दिनांक ११ जुलै २०२४,श्रीगोंदा:
सर्वधर्मसमभावाचा, माणसाच्या कल्याणाचा विचार संत शेख महंमद महाराजांच्या या भूमीने मला दिला. श्रीगोंदाच्या भूमीमुळेच मी घडलो, अशी कृतज्ञतेची भावना कुलगुरू डॉ. ज्ञानदेव म्हस्के यांनी व्यक्त केली. ते महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात श्रीगोंदा तालुका सर्व रयत शैक्षणिक संकुलाच्यावतीने आयोजित केलेल्या भव्य नागरी सत्कार समारंभात बोलत होते. कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ, सातारा येथे त्यांची कुलगुरूपदी निवड झाल्याबद्दल हा सत्कार समारंभ आयोजित केला होता.
पुढे कुलगुरू डॉ. ज्ञानदेव म्हस्के म्हणाले की, नवीन शैक्षणिक धोरणाला सामोरे जाताना विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे. ज्ञान विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर मानवी कल्याणासाठी झाला पाहिजे, असे विचार त्यांनी व्यक्त केले. अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेचे माजी मॅनेजिंग कौन्सिल सदस्य बाबासाहेब भोस होते. ते म्हणाले की, शेतकऱ्याचा मुलगा कुलगुरू झाल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. कुलगुरूच्या भावी वाटचालीसाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या.
परिक्रमा शैक्षणिक संकुलाचे सचिव विक्रमसिंह पाचपुते म्हणाले की, डॉ. ज्ञानदेव म्हस्के हे ज्ञानसंपन्न व्यक्तिमत्व आहे. उत्तम वाचक आहेत. असे सांगून कुलगुरू पदाच्या भावी वाटचालीसाठी त्यांनी हार्दिक शुभेच्छा दिल्या. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. महादेव जरे यांनी केले. बाळासाहेब नाहाटा, रंगनाथ कळमकर, नायब तहसीलदार पंकज नेवसे, प्राचार्य डॉ. सतीशचंद्र सूर्यवंशी, कुंडलिकराव दरेकर, राजेंद्र म्हस्के, विभागीय अधिकारी नवनाथ बोडखे इत्यादींनी यावेळी मनोगत व्यक्त केले.
या समारंभाला सुभाषशेठ गांधी, बाजीराव कोरडे, डॉ. एस. पी. लवांडे, प्रा. बाळासाहेब बळे, आरिफभाई शेख, सुवर्णाताई पाचपुते, तुषार खामकर, डॉ. ज्ञानदेव भोसले, वसंत दरेकर, इत्यादी उपस्थित होते. रयत संकुलाचे शिक्षक, शिक्षणप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. शरद साळवे यांनी केले. आभार प्राचार्य दिलीप भुजबळ यांनी मानले.
स्रोत:(प्रसिद्धी पत्र)






