श्रीगोंद्यात अतिक्रमण हटवण्याची मोहिम; किरकोळ अतिक्रमणांवर कारवाई, मोठी अतिक्रमणे जैसे थे..! २८ तारखेची मुदतही संपली.. मोठ्या अतिक्रमणधारकांना न्यायालयाचा आधार.? सामान्यांवरच प्रशासनाचा हातोडा..? प्रशासन मुग गिळून गप्प का..?

दिनांक ४ मार्च २०२५, श्रीगोंदा:

शहरातील अतिक्रमण हटवण्याच्या मोहिमेत प्रशासनाने किरकोळ टपऱ्या, फ्लेक्स आणि होर्डिंगवर कारवाई केली असली तरी मोठ्या आणि पक्क्या अतिक्रमणांकडे प्रशासन डोळेझाक करत असल्याचा आरोप नागरिकांमधून होत आहे.

राष्ट्रीय महामार्ग प्रशासन आणि स्थानिक नगरपालिका प्रशासन यांच्या संयुक्तिक कारवाईअंतर्गत जामखेड-दौंड रोड तसेच शहरातील शनि चौक ते जोधपूर मारुती चौक आणि जोधपूर मारुती चौक ते मांडवगण रोड लगतच्या अतिक्रमण धारकांना काही दिवसांपूर्वी नोटिसा देण्यात आल्या होत्या. या नोटिसांनुसार, २८ फेब्रुवारी ही अंतिम मुदत देण्यात आली होती, त्यानंतर कारवाई होणार असल्याचे प्रशासनाने जाहीर केले होते.

सामान्यांवरच प्रशासनाचा हातोडा?

प्रशासनाने सुरू केलेल्या मोहिमेत पहिल्या टप्प्यात लहान टपऱ्या आणि अनधिकृत फ्लेक्स काढण्यात आले. दुसऱ्या दिवशी, अनेक स्थानिक व्यापाऱ्यांनी प्रशासनाच्या सूचनांप्रमाणे स्वतःहून अतिक्रमण हटवले. मात्र, लक्षवेधी बाब म्हणजे मोठ्या इमारतींनी रस्त्यावर केलेली अतिक्रमणे मात्र जैसे थे राहिली. यामुळे ही कारवाई केवळ सर्वसामान्य व गरीब कष्टकरी लोकांवरच होत आहे क.? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, काही मोठ्या व्यापाऱ्यांनी आणि इमारत मालकांनी न्यायालयात धाव घेतली असून, त्यांना तात्पुरती स्थगिती मिळाल्याचे समजते. त्यामुळे प्रशासन मोठ्या अतिक्रमणांवर कारवाई करण्यास असमर्थ ठरल्याचे चित्र आहे. स्थानिक नागरिकांमध्ये याविषयी नाराजी असून प्रशासनाने समान न्याय द्यावा, अशी मागणी होत आहे.

या संपूर्ण कारवाईबाबत अधिकृत माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता, श्रीगोंदा नगरपालिका प्रशासन प्रमुख पुष्पगंधा भगत मॅडम आणि राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाचे अधिकारी यांच्याशी संपर्क साधता आला नाही. त्यामुळे पुढील कारवाईबाबत स्पष्टता मिळू शकलेली नाही.

शहरातील अतिक्रमण हटवण्याची मोहिम केवळ सामान्य नागरिकांवरच होणार का ..? की, मोठ्या व्यापाऱ्यांवरही समान कारवाई होईल, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

स्रोत:(अधिकृत माहिती)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading