उपरा, लक्ष्मण माने.(भाग ४)..

उपरा, लक्ष्मण माने..

आई म्हणत होती ,

“ निना कै . किरका क्याल ? ( तुझा हात हाय , का दगड ? ) लई लागलं .

” मघाचं फोडनं कुठल्या कुठं पळालं होतं . आई म्हणत होती,

‘ उद्या चार मनाची कणिंग आलीया . आणखी आठ दिवस इथं भागंल . आठ दिवसानं बिहाड हालवावं लागंल .

‘ दुसरा दिवस उजाडला . पुन्हा बा पहाटेच निघून गेला . आईनं चा केला . मला उठवलं . लहान पोरांना उठवलं . आई म्हणत होती ,

‘ लक्षा , शाळंच्या वक्तापतुर तू गाढवं घिऊन जा . पोरं साळला जायला लागली , की समीला गाढवाकडं घालवीन अन् तू साळंत जा वाव साळंतनं पळून जावू नगं . नाहीतर बा जीव जास्तवर मारंल .

‘ मी मान खाली घालून ऐकत होतो . गाढवाची लीद बाजूला सारली … राधीला , भागीला सोडली … सिंगरं आईच्या मागं जाऊ लागली . आम्ही गावंदरीला गाढवं इरड करायला सोडली . अन् गोट्या , काचा खेळू लागलो .

शाळेत नव्या जोमानं यायचं . आईला मार बसू द्यायचा नाही . नसलं करमत , तरी बसायचं असा बेत करीत केव्हा वेळ गेला समजलंच नाही .

समी – माझी माझ्या पाठची बहीण – शेंबूड पुसत आली . म्हणाली ,

” दादा , निक आय बुटीरा ! निन हू नान खेद्या पाकाकी . “

(दादा, आई बोलावतीया तुला. मी गाढवं सांभालीन.)

मी धूम पळत आलो . वाटेत एक उकिरडा होता . त्याच्यावर शेंगांची फोलपटं दिसत होती . साळंत जायचा विचार डोक्यातनं गेला . कोचीचा दगड घेतला आणि उकिरड्यावर तपटं पडली होती , तिथं उकरायला सुरुवात केली . बराच वेळ गेल्यावर दोन – चार शेंगा घावल्या . मी शेंगा हुडकत बसलेलो . तिकडं आईनं बरीच वाट बघितली आनि ‘ लक्षा – लक्षा ह्य ऽऽ ‘ अशी मोठ्यानं मारलेली हाक कानांवर आली . तसा धूम पळत सुटलो . हातातल्या शेंगा केव्हाच गळून पडल्या व्हत्या .

आईनं ताक मागून आणलं होतं . शिळ्या भाकरी , शेंगाची आमटी , चटणी , खरडा , सारं गावातनं मागून आणलेलं . आईनं सांदन – टुपनं करायचं , छबड्या , कुडुकी द्यायचं आणि त्याच्या बदल्यात शिळंपाकं , वाढतील ते आणायचं . आम्ही साऱ्यांनी खायचं . हेच रोज सकाळचं जेवण . मी जरमलच्या वाटीत आमटी … हातात भाकरी खात , शेंबडाची नाळ वर वडत … जेवायला बसलो होतो . आणि धापकन् आवाज झाला ,म्हणून मागं बघितलं तर बानं फोकाचं ओझं टाकलं होतं . माझ्या शेजारी घाम पुसत कंठाळीला १२ तो टेकला . आईनं पाणी दिलं . ढसाढसा पाणी पिऊन त्यानं फोकाच्या बिंड्यातनं मव्हाची पोवळ काढली . तसा मला आनंद झाला . केव्हा केव्हा असं म्हव घावलं , की बा आमच्यासाठी काढून आणायचा . मी मध खाल्ला आन् साळंकडं धूम ठोकली . मी आपनहून शाळेत जातोय असं बघून बाला खूप आनंद झाला . त्या दिवशी तो तीन – चार वेळा साळंकडं चकरा मारून गेला .

मी नुसता दगडासारखा बसलो व्हतो . जवळची पोरं बोलत नव्हती . मला कैकाडी भाषा यायची . पोरांना मराठी यायची . मला मराठी अडखळत बोलायला यायची . पोरं हसायची . चेष्टा करायची . कुणी कुणी सदरा वर उचलायची . माझा जीव जायला व्हायचा . चड्डी नव्हती . शर्टानंच सारं भागायचं , बसलं की सारं दिसायचं . पोरं हसायची . आणि मास्तर कावायचा . त्यात माझ्याकडं पाटी , पेन्सिल , पुस्तक , काहीच नसायचं . नुसता रापत १३ बसायचो . बा म्हणतुया , मास्तर होणार , कसा मास्तर व्हतो ? याचाच विचार डोक्यात असायचा . अंग बांधून घातल्यागत व्हायचं . शाळंत काय चाललंय समजायचं नाही . मास्तर माझ्याबरोबर कधी बोलत नव्हता . नुसतं बसायचं . कंटाळा यायचा . मनात समी , इंदया , लाली , पुष्पी , किसन्या , भागी , राधी , शिंगरं , बिराड , असलंच असायचं . जीव लागायचा नाही . साऱ्या पोरांच्या अंगात चड्डी , सदरा , टोपी , पाटी , पिशवी असायची . मी नागडा . नकोसं वाटायचं . आनि शाळंत काही चाललं असलं , तरी मी झाक डुलक्या घ्यायचो . पोरं कानात केरसुणीच्या फडाच्या काडीनं मगुदगुल्या करायची . मी जागा झालो , की सारी हसायची . कालवा व्हायचा . आनि मला पळून जावं असं वाटायचं .

हळुहळू पोरांच्या वळकी झाल्या . आता पोरं चिडवत नसत . मास्तर मारायचा , म्हणून असेल . मी झोपा काढायचो . शाळा सुटली , की पोरं भाकरी सोडून खायची . शेंगा खायची . आणि काय काय खात असायची . मी नुसता तोंडाकडं बघत दाताचं पाणी गिळत असायचो . असं आम्हाला कधीच खायला मिळायचं नाही . आपण ह्यांच्यापेक्षा वेगळे आहोत , हे सारं खातात , आपण नुसतं बघायचं , असे विचार डोक्यात येत , पण कुणीतरी एकादी शेंग दिली – भाकरीतला तुकडा दिला , तर लई बरं वाटायचं . त्या दिवशी शाळंत जावंसं वाटायचं . हे आसं आठएक दिवस चाललं . न चुकता शाळंत जात होतो . जीव नकोसा व्हायचा . पण बाच्या हातातल्या फोका दिसल्या की नाइलाज व्हायचा . रडतखडतम्हणत पण शाळंत जायचो .

त्या रातीला मी आई – बाचं बोलणं ऐकलं . बा म्हणत होता ,

‘ दोन डोंगार चढून जवा खाली दरीत उतरावं तवा फोका दिसत्यात . जवळपासच्या फोका झाल्यात . गिऱ्हाइकंबी फुकापासरी मागायला लागलंय . दोन – चार पायल्या आरगड मिळेल . ती उकलू . आन् परवा दिसी हालावं लागलं .

‘ आई हुंकार देत होती . ‘ बाया आताशा वाढत नाहीत . शिव्या देतात … ‘ होती . बानं जयसिंग्याला हाक मारली ,

“ आला जयसिंग्या , तमाकू थिंगरक ! ” (आरं जयसिंग्या, ये तंबाखू खायला.)

बा भावाला बोलावून तेच सांगत होता . जयसिंग्या बाच्या शब्दाच्या बाहेर नव्हता . चुलीच्या दगडांना दोन पाय लावून बानं तंबाखूची चिमूट तोंडात टाकली . जयसिंग्याला तंबाखू दिली आणि दोगंजण गप्पा मारायला लागले . आईनं चुलीवर कांदवणी घातलं होतं . तीन बाजूंनी जाळ चालला होता . बा मधीच थुकत होता . आन् त्यानं बघितलेल्या सापाचं सांगत होता . मी पुढं सरकलो . इंद्या , खग्या , म्हाद्या , सारी जणं कान लावून ऐकायला लागले . बा सांगत होता , कोकणातली बात .

एकदा बा डोंगरात फोका काढायला गेला होता . हातात इळा होता . पायांतल्या वाहणा आणि डोंगरातल्या घाणेरीच्या , तिळुबीच्या , करवंदीच्या , कानवाडीच्या वेलातल्या किड्यांचा आवाज , मधीच एखाद्या पाखराचं ओरडणं एवढं सोडलं तर कशा कशाचा म्हणून आवाज होत नव्हता . सारं कसं शांत … माणूस मरून पडावं तसं . चिटपाखरू दिसत नव्हतं . दिस अजून उगवायचा होता . झुंजुमुंजू झालं होतं . बानं पटका नीट बांधला … धोतराचं खोचं आवाळलं . आनि गडी जाळीत शिरला . सपसप हात चालू झाला . घाणेरीच्या काट्यांनी हाताला इतकं वरबडलं होतं की साऱ्या हाताला चिराच पडलेल्या असायच्या . पण ओझं झालं पाहिजे . निदान दोन कणगी आणि चार – पाच झापाचं फोक व्हायला पाहिजेत , या विचारानं बाचा हात चालू होता . वाकड्या फोकांचा शेंडा छाटून टाकायचा . सरळ फोक मागं टाकायचं , मुठीमुठीनं ढीग करायचा … गडी कामात गुंगून गेला होता . आनि एकदम हातात रक्ताची धार आली . बाला वाटलं , मेलो … हातच कापला वाटतं . म्हणून बा थांबला , बगायला लागला तर काळाशार साप बानं कापला होता . बाच्या अंगाला दरदरून घाम फुटला . ते हातातलं शेपूट टाकून देत बानं वर बघितलं तर जाळीत गिचमाटीत डोकं असलेला साप फणा काढून वर झेपा घेत होता . बा मागं सरला . इचार केला . आता ह्याला सोडला तर ह्यो डूक धरल . रातचं येऊन चावंल . ह्याला मारला पाहिजे . आणि ह्यो तर वर जाऊन बसलाय . खाली सरला तर दुसऱ्या जाळीत जाईल . गडी एकटाच .काय करावं ? – सुचना . आपल्याला तो चावलेला नाही याची चिमटा काढून बा खात्री करत होता . मनातनं काळुबाई , यल्लमा , लमान साऱ्या देवांची नावं घेत होता . देवाच्या नावानं अंगारा म्हणून माती टाकू लागला . त्यानं साप बाहेर येईल म्हणून . पण साप तिथवर वळवळत होता . अखेर बाला अक्कल सुचली . त्यानं पायानं पाला गोळा केला . पण ध्यान सापावर . खिशातली काड्यापेटी काढली आणि जाळीला आग लावली . तसा धडधडा जाळीनं पेट घेतला … जाळीतील वाळकी पानं , फोकाट्या धडाडून कोंब झाला . वाळल्याबरोबर वलं जळू लागलं . बानं फोकाच्या मुठी गोळा केल्या . बिंडा बांधला . आत साप जळून जाणार , आपला डूक धरणार नाही . आई काळुबाईनं आपल्याला सोडवलं . नाहीतर आज जगबुडी झाली असती . डोक्यावर फोकाचा भारा . पायाला गती आलेली . बा दोन डोंगार चढला , एक उतरला आणि घरी मनात देवाचं नाव घेत घेत .

त्या दिवशी जयसिंग्या , बा , आई आणि पारी ( जयसिंगाची बायको ) बराच वेळ गप्पा मारीत बसले होते . काम जवळ जवळ नव्हतं … मालाला गि – हाईक नव्हतं , डोंगरात फोका नव्हत्या . उद्या काय करावं , हे ठरत होतं . आम्ही पोरं झोपी गेलो होतो .

वेळ रात्रीची असेल . म्हणजे मला तरी चांदण्यांनी भरलेलं आभाळ दिसत होतं . बा – आई केव्हातरी रात्रीच उठले होते . बानं मला , समीला हलवून उठवलं . तसं समीनं भोकांड वासलं . आईनं तिला चार – दोन हासडल्या … समी रडायची थांबली . आई इतक्या रातीचं चुलीवर भाकऱ्या घालत होती . सारा गाव शांत झोपला होता . बाची घाई चालली होती . कंठाळीत डबं , जरमलच्या पितळ्या , विळे , फाटकी पोती , दोऱ्या भरत होता . आईला हात उचलायला सांगत होता . कोंबड्यानं बांग दिली होती . गाढवं निवांत उभी राह्यली होती . शिंगरं जमिनीला अंग घासत होती . एका मोठ्या टोपल्यात उडीद , मूग , पावट्याच्या शेंगा , भुईमुगाच्या शेंगा , तीळ , कायलं , जवस , तिखटाच्या हिरव्या मिरच्या , आयाबायांकडून जमा केलेले जुने कपडे , सारं आईनं भरलं होतं . सारा फाटका संसार , बा लगभग करीत होता .

जयसिंग्याच्या पालातही तीच घाई होती . इंद्या , खग्या , म्हाद्या उठले होते . मी , समी उठलो होतो . सगळ्यांचा कालवा झाला होता . कोण काय बोलतंय , समजत नव्हतं . बा आणि जयसिंग्या उगाच ओरडत होते . आम्ही पोरं गप्प बसून बघत होतो . त्याची कंठाळी भरून झाली . पारीनं सारं उरकलं . आईचंही झालं होतं . तांबडं फुटायला आलं होतं . बाया – बापडी हातात तांबे घेऊन जरा फटकून लांबचा तांब्या जवळ ठेवून बसत होते . कैकाड्यांच्या पालाला जाग आलेली पाहत होते . खाकरत होते . कुणी कुणी बाजवळ काही बोलत होते . तंबाकू खात होते . जात होते . बाचा हात चाललाच होता . बानं राधीला सोडलं , भागीला म्होरकी घातली. सिंगरांना कळवा घातल्या. कासरा बांधला आणि आईवर खेकसला. त्याला दोन्ही गाढवं ऐकत नव्हती.’

अय , गाला लवकर पराद आड्डा वाईर ‘ बा म्हणत होता . (अगं, उरक, म्हार आडवा येईल.)

आईनं गाढव धरलं. बानं आणि जयसिंग्यानं कंठाळी धरली आणि गाढवावर घातली. पटाशीनं कंठाळी चांगली बांधली . हातातला कासरा मेखेला बांधला. शिंगरं धिंगाना घालत होती . आम्हाला चाबी दिला नव्हता .

जयसिंग्याचं एका टोपल्याचं चार आणं गावात कुणाकडं तरी येणं होतं . ते आणायला तो गेला होता . म्हणून खोळांबलं होतं . बाला निघायची घाई झाली होती . बा पारीवर ओरडला ,

‘ अगं , बगशील का कुठं गेला , ते … लई पैकंवाला लागून गेला . जा , पळ … ‘

पारी लगबगीनं गेली. जयसिंग्या आला . त्याचं बिहाड गाढवावर बांधलं . सारी तयारी झाली . बानं देवाचं टोपलं धोतरात बांधलं आनि पाठीला बरोबर बसवलं . घट्ट बांधल्यावर ‘ आई मातुश्री काळुबाई ‘ म्हणून साऱ्यांना गुलाल लावला . तोंडातल्या तोंडात काईबाई बडबडला . गालात मारून घेतलं… एका पायावर उभा राहिला आणि म्हणाला ,

‘ गलांगू ( निघा.)

मला राधीवर बसवलं . समी भागीवर बसली … किसन्याला बानं खांद्यावर घेतला . पुष्पीला माझ्या म्होरं राधीवर बसवली . लालीला आईनं काकंत घेतली . डोक्यावर कंदील , चमचा , पळी , घासलेटची बाटली भरलेली पाटी घेतली आणि गाढवं निघाली . बाच्या हातात फोक होता आणि गाढवाच्या मागं झ्या , या – या … असा आवाज करीत तो निघाला . जयसिंग्याची गाढवं म्होरं होती , त्याच्या मागं जयसिंग्या , पारी , खग्या , म्हाद्या आन् दोन कोंबडी , एक कुत्रा . त्यांच्या मागं आमची गाढवं , कोंबड्यांच्या दोन तलंगा माझ्या पायाच्या खाली लोंबत्या बांधलेल्या . त्याच्या मागं समी बसलेली . गाढवं , त्यांच्या मागं आई . आणि साऱ्यांच्या मागं बा अशी बिहाडं निघाली . बा म्हणत होता ,

‘ जाता जाताच दिसंल तिथलं फोक तोडून घिऊ .

‘ गाढवं गावातनं निघाली , तसं कुत्र्यांनी कालवा केला . पार उजाडलं होतं . जो तो ‘ बापू , का रं निघालास ? ‘ म्हणून विचारत होता . बा पोटावरनं हात फिरवून दाखवीत होता . हात जोडीत होता . ‘ म्होरल्या सालाला यीन देवा , आपल्या माय पांढरीचं लक्ष असू द्या ‘ म्हणून कुळवाड्यांना हात जोडीत होता. कुणाचं तरी देणं असायचं . ते म्होरल्या साली दीन … न्हाईतर म्होरल्या गावावरनं आनून दीन … न्हाईतर बाजारात दीन , ‘ असं सांगून पुढं सरकत होता . आम्ही गावाच्या बाहेर आलो . बा मागं वळला … साऱ्या शांत झोपलेल्या गावाला आनि म्हादेवाच्या देवळाकडं बघून त्याला हात जोडले . ‘ आशीर्वाद असू दे … बायकापोर

क्रमशः

स्रोत:(पद्मश्री लक्ष्मण माने यांच्या पूस्टकातून)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading