बलुतं.दया पवार.(भाग १०)

बलुतं..

मास्तर ब्राह्मणच होते . एका पायानं लंगडे , धुवट रंगाची पांढरी कापडं वापरीत . डोक्यावर गांधीटोपी . त्यांच्या जवळ गेलं , की दुधा – तुपासारखा वास यायचा . चौथीपर्यंतच शाळा होती . पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग एकाच हॉलमध्ये भरत . शाळेला जाताना पाटी दप्तराबरोबर बसण्यासाठी आम्ही बारदाण्याचा तुकडा नेत असू, सुरुवातीचं चांगलं आठवतय . गावातल्या मराठ्यांच्या मुलांबरोबर एका रांगेत बसू दिलं जात नसे . कोन करून बसावं लागे . तहान लागलीच , तर शाळेत पाणी मिळायचं नाही . तडक महारवाड्यात यावं लागे . जवळच्या चांभारवाड्यातही पाणी मिळायचं नाही . आठवड्यातून एकदा शाळा मुलांनाच शेणानं सारवावी लागे . मुलांच्या पाळ्या असत . अर्थात ही कामं वरच्या वर्गातील मुलांच्या वाट्याला यायची . ब्राह्मण मास्तर वर्गात दुपारच्या चक्क झोपा काढीत . समोरच्या टेबलावर पाय ताणून वर्गात झोपणं हा मास्तरांचा परिपाठ . केव्हा केव्हा मास्तर आम्हाला समोरच्या बागेतून लिंबू , मोसंब्या चोरून आणण्यासाठी सांगत . ब्राह्मण मास्तर आमचा वर्गात बाट धरतात , असं कधी जाणवायचं नाही . पण घरी गेल्यावर मास्तर फारच चमत्कारिक वागत . सकाळी सोवळ्यात असत . यांचं किराणा मालाचं छोटंसं दुकान होतं . दुकानाला जाताना पैसे नसले , तरी चिपटमापट धान्य घेऊन गेलं की सामान मिळायचं . पण मास्तरांच्या घरी वाड्याच्या उंबऱ्याबाहेर पायरीवर उभं राहावं लागायचं . घरात मुळीच प्रवेश नसायचा . उबंऱ्यातून बोट लागणार नाही अशा प्रकारे माल दिला जायचा . शाळेतले मास्तर आणि घरचे मास्तर ह्यात खूपच अंतर वाटायचं . जणू काय , त्यांनी घरी आल्यावर खुंटीवरची जात जानव्यासारखी अंगात घातली आहे .

मी शहरातून आलो होतो . त्यामुळे माझ्याबरोबरच काही शहरी शब्द आलेले . माझ्या बोलण्यात जाता – येता ” सवूर ” हा शब्द यायचा . विशेषतः हुतूतू खेळताना ” थांब ” या अर्थानं मी तो वापरायचो . मराठ्यांच्या मुलांना ह्या शब्दाचा अर्थ कळायचा नाही . त्यांना ती धेडगुजरी भाषा वाटायची . तसं पाहिलं तर गावातल्या मुलांपेक्षा मी चांगली , शुद्ध मराठी बोलत होतो . आणि यामुळंच खरी माझी टवाळी व्हायची . मी हळुहळू त्यांच्यात खेळायचा बंद झालो . ह्या भाषेच्या प्रकरणावरून आठवलं . पुढं तालुक्याच्या शाळेतही ” म्हारड्याची भाषा ” म्हणून हिणवलं जायचं . वर्मी घाव लागावा तसं वाटायचं . मुलांशी तावातावान भांडायचो . आमचीच भाषा कशी शुद्ध , हे पटवून द्यायचो . माझ्या बोलण्यात “ नहीं आणि ” बजार ” हा शब्द हमखास यायचा . नही आणि बजार हे उर्दूतले अस्सल शब्द आहेत आणि असे अनेक शब्द मराठीत राजमान्यता पावलेत . तेव्हा माझ्या पाणी ह्या शब्दातील ‘ ण ‘ चा उच्चार बराच काळ जमत नव्हता . त्यामुळंही खूपच टवाळी व्हायची .

एक मात्र खरं , की दिवसेंदिवस पुस्तकी जगामुळं मी आमच्या वस्तीपासून जाणिवेच्या पातळीवरही दूर जाऊ लागलो . शिकल्या – सवरल्यामुळं एकीकडे जादा संवेदनाशील होत होतो . नको ते प्रश्न डोक्यात थैमान घालत होते . ‘ कोंडवाड्यात’त एका कवितेत तू लिहिलं आहेस : कशाला झाली पुस्तकांची ओळख ? बरा ओहळाचा गोटा गावची गुरं वळली असती असल्या इंगळ्या डसल्या नसत्या !

हे तर मला माझंच वर्णन वाटतं . ह्या इंगळ्यांमुळं , जीवनात जो थोडाफार निर्व्याज आनंद होता तोही नासून गेला . महारवाड्यातील माणसं तशी जनावरांसारखी जगत होती . त्यांच्या जीवनातही एक रंगेल तत्त्वज्ञान होतं . मला मात्र त्यांची घृणा वाटत चाललेली , आणि ज्यांचं जीवन मला आदर्श वाटत होतं ते मात्र मला सामावून घेण्यास राजी नव्हते . अशा चमत्कारिक कोंडीत मी सापडलो होतो .

कळू लागलेल्या वयापासून मी एकाकी होत चाललो . गावची मुलं खेळात तुच्छतेनं वागवायची आणि महारवाड्यातील मुलांचे खेळ आवडायचे नाहीत . त्यांच्याशी खेळण्यात मन रमायचं नाही . हातात येईल त्या पुस्तकात रमणं एवढाच आनंद राहिला . शाळेच्या समोरच ढग्या डोंगर होता . त्या काळात तो खूपच हिरवागार होता . आजच्यासारखा तो उघडाबोडका नव्हता . त्या डोंगरावर आई मोळ्या आणायला जायची . ह्या डोंगराच्या पलीकडे काय बरं असेल ? ह्याचं कोडं नेहमीच सतावायचं . ह्या डोंगराच्या घाटमाथ्यावर एक पोस्टमन दुपारी नियमित जायचा आणि संध्याकाळी तो पुन्हा उतरायचा . त्याचा तालुक्याच्या गावी जाण्याचा रस्ता हा आमचा शाळेवरून होता . ह्याच्या हाती खुळखुळ्याची काठी असायची . डोक्याला तांबडा पटका . खाकी कपडे . त्याचं येणं म्हणजे शाळेचं घड्याळच होतं . त्याच्या खुळखुळ्याच्या काठीनं आम्हाला ‘ शाळा सुटण्याची वेळ झाली ‘ याचा अंदाज यायचा . हा दररोज वर डोंगराच्या घाटमाथ्यावर कशाला जातो , हा प्रश्न बराच काळ मला पडलेला . पुढं केव्हा तरी हे कोडं सुटलं . पलीकडे कोतुळ हे , बाजारपेठेचं गाव . त्या भागाची डाक घेऊन हा यायचा . ह्या कड्यावरून घाटमाथ्यावर पाहोचला , म्हणजे दुसरा पोस्टमन कोतुळाच्या पोस्टाची डाक घेऊन तिथं आलेला असायचा . त्यांच्या डाकेची अदलाबदल व्हायची . रानातल्या जंगली जनावरांची भीती ह्यांना कशी बरं वाटत नाही , हा प्रश्न मला सतावायचा .

शाळेत बहुधा मुलं वाढली असावीत . एका शिक्षकाचे दोन शिक्षक झाले . नवीन मास्तर आले , ते महार होते . काळेसावळे , तोंडावर देवीचे वण असलेले . नेहरू – सदरा आणि पांढरा लेंगा वापरीत . छान भांग पाडीत . त्यांच्या डोक्यावर टोपी नसायची त्यांना गावात कुठं राहण्यास घरं मिळणं शक्य नव्हतं . ते आमच्याच पडवीत राहु लागले . मास्तराचं लग्न झालेलं नव्हतं . मास्तरांना कविता करायचा नाद होता . पण त्यांच्या कविता म्हणजे गीतं असत- डॉ . आंबेडकरांच्या चळवळीच्या संदर्भातील . डॉ . बाबासाहेबांच्या शहरातील चळवळीसंबंधी त्यांच्याकडूनच बरंच काही ऐकायला मिळालं . घरी मास्तर माझ्याशी खूप छान वागत , पण शाळेत मात्र खूपच डाफरत . मला गणित हवं तसं जमायचं नाही . एकदा – दोनदा त्यांच्या हातचा चांगलाच खरपूस मार खाल्लेला आठवतोय . त्यांचं गाव ढग्या डोंगराच्या पलीकडे होतं . त्यांचे वडील एकदा शेळी घेऊन येणार असतात . मास्तरांना ताजं दूध मिळावं , म्हणून वडिलांनी ही खास शेळी मास्तरांसाठी विकत घेतलेली . शेळी आणण्याकरिता एकदा मी त्यांच्याबरोबर ढग्या डोंगरावर गेलो होतो . डोंगराची नकटी पायरी चढताना जिवाचा थरकाप झाला होता . तिथून गाव चित्रातल्या आकृतीसारखं भासत होतं . माणसं , झाडं इवली इवली . तिथून डोंगराच्या पलीकडे असलेला अज्ञात प्रदेश प्रथमच पाहत होतो . मास्तर सांगत होते , ” दूरवर दिसतंय ना , ते कळसूबाईचं शिखर ! ” मुळा नदी एखाद्या चांदीच्या धारेसारखी चमकताना दिसत होती . आम्ही पलीकडे खाली उतरलेलोच नसतो . मास्तरांचे वडील तिकडून माथ्यापर्यंत शेळी घेऊन आलेले असतात .

मास्तर बायांच्या बाबतीत तसे खूपच चालू असतात . डोंगराच्या पलीकडच्या गावावरून दोन बाया नेहमी अंड्यांनी भरलेल्या पाट्या घेऊन यायच्या . त्या तो माल तालुक्याला पोहोचवीत असत . त्या दोन बायांशी मास्तरानं कसं काय संधान बांधलं , कुणास ठाऊक . बहुधा त्या शाळेच्या व्हरांड्यातच येता – जाता विश्रांती घ्यायच्या . शाळेची किल्ली मास्तरांजवळच असायची . एक दिवस सकाळी मी शाळेत जातो , तो तिथं कागद , दोरा , लाडूचा भुगा पडलेला . मला नको ती शंका येते . शाळा सुटल्यावर काय झालं असेल , याची कल्पना येते . चुलता तात्या हा मास्तरांचा दोस्त . दोघांची जिवाभावाची मैत्री . ते दोघे जाता – येता ह्या बायांची टवाळी करायचे . अशा प्रकरणाचा बभ्रा करू नये , याची मला कल्पना असावी . एवढे दिवस झाले , आजच हे सांगतोय .

हा प्रकार महारवाड्यात तसा काही नवा नव्हता . अनेक गोष्टी कानांवर यायच्या . टोपलीभर येसकरपाळीच्या भाकरी एखाद्या अडल्या – नडलेल्या बाईला दिल्या , तर ती लगेच वश व्हायची . चवथीच्या वर्गातली गोष्ट . मराठ्याची एक थोराड बांध्याची मुलगी वर्गात होती.

क्रमशः

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading