उपरा,लक्ष्मण माने.(भाग २४).

उपरा,लक्ष्मण माने..

जात – रिवाजापरमानं त्याचा साकरपुडा झालाय . माझ्या भनीनं तिची पोरगी तसी ठिवलिया . ती पोरगी आणि किती दिवस थांबल ? ह्यो गडी हाय . ह्याचं काय न्हाय पर पोरीची जात , कसं करावं ? तू त्याला सांग , दिवाळीत त्याचं लगीन करावं लागंल . न्हाईतर जात आन् पावनंरावळं तोंडात शेन घालत्याल .

‘नारायणनं त्यांना काहीबाही सांगितलं आन् त्यो दुसऱ्या दिवशी कोल्हापूरला गेला .

मी , रामदास , सुभाष , नाना , पोपट , सारी पुन्हा एक राह्यला लागलो . नारायण जरी कोल्हापूरला गेला होता , तरी त्याची पत्रं वर्षभर येत राहिली . या वर्षात मदत झाली , ती सुभाष आणि रामदासची . भाडं कधीच देत नव्हतो . पोटापुरतं कमावत होतो . इंग्रजीची शिकवणी लावली होती . अभ्यास करीत होतो . आईबाप कोकणात पोटं भरायला गेले होते . ऑक्टोबरच्या परीक्षेचा निकाल लागला आणि मी सर्व मित्रांच्या घरी दिवाळी साजरी केली . खूप आनंद झाला होता . मी पास झालो होतो . मॅट्रिक झालो , आता निदान मास्तर तरी होता येणार होतं . इंग्रजीला बरोबर ३५ मार्क्स पडले होते . कॉलेजला जावं की नको , विचार करीत होतो . नारायण कोल्हापूरला गेल्यानं त्याचा कॉलेजला येण्याचा सतत आग्रह होता . सहा महिने नुसते बसून काढले . पोटापुरतं काम करत होतो . सुगीला आई – वडील आले . त्यांच्याबरोबर कामात दोन – तीन महिने घालवले . मनातनं कोल्हापूरला जाण्याचं पक्कं केलं . बाला लग्नाबाबत होकार दिला . त्यामुळं तो खूष होता . आईला सून येणार होती आणि मी पासही झालो होतो . त्यामुळं घरात वातावरण खूप चांगलं होतं . मी मनातनं नक्की ठरवलं होतं … लग्न करायचं नाही ! आपण फलटण आन् घर सोडायचं . घर सोडेपर्यंत लग्नाबाबत नक्की सुगावा लागू द्यायचा नाही . घरातलं वातावरण ठीक ठेवायचं . काम करायचं . त्यावर्षी अखेरचं वर्ष म्हणून खूप रस घेऊन वाजवलं . कधी नव्हे तेवढा पैसाही मिळवला . बा खूष होता .

पावसाळा सुरू झाला . कैकाड्यांची लग्नसराई सुरू होणार … बा पैसं जमा करायला लागला होता . लग्नाचं काय ते शेवटचं सांग, म्हणून टुमणं लागलं होतं. मी बाला झोकांड्या देत होतो.

नारायण पास झाला होता. मी, रामदास, पोपट बनकर , मारुती काळोखे असे चौघे कोल्हापूरला जाणार होतो . माझा आधार तर मित्रच होते .

झालं . एके दिवशी घरातून आईकडून दहा रुपये घेतले . कुणालाही काही बोललो नाही . मनातून गलबलून येत होतं . या साऱ्यांना मनातलं सगळं सांगावं , असं होतं . पण हेही पटत होतं , हे सांगितलं तर मला कधीच जाऊ द्यायचे नाहीत … लग्न ही एकमेव बाब महत्त्वाची , असं यांना वाटतं . मी ‘ फलटणला जातो ‘ असं सांगितलं आणि बाहेर पडलो .

दुसऱ्या दिवशी सकाळी सातच्या गाडीनं चौघेजण कोल्हापूरला गेलो . घरच्यांसाठी सविस्तर पत्र लिहिलं होतं. ते कोल्हापूरला पोचल्याबरोबर पोस्टात टाकलं आणि चौघेजण नारायणच्या खोलीवर गेलो. त्या रात्री आम्ही चौघे आणि नारायण असे पाचजण रात्रभर बोलत बसलो होतो. विषय अनेक होते. पोरीबाळींपासून ते नोकरीपर्यंत…

आयुष्यात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या शहरात गेलेलो . दुसरा सारा दिवस शहरातील प्रशस्त रस्ते आणि इमारती बघण्यातच गेला . त्याच दिवशी कीर्ती कॉलेजला नाव घातलं . आता नोकरी वगैरे काही करीत नव्हतो . भरपूर वेळ असायचा . पहिल्या दहा – पंधरा दिवसांत खूप फिरलो . रंकाळ्यापासून विद्यापीठापर्यंत सर्व काही पाहिलं . घर , परिस्थिती , सारं कसं विसरून गेलं होतं . जेवणाचं आणि राहण्याचं पूर्वी फार कोडं असायचं . आता नारायण , रामदास , मारुती या मित्रांनी ती जबाबदारी उचलली होती . फक्त कॉलेज करायचं . कॉलेज संपलं की फिरायचं , झोपायचं . सारं कसं शांत होतं . आयुष्यात उसंतीचा वेळ गेला तो , तोच चार – दोन महिन्यांचा .

चार – दोन महिन्यांनी , आपण ऐतं खात आहोत , इतरांच्या जीवावर जगत आहोत , ही टोचणी सारखी असायची , म्हणून नोकरी करायचं ठरवलं . ‘ पुढारी’तली पाहिजे ‘ जाहिरात वाचायची आणि अर्ज खर्डायचा . मुलाखती द्यायच्या . असं नवीनच काम लावून घेतलं . आणि अर्थातच नोकरी मिळाली नाही .

कॉलेजमधले दिवस फार मजेत जात होते . मधूनच घरची आठवण व्हायची . करमत तर नव्हतंच , उगीच स्टँडवर चकरा सुरू असायच्या … आपल्या भागाचा माणूस भेटला , तरी बरं वाटायचं . कॉलेजचा स्टाफ चांगला होता . वर्ग म्हणजे काय शे – दीडशे मुलं एका वर्गात असायची . प्राध्यापक लेक्चर द्यायचे , मुलं – मुली एकत्र बसायची . त्यामुळे लक्ष वर्गातल्या शिकवण्यापेक्षा गोऱ्या गोऱ्या पोरी बघण्यातच अधिक रंगायचं . अशा देखण्या पोरी वर्गात असायच्या , पण आम्ही मात्र चारच काय , पाच – पन्नास हात लांब राह्यचो . शहरातली मुलं – मुली एकमेकांशी इतक्या मोकळ्यापणानं राह्यची , की आपण आपलं बघतच राह्यचं . सिनेमातल्या नटनट्या जशा वागतात , तशीच ही मुलं , आपण दोन्ही ठिकाणी प्रेक्षकच . कधीकधी कल्पना करणार नाही , इतकं हे स्वप्न वाटायचं . तोंडात तंबाखूचा बार भरलेला , पिचकाऱ्या मारीत कुठंतरी उभं राहवं . इतरांचं जमेल तेवढं अनुकरण करावं , असं चालू होतं . शर्ट आन् पायजमा , तोही सतरा ठिकाणी शिवलेला . आपणच आपल्याकडं पाहिलं , की कुणाशी बोलावं , असं वाटतच नव्हतं . सुदैवानं एक गोष्ट बरी होती . कॉलेज रयत शिक्षण संस्थेचं होतं आणि प्राचार्यांपासून प्राध्यापकांपर्यंत प्रत्येक जण खेड्यातला . आम्हा मुलांशी फार मनमोकळेपणानं बोलायचे . मिसळून जायचे . त्यामुळं हे कॉलेजचं गुलाबी वातावरण परकं वाटायचं नाही .

हळुहळू सराव होत होता . बोलण्या – चालण्यात परिवर्तन जाणवत होतं . राहण्यात सुधारणा झाली होती . पहिल्या सहा महिन्यात मोजून एकच पत्र घराकडून आलं होतं . त्यात भरपूर शिव्या घातल्या होत्या . अर्थात , शिकतोय याचा आनंद होता . पण लग्न केलं नाही , आई – बाचं ऐकलं नाही , याचा संतापही होता . पण इतक्या लांब जावं तर बाकडं पैसा नसायचा . त्यामुळं हात चोळत बसण्यापलीकडे तो काहीच करू शकत नव्हता .

कॉलेजचं पहिलं वर्ष म्हणजे आयुष्यातला अवर्णनीय भाग . आजही आठवणी ताज्या ताज्या वाटाव्यात , इतकं नवखं . कॉलेजमध्ये इतक्या पोरी होत्या … पण कधी कुणाशी बोलण्याचं कारण नसायचं , त्यातून असाच एकदा प्रसंग आला . हिंदीचा पीरिअड चालू होता … मुलं रंगून गेली होती . तेवढ्यात कॉलेजला नसलेला , केसांची झुलपं वाढवलेला, तब्येतीनं पहिलवान वाटावा असा एक तरुण दारातून आत आला आणि सरळ एका पोरीच्या बाकावर येऊन बसला. सरांनी अनेकदा सांगूनही तो काही बाहेर जाईना . शेवटी सरांनी तास बंद केला आणि ते बाहेर पडले . ते बाहेर पडताच हा पछ्या त्या पोरीला छेडायला लागला . वर्गात येवढी पोरं , पण त्याला कुणीच हटकेना , की बोलेना . सारा वर्ग शांत झालेला . तो इतक्या अश्लील पद्धतीनं वागला , की सांगता सोय नाही . शेवटी प्राचार्य वर आले . ते वरती आल्यावर त्याला बाहेर जाण्यास सांगू लागले , तरी तो जाईना . इतका वेळ शांत असलेल्या आम्ही ग्रामीण पोरांनी अवसान चढून ‘ आयला ! हे कोणत्याच सरांनाबाहेर निघत नाही , ह्याला जरा धुऊ या ! ‘ म्हणत घेरला आणि प्राचार्य खाली फोन करायला गेले , तेवढ्यात आम्ही चार – पाच मुलांनी त्याला बदडला . आमची झटापट सुरू झाली , हे बघितल्यावर सारा वर्ग , अगदी मुलीसुद्धा त्याच्यावर तुटून पडल्या . ज्याला जे घावलं त्यानं त्याला हाणला . झालं , सारं कॉलेज जमलं . तो इसम बराच जखमी झाला होता . कुत्रा गुरगुरावा तसा गुरगुरत निघून गेला . पण ही शहरातली पोरं फार संघटित असतात . आपल्याला मार बसणार , असं सारखं वाटत होतं . आणि मारामारीत पहिल्यांदाच आपण यशस्वी झालो होतो . अर्थात , त्यात आपलं कर्तृत्व किती आणि वर्गातल्या सर्व मुलांचं किती … असा प्रश्न निघालाच . तर आपण केवळ निमित्तमात्र . पण त्या प्रसंगानं शहरातली पोरं आपल्याला भाव देऊलागली , प्राचार्यांचं लक्ष आपल्याकडं वेधलं गेलं , हे मात्र नक्की . कारण , प्राचार्यांनी लगेच त्यांच्या रूममध्ये बोलावून नाव – गाव सारं विचारून घेतलं . प्राचार्यही आपल्याच भागाचे होते . प्रा . राम गायकवाड रयत शिक्षण संस्थेच्या लेबरमधून तयार झालेले . अत्यंत गरिबीतून शिकलेले . आपली आणि या माणसाची नाड जमेल , असं याचमुळं सारखं वाटू लागलं . काही मदत लागली , तर प्राचार्यांकडे जाऊ लागलो .

पी.डी.ची परीक्षा जवळ आली होती. कॉलेजमध्ये मिसळून जाऊ लागलो होतो . सबंध वर्षभर खोलीतल्या मित्रांचा आधार. ही एकमेव जमेची बाजू. कपडेसुद्धा आलटून- पालटून त्यांचेच वापरीत होतो . वह्या – पुस्तकं सारं त्यांचंच. आपण केवळ अभ्यास करायचा आणि कधी नव्हे ते पहिल्यांदाच पी.डी.ला सर्व विषय. पन्नाशीच्या दरम्यान, आणि इंग्रजीसारखा आपला शत्रू विषय, त्यानंही आयुष्यात पहिल्यांदाच साथ दिली होती . इंग्रजीत पास झालो आणि बऱ्यापैकी . म्हणजे याच वर्षी कॉलेज पुरं करण्याचा विचार पक्का होत होता . पुढं काय ? प्रश्न कायम होताच , पण आता सवय झाली होती . काळोखात बरंच चालल्यावर पाय आपोआप पडायला लागतात , तसंच झालं .

पी.डी.चं वर्ष संपलं . पण कोल्हापूर सोडून घरी जावंसं काही वाटलं नाही . उन्हाळ्यात तिथंच होतो . खोलीतील सगळ्या पार्टनर्सच्या घरांकडून पत्रं येत … पैसे येत . आपलं कधीच नव्हतं . नारायणचं अॅग्रिकल्चर कॉलेज उन्हाळ्यात – अगदी सुट्टी लागली , तरी चालूच होतं .

आणि याच वेळी एक नवीन नाटक सुरू झालं . एका दिवशी सकाळी मी , नारायण स्वयंपाक करीत बसलो होतो . तेवढ्यात पोस्टमन आला . नारायणच्या नावानं एक पत्र होतं . अधीरतेनं पत्र फोडलं आणि वाचायला लागलो . पत्र वाचून संपलं आणि मोठ्या कोड्यात पडलो . नारायणनं पत्र वाचलं आणि तोही गंभीर दिसू लागला . पत्र फलटणहून आलं होतं आणि तेही पोरीचं .

त्याचं असं होतं – आम्ही हायस्कूलला असताना शिंदे नावाच्या एका मित्राकडं आम्हा मित्रांचं जाणं – येणं होतं . शिंदे कुटुंब तसं गरीब , जमीन नावापुरती. बाकी पोट हातावरच . त्याचे आई – वडील काही उद्योग करीत … आई विड्या वळण्याचा उद्योग करी. वडील मोलमजुरी. आम्ही सारे अगदी घरच्यासारखे त्यांच्या घरात वावरत असायचो .

शिंद्याला दोन उपवर बहिणी होत्या , खरंतर त्या आमच्याहून जरा मोठ्याच , किमान , बरोबरीच्या असाव्यात . दोघी लग्नाला आलेल्या , आणि ‘ बघण्याचा तमाशा ‘ व्हायचा , पण हुंड्यापायी लग्नं काही जमत नव्हती , मुली स्वभावानं – रूपानं चारचौघींसारख्या , पण लग्नाची डाळ काही शिजत नव्हती . त्यातल्याच एकीचं पत्र होतं . नुकतंच टी.बी. झालेल्या एका मुलाला ह्या मुली दाखवल्या होत्या , मुलीला मुलगा पसंत नव्हता आणि वडिलांच्या हाती पैसा नव्हता . लग्न होत नाही , तेव्हा जीव द्यावा आणि गरीब वडलांना यातून वाचवावं , अशा आशयाचं पत्र त्या मुलीनं लिहिलं होतं .

पत्र वाचून आम्ही बराच विचार केला … काय करावं समजत नव्हतं . नुसतं असं करू नये , म्हणून कोरडा आशीर्वाद देणं बरं दिसत नव्हतं . मग निदान मुलगा सुचवावा , असं वाटत होतं , पण मुलं दिसत नव्हती . आणि दिसली , तरी अडचणी अनेक होत्या .मुख्य म्हणजे मुलींना जातीतलाच मुलगा हवा होता . आणि जातीतली मुलं हुंड्याशिवाय लग्न करायला राजी होणं शक्य नव्हतं .

चार – दोन दिवस आम्ही याच विषयावर बरीच चर्चा केली. आणि तो विषय बाजूला पडला . पत्राचं उत्तरही पाठवलं नव्हतं. तोच दुसरं पत्र त्यांनी अगदी हातघाईवर लिहिलेलं . एक मुलगा बघायला आला होता , त्यानं प्रश्न काय विचारावा ? … ‘ पायथागोरसचा सिद्धांत सांग . ‘ अशी बरीच नामावली लिहून पुरुषजात मुलींना बाजारातल्या खाटकानं कोकरू हेरून घ्यावं तसं कसं पारखत होती , हे लिहिलं होतं .

पुन्हा आम्ही दोघं चर्चा करू लागलो . आपल्यालाच हे का लिहावं हे समजेना . कदाचित , आपण समजून घेऊ , म्हणून लिहिलं असेल , असं वाटलं . पुन्हा विषय मागे पडला . पण चार दिवसांनी पुन्हा एक पत्र आलं . त्यात आम्हाला फलट णला बोलावलं होतं . झालं . काय भानगड आहे , हे बघायला आम्ही फलटणला आलो , एका निर्जन जागी संकेतानुसार त्यातली एक मुलगी आली … आम्ही खूप बोललो . बिचारी साऱ्या प्रकारांना विटली होती . तिनं सरळच नारायणला विचारलं ,

‘ येवढे चांगले विचार तू बोलायचास . तूच का नाही तयार होत ?

‘नारायणनं तिला खूप समजावलं … प्रेम वगैरे सारं सांगितलं, पण ती उठताना म्हणाली ,

‘ तू एकटा कोल्हापूरला गेलास, तर मी जिवंत राहणार नाही ! ‘

आता मात्र आम्ही चक्रावलो . काय करावं , सुचेना . अखेर घरी बोलून सांगतो, म्हणालो. त्याला तिनं होकार दिला . आठ दिवस त्याच धामधुमीत होतो. घरी मात्र जावं असं वाटत नव्हतं. पास झालो, असं घरी नुसतं पत्रानं कळवलं होतं , तेवढंच. नारायणचे मामा, आई, वडील सर्वांशी बोललो… अगदी अप्रत्यक्ष कोणताही वास न येऊ देता. परंतु एका जातीतले असूनही मुलींची चाल चांगली नाही इथपासून ते, अगोदर शिकून पायावर उभे राहा इथपर्यंत आणि चार आकडी हुंडा देतील काय ? इथपर्यंत सारं ऐकून झालं . मार्ग तर दिसत नव्हता .

अखेर नारायणनं साऱ्या मित्रांना एकत्र केलं . साऱ्या मित्रांनी पाठिंबा दिला. आणि मुलगी घेऊन कोल्हापूरला जावं … तिथंच लग्न करावं आणि मारुती काळोखेने सर्वांना सांभाळावं, निदान नोकरी लागेपर्यंत मदत करावी. सर्व कोल्हापूरच्या मित्रांनी काटकसरीनं राहवं … नारायण आणि त्याच्या पत्नीला मदत करावी . नोकरी लागली की ते स्वतंत्र व्हावेत , असं ठरलं आणि आम्ही त्या पोरीला घेऊन रात्री ट्रकनं लोणंद गाठलं. लोणंद ते कोल्हापूर रेल्वेनं प्रवास केला . मुलगी सज्ञान होती. जन्मतारखेचा दाखला बरोबर घ्यावा , तर वेळ मिळाला नाही. कोल्हापूरला आल्यावर पहिल्यांदा हे सर्व प्रा . चंद्रकांत पाटगावकरांना सांगितलं.

त्यांनी लग्नाची व्यवस्था आर्य समाजाच्या दयानंद हायस्कूलवर करण्याचं मान्य केलं . मी पुन्हा फलटणला गुपचूप आलो . शाळेत मास्तरला खोटंच , मी तिचा भाऊ आहे असं सांगून दाखला घेतला . आणि आल्या पावलानं , अक्षरश : कुणालाही सुगावा न लागता फलटण सोडलं . मी कोल्हापूरला जाईपर्यंत नारायणनं…

क्रमशः
स्रोत:(पद्मश्री लक्ष्मण माने यांच्या उपरा कादंबरीतुन)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading