जिल्हा परिषदेचा निधी स्वतःच्या विकास कामासाठी वापरला… कोळगाव येथील सभेत निलेश लंके यांचे सुजय विखेंवर टीकास्त्र..

दिनांक १४ एप्रिल २०२४, कोळगाव, श्रीगोंदा:

मागील लोकसभेत सर्वात निष्क्रिय खासदार म्हणून, यांची दोन नंबरवर नोंद झाली.
गोरगरिबांचे कामे न करणारा खासदार, फक्त निवडणूक आल्यानंतर लोकांमध्ये मिसळणारा खासदार, कांदा निर्यात बंदी झालेली नसतानाही खोटी माहिती जनतेला देणारा खासदार, साकळाई योजना पूर्ण न झाल्यास फॉर्म भरणार नाही. अशी वल्गना करणारा खासदार, सर्वसामान्यांना भेटण्यासाठी मध्यस्थीची गरज लागणारा खासदार, अशी यांची ओळख असून, मागील खासदारांनी पाच वर्षात विकासाची कसलीही कामे या खासदारांनी केली नाही.

पालकमंत्र्यांचा निधी जिल्हा परिषदेमधून आपल्या नावावर वापरायचा व विकास कामे केल्याची आव आणायचा हा त्यांचा धंदा होता. असा घणाघात अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे संभाव्य उमेदवार निलेश लंके यांनी कोळगाव येथे झालेल्या स्वाभिमान जनसंवाद यात्रेच्या निमित्ताने केला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच विठ्ठल नलगे हे होते.

कोळगावमध्ये झालेल्या जनसंवाद यात्रेच्या कार्यक्रमात निलेश लंके म्हणाले की, पाच वर्षात मागील खासदारांनी कसलीही विकासाची कामे केली नाहीत. डाळ व साखर वाटप करणे.. रस चपाती खाऊ घालणे.. ही खासदारांची कामे आहेत का.? असं सवाल उपस्थित केला. त्यापेक्षा गरीब जनतेला कामे द्या. केंद्राच्या योजना आपल्या मतदारसंघांमध्ये राबविल्या तर, लोकं डोक्यावर घेतील. पण, यांनी मात्र, जनतेची दिशाभूल केली गावागावात संघर्ष निर्माण केला.

राजकीय दुश्मनी वाढविली. संसदेमध्ये मागील खासदारांनी एकही प्रश्न मांडला नाही. फक्त जनतेला एकच सांगत राहिले की ५०-६० वर्षापासून आम्ही राजकारणात आहोत. पण, एखादा तरी प्रोजेक्ट लोकांसाठी आणला आहे का.? शासकीय मेडिकल कॉलेज नगर जिल्ह्यात आणले आहे का.? नगरमधील सिविल हॉस्पिटल सुसज्ज बनवले नाही… कारण, त्यांनी विळद व प्रवरेचे रुग्णसंख्या कमी झाली असती म्हणून, त्याकडे दुर्लक्ष केले. असे आरोप लंके यांनी केले.

सध्याची लोकसभेची निवडणूक ही देशाची भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे. परंतु, यांनी शेतकरी हिताचा एकही निर्णय घेतला नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या, दूध, कांदा व इतर पिकांना बाजार भाव दिला नाही. स्वतःचे कारखाने उभे करून, संस्था उभ्या करून, सबसिडी घेण्यापेक्षा गोरगरिबांचे कामे करा.. असा सल्ला दिला. उद्धव ठाकरे व शरद पवार यांचे पक्ष हिसकावून घेतले, त्यांचे चिन्ह पळविले व जे संस्थापक आहेत त्यांनाच त्या पक्षापासून दूर केले. ही यांची राजनीती आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घटना आपल्यासाठी लिहिली.. परंतु, यांच्या काळात संविधान राहते की नाही..! ही शंका निर्माण झाली आहे. त्यासाठी लोकशाही जिवंत ठेवणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन केले. श्रीगोंदा तालुक्यामध्ये साकळाई योजनेचे गाजर दाखवले. त्यावेळेचे तत्कालीन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या साकळाई योजने संदर्भात १४ जानेवारी २०२० व १२ फेब्रुवारी २०२२ रोजी स्वतंत्र दोन मीटिंग घेऊन पाठपुरावा आपण स्वतः केला होता. त्यासाठी प्रत्यक्ष पत्रही दिले होते. या खासदारांनी फक्त शेतकऱ्यांना झुलवत ठेवले. पण, साकळाई उपसा जलसिंचन योजना निलेश लंकेच पूर्ण करेल.. असे आश्वासन दिले.

प्रत्येक तालुक्यात आपण एक एमआयडिसी उभा करणार असून, बेरोजगारी कमी करण्यावर भर देणार आहे. तसेच, औद्योगीकरणावर जोर देणार आहोत. सध्याच्या जनसंवाद यात्रेमध्ये लोक आपणास नोट भी और वोट भी देतात असे सांगितले. जनतेने आपणावर एकदा विश्वास टाकावा त्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही.. असे आवाहन लंके यांनी या निमित्ताने केले.

यावेळी कोळगाव मधील जनतेने निलेश लंके प्रतिष्ठानला १,११,१११/- रुपयांची थैली देणगी म्हणून दिली. या कार्यक्रमात बाळासाहेब लगड गुरुजी, प्रवीण खेतमाळीस, शिवाजी आढाव, राधाताई वाणी, हेमंत नलगे यांनी आपली मते व्यक्त केली.

या कार्यक्रमास माजी आमदार राहुल जगताप, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बाबासाहेब भोस, हेमंत नलगे, हरिदास शिर्के बाळासाहेब दुतारे, टिळक भोस, संतोष इथापे, शिवाजी आढाव, भगवान गोरखे, शहाजी भोसले, दत्तात्रेय डूबल, विनायक लगड, निवास नाईक, इथापे, प्रशांत दरेकर, मनोहर पोटे, विश्वास थोरात, मच्छिंद्र नलगे, सुभाष लगड, नितीन डुबल व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक कोळगाव सोसायटीचे चेअरमन हेमंत नलगे, यांनी तर, आभार प्रदर्शन नितीन डुबल यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन टिळक भोस यांनी केले.

खोटं बोल पण रेटून बोल’ ही यांची वृत्ती…

मागील खासदार व त्यांचे पिताश्री दिल्लीमध्ये अमित शहा यांना भेटले. ती चर्चा राजकीय स्वरूपाची होती. पण बाहेर आल्यानंतर त्यांनी सर्वांना सांगितले की, कांद्याची निर्यात बंदी उठवली. सगळीकडे बोर्ड, बॅनर लागले. सत्कार स्वीकारले व यांनी जाहीर केले निर्यात बंदी झाल्याशिवाय मते मागितली नसती. परंतु, संबंधित खात्याच्या सचिवांनीच जाहीरपणे सांगितले की, निर्यात बंदी उठवण्यात आली नाही. असाच प्रकार साकळाई योजनेबाबतही घडला. साकळाई योजना पूर्ण झाल्याशिवाय निवडणुकीचा फॉर्म भरणार नाही. आता त्यांनी आपला शब्द खरा करून दाखवावा.. असे आव्हान निलेश लंके यांनी दिले.

स्रोत:(पत्रकार महेश शिंदे)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading