वागंदरीचे स्फूर्तीदायी विद्यालय..

ज्ञानदिप ग्रामीण विकास शिक्षण संस्थेचे श्री शिवाजीराव नारायणराव नागवडे विद्यालयाची स्थापना जून १९८८ साली वांगदरीसारख्या एका छोट्याशा गावामध्ये झाली. तालुक्याचे भाग्यविधाते सहकारमहर्षी दिवंगत शिवाजीराव बापू नागवडे यांनी गावातील सर्वसामान्यांची गरीब, कष्टकरी अन भटक्या विमुक्त जाती जमातीतील लोकांच्या दारांपर्यत ज्ञानाची गंगा नेण्यासाठी व सामान्यांचे घर ज्ञानाच्या प्रकाशाने उजळण्याच्या हेतूने विद्यालयाची स्थापना केली.

वागंदरी गावात विविध जाती – जमातीचे जवळपास साडेचार हजार लोक राहतात. घोडनदीतीरावर वसलेले हे टुमदार गाव. पुरातन काळातील प्रसिध्द अंबिका मातेचे मंदिर गावात आहे. शेतीसाठी पाटपाणी असल्याने गावातील लोकांचा शेती हा प्रमुख व्यवसाय . सुरुवातीच्या काळात शिक्षणासाठी अडचणी होत्या . मात्र शिवाजीबापू नागवडे यांच्या उदात्त ध्येयाने गावात १ ९ ८८ साली ज्ञानमंदिर उभे राहिले. या शाळेत सुरुवातीला ३३ मुले आणि ५ मुली असा एकूण ३८ विद्यार्थ्याचा पट होता. परंतु मुलींना शिक्षणात आणण्यासाठी ग्रामस्थ, मुख्याध्यापकांनी अथक परिश्रम घेतले. अखंड परिश्रम करुन मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणले. त्याचाच परिणाम आज सकारात्मकरित्या दिसून येत आहे. आज शाळेमध्ये तब्बल २८२ मुले अन २४२ मुली शिक्षण घेत आहेत. असा एकूण ५२४ विद्यार्थी शाळेत शिक्षण घेत आहेत.

विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासासाठी शाळेत विविध उपक्रम राबविले जातात. शाळा नियमितपणे दररोज एक तास अगोदर सुरु होते. या आधीच्या एक तासामध्ये विद्यार्थ्यांकडून अभ्यास करून घेतला जातो. यामध्ये स्पर्धा परिक्षेची विशेष तयारी करून घेतली जाते. तसेच नवोदय परिक्षा, शिष्यवृत्ती परीक्षा, राष्ट्रभाषा याशिवाय अन्य परिक्षांचा अभ्यास करून घेतला जातो. राष्ट्रीय स्तरावरील चित्रकला परिक्षा, निबंध स्पर्धा, जयंती, पुण्यतिथी, वक्तृत्व स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रमाचेही वेळोवेळी आयोजन केले जाते. रांगोळी स्पर्धा, वृक्षारोपण, क्षेत्रभेट, पालक मेळावा आयोजित केला जातो. विद्यार्थ्यांची बौध्दिक पातळी उंचावण्यासाठी शिक्षणाची आवड निर्माण होण्यासाठी आणि मनोरंजात्नक शिक्षणासाठी विविध सुविधांचा वापर केला जातो. या शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगणीण विकासासाठी सर्व सुविधा उभ्या करण्यात आल्या आहेत.

प्रशस्त व स्वच्छ इमारत लगेच लक्ष वेधून घेते. अभ्यासासाठी मैदानाच्या भोवती हिरवीगार भरपूर झाडी. डिजिटल शिक्षण पध्दतीमुळे विद्यार्थ्यांमधये मोठ्या प्रमाणात शिक्षणाची आवड निर्माण झाली. याशिवाय अन्य सुविधाही मोठ्या प्रमाणात उभ्या करण्यात आल्या. याच शाळेतून शिक्षण घेतलेले विद्यार्थी आज मोठमोठ्या पदावर कार्यरत आहेत. इंजिनिअर, डॉक्टर, वकील, प्राध्यापक तसेच शासकिय सेवेत काम करत आहेत. या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून शाळेचे नाव दूरपर्यंत पोहोचले आहे. गणेश पारखे या विद्यार्थ्यांने धावण्याच्या स्पर्धेत राष्ट्रीय पातळीवर यश मिळविले. विद्यालयाच्या जडणघडणीमध्ये आजपर्यंत अनेकांचे योगदान लाभले अन आजही लाभत आहे.

प्रामुख्याने सरपंच विठ्ठलराव नागवडे, संस्थेचे सचिव राजेंद्र नागवडे, जिल्हा परिषद अहमदनगरच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती अनुराधा नागवडे यांच्यासह गावातील सर्व आजी – माजी पदाधिकारी यांचे योगदान लाभत आहे . येत्या काही दिवसांमध्ये शाळेत नवीन उपक्रम राबविले जाणार आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने शाळेसाठी आणखी एक नवीन इमारत उभी करणे. परिसरातील शालाबाह्य विद्यार्थ्यांचा सहभागघेऊन त्यांना मुख्य प्रवाहात आणणे. राष्ट्रीय पातळीवर खेळाडूंची संख्या वाढावी म्हणून सुसज्ज व सुविधायुक्त मैदान तयार करणे. सर्व वर्ग डिजिटल करणे. संस्था सहविचार सभेसाठी प्रशस्त कॉन्फरन्स हॉल उभा करणे. यासह अनेक नवनवीन उपक्रम शाळेच्या माध्यमातून उभे करण्याचा मानस आहे .

शब्दांकन: समीरण नागवडे, प्रभात प्रतिनिधी, श्रीगोंदा

विद्यार्थ्यांचा व विद्यालयाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी शाळेचे सर्व शिक्षक अहोरात्र परिश्रम घेत आहेत. ग्रामीम भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्यासाठी बापूंनी घेतलेला समाजसेवेचा वारसा पुढे चालवत आहोत. यासाठी शाळेचे सर्व कर्मचारी परिश्रम घेत आहेत. बी.के.लगड,मुख्याध्यापक

(प्रस्तुत माहिती पुस्तक प्रकाशित झालेल्या वेळेची आहे)

स्रोत:(अग्नीपंख फौंडेशन)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading