उपरा, लक्ष्मण माने..
परितेकर , नानासाहेब माने या मंडळींच्या ओळखी अशाच झाल्या – वाढल्या . दलित युवक संघटना चालू होती , तिचा सभासद झालो . पण दलित युवक संघटनेच्या प्रज्ञावंत गौतम आणि मंडळींच्या बौद्ध कल्टमुळं इतका त्रास झाला, की दलितांतल्या मारामाऱ्यांना कंटाळून आम्ही काही मित्रांनी ‘ डॉ. आंबेडकर स्कूल ऑफ थॉट्स ‘ नावाची संघटना काढली. तिच्या वतीनं भटक्या समाजाच्या वस्तीत एक बालवाडी काढली . परंतु ती काही जास्त दिवस चालली नाही . व्यापक चळवळीत आपोआपच खेचला जात होतो . नोकरी चालू होती.
आमचे असे धंदे चाललेले होते. त्याचे काही परिणाम होत होतेच . एका बाजूला घरमालकांच्या मुलीच्या मनात परिवर्तन होत होतं, तसंच ज्यांच्याबरोबर हायस्कूल आणि कॉलेज करीत होतो त्या मित्रांच्यातही एकूण बदल होत होता. मी हे करू नये , अस बहुतेकांचं मत होतं . त्यातच घरमालकांच्या मुलीशी माझे काही संबंध आहेत, याचाही वास त्यांना येत होता . आणि मी तिच्याशी लग्न करण्याचा विचार करतोय म्हटल्यावर आमच्यातल्या मराठा मित्रांना काही बरं वाटेना . तू इतरत्र असं कर , इथं नको . आणि हे बरोबर नाही , असं ते सांगू लागले. मतभेद वाढत गेले आणि कित्येक वर्षांचे संबंध तुटले. नारायणची इच्छा मला वाऱ्यावर सोडायची नव्हती , पण मला सोडून तोटा नव्हता . उलट , बाकीच्या मित्रांना सोडून त्याचं चालणार नव्हतं . तो आणि रामदास , मारुती काळोखे , बनकर , कुंभार , सारे जण खोली सोडून गेले . मी एकटाच राहिलो . गेल्या पाच – सात वर्षांचे संबंध … सारं आठवे .
मी त्या रात्री खूप उशीर रडत बसलो होतो . आता खानावळीचा किंवा हातानं स्वयंपाक करण्याचा विचार करावाच लागणार होता .
त्याच दरम्यान मतकर नावाच्या एका मुलाशी मैत्री झाली . हा गृहस्थ मराठा समाजातला . घरची गरिबी . खिशात पैसा नसे . इंग्रजी उत्तम . बी.ए. करीत होता . मला स्कॉलरशिप व नव्वद रुपये पगार मिळत होता . या मित्राला सारी मदत केली . खानावळ आणि खोलीचं भाडंही मीच भरत होतो . दारिद्र्य काय असतं , हे कुणी सांगण्याची गरज नव्हती . त्यामुळं त्याला मदत करीत होतो . मानसिक दृष्ट्या खूप दुखावला गेलो होतो . जे मित्र ताटात घेऊन जेवले , त्यांनीच पुन्हा जातीचा मुद्दा काढून बाजूला टाकलं होतं . त्यामुळे संबंध बरेच दुरावले होते . नाही म्हणायला नारायण तेवढा बोलत होता .
मतकरला पायावर उभं केलं पाहिजे , सारखं वाटे , पण मार्ग दिसत नव्हता . एस.वाय.चं वर्ष सुरू झालं . कॉलेज नव्या इमारतीत आलं आणि कॉलेजात वसतिगृह सुरू केलं . आता मला वसतिगृहाचं काम पाहवं लागे . आणि कॉलेजच्याच आवारात कँटीनही सुरू करणार होते . मी प्राचार्यांना भेटलो . कँटीन सुरू करणार आहोत , तर ते नारायणला द्या , म्हणालो . प्राचार्यांनी मान्य केलं . स्वत : च्या खात्यातून पैसे दिले .भांडवल उभं राहिलं . नारायणला जगण्याचंसाधन मिळालं . आणि एका नव्याच प्रवृत्तीच्या माणसाबरोबर काम करू लागलो . वसतिगृहात मुलं सारी बी.सी. असत . आणि रेक्टर होते ज.रा. दाभोळे . माणूस प्राध्यापक , तत्त्वज्ञानाचा . पण फार मोकळ्या मनाचा . रसीला . गाणंबजावणं , नाटक , यांचं भलतं वेड . वसतिगृहाच्या कामामुळे सतत संबंध येऊ लागला . आतापर्यंत माणसं खूप पाहिली होती . पण देवादिकांना मानणारी , त्यांच्यावर आपला सारा भार टाकणारी … पूर्वजन्मीचं पाप , पुण्य , स्वर्ग , नरक करीत करीत जातीसाठी माती खावी आणि धर्मासाठी बाईल द्यावी म्हणणारी . सारी चाकोरीबद्ध , मी स्वत : ही त्यांच्याहून वेगळा नव्हतो . अंगात आल्यागत करून , नाटक वठवून कॉलेजच्या कितीतरी पोरांना काही वेळा अंगारा लावत होतो . संकटसमयी काळुबाईवर भार टाकून सुटका करून घेत होतो . प्रत्येक प्रश्नाचा विचार करावा वगैरे भानगडी माहीतच नव्हत्या . जातीचा इतका त्रास व्हायचा , पण आपली जात कमीतली का , ते समजत नव्हतं . अशी साऱ्या प्रश्नांची गाठोडी घेऊन निघालेला मी . त्याला धक्का बसू लागला तो प्रा . दाभोळ्यांच्यामुळे . वर्गात ते लॉजिक शिकवीत , पण मला कामामुळं त्यांच्या तासाला बसता येत नसे . प्रा . पाटगावकर म्हणजे पूर्ण आस्तिक माणूस … घराच्या उंबऱ्याला नमस्कार करून बाहेर पडले की कॉलेजपर्यंत रस्त्यात लागणाऱ्या झाडून सगळ्या देवांना नमस्कार करीत कॉलेजवर येणार . कॉलेजच्या पहिल्या पायरीला नमस्कार करणारे आणि जिथं गणपतीचं चित्र असेल , तिथंही नमस्कार करणारे . देव दिसला की खाली वाकणारे , बरोबर कुणी का असेना , ते आपले नमस्कार करणार !
याच्या उलट ; देवांचं अस्तित्वच नाकारणारे , प्रत्येक प्रश्नाचा वैज्ञानिक विचार करणारे , भूतपिशाच्च न मानणारे , आत्मा नाकारणारे , जडवादी विचार कशाला म्हणावं याचा विचार करणारे प्रा . दाभोळे इतका जोरदार हल्ला करीत , की देव नाही असं वाटे . जातिव्यवस्थेचं ढोंग का माजलं , कुणी माजवलं , आणि हे थोतांड कसं आहे … हे उदाहरणांनी सांगणारे , विद्यार्थ्याला आपले वाटणारे , अशा दोन व्यक्तिरेखा जीवनात आल्या . आता संघर्ष सुरू झाला , तो स्वत : शी . त्यात प्रा . दाभोळ्यांचं सान्निध्य अधिक . अगदी पोरीबाळीपासून ते सिनेमापर्यंत मिळून – मिसळून बोलणारे . त्यामुळे संबंध मित्रासारखे वाढले . प्रत्येक प्रश्नाचा जनरेटर असावा , तसं वाटत होतं .
वसतिगृहाची मेस आणि कॉलेजची लेबर स्कीम दोन्हीकडे काम करायचं , नाव अर्धवेळ सेवक , पण धंदा पूर्णवेळ करायचा . सकाळी कॉलेज सुरू होण्यापूर्वी वसतिगृहातील स्वयंपाकीणबाईंना सकाळचा शिधा काढून द्यायचा . आणि जमतील तेवढे तास करायचे . पत्र्याच्या शेडमध्ये मेस सुरू केली होती . मेसचा पत्रा गळायचा म्हणजे टिपकायचा . कित्येकदा सगळी मुलं हातात ताटे घेऊन थेंब चुकवीत जेवायची . साऱ्या मुलांची जेवणं उरकायला दुपारी एक वाजून जायचा . नंतर जेवायचं . जेवायला एक गंमत असायची . सारी मुलं खेड्यातून आलेली . साऱ्यांची बोलण्याची भाषा एक . बायजाआक्कानं कट आणि मटेरियल काढून ठेवलेला असायचा . मी आणि दीक्षा पातेल्यातच भाकरी चुरायचो . उभ्यानंच जेवायचं आणि दुपारी प्रा . दाभोळ्यांच्या बरोबर मंडईसाठी बाहेर पडायचं . खरेदी उरकून दुपारी तीन वाजता कॉलेजवर यावंच लागे . दुपारी तीन वाजता लेबर स्कीमची मुलं यायची . त्यांना काहीतरी कामं काढून द्यायची . ते करीत दुपारच्या जेवणाची व्यवस्था पाह्यची आणि लेबरबरोबर काम करायचं . लेबर कामाला लागली , की वसतिगृहाचे हिशेब लिहायचे . संध्याकाळी सात वाजता भोजनाची बेल द्यायची आणि मुलं जेवायला आली , की वाढप्यांनी वाढायला सुरुवात करायची .
वसतिगृहात पहिल्या पंगतीला बसायची साऱ्यांना घाई व्हायची . जर नंबर लागला नाही , तर भांडणं व्हायची . कारण कट आणि मटेरियल बऱ्यापैकी मिळायचं ते पहिल्या जेवणातच . नंतर जेवायचं म्हणजे कालवणात आढं दिसायचं आणि डाळीसाठी ‘ गळ ‘ टाकून बसावं लागायचं ! कितीही न्याय्य वाटणी करावी म्हटलं तरी जमायचं नाही आणि मग भांडणं होत असत . रात्री नऊ वाजेपर्यंत जेवणं चालू असत . काही चुकार नग नऊनंतर यायचे . त्यांना जेवण द्यावं लागे , नाहीतर ते उपाशी झोपायचे . हेही पाहवत नसे . आणि मुख्य म्हणजे मुलं लगेच तक्रार करत जायची . तक्रार गेली , की प्राचार्य झापायचे . कित्येकदा भाकरी राह्यच्या नाहीत , मग चूल पेटवायची आणि भाकरी करून द्यायच्या . प्रा . दाभोळे जाळ लावीत असत . भाकरी करण्यात एवढा तयार झालो , की स्वयंपाकीणबाईला भाकरी माझ्यासारख्या येत नसत . एवढं सगळं करून खोलीवर परत यायला रात्री अकरा तरी वाजत . अभ्यासाला वेळच नसे . पण कितीही उशीर होवो , खोलीवर यायचो . कारण पहाटे मालकांच्या पोरीला – शशीला भेटायचं असे . त्यासाठी दुसरी वेळच नसे . ती रोज भल्या पहाटे उठत असे . बाकी सारी दुनिया झोपलेली असे . त्यावेळी आम्ही बोलत असू . फक्त पंधरा – वीस मिनिटं वेळ मिळत असे . पण तेवढाच चान्स . एरवी बोलायचो , पण सारं जनरल . खाजगी बोलण्याची , भेटण्याची वेळ सकाळीच असे . तिच्या मनाची तयारी करीत होतो . पण लग्न करण्याचं त्यावेळी नक्की काहीच होत नव्हतं .
मधेच एकदा वडील कोल्हापूरला आले . मी गेल्यापासून कधीच आले नव्हते . सबंध सहा वर्षांत कोल्हापुरात ते पहिल्यांदा आणि एकदाच आले . इकडचं – तिकडचं खूप बोललो . कारण सहा वर्षांत घर सुटलं होतं . भावंडं मोठी झाली होती . पोपट आता सातवीला आला होता . पण त्याच्या अंगात काळुबाई येऊ लागली आणि त्यामुळं त्याला शाळेतनं काढून टाकला होता . मी त्याला शाळेतून काढू नका , म्हणून खूप सांगितलं . पण त्याला वर्गात बसता येत नाही , वर्गात घुमायला लागतो … म्हटल्यावर इलाज चालला नाही . पण त्यानं शाळा सोडली . वडलांची प्राचार्य गायकवाड , पाटगावकर , दाभोळे साऱ्यांची गाठ घालून दिली . त्यांनी ‘ आमचं लक्ष आहे … मुलगा चांगला आहे … ‘ वगैरे सांगितलं . वडलांना प्राचार्यांपुढं खुर्चीवर बसताना अगदी अवघडल्यासारखं झालं होतं . आम्ही ऑफिसात गेलो . मी वडिलांची ओळख करून दिली . सरांनी त्यांना बसायला सांगितलं , पण ते काही बसेनात . उभ्यानंच बोलत प्रा .होते . पण प्राचार्यांनी आग्रह केल्यावर अगदी अवघडून बसले . बोलणार काय ! अभ्यास करतो का , वगैरे . पाच – दहा मिनिटं असू . पण आपला मुलगा लायनीला लागलाय , ह्याची त्यांना खात्री झाली , एवढंच . माझ्या बोलण्यावर विश्वास फार कमी होता . आणि आता बोलण्यात खूप फरक झाला होता ना ! आम्ही रस्त्यात फिरत होतो . भवानीआईचं दर्शन घेऊन आलो . येताना ते सांगत होते … त्यांनी एक मुलगी पाहिली आहे . आता मी लग्न करावं . आणि मी नुसता हुकारा देत होतो . माझा अंदाज देत नव्हतो . त्यांना काही सांगावं , निदान लग्न ही माझी व्यक्तिगत बाब आहे आणि जातीतली मुलगी करणार नाही , असं सांगण्याचं मनात होतं . पण जातीबाहेरची मुलगी मिळाली नाही , तर ? … उगीच पंचायत नको आणि मी जातीबाहेरची मुलगी करीन , असं म्हणणं म्हणजे पुन्हा भांडण होणार , म्हणून काहीच बोललो नाही .
वडलांना पाठवलं , तेव्हा त्यांनी स्टँडवर सांगितलं ,
‘ बाबा , ‘ जातीसाठी माती खावी ‘ ध्येनात ठीव . जातीशिवा सत ना गत . बाकीचा काय वाईट – वंगाळ इचार करू नगस . म्या लगीन जमिवतो . आवंदा उरकून टाकू . आमी आता म्हातारं व्हायला लागलो … ‘ आणि असंच काही ….
एस.वाय.चं वर्ष संपत आलं होतं . परीक्षा जवळ आली होती , अभ्यास चालला होता . पण लॉजिक आणि इंग्रजी सुटेल , असं वाटत नव्हतं . एकतर , तास सापडत नव्हते आणि इंग्रजीचं आपलं प्रेम दांडगं !
शशी हायस्कूलला जात होती . कब्बडी हा तिचा अतिशय आवडता विषय . खूप चांगलं खेळत होती . ती अकरावीला गेली होती . तिचीही परीक्षा जवळ आली होती . पण का कुणास ठाऊक ‘ मुलीच्या जातीला काय करायचं शिकून ‘ म्हणून ऐन परीक्षा जवळ आलेली असताना तिला शाळेतून काढून घरी ठेवलं . बहुधा तिच्यासंबंधी घरात संशयाचं वातावरण होतं . अगदी गावात जातानासुद्धा कुणाला तरी – घरातल्या घेतल्याशिवाय बाहेर जायचं नाही … इथपासून माझ्याशी बोलायचं नाही इथपर्यंत बंधनं आली . पण आम्ही कुठंच वाईट वागत नव्हतो किंवा संशयाला जागा ठेवत नव्हतो . त्यामुळं मला त्यांना काहीच बोलता येत नव्हतं .
परीक्षा जवळ आली होती आणि ज्या दिवशी पहिला पेपर होता , त्याच दिवशी अचानक शशीचा भाऊ म्हणाला ,
‘ आक्काचं रात्री ऑपरेशन झालं . ती खूप आजारी आहे . ‘
खरंच वाटेना.. मी शशीला भेटायला गेलो, तर मला दवाखान्यातही जाता येईना . तिची चुलती , आई तिथं होत्या . अखेर धाडस करून आत गेलो तर हिला गॅसवर ठेवली होती . खूप वाईट वाटलं . तिला मनातलं सांगावं असं होतं , पण ते शक्य नव्हतं . थोडा वेळ बसून परत आलो .
मन उदास झालं होतं . अभ्यासाचं वांगं भाजलं होतं . परीक्षा झाली . एस.वाय.चे इंग्रजी आणि लॉजिक हे विषय राहिले . पण बी.ए.च्या वर्गात दाखल झालो . वर्ष वाया गेलं नाही.
याच वेळेला आणखी एक घटना घडली , की जिच्यामुळं सामाजिक कामात सक्रिय झालो . एरवी चर्चा आणि वाचन चालूच होतं . ‘ साधना’च्या स्वातंत्र्यदिन विशेषांकात श्री . राजा ढाले यांचा लेख होता . त्यात त्यांनी काही लिहिलं होतं … आणि त्यामुळं पेपरात सारखं ढाले प्रकरण गाजत होतं . तो लेख वाचला . प्रतिक्रिया वाचत होतोच . मित्रांशी चर्चा करीत होतो . बापुसाहेब पाटील , सुरेश शिपूरकर यांच्याशी बोलणं झालं आणि ‘ साधने’ला पाठिंबा देण्यासाठी मोठा मोर्चा काढावा असं ठरलं . बाबुराव परितेकर , प्रा . माणगावकर , डॉ . सुदाम चौगुले , शिपूरकर सारी मंडळी कामाला लागलो . कोल्हापूर म्हणजे वसतिगृहांची नगरी . प्रत्येक जातीसाठी वसतिगृह . प्रत्येक कॉलेज आणि हायस्कूलसाठी वसतिगृह . वसतिगृहात सध्यातरी बी.सी. मुलं जास्त आणि म्हणून बैठका घेत फिरू लागलो . सनातनी विरुद्ध दलितांची कैफियत मांडू लागलो . राजा ढाले आणि ‘ साधने’साठी रात्री दोन – दोन वाजेपर्यंत माणगावकर आणि मी फिरू लागलो . आतापर्यंत वादस्पर्धेत भाग घेत होतो . पण प्राध्यापकांनी दिलेलं व्याख्यान पाठ करून बोलत होतो . आता नव्यानंच आत्मविश्वास वाढत होता . आपण खूप चांगलं बोलतो , असं मुलं म्हणत होती . पोरं पेटवायचं काम फार चांगलं साधत होतं . दलितांच्यातल्या साऱ्या जातींची मुलं एका छत्राखाली येत होती . अनेक संघटना होत्या . त्यांचं सहकार्य होतं . राजकीय पक्षांनाही त्यात सामील होण्यासाठी आवाहन केलं होतं . आणि एक गंमत झाली … आम्ही एक पत्रक काढलं होतं . त्याच्यावर शहरातल्या मान्यवरांच्या सह्या घ्यायच्या होत्या . अनेक नेत्यांनी सह्या केल्या होत्या . त्याच्यावर सही मागण्यासाठी चळवळीतल्या एका वृद्ध नेत्याकडे गेलो होतो . त्याच्याबद्दल प्रचंड आदर . आणि अगदी शाहू महाराजांशी ज्यांचा संबंध असे सत्यशोधकी बाण्याचे हे गृहस्थ म्हणाले ,
‘ पत्रक असू दे . मी सही करून पेपरात देतो . तुम्हा मुलांचं ते छापणार नाहीत .
‘ आम्ही ते पत्रक त्यांच्याकडे दिलं. ते दुसऱ्या दिवशी छापूनही आलं , पण गंमत अशी , की या वृद्ध नेत्यानं आपलं स्वत : चंच पत्रक म्हणून ते छापून आणवलं होतं. त्याच्या दांभिकपणाचं वाईट वाटलं . पण त्यांची तपश्चर्या मोठी . काय करणार ?
मोर्त्याची खूप तयारी केली . शहरात दलित तरुण मुलं नुसती वेगवेगळ्या कॉलेजांची आणि हायस्कुलांची किमान दहा हजार तरी असावीत . कारण मोर्चा एवढा मोठा होता , की किमान चार ते पाच हजार तरुण मुलं मोर्ध्याला आली होती . मोर्ध्याचं नेतृत्व आम्ही तरुण मंडळी करीत होतो . बापुसाहेब , सुरेश वगैरे मंडळी आली होती . मोर्चा त्यांनी पुढे न्यावा म्हणून त्यांना विनंती केली . पण ते म्हणाले ,
‘आम्ही मोर्ध्याच्या मागे राहतो.’ मुलं खूप नाचत होती.’ साधना ‘ तसेच , यदुनाथ , एस.एम. , राजा ढाले यांच्या..
क्रमशः
स्रोत:(पद्मश्री लक्ष्मण माने यांच्या उपरा कादंबरीतुन)
