . आन् त्याच्या शेजारी रामदास सायकल मार्ट हे सायकलचं दुकान . शेजारीच माझं हायस्कूल . शाळा सुटली , की इथंच रेंगाळायचो . माझ्या नशिबानं ह्या हाटेलाचा मालक कर्णे मनाचा दिलदार माणूस . त्याचा भाचा नारायण बोडके माझ्या वर्गात आन् रामदास सायकल मार्टच्या रास्करांचा रामदासही माझ्या वर्गात . हळुहळू मी ह्या पोरांत मिसळत गेलो . मैत्री वाढत गेली . चहा , भजी खाऊन हे पोरगं शिकतंय . कान्ला त्याच्या भाच्यानं सांगितलं . मामाला दया आली . त्ये कवा कवा उदार खायला द्याला लागले . शिळी भजी , भाजी खात खात मी तितं चांगलाच रुळलो . फुकटचं कपबश्या उचलायच्या . लोकांच्या हातातली कामं घ्याची . हौसनं करायची . लोकांचा इस्वास मिळवायची कला लहानपनापास्नं हाडीमाशी झाल्याली ; रक्तात मुरल्याली लाचारी . कदी कदी आपुनपन हाटेलचे मालक झालोय … गल्ल्यावर बसलोय , अशी स्वप्नं बगायचो .
दिवाळीच्या सुट्टीत हाटेलात कपबश्या फुकट धुतल्या … केवळ जेवनावरी . साऱ्यांचा इस्वास बसत गेला . आता नारायण , रामदास आन् मी एकत्र अभ्यास करीत व्हतो . नऊ वाजले , की हाटेलातले गडी आन् आमी हाटेलाचे मालक बनायचो . हाटेलातलं शिळंपाकं संपवायचो , कर्ष्याच्या घरनं त्यांच्या पोरांची जेवनं यायची . त्यातच माज भागायचं . पन काही असो . नारायण मला भेटलेला पहिला देवमानूस . त्यानं मला सोडून रात्रीचं जेवण कधी घेतलं न्हाई . रामदासच्या घरच्यांचा हरकाम्या असल्यागत किरकोळ कामं करायचो . त्याची आई फार चांगली बाई . शिळंपाकं राहिलं आसंल तर द्याची . आमी पोरं एका वर्गात शिकत व्हतो . आता कर्णे आन् रास्कर , दोगांचा आधार व्हुता . जेवायला येळंला नसल , पन मिळत हुतं . चांगलं नसंल पन पोटाची आग भागत व्हती . सकाळी चार वाजताच हाटेलातलं गडी उठायचं . चूलवान पेटवायचं . मलाबी सवय झाली व्हुती . सकाळी शाळेच्या येळंपातुर हाटेलात कामं करायची . मिसळ , च्या , भजी- कायतरी खायचं आन् शाळेत जायचं . संध्याकाळी शाळा सुटून आलं , की दहा वाजेपर्यंत हाटेलात काम करायचं . दहाच्या नंतर अभ्यास केला ना केला , झोपायचं , चाकोरी ठरत व्हुती . दिशा नक्की नव्हती . पण शहरात राहायची…
क्रमशः
स्रोत:(पद्मश्री लक्ष्मण माने यांच्या उपरा कादंबरीतुन)
