निकृष्ट गतिरोधकांविरोधात संभाजी ब्रिगेड आक्रमक – तातडीने कारवाईची मागणी..

दिनांक २५ जुलै २०२५,श्रीगोंदा –

शहरातील विविध मुख्य रस्त्यांवर काही महिन्यांपूर्वी नगरपरिषदेमार्फत अपघात टाळण्यासाठी गतिरोधक (स्पीड ब्रेकर) बसविण्यात आले होते. मात्र, कमी दर्जामुळे हे गतिरोधक अवघ्या काही महिन्यांतच उखडले व फुटले असून, त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आहे आणि अपघातांचा धोका वाढला आहे.

या कामासाठी दोन वेळा निविदा मागवण्यात आल्या होत्या. मात्र, दर जास्त असल्याचे कारण देत त्या रद्द करण्यात आल्या. त्यानंतर ऑनलाइन पोर्टलद्वारे कमी दरात मंजूर करण्यात आलेल्या कामामध्ये दर्जाकडे पूर्णतः दुर्लक्ष करण्यात आले. परिणामी, सार्वजनिक निधी वाया गेला असून नागरिकांच्या सुरक्षेशी थट्टा झाली आहे, असा आरोप संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला आहे.

या पार्श्वभूमीवर संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष इंजि. शामभाऊ जरे यांनी नगरपरिषदेला दिलेल्या निवेदनाद्वारे मागणी केली की – संबंधित कंत्राटदारावर तात्काळ कारवाई करून त्याच्याकडून नुकसानभरपाई वसूल करण्यात यावी. तसेच सध्याचे निकृष्ट गतिरोधक तातडीने हटवून त्याजागी दर्जेदार गतिरोधक बसवावेत. भविष्यात अशा प्रकारच्या निकृष्ट कामांना आळा बसावा यासाठी प्रभावी निगराणी यंत्रणा स्थापन करण्यात यावी.

शहरवासीयांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अत्यंत गंभीर आहे, त्यामुळे संबंधित प्रशासनाने तातडीने याची दखल घ्यावी आणि ठोस उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणीही यावेळी करण्यात आली.

या निवेदनप्रसंगी संभाजी ब्रिगेडचे तालुका मुख्यसचिव सुयोग धस, कार्याध्यक्ष पंकज शिंदे, उपाध्यक्ष संदीप जगताप, संघटक संतोष आरडे (मेजर), सामाजिक न्याय आघाडीचे तालुकाध्यक्ष बापुराव शिंदे, सुनील रोही आदी पदाधिकारी उपस्थित होते.

स्रोत:(प्रसिद्धी पत्र)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading