दिनांक १ जुलै २०२४,श्रीगोंदा:
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ योजनेत तालुक्यातील सर्व महिलांनी सहभागी होऊन योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र नागवडे आणि महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा अनुराधा नागवडे यांनी केले आहे.
श्रीगोंद्यात आयोजित पत्रकार परिषदेत नागवडे म्हणाले की, महायुती सरकारने महिलांबाबत ऐतिहासिक निर्णय घेतले असून, या योजनेअंतर्गत महिलांना विविध लाभ दिले जातील. मुलींच्या शिक्षणाचा सर्व खर्च सरकार उचलणार असून, महिलांना दरमहा १५०० रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल. तसेच, दुधाला प्रतिलिटर ५ रुपये अनुदान आणि पांडुरंगाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या दिंड्यांना प्रत्येकी २० हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे. श्रीगोंदे विधानसभा मतदारसंघातून जाणाऱ्या दिंड्यांना नागवडे कारखान्याच्या माध्यमातून ५ हजार रुपयांची रोख मदत केली जाणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नाहाटा म्हणाले की, ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ योजनेसाठी ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असेल, त्यांनाच या योजनेचा लाभ मिळेल. अडीच ते तीन कोटींचा कर भरणाऱ्या महिलांना या योजनेचा कसलाच लाभ मिळणार नाही.
महिला आघाडी तालुकाध्यक्ष माधुरी नागवडे, युवक तालुकाध्यक्ष विक्रम पाचपुते, विद्यार्थी युवक तालुकाध्यक्ष भारत गिरमकर आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते.

महिलांनी आपली कागदपत्रे घेऊन शहरातील सोनिया गांधी पॉलिटेक्निक किंवा इंदिरा गांधी पॉलिटेक्निक येथे जाऊन योजनेसाठी अर्ज भरावा. येथील कर्मचाऱ्यांमार्फत त्यांचे अर्ज ऑनलाईन मोफत भरले जातील, असेही नागवडे यांनी स्पष्ट केले.
स्रोत:(पत्रकार परिषद)




