उपरा,लक्ष्मण माने..

उपरा,लक्ष्मण माने..

गावंदरीला गाढवं सोडून इरड करत्या जितराबांच्या मागं मागं करीत वळत्या हानत आम्ही खेळत असायचो . गावंदरीतल्या खरकट्या दगडांची लगोरी नाहीतर गोट्या . अंगात शर्ट मागून आनलेला , ठिगळांचा अन् दुमडलेला . त्यानंच सारं अंग झाकलेलं . चड्डीचा पत्ताच नसायचा . सारं काम पायघोळ सदराच निभावून न्यायचा . भाया हाताच्या मापाच्या नसायच्या आणि नाकातला शेंबूड पुसायला त्यांचा उपयोग व्हायचा . डोक्याला टोपी बाची , नाहीतर मागूनच आनलेली असायची . वाऱ्यानं लई तरास व्हायचा . डोक्यावर ती नसायचीच . खग्या , इंदया , मारत्या आणि मी उकिरड्यात नाहीतर हागनदारीत खेळत असायचो .

वय नक्की आठवत नाही , पण कधीतरी एकदा सकाळी सकाळी मोठ्या कापडातला एक माणूस बासंगं काहीतरी बोलत होता . मी अजून झोपेतच व्हतो , पण बाच्या तोंडावर हसू होतं . मला वाटलं , असेल झापकुडुक्याचं गि – हाईक . त्यानंच बा खुललाय . पण कसलं काय अन् कसलं काय … बा आला तो माझ्याजवळ . आमची स्वारी फाटक्या वाकळंत झोपलेली . वसकन बानं हासडली ,

‘ रांडच्या , अजून झोपलायास ? आरं , दिस कुठं आला बघ ! ‘

मी आपला मुकाट्यानं उठलो . तांब्यात पाणी घेतलं . तोंड धुतलं . तसा बा गरजला ,

‘ आजपासनं साळंत जायचं . हिथं हाय तवर . पाटी – पेन्सल उंद्या आनून दीन .

‘ इचू चावावा तसं जीव गेल्यागत मी बघायला लागलो . मनात आलं , आयला ,

बानं आज सकाळीच घेतलीया वाटतं . का रातची उतरली नसंल ? का आजून झोपीतच आहे ? हे शाळंचं कुठनं काढलं ह्यानं ? आन् आपून काय शाळा शिकून मास्तर होणार का काय ? मी बाकडं बघायला लागलो तसा पुन्हा तो आईवर खेकसला ,’ …

आगं , उचलू लागतीयास , का पाटलीन झालीस ?

‘ आई उचलू लागली . बानं कनिंग डोक्यावर घेतली आणि झपाझपा दिसेनासा झाला .

मी आपला हळूच आईजवळ गेलो . तिनं ‘ चा ‘ केला होता . कोरा करकरीत , बिनदुधाचा आणि त्यातबी गुळाचा . हानला पितळीभर आन् गाढवं सोडून गावंदर गाठली . गाढवं गावंदरीला इरड करायला लागली . आन् माझ्या डोळ्यांत बाची शाळा नाचायला लागली . शाळेत जायचं . खरंतर आनंद झालेला … गाढवाच्या वळत्या चुकत्याल , उकिरडं चुकतील अन् गाढवं कोंडवाड्यात नेहली , तर ओल्या फोकाचा मारही चुकणार ! मी हुरळून गेलो होतो . गाढवं वढ्याला न्यायची होती . ह्या इचारात मी गुंगलेलो . आमची तंद्री तुटली , ती कानाखाली झालेल्या आवाजानं .

‘ भाड्या , गाढवानं गंज उपासली आन् हितं काय मुत पितुयास व्हय ? मुडदी भिकारं . गावाला नुसता तरास आनलाय मेल्यांनी ! ‘

बाईनं कान धरलेला . ‘ चल , तुझ्या बाकडं … ‘ म्हणत तोंडाची गिरण सुरू केलेली . आता बाकडं जायचं , म्हणजे मरस्तंवर मार खावा लागणार . म्हणून आमची मुत्री सुरू झालेली . बाई फरपटत फरपटत बिहाडावर आनत होती आन् आमी भोंगा पसरलेला . कान तुटतंया . जीव गेल्यागत कळा , पण बाय काय सोडंना . बिराडात कुणीच नसतं . आई केव्हाच टोपली , कुडीक , झाप घेऊन गावात सांधन करायला निघून गेलेली . बिहाडाजवळ एकटी समी उभी . तिनं हे नाटक बघितलं आन् आता दादाला मार बसणार , म्हणून तिनंबी भोंगा पसरला . बाई शिव्या देऊन देऊन , सांचं सांगती तुला , मेल्या ! मडं उसकाटलं ह्याचं ! ‘ असा दम भरून निघून गेली . आमी कान चोळत , शेंबूड पुसत पळालो . गाढवं वढ्याला हाकलल्याती , आणखी मार बसेल . पायात कुपाचा काटा मोडलेला . हिसक्यात काढून फेकला आन् रक्ताला माती चोळली . जोरात कळ आली , ती दाबली अन् वढा गाठला .

गाढवं चरत होती , वढ्याच्या काठाला . जीव पाण्यात पडला . ढसाढसा गाढवांसंगं पाणी प्यालो . कान दुकत होता . दुपार उलटून गेली होती . पोटात आग पडली होती . गाढवं उकिरड्यावर सोडली . बिहाडावर आलो . इंदयाला गाढवावर नजर ठेवायला सांगितली . बा नुकताच फोकाचं वजं घेऊन आला होता . फोकाच्या खराट्यानं फुफाटा लोटला . पाणी सिंपडलं आन् आईला हाका मारत गावाला गेला . आई हातात भाकरी , कालवण आन् कायबाय घेऊन येत होती . बानं तिच्या डोस्क्यावरचं गठुडं घेतलं . दोघं तरातरा बोलत आली . लाली , पुष्पी , किसन्या आईच्या पदराला धरून भेदरलेली … सारी माझी भावंडं . मी थोरला . बाकी सारी लहान . आईबरोबरच गावात गेलेली .साऱ्यांच्या पोटात भुकेचा डोंब झालेला . आईनं बऱ्याच भाकरी आनलेल्या . तीन उफन्या पाटलिनीला दिलेल्या . तिनंच दिलं होतं ते रात्रीचं राहिलेलं आन् आयाबायांची सांधन केलेली , त्या आईचा वटा गच्च भरलेला .

सारी जेवायला बसलो . बानं हातातच भाकरी आन् झुनका घेतला . आई जेवलीच नाही . मला भाकरी , कसलीतरी आंबूस आमटी आन् कायीबायी दिलं . चुरून सारी शिळी भाकरी पोटात घातली आणि सदऱ्याला हात पुसायला लागलो होतो . दिवस माथ्यावर आला होता . बा तसा गंभीर तोंडानं विचार करीत होता . झटका आल्यागत फोकाचं वझं सोडलं … विळा घेतला . फोका चिरायला बसणार , इतक्यात काही आठवल्यागत वर बघितलं , तोवर मी इंदयाची गाढवं राखायला निघालो होतो . आमच्याबरोबर आमच्या बाच्या चुलत भावाचंबी बिराड होतं . इंदया त्यांचाच मुलगा . माझ्याच वयाचा . बानं हाक मारली , म्हणून परत आलो . मगाची बाई तर आली नाही , या भ्यानं घाबरलो , पण बाई नव्हती . बिराडं उतरली होती , तिथं कुणीच नव्हतं . आमचीच मानसं होती . बाकडं परत आलो .

‘ साळंत जायचंय ! ‘ बा गरजला , ‘ चल , मास्तरास्नी सकाळीच इचारलंय , हिथं हाय , तवर साळंत घेतू म्हणलाय . ‘

आता मात्र बाचा अवतार बघून मी रडायला सुरुवात केली . बा खरंच साळंत घालायला निघाला होता . मी आईच्या मागं जाऊन उभा राहिलो . तसा बानं हिरवा वोला फोक हातात घेतला. बाचे डोळे मोठे झाले होते. त्यानं रागाच्या झिनकाऱ्यानं आईला चार – पाच शिव्या हासडल्या ,

‘ आमागत काय हुरडं फुकत बसावा काय ? ‘ असं कायकाय मोठ्यानं बोलायला लागला . तशी आईनंपण पड खाल्ली. माझा हात बाच्या हातात आणि आमची आरडावरड बघून आयाबाया भरदुपारी कैकाड्याच्या बिहाडावरचा तमाशा बघायला आपापल्या आंगनात उभ्या राहिल्या .

‘ जाऊ दे ; बापू , कशाला मारतुयास ? ‘ शहाण्यासुरत्या सल्ला देऊ लागल्या . आई बिचारी रडत होती . आन् बा हिरो झाला होता .

दुपारची शाळा सुटली होती . बाला करंट आला होता . आमची वरात देवळातल्या शाळेच्या अंगणात गेली. सारी पोरं भोवताली जमा झाली . साऱ्यांच्या नजरा माझ्यावर रोखलेल्या. बा मास्तरांसंगं बोलत होता. आयला, कैकाड्याचं पोरगं शाळंत? साऱ्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव दिसत होते. बानं मला मास्तरच्या हवाली केलं. आन् आल्या वाटनं बिराडाकडं निघून गेला.

मी गावाला नवखा. पोरांना , मास्तरला आणि मला सारंच नवं . गावाचं नाव आता नक्की आठवत नाही . पण वाडीच असावी . पोट भरायला आम्ही इथं आलेलो. किती दिवस राहणार, माहीत नाही . केव्हा जाणार , माहीत नाही . कोंबड्या जशा आपल्या पिलांत दुसरीचं पिलू आलं , की डिवचून घालवत्यात तसं सारी पोरं मला डिवचायला लागलेली. त्यात माझा अवतार म्हणजे उकिरड्यातल्या कुत्र्यासारखा… कुनी पोरं जवळ घेईनात . बिचारा मास्तर चांगला होता . त्यानं मला दारातच बसवलं . पोरं शिवून घेत नव्हती . जवळ पाटी नाही . पुस्तक कसलं असतं … पेन्सिल कसली असती … शाळा म्हंजे काय असतं … तिथं काय करायचं असतं … कशाला कशाचा पत्ता नाही . आमच्या बाच्या कोणात्याच पिढीनं शाळा बघितलेली नाही . आम्हाला एकच पाटी माहीत – ती आमचा बा वळायचा.

मास्तर पुस्तक घेऊन शिकवत होता . आन् पोरं माझ्या पायावरले वोगाळ , नाकातला शेंबूड बघत होती . माझं कशाकडंच ध्यान नव्हतं . डोळ्यांपुढं पाल , आई , बा , समी , फोका आणि गाढवं ; ओढा , ओढ्याच्या काठचं गवत , गवतात मी , इंदया कालवणाला खेकडं धरतोय . असं आन् असंच काही चालू होतं .

बराच वेळ गेला , शाळा काही सुटेना . जीवाची उलघाल सुरू झाली . हाताचे चाळे सुरू होतेच . लघवीला सपाटून लागलेली. मास्तरचं ध्यान आपल्याकडं नाहीसं बघून मी जी धूम ठोकली, ती सरळ वढ्याला. बिहाडावर जायची बिशाद नव्हती.

वढ्याला इंदया , खग्या खरंच मासं धरीत होते . फाडलेल्या धोतराच्या फडक्यात मासं धरायचे . मीबी पाणी ढवळायला लागलो . इंदया म्हणाला ,

‘ आला लक्षा नि शाळा केच्युंगरक हुगीना मिदा आस . मास्तर ईड्डच का ? ” मिदा आस .

(आरं लक्षा , तू साळंत शिकायला गेला हुतास , काय झालं ? मास्तरनं मारलं का ?)

सारी उत्सुकता मला ऐकण्याची . मी शाळेत गेलो … म्हंजे काय? तिथं काय झालं ? मी म्हणत होतो .

‘ आळा मितनाद शाळा आन् मितनाद मिदा . नुसता खांचीरगा. शच्च आंट शाळा, नान इला हुगराव. (मी शाळेत जाणार नाही. तिथं पोरं नुसती बसतात. आणि तो मास्तर काय बोलतोय, ते समजतपण नाही.)

एका कोरड्याशाचे मासे जमा झाले होते . माशांची चटणी झाली . मलाबी माझा वाटा मिळाला . गाढवं चरत होती . दिवस मावळतीला लागला होता . मासे उन्हाच्या उतारात मिळत नव्हते . आम्ही बिराडाकडं निघालो . बिराडाच्या जवळ आलो , आणि शाळा सुटून गेली तरी ल्योक येईना म्हणून आई शाळेकडं गेली होती . तिच्या तोंडाचा पट्टा सुरू झाला होता . ती बाला म्हणत होती ,

“ निन लक्षांनक ख्वालरा , आपू निनक नला वाटीकर . शतु तर नळा अगर ! ” (तू लक्षाला मारून टाक , जाळून टाक , म्हंजी तुला बरं वाटल . ह्यो शिकतुया आन हापिसर होतुया !)

तसा बाचा पारा चढून गेला . त्यानं काही न बोलता हातानं चार – पाच हिरवंगार फोक घेतले. त्याला पिळा घातला. आईचं तोंड दुसरीकडं होतं. बानं पायाचा आवाज देखील केला नाही आणि सपासप आईच्या अंगावर आसुडासारखे फोकाचे फटके बसायला लागले . एका हातात आईच्या झिंज्या धरलेल्या आन् दुसऱ्या हातानं मार चालू . आईनं बोंब मारायला सुरुवात केलेली . समी , लाली , पुष्पी , किसना आणि पळत जाऊन मीही आईच्या अंगावर जाऊन पडलो . जयश्या , महाद्या , बापाचे चुलत भाऊ सोडवायला आले . बाचं तोंड चालू झालं .

“ हुगोट ग्वालनाय, ग्वालनाय मुतुर कुडीकीना हुगोट नानमिशेक शाळूली होडाकीरी . ” ( गलीचा कुत्रा होऊन फिरू दे . मी कशाला साळंत घालतुया ? रांडं , त्याला काय उरसांड करायचाय व्हय ? त्याला शाळेत घालून मास्तर करीन. हापिसर करीन . तू कोण ?) आणि असंच …

माझा मार चुकला होता . पण आईच्या अंगावरचे वळ बघून कळवळलो होतो . झक मारली आनि साळंतनं पळालो, असं वाटलं . मनात एकच इचार , आता साळंतनं पळायचं नाही . बा म्हणतोय , मास्तर करीन ! आपून शिकायचं . साळंत जायचं.

रात्री बराच उशीर . तीन दगडांची चूल ढणढणत होती . बाप आईच्या अंगाला हाळद लावीत व्हता . समी, मी, पुष्पी, लाली, किसन्या झोपलो व्हतो . आई जेवली नव्हती . सकाळी तिनं कोरभर भाकर खाल्ली होती . मला झोप येत नव्हती . आई, बा बोलत नव्हते . गप बसून काम करीत होते . मार खाल्ला होता , तरी आई चिरून देत होती . बा कणगीला कट घालीत होता . बरीच रात झाली , तरी असं चालू होतं . मला झोप लागली , असं वाटून बा आईजवळ गेला .

” अनावरी, लाव तगलच हाई. आया आव केचीकिनु तर आवनादच नला आगर परमीसर आवनक मास्तर शय्यीर . ” ( अनसूये, तुला लई लागलं व्हय ग. त्यो शिकला तर त्याचं परमिसर चांगलं करील . त्याला मास्तर करील)

म्हणत बा तिच्या डोक्यावरनं, अंगावरच्या वळावरनं हात फिरवत होता . मी झोपेचं सोंग घेऊन पडलो होतो .

क्रमशः
स्रोत:(लक्ष्मण मानेंच्या उपरा पुस्तकातुन)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading