विद्यार्थ्यांना वही-पेना बरोबर,शाळेला एक लाखांची मदत..

पुस्तक,कपडे,औषधापासून वंचितांना सढळ हाताने मदत करणाऱ्या वीरपत्नी शालन बाई कांबळे.

दिनांक २८ जानेवारी(घारगाव,श्रीगोंदा):
श्रीगोंदा तालुक्यातील घारगाव या आपल्या माहेरी राहत असलेल्या,शालन कांबळे यांच्या पतीला भारतीय सैन्यात असतांना,१९७१ साली झालेल्या भारत-पाक युद्धामध्ये वीरगती प्राप्त झाली. विवाहानंतर अवघ्या अकरा महिन्यांनी ही घटना
घडली.शालन बाईंवर दुःखाचा डोंगरच कोसळला . यानंतर काही दिवसांनी पाच महिन्यांची एकुलती एक मुलगी आजाराने वारली.जीवनातील सर्व काही संपल्यासारखे झाले.अतिशय खडतर आणि दुःखद प्रवास करीत आपल्या सासरसह माहेरकडील कोणत्याही भौतिक संपत्तीची आशा न बाळगता, आपला जीवन प्रवास करीत,भविष्य निर्वाह निधी तसेच पतीच्या मृत्यूनंतर शासनामार्फत निवृत्ती वेतनातून मिळणाऱ्या पैशातून शालन बाई आपला उदरनिर्वाह चालवित होत्या.
हे करतांना सामान्यांच्या मदतीला उतरने शाळांना, विद्यार्थ्यांना,आजारी व्यक्तींना आर्थिक सहाय्य करणे त्यांनी चालू ठेवले.अश्याच पद्धतीने शालन बाई कांबळे यांनी २६ जानेवारी २०२० या प्रजासत्ताक दिनी घारगाव मधील शिंदेवाडी जिल्हा परिषद शाळेला(मिळणाऱ्या पेन्शन)मधून एक लाख रुपयांची मदत केली आहे.
जि.प.प्राथ.शाळा शिंदेवाडी,घारगाव येथील शाळेत ७१ वा प्रजासत्ताक दिन सोहळा आगळावेगळा साजरा केला.वीरपत्नी शालन यादवराव कांबळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.१९७१ साली भारत पाकिस्तानच्या युद्धात वीरमरण प्राप्त होऊन,शहीद झालेले,यादवराव गणपत कांबळे यांच्या स्मरणार्थ त्यांच्या पत्नी शालन यादवराव कांबळे यांनी शाळेतील शिक्षकांचे कामकाज,उपक्रमशील शाळा,वृक्षसंवर्धन डिजिटल,स्वच्छ – सुंदर शाळा व शिक्षकांच्या धडपडीमुळे एक लाख रुपयांची देणगी दिली आहे.
सदर शाळेने केंद्र पातळीवर सांस्कृतिक स्पर्धेत दहावा क्रमांक,विभागीय पातळीवर पाचवा क्रमांक,तालुका पातळीवर दुसरा क्रमांक व जिल्हा पातळीवर स्पर्धेसाठी वाटचाल चालू आहे.
सदर कार्यक्रमात मुलांना जिलेबी,केळी,बिस्किटे,केक चॉकलेट चे वाटप करण्यात आले.यावेळी गावच्या सरपंच सौ.अरुणाताई खोमणे यांच्या हस्ते वीरपत्नी चा सत्कार करण्यात आला.ग्रामपंचायत सदस्य माजी सरपंच अप्पासाहेब शिंदे,पंचायत समिती शिक्षण अधिकारी कलगुंडे,ग्रामस्थ,पालक,महिलां या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.
सदर कार्यक्रमास(व्यवस्थापन समिती अध्यक्ष)विजय शिंदे व उपाध्यक्ष सौ.रोहिणी शिंदे सह सर्व सदस्य सौ. नीलम शिंदे,वर्षारानी शिंदे,पूजा शिंदे,मंगल शिंदे, सोमनाथ शिंदे,सोमेश शिंदे,(माजी उपसरपंच)गोरख शिंदे,ग्रामस्थ,महिला,पालक पदाधिकारी,काळे सर (अध्यक्ष)रामनाथ खामकर,(केंद्रप्रमुख)बापुराव खामकर सर इत्यादी मान्यवर बहुसंख्येने उपस्थित होते.
शाळेचे मुख्याध्यापक संजय रायकर व सोनाली रणदिवे मॅडम यांनी प्राथमिक शाळा शिंदेवाडी या शाळेचा विशेष कायापालट केल्याने वीरपत्नी कांबळे यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले.


सैन्यात असलेल्या आपल्या पतींना वीरगती प्राप्त झाल्यानंतर तत्कालीन राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्या हस्ते शालन बाईंचा वीरपत्नी म्हणून गौरव करण्यात आला होता.शासनाकडून मिळणाऱ्या मानधनातून शालन बाई या ज्यांना पुस्तक, कपडे, औषधोपचारासाठी पैशांची गरज आहे. अशा उपेक्षितांना सढळ हाताने मदत करतात. याविषयी त्यांचा पंचक्रोशीत चांगलाच गवगवा आहे. शाळा हे राष्ट्र निर्मितीचे केंद्र असल्याने शाळांना मदत करणे हे आपले कर्तव्य असल्याचे त्या सांगतात. खडतर व दुःखद प्रवास करून आयुष्याचे मार्गक्रमण केलेल्या शालन बाई कांबळे यांनी जिल्हा परिषद शाळेला श्रीमंत मनाने केलेल्या मदतीमुळे त्यांचे परिसरात मोठे कौतुक केले जात आहे.कोणत्याही मोठेपणाची किंवा प्रचाराची अपेक्षा न बाळगता सामान्यपणे जीवन व्यतीत करीत असामान्य काम करणारे आपल्या आसपासच असतात.यापैकी शालन कांबळे ह्या एक दानशूर व्यक्तिमत्व म्हणून,या ठिकाणी नमूद होत आहेत.


Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading