दिनांक ४ जून,श्रीगोंदा:
कुकडी डाव्या कालव्याचे उन्हाळी हंगाम आवर्तन क्रमांक एक दिनांक १३ मार्च ते २५ एप्रिल २०२० अखेर ४२ दिवस चालले. या ४२ दिवसांत येडगाव पासून १६५ किलोमीटर पर्यंत १२०० द.ल.घ.फूट पाण्याचा अपव्यय झालेला आहे. याचा हिशोब जलसंपदा विभागाने दिला पाहिजे. ज्या नेत्यांना शेतकऱ्यांचा मनोमन कळवळा आहे. अशा सर्वपक्षीय नेत्यांनी हा हिशोब घेण्यासाठी एकत्र आले पाहिजे. असे प्रतिपादन कुकडी कालवा कृती समितीचे निमंत्रक प्रा. तुकाराम दरेकर यांनी केले आहे.
प्रा.दरेकर म्हणाले की, जलसंपदा विभागाने दि. १८ मे २०१८ रोजी येडगाव धरणातून १४०० क्यूसेक्सने सोडलेले पाणी श्रीगोंद्याच्या ११० किलोमीटरला १०८२ क्यूसेक्सने दिलेले आहे. आता हे पाणी फक्त ९५० क्यूसेक्सने मिळत आहे. म्हणजे दररोज १३२ क्यूसेक्स प्रमाणे ४२ दिवसांत ५५४४ क्युसेक्स म्हणजे ४८० दशलक्ष घनफूट पाणी नेमके कुठे गेले ? याचा हिशोब जलसंपदा विभागाने द्यावा. याचा उघड अर्थ असा आहे की, हे पाणी येडगाव ते किलोमीटर ११० पर्यंत कोणीतरी वापरलेले आहे. असे अनधिकृत पाणी जलसंपदा विभागाने का वापरून दिले ?याची चौकशी झाली पाहिजे.
किलोमीटर ११० ला १०८२ क्यूसेक्सने पाणी मिळाले असते.तर, कि.मी. १६५ ला त्यातून २२० क्यूसेक्सचा अपव्यय वजा जाता म्हणजे, कर्जत तालुक्याच्या हद्दीवर हे पाणी ८६० क्यूसेक्सने यावयास हवे होते. परंतु, कर्जत हद्दीपासून हा कालवा ६५० क्यूसेक्सने चालतो. म्हणजे ११० ते १६५ कि.मीटर मध्ये दररोज २१० क्युसेक्स प्रमाणे ४२ दिवसात ८८२० क्यूसेक्स म्हणजेच ७६२ द.ल.घ.फूट पाण्याचा अपव्यय होतो.
एकंदरीत येडगाव ते कर्जत हद्दीपर्यंत (पिरापर्यंत) १२४२ म्हणजे सुमारे १२०० द.ल.घ.फूट पाण्याचा अपव्यय होतो.तर, ११० ते १६५ किलोमीटर मध्ये होणारा अपव्यय श्रीगोंदा तालुक्याच्या माथी मारला जातो.
मार्च- एप्रिल २०२० च्या आवर्तनामध्ये श्रीगोंदे तालुक्याला प्रत्यक्ष ६६४ द.ल.घ.फूट पाणी मिळाले असताना, कागदोपत्री सुमारे ११०० द.ल.घ.फूट पाणी दिल्याचे अहवाल जलसंपदा विभागाने जलसंपदा मंत्र्यांना देऊन, त्यांचीही दिशाभूल केलेली आहे. म्हणून, येडगाव ते पिरापर्यंत अपव्यय होणाऱ्या १२०० द.ल.घ.फूट पाण्याचा हिशोब कोणतीही बोटचेपी भूमिका न घेता, सर्वपक्षीय नेत्यांनी मागितला पाहिजे. अशी मागणी प्रा. दरेकर यांनी केली आहे.
