उपरा,लक्ष्मण माने.(भाग ३२)..

उपरा,लक्ष्मण माने..

दाखवीत असे . पण घर दाभोळकरांच्या मित्राचं आहे … पैसेवाल्यांचं आहे . गि – हाईक मोठं . तडाख्याला पाच – दहा पीस गेले , तर फारच बरं होईल , ह्या हिशेबानं सारं गाठोडं सोडून दाखवीत होतो . कोणी किती पीस घेतले , काही समजलं नाही . साऱ्या पोरींनी गराडा घातला होता . माझं लक्ष किती पीस घेतात , ह्याच्याकडं होतं आणि त्या निवडानिवडीत रंगल्या होत्या . झालं . अखेर , एकही ब्लाऊज पीस त्यांनी घेतला नाही . सारे पीस परत आले असतील … म्हणून चिडूनच ‘ चामडी देत्याल , पण दमडी देणार न्हाईत ‘ म्हणून त्यांच्या हलकट जातीला शिव्या घालत पुढं गेलो .

संध्याकाळी घरी आलो आणि किती पीस विकले आणि किती पैसे आले , याचा हिशेब करायला लागलो , तेव्हा तब्बल पाच ब्लाऊज पीस नव्हते . अक्कलखाती खर्च टाकायला अक्कलच नव्हती ! खूप भटकलो . वीस रुपयांना टोपी बसली होती, शशीही हळहळली . बुडत्याचा पाया खोलात , त्याला काय करणार ? मनाचं समाधान करून घेतलं , बरं ‘ मुकी झवली, हाक ना बोंब ‘ . त्यांनी माझे पीस चोरले असं मी म्हणणं म्हणजे साऱ्यांनी मलाच खुळ्यात काढलं असतं . स्वत : लाच शिव्या घालत हात चोळत बसलो . व्यापारात पैसे बरे मिळत . पण मिळाले की लॉटरी फुटावी तसं , नाहीतर तोंडाला फेस येईपर्यंत फिरलं , तरी चहापाण्याचे पैसे मिळायचे नाहीत . शशी घरात बसून कागदाची पाकिटं चिकटवत असायची . कंबर मोडंस्तवर काम केलं , की दिवसाला रुपया – दीड रुपया सुटायचा , तिचे कष्ट बघवायचे नाहीत . गाड्यावाणी पोट घेऊन काम करायचं . स्वयंपाकपाणी करायचं . मनातनं खूप वाईट वाटे . साला , ह्या पोरीनं माझ्यासाठी एवढं का सोसावं ? तिचा बा लाखोपती मानूस , घरी चार चाकांच्या गाड्या . बहिणी मोठ्या घरी सुखानं नांदताहेत . गाद्या – गिर्यात फिरताहेत आणि हिला असे भिकेचे डोहाळे का लागले असतील ? माझा मीच विचार करायचो आणि ही ताकद नुसत्या प्रेमाची असेल , हे काही पटायचं नाही . तेरड्याचा रंग तीन दिस ‘ असं तर होणार नाही ? सारखी धास्ती असायची . झेपावून काम करायचो . आता तिला बरं नसायचं . डॉक्टर आणि औषधं फुकटचीच असायची .

https://play.google.com/store/apps/details?id=nxtgen.mycity

दाभोळकर पतिपत्नी तिची फार काळजी घ्यायचे . तिला बरं नसलं की मी दोघांची धुणी धुवायचो . एकदा घराबाहेर नळावर धुणं धूत बसलो होतो . शशीला बरं नव्हतं … .जवळचं कुणीच नाही आणि घरात बाई माणूस नाही . मी आपलं तिच्या पातळाला साबण लावत बसलो होतो . आणि शेजारच्या आयाबाया टवकारून बघत होत्या . त्यातलीच एकजण आली आणि म्हणाली , ‘ गुरुजी , असं काय करताय ? पाप हाय हे ! … बायकुला काय रगातपिती फुटली व्हय ? का हाड्यावरून झाला ! ‘ उठा ! तिची कापडं धू नगा . मी खाल मान घालून काम करीत होतो . ‘ अहो , मी आजारी असो – नसो , तीच करती , मग तिच्या जीवाला आलं , तर मी केलं म्हणून काय झालं ? ‘ माझा प्रश्न . ती म्हणते , ‘ गुरुजी , जात बाटली म्हन रीत बाटलीया का ? नवऱ्यानं बायकूचं धुणं धुवायचं म्हेजी हे पाप ती कुठं फेडील ? नरकात जावं लागंल , का न्हाय ? … काय बया ही शिकल्याली मानसं नंदीबैलावाणी करत्याती ! आमच्या वक्ताला , नुस्तं वरनं पाणी घाला म्हटलं तर नवऱ्यानं जीव जास्तंवर हानली हुती . नजरंला नजर भिडंल काय ? जीव जाया लागला , तरी करायचं . ना करून कुणाला सांगायचं ? आपल्या कर्माला आलं , म्हनं बाप्यानं करावं ? बाई हाय का गाडाव ! ‘ आता तिच्या साथीला चारचौघी जमून अशाच लागल्या बडबडायला .

स्त्री – मुक्ती चळवळी’वर ह्यापेक्षा आणखी काय बोलावं ? त्या बाईनं हातातलं धुणं हिसकून घेतलं आणि तेवढ्यापुरतं , पण कसं जिरवलंच्या थाटात सारं धुणं धुतलं . पुन्हा धुणं धूत होतो , पण घरातल्या मोरीत . असं आमचं वागणं असायचं . त्यानं शेजारपाजारणींच्या बरोबर शशीचं फारसं जमायचं नाही . एकदा वटसावित्रीच्या पूजेवरनं असंच शेजारणींबरोबर शशीचं बिनसलं होतं . वेळ सकाळची होती . मी घाईनं उरकून ब्लाऊज पीस विकायला निघालो होतो . शशी निवांत होती . तेवढ्यात पाच – सात बायका घरात घुसल्या . म्हणून मी थांबलो . त्यांच्या हातात ताटं होती … त्यात पंचारती , कापूस , साखर , आंबा , नैवेद्य आणि दोरा , पान , सुपारी असं बरंच पूजेचं सामान होतं . साऱ्या जणी ‘ वैनी , चला ‘ म्हणून बसल्या होत्या . शशी सांगत होती , ‘ मी उपवास केलेला नाही . मला पटत नाही . माझा असल्या बाबींवर विश्वास नाही . पुनर्जन्मावर माझा विश्वास नाही आणि अशी नाटकं करून हाच सात जन्माला मिळेल , असंही मला वाटत नाही ! … ‘ बाँब टाकावा , तशा बायका उडाल्या होत्या . ‘ नवऱ्याच्या म्होरं ही बया असं बोलतीया आन् ह्यो बैल नुसतं ऐकतुया . ही कसली आवदासा आसंल ! ‘ एक पोक्त बाई म्हणते कशी ! ‘ आवो , त्या सावित्रीनं सत्यवानाचा जीव यमाच्या हातातनं मागारी आनला , ती गाढव हुती का ? पतिवर्ता , गर्ती बाय कशाला म्हनत्यात ? येसवा ह्याच्यापरीस वेगळ्या असत्यात का ? मेल्यावर नगा पाळू , पण जितं हाय , तवर तरी पाळा ! रीत कशाला केलीया ? ‘ मी गप्प बसून ऐकत होतो . शशीला साऱ्याजणी नुसतं पाण्यात बघायच्या .

शशी पक्की आहे म्हटल्यावर ह्या साऱ्या साळकाया , म्हाळकाया सात जन्मांच्या फेऱ्यांत गुंतायला गेल्या . शशी रडकुंडीला आली होती . क्षणभरच असेल , पण आपण चुकत तर नाही ना ? सगळ्या तुफानाला टकरा द्यायच्या , आपण टिकू का ? असं काही म्हणत माझ्या खांद्यावर डोकं ठेवून कितीतरी वेळ मूकपणे उभी होती . डोळ्यांची टिपं सात जन्म तर मागत नसावीत ? … -आणि एकदा असंच झालं . शेजारी सारी होलार वस्ती . साताऱ्यातली झोपडपट्टी , हवं तर , म्हणता येईल . सकाळ झाली , की सारे पुरुष पेठेत जायचे . चपला शिवायचे , बँड वाजवायचे . मिळेल ते काम करायचे . घरात बायांनी धुणी – भांडी करायची , मोलमजुरी मिळेल तशी बघायची , चिंचा फोडायच्या , नाहीतर तंबाकूच्या पुड्या चिकटवायच्या . संध्याकाळपर्यंत मिळेल ते करायचं … माझ्या घराच्या मागच्या बाजूला अशीच एक बाई होती .

https://play.google.com/store/apps/details?id=nxtgen.mycity

आठ – नऊ पोरं , सारी चिल्लीपिल्ली . गल्लीतनं फिरत असायची . आई सकाळपासून सांजपर्यंत मरणाची कामं करायची . -आणि कडुसं पडलं , की तिचा नवरा झोकांड्या खात यायचा . आला की तोंडाचा तमाशा सुरू व्हायचा . इतक्या विचकट शिव्या द्यायचा की विचारू नका . मधेच तिच्याबद्दल ह्याला शंका यायची , आत एकदा कलागत जुंपली , की सारी रात ‘ ह्याच्या खाली निजलीस आन् त्यो तुझ्यावर चढला ! ‘ असली भंकस सुरू व्हायची . एकदा तर रात्री आठ – साडेआठला सुरू झालेली भांडणं सकाळ झाली , तरी सुरूच होती . अगदी , जवळ राह्यला नको वाटायचं . मधे पडावं , तर नवराबायकोचं भांडण . कुणी काय करावं ? … मनातनं बराच अस्वस्थ असायचो . एकदा रात्री आठ – नऊ वाजता बाई बोंब मारत आणि नवऱ्याला शिव्या देत पळत आली आणि माझ्या घरात घुसली … मी काय झालं , ते ऐकत होतोच . भांडणं तिच्या घरात असली तरी कालवा एवढा असायचा , की साऱ्या आळीला माहिती असायची . तिच्या मागं हातात दगडाचं गोटं घेऊन तिचा नवरा आला . काय करावं अशा विचारात पडलो , पण तो काही दारापर्यंत आला नाही . ‘ गुरुजी , सरीला भाईर काढा , न्हायतर आई झवून टाकीन ! ‘ आणि अशीच शिवीगाळ सुरू झाली . बाई काही बाहेर जाईना , मी तिला विचारलं , तर ती रडत सांगत होती , ‘ गुरुजी , सकाळधरनं कष्ट करून आलीया . माझ्याच रोजाचं दाणं आनल्यात , कोरड्याशाला काय नव्हतं , तर खरडा करून पोरानूला दिला . अन् ह्यो किरडीवाला मूत पिऊन आलाय आन् तीन रुपयं आंगावर टाकल्याती आन् सागुतीचं करून घाल , म्हन मारायला . इतक्या रातची सागुती ह्याच्या आईच्या गांडीत मिळायची व्हय ? आता मी बायामानूस पडली . कुंकवासाठी जिता ठिवतीया . न्हाईतर ह्याचं आंड दाबून जीव घीन ! शशी तिला समजावीत होती , शांत करीत होती . आणि आत – बाहेर नुसता गोंधळ घातला होता . काय करावं , मलाही सुचत नव्हतं .

पोलिस कंप्लेट करावी असं एकदा मनात आलं . पण बाई काही तयार होणार नाही . वाटाणं , शेंगदाणं गडगडत्याल . आपण तोंडघशी पडू , म्हणून गप्प बसलो . अरुण शेलार म्हणून दलाचा एक कार्यकर्ता राहत होता . त्यानं माझ्या घरापुढं गर्दी बघितली आणि पळत आला. काय झालंय ते सांगितल्यावर तो तिच्या नवऱ्याजवळ गेला. त्याला समजावण्याचा प्रयत्न केला , पण व्यर्थ . गडी वाघासारखा डरकाळत होता . -आणि तिरीमिरीत बाई बाहेर गेली . शेजार – पाजारची मानसं देवावानी हायती , त्यान्ला मेल्या , माझ्यासाठी शिव्या दितुयास व्हय ? ‘ म्हणत नवरा उभा होता , तिकडं पळत गेली आणि काय होतंय हे समजायच्या आतच तिनं त्याला खाली पाडला आन् त्याच्या उरावर बसली . दोघांची झटापट सुरू झाली . त्याला हल्ला अनपेक्षित होता . तो गांगरून गेला . आणि आधीच प्यालेला . अक्षरश : तिनं राग शांत होईस्तंवर हाणला . सारी गर्दी अवाक् झाली … ‘ ये रांड ! आगं , नवऱ्याला मारतीयास व्हय ? ‘ म्हणत गर्दीतली मंडळी तिला शिव्या द्यायला लागली . आता मात्र तिला लोक मारतील , असं वाटलं . त्यातली चारचौघं तयारी करीत होतीच .

मग पुढं झालो आणि सगळ्यांना ओरडून म्हणालो , ‘ नवरा – बायकोचं भांडण हाय … आपल्याला काय करायचंय ? ती भांडतील आणि एक होतील , आपण का वाईट व्हायचं ? सारखा बायकोनंच मार खायचा … आता जरा नवऱ्यानं खाल्ला , तर कुठं बिगाडलं ? ‘ अखेर बायाच मदी पडल्या आणि तिला सोडवली . त्यानंतर , तो पीत होता , पण बायकोचा आवाज वाढला की पड खायचा . आणि म्होरचं सारं टळायचं . आणि एके दिवशी मामा – आत्या घरी दाखल झाले . अद्याप जातीचं वाळीत चालू होतं . घराकडून कोणी जात – येत नव्हतं . साधं पत्रही नसे . जगला , की मेला कुणी विचारत नव्हतं . पुसत नव्हतं . मीही विचारत नव्हतो..पुसत नव्हतो . मग अचानक हे पाहुणे का आले असावेत , समजत नव्हतं … घरात काही नव्हतंच . कार्यकर्त्यांच्या मदतीनं निभावलं . मामा अतिशय मोकळेपणानं बोलत होते . शशीशी बोलत होते . आत्या जरा ताठ्यात होती , पण तीही तोंडदेखलं बोलत होती . संध्याकाळी इकडच्या – तिकडच्या गप्पा मारत होतो . आणि मामा म्हणाले , ‘ आम्ही तुम्हाला घेऊन जायला आलो आहोत . आप्पाच्या थोरल्या मुलीचं लग्न परवा आहे … तुला आलं पाहिजे . झालं – गेलं विसरून जा . तुला घरच्यांनी बोलावणं पाठवलंय , मी घेऊन जायला आलोय . तू लग्न केलंस , कुणाला सांगितलं नाहीस …

https://play.google.com/store/apps/details?id=nxtgen.mycity

आम्ही रागावलो होतो . पण आता राग विसरून तुला आलं पाहिजे . ‘माझ्या चुलत बहिणीचं लग्न अन् मला एका अक्षरानं कुणी बोलावलं नाही , कळवलं नाही … मी स्वाभिमानानं , चिडून गेलो होतो . ‘ तुम्ही जा , तुम्हाला बोलावलंय , मी येणार नाही , ‘ असं म्हणालो . सारी अक्कल पणाला लावून वाद घालत होतो . मामा म्हणत होते , लग्नाला जमात जमणार आहे . तुझ्या घरच्यांना वाळीत टाकलं आहे . पंचायत बसेल , कुनी पंगतीला बसणार नाही . तुझ्या भावंडांची लग्नं होणार नाहीत . त्याचा विचार कर . तू आता सुटलास असं वाटतं , पण तुझ्या पोरांना कुणी सोयरीक देणार नाही . वडील म्हातारे , आता म्हातारपणातच त्यांचे धिंडवडे निघतील . तू जातीची माफी माग , जात तुला पुन्हा जातीत घेईल . तुझ्या येण्यावर सारं अवलंबून आहे . तू आला नाहीस , तर खंडीभर वरणात मुतल्यागत होईल . ‘ वगैरे …. सारी रात्र तळमळत होतो . आई – वडील , त्यांची गरिबीशी अहोरात्र लढाई आणि उत्तारवयात त्यांचे जातीनं काढलेले धिंडवडे . पाहवत नव्हतं . मनाची तयारी केली . स्वाभिमान गुंडाळून ठेवला आणि दुसऱ्या दिवशी लग्नाला निघालो . माझं लग्न झाल्यावर घरी गेलो नव्हतो . शशीनं घर – जात काहीच पाहिलं नव्हतं . पंचायत पाहिली नव्हती . नुसतं ऐकलं होतं . गाडीनं स्टँडवर उतरलो . हातात बॅग , शशी , आत्या , मामा असे सोमंथळीत प्रवेश करते झालो . मी कळवलं नसलं तरी माझं लग्न हा चर्चेचा विषय असावा .

गाव पाच – सहाशे उंबरठ्यांचं . आम्ही वाटेनं निघालेलो . येणारे – जाणारे मारक्या म्हशीसारखे बघत होते . बायका दारात उभ्या राहून मला आणि बहुतेक शशीला अशा पाहत होत्या की शरमेनं मान खाली घालावी . टवकारून बघणाऱ्या नजरा चुकवत चुकवत घरी पोचलो तो गावातल्या पोरांचा घोळका दारात उभा . त्यात वहाड आधीच आलेलं . घरच्या चारी बाजूंना माणसंच माणसं आणि त्यांच्या नजरा आमच्यावर रोखलेल्या . भावंडं जवळनं हिंडत , पण जवळ कुणी येत नव्हतं . आईनं बघून न बघितल्यासारखं केलं . वडलांनी तेवढी विचारपूस केली . शशी – आत्या घरात गेल्या . मी अंगणात बसलो . लोकांचं बघणं संपलं होतं . जीव मोकळा झाल्यागत वाटत होतं . आकरीत झाल्यागत मंडळी वागत होती . कुतूहल , प्रचंड कुतूहल , भावकीतले लोक – ज्यांच्या अंगाखांद्यावर वाढलो होतो , ताटात जेवलो होतो , ती माणसं अगदी वाटच्या वाटसरासारखी वागत , बोलत होती . अगदी तुटक – अस्पृश्य समजून . जसं काही फार मोठा गुन्हेगार असावा , तसं . मी आणि मामा , दोघं बसलो होतो , तिथं लोक येत . केव्हा आला ? काय करतो , एवढं विचारीत आणि नोकरी नाही म्हटलं , की विंचू डसावा तसे हातवारे करीत . मला निदान भाषा समजत होती , बोलता येत होती . शशीची फारच पंचाईत . तिला काहीच समजत नव्हतं , कळत नव्हतं . वळत नव्हतं . नुसतं बघत बसायचं . लग्नाच्या आदल्या दिवशी पंचायत बसली . मी आरोपी होतो . भावकीनं मिटवलं पाहिजे , तर जमात मिटवणार . भावबंदकीच्या शिड्यात आजपर्यंत हयातीत मान खाली…

क्रमशः
स्रोत:(पद्मश्री लक्ष्मण माने यांच्या उपरा कादंबरीतून)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading