उपरा,लक्ष्मण माने..
तसं खूप अस्वस्थ झालो . खोली मिळाली नाही तर ? आणि त्या दिवशी खोली मिळाली नाही . शशी खूप चालल्यानं थकली होती . बरं , तिला कुठं बसवावं , तर ओळखीचं कुणी नाही . बॅगलाच कसाबसा आश्रय मिळालेला .

रात्र झाली . तिघंही खाणावळीत जेवलो आणि स्टँडवर आलो . आम्ही दोघं विचार करत होतो . शशी पॅसिंजरच्या फलाटावर झोपली . आम्ही शेजारीच बसलो होतो . रात्र बरीच झाली होती . आदल्या रात्री झोप नव्हती . त्यामुळं डोळे चुरचुरायला लागले होते . रात्रीचे प्रवासी जात – येत होते . गाड्या येत होत्या … माणसं उतरत होती , चढत होती आणि आम्ही बोलत बसलो होतो . तंबाखूचे बार भरीत होतो . धुंकत होतो . घसा सुकला की पाणी ढोसत होतो . बरीच सामसूम झाली होती .
तेवढ्यात एक पोलिस आला . शेजारच्या बाकड्यावर एक खेडूत झोपला होता . त्याच्या तोंडावरचं पांघरूण खस्सकन ओढून ‘ ऊठ ! ‘ म्हणून त्याच्या केसांना धरून त्याला पोलिसानं उठवलं . तो बोलायच्या आत खाड्कन त्याच्या गालफाडात बसली . तो पुरता जागा होण्याच्या आतच कानसूल रंगलेलं . तत पप करीपर्यंत ह्या शासकीय हवालदारानं दम देत आणखी एक – दोन चढवल्या होत्या . बिचारा सांगत होता , ‘ गाडी चुकली , म्हणून झोपलोय . ‘ पण पोलिस ऐकत नव्हता . ‘ तुझ्या बापाची जागा आहे ? का घर आहे ? ऊठ , ऊठ ! ‘ करीत त्याला स्टँडच्या बाहेर हाकून , मग तो आमच्या जवळ आला . आल्याबरोबर आम्हाला कुठून आला म्हणून विचारलं . आम्ही सांगितलं … कुठं जाणार म्हटल्यावर काय सांगावं , याचा विचार करीत होतो , तेवढ्यात त्यानं शशीच्या अंगावरची चादर मगासारखीच ओढली . मी धावून गेलो . ती माझी बायको असल्याबद्दल सांगितलं . पण त्याला काही पटत नव्हतं . तो तिला दम देऊ लागला . ती पुरती जागी झाली . पदर सावरला आणि त्याला साफ शब्दांत ‘ मी ह्यांची बायको आहे ‘ असं तिनं सांगितलं . पण कुठं जाणार याचं तिनं दुसरंच उत्तर दिलं आणि हा गडी भडकला . ‘ चला पोलिस स्टेशनला ‘ म्हणू लागला . ‘ आयला ह्या शिपुरड्याच्या ! ‘ म्हणून मनातनं खूप शिव्या घातल्या , पण काय करणार ? चल म्हणालो . बरोबर बास्केटच्या शिवाय काही नव्हतंच .

पोलिस स्टेशनला आल्यावर तो आपणहूनच गार आला . रस्त्यानं त्यानं अनेक पद्धतीनं पैसे मागितले , परंतु काही मिळत नाही , म्हटल्यावर एका कागदावर नावं लिहून घेतली आणि आम्हाला सोडून दिलं . आता स्टँडवर जाण्यात अर्थ नव्हता . बरं , इतक्या रात्री कुठं जावं , हा प्रश्न होताच . एका पोलिसाला परिस्थिती सांगितल्यावर त्यानं पोलिसस्टेशनवरच बाहेर थांबायला परवानगी दिली . आणि लग्नानंतरची पहिली रात्र गेली , ती पोलिस स्टेशनमध्ये !
दुसऱ्या दिवशी पुन्हा खोलीचा तलास चालू केला . मला – नारायणला हे माहीत होतंच . पण जिला आयुष्यात कसलाच प्रश्न नव्हता , तिला काय वाटत असेल ? … याचा सारखा विचार करीत होतो . खरंतर , आता विचार करायला लागलो तरी होतो .नाहीतर आतापर्यंत उपटसुंभासारखं सारं आयुष्य . हॉटेल में खाना – मसजिद में रहना चाललं होतं . अखेर बुधवारपेठेत एका मुस्लिम गृहस्थानं खोली भाड्यानं दिली . ‘ दर एक तारखेला भाडं पाहिजे . दोन तारखेला सामान रस्त्यावर टाकीन ‘ या अटीवर खोली मिळाली . खोली मिळाली , तेव्हा स्वर्गप्राप्तीचा आनंद झाला . बॅग जाऊन आणली . हातपाय धुतले . शशीला खोलीत बसवून बाजारात गेलो . ताट , तांब्या , वाटी , स्टोव्ह , तवा- किमान स्वयंपाकाला लागणारं खरेदी केलं . आणि त्या रात्री पहिल्यांदा शशीच्या हातचा स्वयंपाक जेवलो .
नारायणचं कोल्हापुरात बरं चाललं होतं . कँटीनवर संसार चालला होता . त्यानं नोकरी लागेपर्यंत जमेल तेवढी मदत म्हणजे खोलीभाडं देण्याचं मान्य केलं होतं . दुसऱ्या दिवशी सकाळी तो गेला . पत्र लिहिण्यास आणि काही गरज लागल्यास नि : संकोच मागायला सांगितलं होतं . नारायण गेला , तेव्हा खूप वाईट वाटलं .
आता दोघंच राहिलो होतो . सुखदुःखाचे भागीदार . मी तिला परिस्थिती समजावून सांगत होतो . ती बोलण्यापेक्षा ऐकण्याचंच काम अधिक करत होती .
जवळ दोन महिने पुरतील एवढे पैसे होते . काटकसरीनं ते जास्त दिवस कसे पुरतील , ते पाह्यचं होतं . पहिल्या दिवसापासूनच नोकरीच्या शोधात होतो . कोल्हापूरला ‘ पुढारी’त जाहिरात तरी असे . साताऱ्यात तेही नाही . नोकरी कुठं शोधावी हा बिकट प्रश्न होता . तरीही चिकाटीनं प्रयत्न सुरू केले . घरी लग्न केल्याचं सविस्तर पत्र लिहिलं होतं . शशीच्या घरीही सविस्तर पत्रं लिहिलं होतं . मनात असायचं , नोकरी लागेल . आपल्यासाठी राखीव जागा असतात …
पण दोन महिने संपले , तरी नोकरी मात्र लागली नाही .
मधेच गावाकडून आई – वडील , आप्पा , तात्या- सारी माणसं आली . पत्रात पत्ता लिहिला होता . ते आले , तेव्हा दुपारी चार वाजून गेलेले असावेत . मी बाहेर गेलो होतो . आणि ते रस्त्यावरच बसले होते . एका घरातल्या सावलीला . मी आल्याचं पाहिलं आणि माझ्या मागोमाग दारात आले . मी मागे वळून पाहिलं तर सारी पलटण मागे उभी . मी ‘ या ‘ म्हणालो तसं बा , आप्पा आणि तात्या आत आले . मयतीला गेल्यासारखं . आई उंबऱ्यात उभी . मी अवसान आणून आईला आत बोलावलं . शशी गुपचूप बसली होती . यापैकी कुणालाच तिनं पाहिलं नव्हतं . आणि त्यांनी तिला पाहिलं नव्हतं . मारक्या म्हशीसारखे सारे तिला बघत होते . सारे जण गप्प होतो . कुणीच काही बोलत नव्हतं . आणि वीज कोसळावी , तशी आई हातपाय चोळायला आणि गहिवरून रडायला लागली ,
‘आमचं वाटुळं केलंस, रं बाबा ! आरं , तुला पैदा करण्याऐवजी दगडधोंड्याला काढला आसता , तर बरं झालं आसतं , रं … ‘
ती सूर लावून रडाय लागली . मी जाऊन पटकन दरवाजा बंद केला . फुकट तमाशा नको . मी गप्प बसलो होतो .
‘ आरं , जलामलास , तवाच का मेला न्हाईस ? आमचं नाक कापलंस … आमाला मानसातनं उठविलंस . ग्वाल नाई . फँड द मुतुर ठिक कुडक्या ! निक यत्युग सुडा ‘ (तुला डुकराचा मूत मी पाजीन . तुला जाळायला न्हेला !)
आई शेलक्या शिव्या देत होती . मला अगोदरच बरं नव्हतं . त्यात आईनं कालवा केलेला . भाऊ , आप्पा , तात्या तिला गप्प बसायला सांगत होते , पण तिची टकळी काही थांबत नव्हती .
‘ तुला लहानाचा मोठा केलं … कोंड्याचं मांडं केलं … भीक मागून शिकीवला त्यो तू आमच्या तोंडात मुतलास ?
‘ मी , शशी दगडागत गप्प बसून होतो . शशीनं चहा ठेवला होता . ती चहा ठेवायला लागल्याबरुबर आई म्हणाली …
‘ ए औदसा ! आमच्या घरची घरफोडी केलीस , मानसातनं उठवलंस आन् वर च्या करतीस , व्हय ? आगं , वैऱ्याच्यात च्या पिऊ , पन तुझ्या हातचं पिनार न्हाय !
‘मी शशीला चहा नको म्हणून सांगितलं. तिनं स्टोव्ह बंद केला.
आई ई – बा मला शिकवायला किती खर्च आला … त्याची बेरीज करीत होते . एवढं टाक , म्हणून म्हणत होते . आतापर्यंत मी गप्प बसलो होतो . पण राग आवरला नाही आणि मी आईला बोललो ,
‘ आई, आता शिव्याशाप देऊन फायदा नाही . तुझे सारे पैसे परत करीन . ‘ ‘ तर रं , बाबा , तू दिलं न्हाय , तर काय उपाशी राहू , व्हय ? का तू घेतलं न्हाईस तर नागवी बसंन ?
‘ बा आईवर खेकसला , तशी आईची टकळी थांबली .
बानं इचारलं ,
‘ पोरगी कुनाची हाय ? …
मी म्हटलं . ‘ मी पत्रात लिहिलं होतं .
‘ बा म्हणाला ,
‘ आरं , पतार कुनाला वाचाय येतंय ? …
‘ मी ‘ मराठा ‘ म्हणालो . तसं आप्पा म्हणाला ,
‘ ती कशावरनं म्हराठा हाय ? म्हाराची का नसंल ? … कुनी बगितलंया ? त्वा बगितलयास का ? आन् तुला जात मेली व्हुती व्हय ? आई – बाप जितं व्हतं , का मेलं व्हतं ?
‘ आमाला सांगायचंस … जाऊ दे . तुझं तू कसंबी कर . एकदा का पेंढीचा आळा सुटला की पुना बांदताव का ? आन् तू कंच्या जातीचा हाईस , ते ह्या पोरीला ठावं हाय का ? ‘
मी मानेनं होकार दिला .
‘ आरं , हीच खालच्या जातीची आसंल , म्हन … तुझ्यासंगं आली . न्हाईतर वरच्या जातीच्या बायका आसं करत्यात का ?
‘ वेळ बराच झाला होता . बा म्हणाला ,
‘ आता वाळीत चिठी फिरंल त्याला काय करायचं ? … आपला गू आपल्या तोंडात दुनिया घालंल , त्याला काय सांगू ? कंच्या तोंडानं पंचात बसू ? आता सारी पंचात बोलल आन् , लक्षा , मी खाली ध्यान घालून माती टोकरीन . मागं चार पोरी हाईत्या , त्यान्ला कुनाला दिऊ ? आता ह्यान्ला हिर – बारवंशिवाय १२६ कुनी हाय का ? ‘ असं म्हणत बाबी रडायला लागला . खरंतर , मलाच आतून ढवळून आलं होतं . प्रकृती बरी नव्हती . तात्या सोडला तर आप्पा , बा , आई , मी स्वत : आणि शशी सारी रडत होतो . पण वेगवेगळ्या कारणांसाठी . मी जात मानत नाही , म्हटल्यावर तात्या म्हणाला ,
‘ तू नगंस मानू ! आम्ही काय करावं ? तुझ्या पोराबाळान्ला कोन पोरगी दिल ? तुझ्या मयतीला कोन यील ? बापाला कोन उचलील ? हे जर थोड्यात मिटलं न्हाय , तर , लक्षा … ह्यो बजा जिता आसला आन् तुझा बा मेला , तर त्याला शिवून दिकान जात द्याची न्हाय ? आरं , काय केलंस , वाद्या … साऱ्या कुळाला बट्या लावलास !
‘ पहिला बहर संपला होता . रात्र बरीच झाली होती . शशीला भाकरी कराय सांगितलं , तसं सारेजण उठले . बा – आई म्हणाली ,
‘ आमी जातो . तुजा पावनचार घ्याला आलू न्हाय . साताऱ्यात कुठंबी भीक मागून खाऊ , पन तुझ्या घरात पान्याचा ठेब दिकून घेयाचू न्हाय .
‘ मी खूप विनवलं, पण कुणी थांबलं न्हाय. सारीजणं कैकाडवाड्यात निघून गेली .
इतका वेळ दाबून धरलेला कढ रिकामा होईपर्यंत रडलो . शशीचा फार विरस झाला होता . ती म्हणत होती ,
‘ मला वाटलं , आमीच ९६ कुळीचे, पण हे तर फारच भयानक दिसतंय !
‘ रात्री केव्हातरी जेवलो .
दुसऱ्या दिवशी दिवस उगवायला पुन्हा मंडळी , आणि आता त्यात कैकाडवाड्याची भर , सारी बघायला आलेली .
‘ आसं कंदी झाला न्हाय . हे इपरित झालं . आपल्यात आसलं कंदी न्हवतं .
‘ सारीजण चर्चा करीत होती . मी उठलो नव्हतो . अंग इतकं दुखत होतं , की विचारायची सोय नव्हती . आई – बा उशा – पायथ्याला बसून चुना घालीत होते . मी आजारी असल्याचं सांगितलं तर सगळ्यांना मी ढोंग करतोय असं वाटलं . खरंतर अंगात ताप होता . खूप मानसिक त्रास झाला होता . डोकं दुखत होतं . आणि ह्या कैकाडणी आणि सारे पाहुणेरावळे दारात , घरात . चहा नाही , पाणी नाही , जेवण नाही . खरीखरी वाळीत चिठ्ठी ह्यांनीच काढली . साऱ्यांचं बघून – देखून झालं . येत होते … जात होते . शशीला जीव नको असं वाटलं असेल … कारण बाया बोलत , ते लिहिण्यासारखं आणि सांगण्यासारखं नव्हतं . पण नशिबानं ते माझ्या भाषेत बोलत , शशीला आणि कुणालाच समजत नव्हतं . उदा . एक बाई म्हणत होती , ‘ अल सुन्नी पात्य बांदीर ! आतनक मिदा पाकाका ‘ (अगं , लवडा बगून आलीता … तिला का बगताय ?) माझ्या जीवाची काहील होत होती . ओरडून सांगावं , आणि साऱ्यान्ला हाकलून लावावं , असं सारखं वाटत होतं . पण इलाज नव्हता . हात चोळत बसलो होतो . आणि कुणाला बोलण्यात अर्थही नव्हता .
उन्हं बरीच वर आली होती . चहा नव्हता . कारण हे कुणी चहा घेत नव्हते आणि ह्यान्ला बसवून चहा प्यायचा तर आणखीनच आगीत तेल ओतल्यागत होणार . गपचीप पडून होतो . जिनं जन्म दिला होता … तिला मी पापाचा ढीग वाटत होतो . जात जोवर सांगणार नाही , तोवर हे माझ्याबरोबर असंच वागणार होते .
अखेर बा उठला . धोतार घेतलं आणि म्हणाला , ‘ आमी जातू … मुलकावर तोंडाचं काळं करून जा , पन मला , मी मेलू तरी त्वांड दावू नगस आणि आलास , तर तुला मियतीला शिवूबी द्याची न्हाईत . झ्यांट उपटून टाकलं . तुझ्या येळी वांझुटा खडा खाल्ला व्हता ! ‘

आई , बा , आप्पा , तात्या – ज्यांनी मला लहानाचं मोठं केलं … जन्म दिला … ज्या आईनं .. … तोंडचा घास घातला , डोळ्यातल्या भावलीवानी जपलं , ती सारं नाकारून निघून गेली होती , ताप आणखीनच वाढत होता . सारं शांत व्हायला दुपार गेली . शशी गांगरून गेली होती . तिला धीर देत होतो . ‘ घाबरू नको ‘ म्हणून सांगत होतो . तापात वाटेल ते बडबडत होतो . तिच्या डोळ्यांना धारा दिसत होत्या . सारखी भीती वाटत होती . इतकी अवहेलना … इतका अपमान पहिल्यांदाच वाट्याला आला होता . मुख्य म्हणजे खिशात पैसा नव्हता . आणि घरातही काही नव्हतं . मी खूपच बडबडायला लागल्यावर शशीनं सारं निभावून नेलं , मला एकट्याला सोडून ती गावात गेली , काळं कुत्रंसुद्धा ओळखीचं नाही … सारंच परकं . तिनं आपलं स्वत : चं घड्याळ एका वॉचमेकरकडं अवघ्या पंचवीस रुपयांना विकलं . रिक्षा आणली आणि दवाखान्यात नेली . ज्यांनी काढलं होतं , त्यांनी नाटक समजून फेकून दिलं आणि जिचा तसा रक्ताचा संबंध नव्हता , तिनं जवळ होतं ते पणाला लावलं आणि औषधोपचार केले. डॉक्टरनं लिहून दिलेली औषधं विकत घेता येत नव्हती . जवळ पैसा नाही , अंगावर दागिना नाही … कुठूनच पैसा नाही.
दिवस जात होते . दिवस दिवस उपवास घडत होते. नुसतं पाणी , नुसते फुटाणे ,…
क्रमशः
स्रोत:(पद्मश्री लक्ष्मण माने यांच्या उपरा कादंबरीतुन)
