उपरा,लक्ष्मण माने.(भाग ८).

उपरा,लक्ष्मण माने..

‘ उगंच , सारी टाकत आल्यात म्हणून !

‘ घाट उतरलो . बानं मागं वळून हात जोडले . खंडुबारायानं सुकरूप खाली आनलं होतं . म्होरं बघून हात जोडले . काळुबाईकडं – तिच्या हद्दीत आलो म्हणून . डोंगर उतरलो , की घरी आल्यागतच . मधे कदमांची गिरवी . गिरवी हे बाजाराचं गाव . गावात मोठं वार्ड हायती . पूर्वी राजा होता गावाला . बानं तमाकू घेतली , बटव्यात भरली आन् गाढवं गाडीरस्त्यानं भन्नाट सुटली . पायाखालची वाट लागली . बापे लोक ‘ काय , बापू ? कुठनं आलास ? ‘ म्हनून इचारत हुते … बा सांगत व्हता .

निरगुडी हे आमचं गाव . फलटनपास्नं पाच – सहा मैल . बऱ्यापैकी खेडं . गावाच्या खाल्लीकडनं वढा वहातो . तसा तो फक्त पावसाळ्यात वहायचा . येरवी कोरडा . गावात सातवीपोतुर शाळा . म्हार , मांग , व्हलार , कैकाडी , धनगर , सोनार ह्यांची चार – दोन घरं . बाकी सारा गाव मराठ्यांचा . घरं टोलेजंग , मोठमोठं वाडं , गाव लई जुनं … वळानबी जुनं . पाटलाच्या वाड्याच्या डाव्या हाताला कैकाडवाडा . त्यांच्या म्होरं म्हारवाडा . मागं रामूसवाडा , जवळच मांगवाडा , गावात मध्यवस्तीत चावडी , चावडीम्होरं शाळा . शाळंम्होरं दंड्या लिंबाचं झाड . गावपांढरी बागायती … उसाचं मळ फुलल्यालं . केळी , ज्वारी मुख्य पिकं . उसाची हिरवीगार शेतं मंजी तर गावाची दौलत !

गावातल्या बारा बलुत्यांनी गावाची सेवा करायची . वर्सातनं एकदा सुगीत पाचुंदा बैत २८ मिळायचं . म्हार , मांग , रामूशी , कैकाडी – सारं गावचं बलुतेदार . आमची कैकाड्याची दहा – बारा घरं . नुसती पावसाळ्यात उघडी . येरवी कुलपाला शेन थापून पसार झालेली .

आमची बिराडं आली , तसं कैकाडवाडा शेनाच्या कुलपातनं मोकळा झालेला . बाला दोन सख्खं भाऊ – द्यानू , बजीरंग्या . बाकी भावकीची घरं . चैती आमुशाला कुरवलीच्या काळुबाईची जत्रा . पोटामागंगावगन्ना वरीसभर फिरायचं , पर चैत्रीला गावाला यायचं . आन् दसऱ्यापतुर घरी राह्यचं असा नेम .

आमी आलो , त्याच्या चौथ्या दिसी द्यानू , बजीरंग्याची बिराडं आली . ते लांब नातंपुतं , माळशीरस , इंदापूर करून आलेले . आम्ही मानदेस करून आलेलो . सारीकडं आनंदीआनंद . आपली मानसं भेटत हुती , गळ्यात पडून आलाबाला घेत व्हती .

बा संध्याकाळी भावांच्या संगं बोलत बसला होता . कुनी किती कमावलं … इच्यारत होता . साऱ्यांनीच ‘ जगलू ‘ म्हणून काका झाडल्या . कुरवलीची जत्रा चार दिवसांवर आली होती . तिघांची तीन वायली बिराडं झाली होती . ‘ देव म्हणत व्हता …

‘ आता तीन जत्रा झाल्या पायजे .

‘ बानं भावान्ला सांगितलं ,

‘ औंदापासनं तुमची जत्रा तुमी करा . देवाचा हुकूम हाय .

द्यानू , बजीरंग्या खजील झालं . दोघांची तयारी नव्हती . त्यात द्यानूला चार – पाच पोरी . एक लगनाला आली व्हती . दांडगा घोर लागला .

‘ भाऊ , आरं , तिघांत जत्रा करू ! ‘ बजीरंग्या म्हणाला .

पर बानं ऐकलं न्हाई . पोराबाळांस्नी कापडचोपड घ्यायला हवं . दोन कोंबडे , एक बोकाड , लई भारी वझं हाय . बा ढेपाळला न्हाय . देवाचीच करनी .

बा गावात गेला . पैसं तर तिघांकडंबी नव्हतं . बानं जवारीच्या सुगीतनं पोतंभर जवारी किसना पाटलाकडं ठिवली हुती . तिला गिराइक बघितलं . फुकली ४० रुपयाला . बजीरंग्यानं , द्यानूनं आपलं आपलं बिराड उपासलं . पाच – पन्नास उभं केलं . साऱ्या वर्साची कमाई रोकड जमा केली . पर त्वांडमिळवणी काय हुईना . बानं दिनकर पाटलाला गळ घातली . देव देव तर केलाच पायजे . त्याबिगर भागायचंन्हाय . आईमातुसरीचा आशीर्वाद हाय म्हनून क्वार – कुंडका मिळतुया . तिचं करायला व्हवं . दिनकर पाटलानं दोनसे रुपये याजानं दिलं . बा घरी आला . भावान्ला याजानं पैसं आनल्याचं सांगितलं . दोघान्ला बरं वाटलं . आईनं संकीट सोडविलं , म्हून सुस्कारं टाकलं.

आइतवार , फलटनचा बाजार . बा , आप्पा ( द्यान ) , तात्या ( बजीरंग्या ) बाजाराला गेलं . मी रडत मागं लागलो . बाजाराला येनार म्हनून आईनं चार – दोन वाजिवल्या . तसा गुमान फुगून चिंचखाली पारावर बसलो . उन्हानं सारं भाजत व्हतं . चिंचंच्या झाडाला नवा पालवा आला व्हता . गावातली पोरं गोट्या खेळत होती . मी जवळ उभा राहून बघत व्हुतो .

पोरांच्या डावावरनं मारामाऱ्या सुरू झाल्या . कालव्यात पोरं रंगली … मी गोट्या खिशात घातल्या . कुनाच्या ध्येनातच आलं नाही . पोरं पुन्हा गोट्या खेळाय लागली . मी त्यांच्यात मिसळलो . माझंकडं गोट्या होत्या . पाटलाचा बाळ्या पुढारी होता . त्याला , ‘ मला खेळायला घे ‘ म्हणून मी इनवत व्हतो . बाळ्या म्हणत व्हुता , ‘ हाट ! इज्या आईचं व्हांकाड ! सर ! खेळतुया !

‘ तशी सारी पोरं दात इचकाय लागली . मी गप झालो . नाकात शेंबडाची नाळ लोंबत व्हती .

बाळ्याला काय जोर आला , कुनास ठाव ? त्यानं माज्याकडं बगितलं आन् ‘ शेंबडी मेंडी ‘ ‘ शेंबडी मेंडी ‘ करून चिडवाय लागला . तशी बाकीची पोरंबी चिडवाय लागली . मी रडकुंडीला आलो . त्यांच्यापास्नं लांब गेलो तर ते माझ्या मागंच . ‘ व्हंकाड्या , व्हंकाड्या ‘ नाहीतर ‘ शें बडी मेंडी ‘ म्हणून नाचाय लागले . आता मलाबी लई राग आला व्हता . मी उलाटलो . हातात धोंडा घेतला आन् ‘ तुझ्या आईला झवतो ‘ म्हणूनजो भिरकावला , तो त्याच्या पाठनीत बसला . बाळ्या कळवळला . तशी बाकीची वाड्यातली ( पाटलाच्या ) पोरं माझ्यावर तुटून पडली . लाथा – बुक्यांनी मला खाली पाडलेला . तोंडात माती जात होती . आन् वरनं मार . ठो ठो बोंबा मारल्या , तेव्हा सारी पळाली . पारीनं भांडण सोडवलं . आमच्या भाषेतनं पोरांना शिव्या देऊ लागली …

सांचं दिस मावळला , तसा घरात गेलो . आईचा पत्त्या नव्हता . ती गावात गेली व्हती . टोपल्यात भाकरीचा टुकडा नव्हता . आता गावात मागायला जायला नको वाटत व्हतं . गप बसलो .

आई आली . तिनं वट्यातनं हिरव्या मिरच्या आन् ठेसं आनलं व्हतं . ठेसाला तिकाट लावून खाल्लं . आन् अंगणात येऊन बसलो . अंगणात पोरं फटफट सापळी खेळत व्हती . त्यात जावंसं वाटलं . उठून निघालो व्हतो . तवर सडकंनं बा येताना दिसला . धूम पळत आडवा गेलो . त्याच्या डोक्यावर बाजार व्हुता . हातात बोकडाचा दोर आन् दोन बगलंत दोन कोंबडं . म्या बोकाड धरलं . पळवीत पळवीत घरी आनला . मेखेला बांधला आन् उभ्या उभ्या आईला हाका मारून सांगू लागलो . उड्या मारत समी , पुष्पी , लाली , किसन्या , सारी पोरं बाच्या धोतराला धरून लोंबकाळाय लागली . मागाहून आप्पा , तात्या आले . त्यांनीबी बोकाड आनलं व्हुतं .

आली आली म्हणत जत्रा जवळ आली . सारी कैकाडी आळी जत्रंला तयार झाली होती . साऱ्या पोरान्ला नवी कापडं आली व्हुती . मला बानं खाकी चड्डी आन् पट्यापट्याचं आंगारकं आनलं व्हतं . समीला फडका – पोलकं , किसन्याला गोंड्याची टोपी – कुडतं , पुस्पीला , लालीला फडका – पोलकं … आईला लुगडं . बानं आपल्याला नुसता आंगारका आनला व्हता . सारी पोरं उड्या मारत व्हती . आप्पा – तात्यानंबी कापडं आनली व्हती . वर्सातनं एकदा जत्रंला समद्यान्ला कापडं मिळायची .

जत्रंचा आदला दिस उजाडला . सारी बिराडं कंठाळीत घातली . नव्या कापडाचं गठळं आईनं घेतलं . देवाचं टोपलं बानं पाठीला बांधलं . आमाला गाढवावर बसावलं . पुन्हा तांडा चालू लागला . सारी कैकाड आळी गाढवावर बसली . आन् एक एक करीत पाच – पन्नास गाढवांचा तांडा निघाला कुरवलीला . कुरवलीला इचुर्णीवरनं जायचं . सारा माळ पालथा घातला . गाडीरस्त्यात गाढवं दुडक्या चालीनं निघाली . पाच – सात मैल असंल . उनं उतारली व्हुती . दिस मावळतीला गेला व्हता .

आमची गाढवं कुरवलीला पोचली .

कुरवली तसं लई बारीक गाव . गावाच्या वरल्या अंगानं बानगंगा वहाती . धराण झालं तवापस्नं नदीला पाणी नसतं . चैताचं ऊन उतारलं , तरी भाजत हुतं . नदीच्या अल्याड गाव , पल्याड आई काळुबाईचं देऊळ . देवळाम्होरं लिंबाची , पिपळाची , पिपरणीची , वडाची झाडं . नदीच्या कडनं लिंबाची मोठी झाडं . बानगंगा वहात व्हुती . गाढवं पाण्यातनं पल्याड गेली . आमच्या बिराडाची जागा ठरलेली व्हुती . देवळाम्होरं तुटाक लिंबाचं झाड . त्याच्या सावलीत बिराडं उतारली . गाढवं सोडली . सामान लावलं . तबर नदीच्या दोनी कडला शे – पाचशे बिराडं उतरली व्हुती . गाढवांचे तांडे येत व्हुते . मानसं जमत व्हती . कैकाड्यांची बिराई देवीच्या म्होरच्या बाजूला . कैकाड्यांचा जत्रंत मान . मानकऱ्यांची बिहार्ड देवीला लागून . त्याच्या म्होरं वडारी , कोलाटी , गोंधळी , माकडवाली , गोसावी , मांग – गारुडी , वैद , आन् त्याच्या म्होरं अठरा पगड जाती जमा होत व्हुत्या .

जत्रंच्या आदल्या दिवशी गोडाचा निवद झाला . दुसऱ्या दिवशी कंदुरीची वेळ , बकरी पडायची . त्याची वर्दी गोळ्यांनी फिरून जत्रंला दिली . गोळी हे मराठा देवीचे भगत . त्यांनी येळ सांगितली . बाळकू कैकाड्याचा मान पैला . त्याच्या पणज्यानं देवी हटवली , तवापस्नं त्येचा मान असतुया .

दुसरा दिवस उजाडला . साऱ्यांनी बानगंगंत आंगुळी केल्या . आमी पोरं तर सारकी पाण्यात खेळत व्हतो . बानं हाक मारली , म्हणून वाळूतनं पळत बिराडाजवळ गेलो . बानं दोन कोंबड हातात दिलं . कोंबडं ऐकत नव्हतं . जाम दाबून धरलं . हातात निवदाची पितळी , तिच्यात गव्हाचा दामटा , त्याच्यावर भाताचा ढिकूळ , गुळाचा खडा , उदबत्त्या , कापूर , गुलाल , बुक्का , कुंकू , हळद . बानं बोकाड धरलं . आन् वडत वडत देवीम्होरं नेलं . ही दांडगीवळ.सारीमानापरमानं वळीत उभी राहिली व्हती . देवीच्या दारात बकरी कापायला सुरुवात झाली नव्हती . भांडनं चालली होती . मानाचं बकरं कुणाचं ? बाळकू कैकाडी राहिला नव्हता . त्या मागच्या वर्षीच मेला . त्याच्या पोरांच्या मारामाऱ्या झाल्या व्हत्या . इस्तू जात नव्हता . मानासाठी चौघं ल्याक चढून जात व्हते . बकरी पडत नव्हती . मागं वळीत कालवा झाला व्हता . जितराब मरगळ खात व्हुती , म्होरं काय चाललंय , समजत नव्हतं .

बा म्हणत व्हता , ‘ कवूल लावा , म्हनावं … देव सांगल , त्याचा मान . ‘ साऱ्यांनी उचलून धरलं . झालं , देवीला कवल लागला . वकुत होत होता . गोळी वैतागला व्हता . आतापातुर पाच – पन्नास बकरी पडायला पायजे व्हुती . चुटपुटत व्हता . देवानं कवल दिला , बाळकू कैकाड्याच्या धाकट्या पोरग्याच्या नावानं . बाकीचं चौघं मागं झालं . बकरी पडायला लागली . मुलाणी आला हुता .

सारी वळीनं बकरी घ्यायला लागली . बकरी कापायला सव्वा रुपाया , कोंबड्याला आठ आने दर व्हता . मानाच्या बकऱ्याला धोतर , लुगडं , चोळी मिळाली . मुलाणी बकरी कापत हुता . ज्यांचं बकरं आसंल , त्यानं बकऱ्याचं पाय धरायचं . त्यो नुसतं मुंडकं सोडवायचा . रक्ताच्या चिळकांड्या उडायच्या . कोंबड्याची मान तुटली ना तुटली , की भिरकवायचा . रक्ताचा हळुहळू पाट झाला … पाटाचा वगळ . रक्ताचा चिखल तुडवीत बा म्होरं झाला … बोकडाचं चारी पाय धरले . मानंवरनं सुरी फिरली . रक्ताच्या चिळकांड्याउडल्या . बानं निवद दिला . पैसं दिलं . पाया पडला . भक्तिभावानं परसाद उचलला . आन् बोकाड वडीत बिराडावर आनलं .

हजार – दोन हजार जितराब बळी दिलं होतं . सारीकडं चुली पेटल्या . सांच्या सहा वाजस्तंवर बकरी पडत व्हती .

बानं बोकाड आणलं . वर लिंबाचं झाड होतं . त्याला दोर घातला आन् उलटं टांगलं . भराभरा कातडं सोललं . मुंडी , कातडं , एक फरा , चार कुरका , कातड्यात बांधून लिंबाच्या ढाळीला बांधल्या . सांच्यापुरतं मटान काढलं . आईनं तंवर कोंबडी सोलून घेतली व्हती . कुत्र्यांची चंगळ झाली व्हती . सारी नदी धुरानं फुलली होती . जिकडंतिकडं चुली पेटलेल्या व्हत्या . मटन शिजत हुती .

कडुसं पडलं , तसं देवळात ढोल वाजायला लागलं . धूपारतीची येळ झाली . सारी बायकामाणसं , गडी , पोरं देवळाच्या मंडपात जमा झाली व्हती . ढोल वाजत व्हतं …. ढिगाडांग टिपाडांग , ढिगाडांग टिपाडांग . कैकाडी बाजे घिऊन पळत आले . बँड वाजू लागला . मानसांनी देवीचा परिसर फुलून गेला . चारी बाजूनं मानसं उभी राहिलेली . ही ऽ सारी गर्दी . मी खांबाला टेकून उभा राहिलो व्हतो . तात्या , आप्पा , बा बँड वाजवीत होते . जयसिंग्या , खग्या , दत्तू , सुद्या , चंद्र्या , राजी , मारत्या , सारी बँड वाजवीत होते . ढोलक्यांचं ढिपाडांग टिपाडांग गतीनं सुरू व्हतं . एक ठेका व्हता . झांजा वाजत व्हत्या . कैकाडी , माकडवाले सारी कलाकार मंडळी . रात्रीच्या वढाचढी चालू झाल्या व्हत्या . एकजण दमला , की दुसरा म्होरं रुजू व्हत व्हता . बँड चालू व्हुता .

गोळी उघडाबंब झालेला . कातडी कोड्यानं पाठीवर मारून घेत व्हता . ‘ आई काळुबाईचं चांगभलं … ! ‘ म्हणून घुमत व्हता . एक नाद घुमत होता . माणसं तालावर नाचायला लागली … अंगभरामत व्हती . ज्यांच्या अंगात येत व्हतं , त्ये आरूळ्या ठोकत , उड्या मारीत रंगनात येत व्हते . बघता बघता अंगात येणारांची संख्या मांडवात मावना , एवढी झाली . सारी कुणी काळुबाई , कुणी साताआसराया , कुणी मरीआई , कुणी लक्ष्मीआई , कुणी खंडुबा , विरुबा , म्हसुबा , म्हाळसाई , लमानसारी , सारी अठरापगड जातीची देव – भुतं नाचत व्हती . गोळी हातावर पेटता कापूर घेऊन तोंडात टाकत व्हता . कुणी लिंबाचा पाला खात व्हती . कुणी उदबत्त्या चघळत व्हती . सारीजनं आपापल्या नावाचा गजर करीत ‘ हान , बजाव ‘ म्हणत , की आठ – दहा लेझमांचे ढोल डिंगडांग टिपडांग दॉव – ढॉव डिपडांग जोरात सुरू करीत व्हते . देव नाचत व्हते .

मधेच वाजायचं बंद व्हायचं . कुणातरी कोडं असायचं . त्यो इचारायचा –

आई , पोरं जगत न्हाय . चार दिसांत खराटा फिरला . चारी पोरं मेली .

आई आजारी हाय , बरकत न्हाय …

क्रमशः
स्रोत:(पद्मश्री लक्ष्मण माने यांच्या उपरा पुस्तकातुन)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading