#श्रीगोंदा.. नगरपालिकेतील अधिकाऱ्यांनी मोठ्या आर्थिक तडजोडी करून पाळण्यांना मुकसंमती दिल्याचा आरोप..!

दिनांक १२ मार्च २०२५, श्रीगोंदा:

संत शेख महंमद बाबा यात्रेत परवानगीविना उभारण्यात आलेल्या भव्य पाळण्यांमुळे मोठी अनागोंदी निर्माण झाली असून, श्रीगोंदा नगरपालिकेतील अधिकाऱ्यांनी मोठ्या आर्थिक तडजोडीतून हे सर्व घडवून आणल्याची चर्चा शहरभर आहे. विनापरवाना चालवलेल्या या पाळण्यांमधून लाखोंची कमाई झाली असून, त्यासाठी कायद्याचे सर्व निकष बाजूला सारण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.

नगरपालिकेच्या मुख्याधिकारी पुष्पगंधा भगत, तसेच संबंधित विभागप्रमुख बोरुडे आणि कनोजे यांनी का आणि कोणत्या हेतूने या अनधिकृत पाळण्यांना परवानगी दिली? असा सवाल केला जात आहे. श्रीगोंदा तहसीलदार क्षितिजा वाघमारे यांनी यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी आदेश दिले होते आणि पोलिस प्रशासनही कारवाईसाठी सज्ज होते. मात्र, मुख्याधिकारी भगत यांनी कारवाईस टाळाटाळ का केली? या प्रश्नाने आता उहापोह सुरू झाला आहे.

यात्रेसाठी २८ लाख रुपयांचा भाडेकरार करण्यात आला होता. या रकमेची वसुली करण्याच्या उद्देशाने विनापरवाना पाळण्यांना परवानगी देण्यात आली का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. दोन दिवस चाललेल्या अनधिकृत पाळण्यांमधून लाखोंचा महसूल उभा राहिला. विशेष म्हणजे, केवळ पाळण्यांवरच नव्हे तर लहान दुकानदार, फेरीवाले, पाणीपुरीवाले, फुगे विक्रेते, छोटे व्यवसायिक यांच्याकडूनही मोठ्या प्रमाणात अवैध वसुली करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

श्रीगोंदा शहरातील आणि तालुक्यातील नागरिक, तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आंदोलनानंतर तहसीलदार वाघमारे यांनी काही महत्त्वाच्या मागण्या पूर्ण करून यात्रेतील अनागोंदी थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र यातील अनेक महत्त्वाच्या बाबींची पूर्तता झाली नाही.

लोकांच्या सुरक्षेचा विचार न करता अनधिकृत लोखंडी संरचना असलेले भव्य पाळणे चालू ठेवण्याचा अट्टाहास नक्की कोणाच्या फायद्यासाठी केला गेला? नगरपालिकेतील अधिकाऱ्यांनी मोठ्या आर्थिक तडजोडी करून पाळण्यांना मुकसंमती दिल्याचा आरोप होत आहे.

सखोल चौकशीची मागणी

या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांसह नागरिकांकडून होत आहे. श्रीगोंदा तालुक्यात प्रशासन आणि नगरपालिकेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, पुढील कारवाई साठी सामाजिक कार्यकर्ते सरसावले आहेत..

स्रोत: (अधिकृत चर्चा)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading