दिनांक ३ मार्च २०२५, श्रीगोंदा:
राज्यातील बालकांचे सर्वांगीण आरोग्य सुदृढ राहावे यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने “राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम विशेष मोहीम 2025” राज्यभरात राबविण्यात येत आहे. सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या सूचनेनुसार या मोहिमेचा शुभारंभ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सकाळी ८.३० वाजता पुणे येथे करण्यात आला. या वेळी आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

या अभियानांतर्गत ० ते १८ वर्षे वयोगटातील बालकांची आरोग्य तपासणी करून आवश्यक त्या उपचाराची सोय केली जाणार आहे. ही मोहीम सार्वजनिक आरोग्य विभाग, एकात्मिक बाल विकास विभाग, शिक्षण विभाग, आदिवासी विकास विभाग आणि नगरविकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राबवली जात आहे.

श्रीगोंदा येथे ज्ञानदीप विद्यालयात मोहिमेचा शुभारंभ..
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम विशेष मोहिमेच्या अनुषंगाने आज श्रीगोंदा माध्यमिक विद्यालय (ज्ञानदीप स्कूल) येथे विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामीण रुग्णालय, श्रीगोंदा येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ. आकाश कोकरे आणि विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. आनंदकर सर उपस्थित होते. त्यांच्यासह विद्यालयातील प्राध्यापक वर्ग, आरोग्य विभागाचे अधिकारी, तसेच विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

या शिबिराचे आयोजन ग्रामीण रुग्णालय श्रीगोंदा व RBSK पथक श्रीगोंदा यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. अभिजीत तीवाटणे यांच्या प्रस्तावनेने झाली. यानंतर वैद्यकीय अधीक्षक डॉ. कोकरे यांनी मुख्याध्यापक आनंदकर सर यांचा सत्कार केला, तसेच आरोग्य विभागाच्या निरीक्षक सौ. खेतमाळीस मॅडम यांचाही विशेष सत्कार करण्यात आला.

शिबिरात विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी व उपचार
या मोहिमेअंतर्गत विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. या वेळी विविध आरोग्य तज्ज्ञांनी विद्यार्थ्यांच्या आरोग्यविषयक समस्या तपासून त्यांच्यासाठी आवश्यक त्या सल्ल्यांची व औषधोपचारांची व्यवस्था केली. या शिबिरासाठी गट शिक्षण अधिकारी श्री. सत्यजीत मच्छिंद्र, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. डांगे मॅडम यांनी विशेष मार्गदर्शन केले.

या विशेष मोहिमेच्या यशस्वी आयोजनासाठी वैद्यकीय अधीक्षक डॉ. कोकरे, नोडल अधिकारी डॉ. काळे, डॉ. तीवाटणे, डॉ. आनंदकर, डॉ. पाबळे, डॉ. निमसे, डॉ. कोंढापुरे, तसेच सर्व RBSK फार्मासिस्ट आणि परिचारिका यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे आभार फार्मासिस्ट श्री. अमित हिरणवाळे यांनी मानले.
स्रोत:(प्रसिद्धी पत्र)
