चारचाकी वाहन असलेल्या महिलां ‘लाडकी बहीण योजना’ लाभातून वंचित.!

दिनांक ४ फेब्रुवारी २०२५, मुंबई:

राज्य सरकारने ‘लाडकी बहीण योजना’साठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आता या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रतेचे निकष अधिक कडक करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे ज्या महिलांकडे चारचाकी वाहन असेल, त्यांचे अर्ज थेट बाद करण्यात येणार आहेत.

महिला व बालकल्याण विभागाने या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी विशेष पडताळणी मोहीम सुरू केली आहे. अंगणवाडी सेविका आणि पर्यवेक्षिका महिलांच्या घरी जाऊन पडताळणी करतील. जर चारचाकी वाहन असल्याचे आढळले तर संबंधित महिलांना योजनेचा लाभ मिळणार नाही.

महिला व बालकल्याण विभागाचे सचिव डॉ. अनुप कुमार यादव यांनी सोमवारी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी परिवहन विभागाकडून वाहनधारकांची यादी घेऊन जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवण्याचे निर्देश दिले. त्यामुळे चारचाकी वाहन असलेल्या महिलांची माहिती सहज उपलब्ध होणार आहे.

‘लाडकी बहीण योजना’चा लाभ घेण्यासाठी पुढील अटी लागू करण्यात आल्या आहेत:

  • वय 21 ते 65 वर्षे दरम्यान असावे.
  • कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी नोकरीत नसावा.
  • वार्षिक उत्पन्न २.५ लाख रुपयांपेक्षा कमी असावे.
  • कुटुंबात चारचाकी वाहन नसावे.
  • कोणत्याही इतर शासकीय योजनेचा लाभ घेतलेला नसावा.

पडताळणीची अंमलबजावणी मंगळवारपासून सुरू:

मंगळवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयांकडून प्राप्त झालेल्या यादीच्या आधारे अंगणवाडी सेविका व पर्यवेक्षिका पडताळणीचे काम सुरू करतील. चारचाकी वाहन असलेल्या महिलांची नावे शासनाला कळवली जाणार आहेत.

राज्य सरकारच्या या निर्णयामुळे लाडक्या बहिणींच्या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या महिलांचे टेन्शन वाढण्याची शक्यता आहे.

स्रोत:(ऑनलाईन वृत्त)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading