अण्णाभाऊ साठे हे क्रांतिकारी साहित्यिक – डॉ. बळे..

दिनांक ३ऑगस्ट २०२४, श्रीगोंदा:

अण्णाभाऊ साठे हे जातीच्या अन्यायाची जाणीव करून देणे आणि त्याविरोधात लढण्यासाठी उद्युक्त करणे हेच त्यांच्या साहित्याचे उद्दिष्ट होते, असे प्रतिपादन डॉ. बाळासाहेब बळे यांनी केले. ते श्रीगोंदा येथील राहुल विद्यार्थी वसतिगृहात आयोजित करण्यात आलेल्या अण्णाभाऊ साठे जयंती कार्यक्रमात बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाजसेवक दादासाहेब शिरवाळे होते. या कार्यक्रमात विनायक ससाने सर आणि पत्रकार मुस्ताक पठाण यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

डॉ. बळे पुढे म्हणाले की, अण्णाभाऊंच्या साहित्याने महाराष्ट्रात घडवून आणलेल्या परिवर्तनाविषयी जागर होणे गरजेचे आहे. प्रतिकाराचे दुसरे नाव संघर्ष होय आणि अण्णाभाऊ साठे यांचे संपूर्ण आयुष्य संघर्षात गेले आहे. वाटेगाव ते मॉस्कोपर्यंतचा प्रवास हा त्यांच्या संघर्षाचा पुरावाच होय.

अण्णाभाऊंचा जन्म ज्या वाटेगाव परिसरात झाला त्या भागात अनेक क्रांतिकारकांनी जन्म घेतला होता. एखाद्या विचारप्रणालीचा स्वीकार हा बहुधा त्या व्यक्तीच्या पार्श्वभूमीवर अवलंबून असतो. अण्णाभाऊंना भाकरीचा प्रश्न महत्त्वाचा वाटला आणि त्या प्रश्नाच्या अनुषंगाने येणाऱ्या कामाचे महत्त्व सांगणाऱ्या मार्क्सवादी तत्त्वज्ञानाचा परिचय त्यांना झाला. त्यामुळे त्यांना जात जाणिवेबरोबरच वर्गजाणीवही होऊ लागली.

डॉ. बळे यांनी असेही सांगितले की, अण्णाभाऊंच्या अनेक कथा आणि कादंबऱ्यांवर चित्रपटाची निर्मिती झाली आहे. असा एक बहुआयामी साहित्यिक महाराष्ट्राला मिळणे हे महाराष्ट्राचे भाग्यच होय. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सतीश ओहोळ यांनी केले तर आभार प्रसाद भैलुमे यांनी मानले.

स्रोत:(प्रसिद्धी पत्र)

जाहिरात..

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading