उपरा,लक्ष्मण माने..
चुरमुरे असं चाललं होतं . नारायण दरमहा पैसे पाठवत होता , पण ते भाड्याला देत होतो . निदान निवारा तरी होता . वैताग इतका आला होता की जगण्याची शरम वाटत होती .
आणि एका रात्री निर्णय घेतला … शक्य झालंच नाही , अगदी हमालीही मिळाली नाही तर टिक ट्वेंटी घेऊन सारं संपवायचं . अर्थात दोघांनी .

आता मी जरा बरा झालो होतो . एका पेंटरकडे जाऊन बसत होतो . तो बोर्ड रंगवायला गेला की मी त्याची गि – हाईकं बसवून ठेवायचो . अखेर हमाली मिळाली नाही . पण ह्या कलाकारानं आधार दिला . पन्नास रुपये महिना मिळू लागला होता . काय होणार पन्नासानं ? राहत होतो त्याच्या शेजारी एक सरकारी नोकर सत्ती म्हणून होते . त्यांना सारं खरं सांगितलं होतं … त्यांनी एका रेशनिंगदाराला सांगितलं होतं … ह्यांना लागलं तर धान्य दे . दुसऱ्यांच्या कार्डावरचं . मिलो आणि बाजरी शशी आयुष्यात पहिल्यांदा खात होती . जिनं हट्टासाठी पाच – पन्नास उधळले असतील तिला खायला देखील देऊ शकत नव्हतो . दिवस अतिशय खडतर आले होते . कॉलेजला असताना ज्या मराठा मुलाला सर्व त – हेची मदत केली होती , त्या मतकरला आता हायस्कूलमध्ये नोकरी लागली होती . त्याला आशेनं पत्र लिहिलं , पण त्याचं साधं उत्तरसुद्धा आलं नाही . आपलं मीठ आळणी … काय करणार ? पण एकच आधार … नारायण आणि पेंटर . मधून मधून बनकर , कुंभारही मदत करीत असत , तेवढीच .
अशीच गंमत झाली . मुस्लिम गल्लीत राहत होतो . शेजाऱ्यांच्या घरात मुलीचं लग्न होतं . त्यांनी जेवायला आणि लग्नाला बोलावलं होतं . तेवढाच दिवस पदरात पडला म्हणून आम्ही खुशीत होतो . आम्हाला वाटलं , लग्न दुपारी , म्हंजे सकाळी स्वयंपाक नको म्हणून सकाळी जेवलो नाही . केव्हा जेवायला बोलावतात इकडे सारं लक्ष . घरात तर दाण्याचा कण नाही . रात्रीचे आठ वाजले , तरी जेवायला या म्हणून कोणी म्हणेना . उगीच मांडवातून फिरत होतो . पण कुणी कुत्रा विचारीना … सकाळी , जेवायला या … म्हणणारा शोधीत होतो . तो गडबडीत असायचा . बिर्यानीचा खमंग वास येत होता . पण आपल्या काही नशिबात नव्हता . जिभेआड नाही तर पडजिभेला कुठला ? नुसतं नाकानं हुंगत होतो . अखेर , जेवायला आता बोलावतील , मग बोलावतील , म्हणून वाट बघत बसलो . खिशात चार आणे होते . निदान , दोन केळी आली असती , पण तेही सारं बंद झालं . मनातनं साल्यांना एवढ्या शिव्या दिल्या … दोघंही दारं बंद करून शनिवार चौकात आलो – सारं बंद झालेलं . अखेर सिनेमाच्या थिएटरजवळ एक चहा फिप्टी फिप्टी प्यालो . आणि माघारी आलो .
दार उघडताना लहानपण डोळ्यांपुढून सरकत होतं , लोक जेवून उठले की पत्रावळ्यावर तुटून पडायचं . मनात आलं , काय हरकत आहे . पण शशीला सांगावं कसं ? तिला न विचारताच बाहेर पडलो . भराभर लग्नमंडपाजवळ गेलो , तर सारे ‘ आव भाई ! खाना खाव ! ‘ म्हणून एकमेकाला म्हणत होते आणि एकाच परातीत मावतील तेवढे जण बसत होते . माझ्या डोक्यात प्रकाश पडला … आयला , ही मुसलमानं आपल्यासारखी पत्रावळ्यावर जेवत नाहीत . घरी आलो . तांब्याभर पाणी प्यालो . ज्याच्यासाठी लग्न केलं … ते शरीरसुख – उपाशीपोटी घोरत पडलो म्हणायला जागा नाही . पण तळमळत पडलो . मधेच साऱ्या जगाला शिव्या घालत होतो . व्यवस्थेवर एकटाच अंथरुणात मुतत होतो .
एकदा एक मस्त आयडिया डोक्यात आली होती … हे देशाचं कारभार करणारं सरकार असतं कुठं ? मुंबई आणि दिल्लीत ना ? बाईची ‘ गरिबी हटाव ‘ घोषणा होती . आपण पार्लमेंटवर एकाच वेळी बाँब टाकावा अन् साली ही खरूज हटवून टाकावी ! आणि खरोखरच स्वप्न पडलं … त्यात मी पार्लमेंटवर बाँब टाकतोय आन् ते काल्पनिक जनतेचं अधिराज्य गरिबांच्या , दलितांच्या आणि माझ्यासारख्या , जे या देशाचे काही लागतात , त्याच्या ठिकऱ्या ठिकऱ्या होताना पाह्यचो . नुसताच गाडून ठेवलेल्या आगीवाणी धुमसायचो . रिझर्वेशनबद्दल कुणी बोललं की नरडीचा घोट घ्यावं , असं वाटायचं . साला , नुसती भंकस वाटायची . साऱ्यांचे मुखवटे फाडावेत असं वाटत होतं .
मनात यायचं , आपलं सरकार आंतरजातीय विवाह केला , की म्हणे , सत्कार करून मदत देतंय . आपणही प्रयत्न करावा .
झालं, सातारा जिल्हा परिषदेला अर्ज केला. त्याची पोच आली, ती तब्बल महिन्यानं . सातारा म्हणजे पुरोगामी जिल्हा. जिल्ह्यानं देशाला नेतृत्व दिलेलं. नेते भाषणाच्या आणि घोषणांच्या पलीकडं झ्याट उपटून देत नव्हते . आणि आम्ही नुसतेच हात चोळत बसत होतो . जिल्हा परिषदेचं पत्र होतं – फॉर्म भरून द्या . झालं , आता जि.प.त गेलो तर अधिकारी गायब आणि कारकून महाजोर . कुणी दखलही घेईना . त्यांना पत्र दाखवलं , तेव्हा कोरडं बसा ‘ म्हणाले … हे समाज कल्याण खातं . सभापतीला भेटावं म्हटलं , तर ते पोटाचा घेर सावरीत फोनवर बोलत होते. डॉ. आंबेडकरांच्या नावानं जिंदाबाद … नुसती फालतुगिरी होती . अखेर संबंधित कारकून आले . त्यांनी फॉर्म दिला .
हे घेऊन जा आणि चार प्रती टाईप करून फोटो लावून परत द्या …

मनात आलं , ह्यांच्या आयला ! ह्यांना भीक लागली , का सरकारला ? हे आता टाईप करायचं … आणि फोटो काढायचा म्हणजे किमान दहा – पंधरा रुपये लागणार .
अर्ज घेऊन आलो , तो पाय आपटीतच . शशीला दांडगं कुतूहल … आल्या आल्या काय झालं , म्हणून तिनं विचारलं . तसं सारा राग बिचारीवर निघाला . सभापती ते कारकून साऱ्यांची आई झवून टाकली ! घरात नाही दाणा आन् मला म्हण नाना , अशातली गत . पेंटरला सांगितलं … तो हसला . फॉर्म घेऊन गेला . टाईप करून आणले . फोटो काढायला पैसे दिले . जे.के. आर्टमधून आलोय म्हटल्यावर फोटो कमी किंमतीत काढले . हाता – तोंडाची गाठ पडत नव्हतीच . म्हणजे , एक वेळचं कसंतरी जमत होतं , एवढंच.
सारे फॉर्म नेऊन दिले . पंधरा दिवसांत कळवतो , म्हणाले . सभापतीला भेटलो . सारं सांगितलं , पण हे सभापती काही डॉ . आंबेडकर नव्हते , तर त्यांना पान्हा फुटेल . थातूरमातूर उत्तरं दिली . ‘ बघतो ‘ म्हणाले .
अनेक हेलपाटे घातले . कधी साहेब नाही , कधी प्रकरण पुण्याला गेलंय , कधी सभापती नाहीत , असे दोन – तीन महिने गेले . आणि मी नादच सोडून दिला .
पुढे सहा महिन्यांत उत्तर आलं ,
‘ जर दोघांपैकी एकजण अस्पृश्य असेल , तरच मदत करता येते .
‘ मला हे समजेना , की अस्पृश्य कोणाला म्हणायचं ? अरे लेकांनो , महाराला निदान महारकी असते , हाडकी असते , हाडकळी असते . डोक्यावर कसं का असेना , छप्पर असतंय … पण मी – मला ‘ धरणी माय ठाव देईना , आन् आभाळा हात पोचंना . ‘ हागंदारीतल्या माणसाला अस्पृश्य म्हणत नाहीत . मग काय म्हणतात ? पोटापायी पायात भिंगरी बांधणारा तुमचा कोण ? आणि असेच प्रश्न डोक्यात वावटळ निर्माण करायचे .
दुसरं कलम होतं , ‘ मात्र तुमच्या मुलाला दोघांपैकी कोणाचीही जात लावता येईल .
‘ म्हणजे , ज्या जातिव्यवस्थेवर प्रहार करावा , म्हणून उपास काढतोय तीच पक्की करावी काय ? आणि आमच्या पोरानं कुणाचीच जात लावली नाही , तर तो ह्या देशाचा नागरिक होणार काय ? अस्सा सारा शिमगा केला आणि सरकार , सवलत , ‘ गरिबी हटाव ‘ कुणी म्हणाला , की मोजून पायतानानं हाणावा , असं वाटत होतं .
दिवस भयंकर आले होते . आतापर्यंत एकटा होतो … काहीही करू शकत होतो . आता शक्य नव्हतं . पण शशीनं सारं निभावून न्यायचंच , अशी अगदी खणूगाठ बांधली असावी . खरंतर हिजडा ठरवून तिनं हाकून द्यायला हवं होतं . पण ते होत नव्हतं . राग , संताप आणि माणसांच्या जगातील स्वार्थी , दयामायाशून्य , भावनाशून्य , माणुसकीहीन माणसं नावाच्या समूहात आपण जगत आहोत , असं वाटत असे . हळुहळू पण निश्चितपणे मनात गुन्हेगारी प्रवृत्ती निर्माण होत होत्या .
चोर चोरी का करतो ? माणसं अनीतिमान का होतात ? ती मुळातच तशी असतात का ? पोटातलं पाणी न हलता लाखो रुपये कमावणारे नीतिमान कसे ? केवळ गुंतवणुकीवर व्याज खाणारे भाडखाऊ … नव्हेत काय ?
अनेक प्रश्न समोर फेर धरीत आणि स्वप्नाळूपणे त्यांची उत्तरं शोधीत होतो . पाप , पुण्य , पूर्वजन्मीचं फळ , नशीब , साऱ्यांच्या आयांवर पांडुरंग चढवावा असं वाटे . पण रंडकीच्या तळतळाटासारखं हात चोळण्यापलीकडं काहीच करू शकत नव्हतो .
पेंटरच्या दुकानात एक कार्यकर्ते आले होते . माझ्याच वयाचे … धनगर समाजातले . काळे त्यांचं नाव . त्यांची एक लहान संस्था होती . तिचा बोर्ड रंगवायला आला होता . पेंटर नव्हता . म्हणून गप्पा मारायला लागलो . काहीही बोलायला लागलं तरी राजकारण, महागाई, भ्रष्टाचार इत्यादीवर येत असू. जातिव्यवस्था त्या अनुषंगानं येई . मी खूप चिडून एकजात सारे पक्ष कसे हरामखोर आहेत , हे सांगत होतो . जातिव्यवस्था , धर्मसंस्था यांवर बोलू लागलो , की एकतर वेड्यात काढत किंवा निर्लज्जपणे जातिव्यवस्थेचं समर्थन करीत . तर ह्या काळ्यांशी जरा दोस्ती झाली . गडी युवक संघटनेत काम करीत होता . त्याला मी नोकरीसाठी खूप गळ घातली . तो नुसती आश्वासन देत होता . पण तो खेड्यातून आला होता . उत्साही होता . तो म्हणाला ,
‘ बाबा रे , जात – पैसा – वशिला यांपैकी तुझ्याजवळ काही नाही आणि आम्ही सत्ताधारी पक्षातली माणसं आईसंग जाऊन बापाला सलाम करीत असतो . त्यापेक्षा तू असं कर , मी तुला एका माणसाकडं घेऊन जातो . तो तुझ्यासारखीच बडबड करीत असतो , बामणच हाय , पण जरा जानव्याच्या भानगडीतलं न्हाय . बोलाय फुटाण्यावाणी , पण लई करून चर्चाच असती . तुझाही वेळ जाईल आणि माणूस चांगला हाय . काही मदत करील .
‘ खरं म्हणजे , माझा माणसांवरचा आणि माणुसकीवरचा विश्वास उडून गेला होता . जन्मदात्यांनी संबंध सोडला , तिथं कुणी आपलं असू शकेल , यावर विश्वास बसत नव्हता . पण त्यानं गळ घातली आणि बघू या आणखी एक खडा टाकून , म्हणत मी काळेबरोबर जिना चढून वर गेलो, तर दार बंद . त्यानं दाराची कडी वाजवली .
एका तरुण गोऱ्या माणसानं हसत हसत दार उघडलं . आम्ही आत गेलो , तर हे गृहस्थ बाहेर निघाले होते. पण थांबले . रावसाहेब काळ्यांनी त्यांची ओळख करून दिली ,
‘ हे डॉ. नरेंद्र दाभोळकर… इथं ‘ समाजवादी युवक दला’चं काम करतात आणि हे लक्ष्मण माने !
‘ ‘ आंतरजातीय लग्न ‘ वगैरे – औपचारिक जुजबी बोलणं झालं . डॉ . दाभोळकरांनी हातातली बॅग खाली ठेवली . कुठून आलो , सध्या काय करतो वगैरे खाजगी माहिती विचारली . डोळ्यांत सहानुभूती दिसत होती . पण माझ्याकडे मी पाह्यला लागलो , तर दाढीचे खुंट वाढलेले , अंगावर मळकी कापडं … माझी मलाच लाज वाटली . अतिशय अस्पष्ट माहिती सांगितली … खरी स्थिती सांगायला जीभ रेटत नव्हती . इकडच्या तिकडच्या गप्पा मारल्या आणि दाभोळकर म्हणाले ,
‘ मी परळीला नोकरीला आहे … तुम्ही असं करा , सहा वाजता या , मग आपण बोलू .
‘ माणूस समाजवादी आहे . निदान , आपला सहप्रवासी आहे . काही करील , असा भरोसा मनात घेऊन उठलो . पण आता उभारी राहिली नव्हती . आणि असे , स्वत : ला समाजवादी म्हणवणारे शेकडो हरीचे लाल पाहिले होते . पण ‘ मोले घातले रडाया , नाही दया , नाही माया ‘ अशी स्थिती . मोकळ्या हातांनी माघारी गेलो . पण आशेचा धागा जरा बळकट झाला होता .
पुन्हा खडा टाकावा , म्हणून सात – साडेसात वाजता जिना चढलो . डॉ . दाभोळकर पेशंट तपासत होते . ‘ पेशंट तपासतोय , जरा थांबा ! ‘ म्हणून गेले . कानोसा घेत होतो . पण एवढ्या मोठ्या घरात बाई कुणीच दिसत नव्हती . स्वयंपाक बाई करीत होती . ती काही बायको वाटत नव्हती . ती स्वयंपाकीण असावी आणि आपल्याहून वयानं जास्त असलेल्या माणसानं लग्न केलं नसावं आणि आपण … असा विचार करीत बसलो होतो . एवढ्यात डॉक्टर आले . दरवाजा बंद केला . आणि खुर्चीत बसत म्हणाले ,
‘ बोला
मी सारेगम पाठच केली होती … सारी गायली . बापुसाहेब , सुरेश शिपूरकर , अनंतराव या मंडळींकडून आलोय म्हटल्यावर लाईन जमली . जातीला जातीनं ओळखलं असावं . गृहस्थ उठले आणि घरात गेले . मला वाटलं , हे आता चहा देऊन कटवणार . ते आत बाईंशी काही बोलत होते . मला वाटलं , चहा सांगत असतील . मी घरातल्या फोटोकडे बघत बसलो होतो . ते दारातून आले , ते पाच – सात पिशव्या घेऊन . गहू , तांदूळ , ज्वारी , डाळी , सारे डबे उघडे करून पिशव्यांत ओतून आणले होते . रॉकेलचा कॅन आणि गोड्या तेलाची किटली . दहा मिनिटांपूर्वी मला कुणी सांगितलं असतं , तर मी नक्कीच शिव्या हासडल्या असत्या . घरातलं सारं धान्य नसेल दिलं , पण पिशव्या भरून आल्या . खिशात हात घातला , वीस रुपयांची नोट काढून हातावर ठेवली . मी नुसता बाहुलीसारखा हलत होतो . आपण स्वप्नात तर नाही ना ? असंही वाटत होतं . ते म्हणाले ,

‘ हे बघ , हे घेऊन जा . आणि काहीही लागलं , तरी निःसंकोच मागायचं . हे आपलं – परकं नाही .
‘ मला अगदी अवघडल्यासारखं उपकाराचं ओझं वाटत होतं . ते म्हणाले ,
‘ हे देतोय , म्हणजे उपकार समजू नकोस . तू केलेलं काम हे याच्या तुलनेनं लाखोपट मोठं आहे . त्याची ही किंमत नव्हे . तेव्हा लक्षात ठेव , आम्ही दर रविवारी इथंच गप्पा मारीत बसतो . येत जा .
सामान घेऊन घरी कसा आलो , समजलं नाही . शशीला पण धड काय झालंय ऽसांगूच शकलो नाही . कितीतरी वेळ रडत बसलो आणि शशीलाही रडतच सारं सांगितलं . देवबीव फॅड डोक्यातनं हद्दपार झालं होतं , पण असेलच , तर तो या पिशव्यांत आहे , असं जरूर वाटलं . सारीच राक्षसी पैदास नाही . अजूनही माणूस कुठंतरी जागा आहे , याची पावती मिळाली होती . एरवी ज्याला पाहिलंही नव्हतं , त्यानं आपल्यावरच एवढा विश्वास का टाकावा ? असे विचार मनात येत असत . कढ दाटून येत नि हंबरडा फोडून मोठ्यानं रडावं , असं वाटत होतं . खूप हाल झाले होते . उपेक्षा आणि तिरस्कार म्हणजे पाचवीला पुजले होते…
क्रमशः
स्रोत:(पद्मश्री लक्ष्मण माने यांच्या उपरा कादंबरीतुन)
