बलुत..
हि कविता मला माझ्या आयुष्याचा आरसा वाटते. माझा चेहरा असा हा गोठलेला. समुद्रात हिमखंड पोसला जातोय. त्याचं शिखर तेवढंच लोकांना दिसतं. त्यावरून समाजात अनेक तर्क – वितर्क. मी भोगलेला भूतकाळ तर, ह्या सागरात पोसलेल्या बर्फाच्या पहाडा एवढा. मला कळू लागल्यापासून हा माझ्याशीच हुलकावण्या देत आहे. तो पकडताना जिवाचा थरकाप होतो आहे. बराच काळ वरवर दिसणाऱ्या ह्या सुळक्यावरच मी भाळलो. अनेकदा शॉक दिलाय. आता हाती कुदळ घेऊन तो मी फोडावा, अशी तुझी इच्छा दिसतेय. तो फुटेल की नाही ह्याबाबत मी गोंधळात आहे. पण फोडताना माझी अवस्था पोतराजासारखी होणार आहे. तू पाहिलं असशील, पोतराज स्वतःच्याच उघड्या अंगावर आसुडाचे फटके ओढून घेतो. पायांतील चाळ वाजवीत फुगीर दंडात दाभण भोसकतो. रक्ताची चिळकांडी उडते. भोवताली जमलेला जमाव टाळ्या पिटतो. कुणी बिच्चारा ! ‘ म्हणून सुस्कारा सोडतो. तशी माझी अवस्था होणार…. आणि मी जर दयेचं पात्र झालो, तर … ? ” ” ह्यात तुझा काय दोष ? ” ” हे मला चांगलं कळतंय. बर्फाळ अशा टंड्रा प्रदेशात माझा जन्म झाला असता, तर माझ्या वाट्याला नेमका भूतकाळ आला, तसा आला असता काय ? तिथंही दुःख असेल, पण त्या दुःखाची प्रत वेगळी असेल. अशी मनुष्यनिर्मित, भीषण नसेल. हे सारं सांगताना ‘ माझी ‘ नेमकी गाठ पडेल की नाही, हे आताच सांगता येत नाही.
आरशातील प्रतिबिंबाला त्या माणसाबद्दल सारंच काही माहीत असतं, असं काही नाही. आता हे बघ नाव. माझ नाव दगडू हे तू विसरूनच गेलास. मीही विसरलोय. आजही शाळेच्या दाखल्यावर तुला ते दिसेल. ह्या नावानं कुणी मला शहरात ओळखत नाही. बायको – मुलानांही हे नाव माहीत आहे की नाही, कुणास ठाऊक ! ‘ लहानपणापासून ह्या नावाबद्दल मला घृणा वाटत असे. शेक्सपियर म्हणतो, ‘ नावात काय आहे ? ” पण आपल्याच वाट्याला असं ‘ दगडू ‘ नाव का बरं यावं ? आपण ज्या जमिनीच्या तुकड्यावर जन्माला आलो, तिथंही अशीच नावं. कचऱ्या, धोंड्या, सटवा, जबा – अशी. कुणी एखाद्या मातेनं आवडीनं गौतम ठेवायचं आणि त्याचं लगेच ‘ गवत्या ‘ व्हायचं ही परंपरा. मनुस्मृतीत शूद्रांच्या नावांची यादी पाहिलीय अशी तुच्छतादर्शक. ब्राह्मणांची विद्याधर, क्षत्रियांची बलराम आणि वैश्यांची लक्ष्मीकांत, तर शुद्रांची – शुद्रक, मातंग अशी. तोच पायंडा ह्या विसाव्या शतकापर्यंत चालत आला काय ? ” लहानपणी आई सांगायची, लेका, तुझ्या आधी दहा – पंधरा लेकरं मातीआड लोटली. लेकरू जगंना. नवससायास केलं. तू जलमलास, तवा कुनी तरी म्हणालं, ‘ दगड, धोंडा, नाव ठिवा. लेकरू जगंल. ” असं माझं नाव पडलं. शाळेत जाऊ लागलो. मला हे नाव आवडत नाही, तर आजी दारातून सांगायची, “ ड्याम घरात न्हायी. ” डी. एम.चं तिच्या भाषेतलं ते रूप होतं. दोन दिशांना फेकलेली. कुटुंबही तिथंच. हे पाहून वर्गातील मुलं डी. एम. म्हणत. कुणी मित्र घरी आला आणि विचारलं, माझं बालपण कधी खेड्यात, कधी शहरात गेल. माझा एक पाय खेड्यात तर दुसरा शहरात, असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही. त्यामुळं आजही पूर्ण शहरात किंवा पूर्ण खेड्यात मी वावरत नाही.
माझी मानसिकता दुभंगलेली – जरासंधासारखी नवऱ्यानं कितीही बदडलं, तरी त्याची सेवा करीत. त्याचे व्यसनाचे लाड पुरवीत. वडील मुंबईला सुक्या गोदीत नोकरीला होते. त्यांना मी ‘ दादा ‘ म्हणत असे. आजही माझा मुलगा मला ‘ दादा ‘ म्हणतोय. त्यानं डॅडी किंवा पप्पा म्हणावं हे मला आवडत नाही. गावठी निवडुंगाला विलायती कॅक्टसचं कलम करावं, तसं वाटतं. तर काय सांगत होतो ? हं… त्यावेळी आम्ही ‘ कावाखाना ‘ इथे राहत असू. दहा बाय बाराची खोली. त्यातच नळ. संडास कॉमन. आई, आजी आणि चुलत्याचं आजच्या मुंबईच्या नकाशात कावाखाना गवसायचा नाही. त्या वेळी खड्या पारशापासून सुटणारी ट्रॅम फोरास रोड नाक्यावरून गिरगावच्या दिशेला जायची. आजीनं घोड्याची ट्रॅम पाहिलेली. आजी आठवणी सांगायची. त्यामुळं मला पुलावरून घोडा ट्रॅम कसा ओढत असेल, त्याच्या तोंडाला कसा फेस आला असेल असंच दृश्य लहानपणी दिसायचं. ह्या पुलाला खेटूनच नागपाडा सुरू व्हायचा. ह्या नागपाड्यातच ‘ कावाखाना ‘ होता. आज तिथं पाच – सहा माळ्यांची टोलेजंग इमारत आहे. कावाखान्याच्या एका बाजूला चोरबाजार. दुसऱ्या बाजूला कामाठीपुरा. गोलपीठा इथं वेश्यांची वस्ती. ह्या दोन्ही बाजूंनी रेटीत नेणारी अशी कावाखान्यातील वस्ती. भोवतालच्या टापूत छोटी छोटी बेटं करून महार मंडळी राहत. सारी घाटावरची. संगमनेर, अकोला, जुन्नर, सिन्नरकडून जमा झालेली. आजुबाजूला ख्रिश्चन – मुसलमानांची वस्ती. महार मंडळींची राहण्याची अवस्था खूपच निकृष्ट. एका एका खुराड्यात दोन किंवा तीन पेटा – भाडोत्री. मध्ये लाकडी पेटीचं पार्टिशन. ह्या लाकडी पेटीत सारा संसार. रात्रीच्या वेळी वलाण्यावर जुनेराच्या आसऱ्यानं तात्पुरत्या भिंती उभारल्या जायच्या. पुरुष हमाली करीत. कुणी गिरण्या – कारखान्यांत कामाला जात. स्त्रियांना कुणी पडद्यात ठेवीत नसत. उलट, पुरुषांपेक्षा ह्याच जादा राबत. दारुड्या.नवऱ्यानं कितीही बदडल,तरी त्यांची सेवा करीत.त्यांचे व्यसनाचे लाड पुरवीत.रस्त्यावर पडलेल्या चिंध्या,कागद,फुटलेल्या काचा,लोखंड, बाटल्या उचलून आणणे,रस्त्यावर त्यांची वेगवेगळी वर्गवारी करणे आणि सकाळीच नेऊन विकणे हा यांचा धंदा. तिथून जवळच मंगळदास मार्केटात कापडाचा व्यापार चाले. त्या दुकानांतून झाडलेला कागद ह्या बाया गोळा करीत. प्रत्येकाची नेमून दिलेली दुकानं असत. कचरा कुणी घ्यायचा यावर तुंबळ भांडणं होत. तेथील नोकराला चिरीमिरी दिली जायची. काही बाया जवळच्या कुंटणखान्यांतील वेश्यांची पातळं धूत. खिमा – पावाला कंटाळलेल्या वेश्यांना काही स्त्रिया बाजरीची भाकर आणि ‘ बरबाट ‘ पुरवीत. बाजिंद गि – हाईक या स्त्रियांचीच मागणी करी. अशा वेळी काचेसारखी आपली अब्रू सांभाळताना ह्यांना पळता भुई थोडी होई. कावाखान्याचं आणखी एक वैशिष्ट्य होतं. वस्तीला जोडूनच एक क्लब होता. जवळ जवळ उघडा. मोठ्या हॉलच्या पुढं बखळ जागेत चटयांच्या भिंती, ताडपत्र्यांचं छत. या क्लबलाच कावाखाना म्हणत. गोरे साहेब, यहुदी, उंच – धडंग अरब, त्यात एखादा हवशी – असे श्रीमंत लोक दिवसभर क्लबमध्ये जुगार खेळत. त्यांचे खेळही विविध. ताश, तीन पत्त्यांचा खेळ, बिलियर्ड असे खेळत. चकचकीत रंगीबेरंगी गोळे सुळसुळीत काठीनं भोकात ढकलण्याचा विलियर्डचा खेळ आम्ही बंद दरवाज्याच्या फटीतून बघत राह्यचो. आमच्या वस्तीतील पुरुष हा खेळ खेळायचे नाहीत. गरिबांचा हा खेळ नव्हे, असंच त्यांच्या मनावर बिंबलेलं. क्लबमधील हे श्रीमंत लोक कधी नोकरीवर जाताना दिसत नसत. सकाळपासून रात्री बारापर्यंत तिथंच रेंगाळत. चहा पीत; पण बिनदुधाचा. असंच एक दुसरं पेय ते पीत. कोकोच्या बियांपासून ते पेय तयार करीत. त्याला हे ‘ कावा ‘ म्हणत. हे काळं कुळकुळीत, कडवट पेय पिताना गाजरासारख्या लालबुंद यहुदी मंडळींना कोणता आनंद होत असावा, असा प्रश्न आम्हांला पडत असे.
यहुदीचरून आठवलं, कोंबडं मारण्याचं त्यांचं अजब शास्त्र होतं. कोंबडं मारणारा यहुदी कोंबड्याच्या गळ्यावरून आरपार सुरी फिरवीत नसे. अर्धवट गळा कापलेल्या अवस्थेत कोंबडं समोरच्या मैदानात फेकून दिलं जायचं. त्याच्या गळ्यातून ठिबकणारा रक्ताचा सडा आणि त्याचं जीवघेणं फङफडणं. हा क्रूर खेळ पाहवत नसायचा. यहुदी मंडळीच्या प्रचंड देवळाशेजारीच हे हत्याकांड सातत्याने चाले. शाळेला जाण्यायेण्याचा तोच रस्ता. हे सारं पाहताना अंगावर सर्रकन काटा फुटायचा. केव्हा केव्हा क्लबचा वस्तीला त्रास व्हायचा. केव्हा हुल्लड होईल, खुर्च्या – बरण्या यांची फेकाफेक होईल, हे सांगता यायचं नाही. दिवसभर सट्टा, रेस, बेटिंग असे शब्दप्रयोग कानावर आदळायचे. बसल्या जागी त्यांच्या हजारो रुपयांच्या उलाढाली होत . काही कफल्लक होत, काही मालदार.
क्रमशः
