बलुत.दया पवार(भाग ९).

बलुत..

हमखास गाजायचा .. जसा राजा हिजडा , तसा त्याचा दरबार हिजडा . सारे राजाचं अनुकरण करीत आहेत … पुढे तात्याबाची शोकांतिका का बरं झाली ? रात्रीचा स्टेजवर सरदाराच्या भूमिकेत वावरणारा हा माणूस फुटपाथला आला . विडीला मोताद झाला . पुढं जेव्हा तालुक्याला शिकायला गेलो , तेव्हा तालुक्यात मोळी विकताना त्याला पाहिलं . तात्यावावर त्या काळात केलेली एक कविताही आठवते आहे . पुढे हाच शिंदे मुंबईला ‘ गाढवाच्या लग्ना’त लालबाग थेटरला झील ओढताना पाहिला . त्याला ल्या अवतारात पाहून काळीज तुटलं .

सटवाला मी मामा म्हणत असे . त्याच्यामुळं आमचा मात्र एक फायदा झाला . त्याचा वाजंत्र्यांचा एक तापा होता . त्यात तो कांडं वाजवी . सनईसारखंच हे वाद्य , पण आवाज वरच्या सुरातला . ह्या ताप्यात दादाही काडं वाजवीत . सटवा पुढं म्हणायचा , दादा ते गाणं उचलायचे . वाजंत्र्यांत चार गडी असत . दोन कांडं वाजवीत , तिसरा सूरकरी आणि चौथा संवळ वाजवायचा . सूरकऱ्यानं नुस्ता भो ऽ भो ऽ ऽ आवाजात सूर घरायचा . फुकताना याची खूपच दमछाक व्हायची . वाटायचं , आतल्या आत श्वास कोंडून हा एक दिवस मरणार काळीज फुटून . फुकताना याचे गाल सतत फुगलेले , गालात दोन लिंबं धरल्यासारखे . महारवाड्यात अगदी लहानपणापासून दम घ्यायचा कसा , हे शिकवीत . कांडेकऱ्यालाही ही विद्या यावी लागे . डबडाभर पाण्यात सरमाडीच्या पोकळ काडीनं लहान पोरं दम शिकत . मी शाळकरी असल्यामुळे ह्या प्रकाराची लाज वाटायची . आज मला कोणतंही चर्मवाद्य अगर स्वर फुकंण्याचं वाद्य वाजविता येत नाही . खरं म्हणजे हे सारं घरात पिकत होतं . संबळ मात्र मनापासून आवडायचा . डाव्या हातात पातळ लाकडाची शिमटी आणि उजव्या हातात लाकडाचाच एकाचा आकडा . या दोन्हींच्या साहाय्याने तो संबळ वाजवायचा . बैलाला लावतात तशी झूल संबळाला लावलेली . त्याला गजमुख म्हणत . त्यावर आरशाची लहान लहान भिंग लगडलेली . समोर लेजमांचा तापा नाचता आहे आणि मधल्या रिंगणात वाजंत्री उभे आहेत ; लेजमाच्या तालात संबळ वाजविणाऱ्या रंगीबेरंगी पटक्याचा शेमला डुलतो आहे – हेच दृश्य मनावर कोरलं गेलेलं .

वाजंत्र्याच्या ताप्यावरांवर मीही कधीकधी जायचो . सटवामामाला म्हणायचो , ” मामा , तू कांडं किती चांगलं वाजवतोस . पण तुझी पत्रावळी वर उकिरड्यावर ! ” तो नेहमीची पेटंट शिवी द्यायचा , ” त्यांच्या आईच्या वरातीत मी नाचलो ! ” आणि मग म्हणायचा , ” ह्या खळगुट्यांना कांड्यातूनं शिव्या देऊ का ? ” -आणि मग तो वहाडाकडं तोंड करून कांड्यातून शिव्या द्यायचा . वऱ्हाडाला त्या काही समजायच्या नाहीत ; फक्त आम्हा दोघांना त्यांचा अर्थ कळायचा . खळाळून हसायचो ..

गावात लग्नाचा सीझन आला , म्हणजे आमच्या घरी दिवाळी – दसरा उजाडायचा . दादांच्या हातात पैसे खेळायचे . नवीन कापड घरी यायचं . वर्षाची ‘ दीदरी हटायची.. लग्नात उरलेली लापशी , मालपोहे , कडकण्या घरी यायच्या . ठाकरांच्या लग्नात मात्र नुसता भात आणि मसाल्याचा लाल कोंडा मिळायचा . हीच त्यांची लग्नातली मेजवानी ।

लग्नातली गाणी मात्र मोठी मजेशीर . ‘ का रे नवऱ्या , एवढी रात रे । आता खाशील शिळा भात रे ! ‘ नवरामुलगा कुणाच्या तरी कडेवर अथवा खांद्यावर . ह्यांना गाडीघोडा कुठून ? सारं वऱ्हाड दऱ्याखोऱ्यांतून , तापलेल्या फुफाट्यातून लग्नघरी आलेलं . हे ठाकर जरी खूप गरीब होते , तरी तेही मराठ्यांएवढाच वाजंत्र्यांचा बाट धरायचे . त्यांना दूर बसवीत . तांब्यात वरून पाणी वाढीत . जेवणाची पत्रावळी पंगतीमून दूर मांडीत . वाजंत्र्यांचं जिणं म्हणजे नुसती हाडहाड . मराठी मंडळी तर खूपन लालवार . आज मी बघतोय , बैंड वाजविणाऱ्यांचा केवढा तरी सन्मान . पण वाजंत्री म्हणजे चार दिवसांचे बांधलेले गुलाम . कुणीही पोरासोरांनी यावं आणि दम द्यावा , ” फुका ‘ , त्याला टाइम टेबल नाही . गडगनेराला फुका ! हळद लागली फुका ! लग्नाला फुका ! वरातीला फुका ! मंडळी हातपाय धुतात , तेव्हाही फुका ! रुखवताला तर रात्री दोन – तीन वाजता फुकावं लागे . पैन पै वसूल केली जायची . एकदा लग्न उरकून गेल , म्हणजे विदागी मिळायचीही खळखळ . कुणी ताकास तूर लागू देत नसत . अशा वेळी सटवाचं डोकं भन्नाट चालायचं . एखादं बाजिदं गिहाईक भेटलंच तर तो जाईल तिथं त्याच्या पाठीमागं सूरकरी लावला जायचा . बाहेर पडण्याची शिराणी व्हायची . सारखा पाठीमागून भोऽ आवाज . ही बलामत नको , म्हणून लगेच सारे पैसे वसूल होत .

तालुक्याला गुरुवारच्या दिवशी आठवड्याचा बाजार भरत असे . एखाद्या यात्रेला जावं , तशा उत्साहानं आमचं सार घरदार बाजाराला जायचं . आईनं कोंबड्या पाळलेल्या असायच्या . तिला अंडी विकायची असत , त्या वेळी एक आण्याला एक अंडं जायचं . बाजाराची मात्र खूप गंमत वाटायची . भेळ , जिलबी हमखास मिळायची . या बाजाराचं एक वैशिष्ट्य होतं . बाजाराच्या अवतीभोवती झाडाखाली गावोगावची माणसं कोंडाळं करून बसायची . त्यातही जातवार . महारमंडळी मरीआईच्या देवळापाशी बसत . कोणत्या गावच्या महारांनी कुठं बसायचं , हेही परंपरेनं चालत आलेलं . डोळे झाकून माणसं तिथं जात . हॉटेलात मात्र महार , मांग , चांभारांना वेगळा कप असायचा . तोही कान तुटलेला . भोवती मुंगळ्यांची रांग . चहा पिणारालाच तो विसळावा लागे . बसायची वेगळी जागा . बाहेर व्हरांड्यात अगर हॉटलच्या मागच्या जागेत एखादा बाकडा ठेवला जायचा .

दादा सकाळीच चहा प्याले , की बाजाराच्या दिवशी तालुक्याला येत . कामधंदा नसला की त्यांची तालुक्याची फेरी चुकायची नाही . आजुबाजूच्या सर्व महारांना ही सवय होती . आमच्या गावी नदी नव्हती . खोल विहिरीचं पाणी उपसावं लागे . त्यामुळं तालुक्याला ते खास नदीवर कपडे धुण्याकरिता जात . कपडे वाळेपर्यंत ते लंगोटी लावत . गावात येत तेव्हा ते वगळ्यावाणी झकपक येत . दररोज धुतलेले कपडे घालणं त्यांना मनापासून आवडे .

त्यांच्याबरोबर नदीला जाताना एका भव्य पडक्या वाड्याजवळ मला हमखास भीती वाटे . आजीनं ह्या वाड्याची एकदा गोष्ट सांगितलेली . ह्या वाड्यात पूर्वी एक मुसलमान मामलेदार राहत होता . त्यात त्याचा मोठा बाडदाना . दोन बायकांचा विस्तार . इंग्रजांचा काळ . तेव्हा हा मुसलमान मामलेदार खूपच मातलेला . नदीच्या काठी मासे धरण्याचा ह्याला छंद होता . तो तिथंच कचेरी भरवी . असं म्हणतात , की अनेक साधुसंन्याशांच्या तोंडात त्यानं मासे कोंबलेले . साऱ्या तालुक्यात संतापाची एकच लाट पसरलेली . एके दिवशी- अर्थात बाजाराच्या दिवशी – सारा डांग भाग उलथलेला . सर्वाच्या हाती भाले , तीरकमठे : हा तसा नियोजित उठाव होता . सर्वांनी वाड्याभोवती कडं केलेलं . मामलेदार तळघरात लपून बसलेला . बाहेर निघण्याची शक्यता नाही . लोकांनी काय करावं ? घासलेटचे डबे , मिरच्यांची पोती वाड्यात ओतली आणि दिला पेटवून वाडा . अर्थात मामलेदाराची बायका – मुलं सुरक्षित ठेवण्यास लोक विसरले नाहीत . थोड्याच वेळात मामलेदाराचा कोळसा झाला … वाड्याशेजारून चालू लागलो , म्हणजे हमखास आजीच्या ह्या गोष्टीची आठवण व्हायची . वाटायचं , मामलेदाराचं भूत तर दिसणार नाही ना ?

आमची शाळा लोकल बोर्डाने बांधलेली . बहुधा त्यामुळं आम्हाला बाहेर बसवीत नसत . या संदर्भात तात्यांचा अनुभव मात्र विपरीत आहे . तेव्हा शाळा मारुतीच्या देवळात भरत असे . महार मुलं पायरीवर बसत . एकदा ब्राह्मण मास्तरांनी तात्याला रूळ फेकून मारलेला . तात्यानं काय करावं ? तो रूळ तसाच मास्तरांच्या दिशेला फेकला . मास्तरांना खोक पडली . मास्तरांचं रक्त पाहून तात्या महारवाड्यात पसार झाला . तेव्हापासून तात्या शाळेतच गेला नाही . महारवाड्याच्या वरच्या अंगाला एक प्रचंड घोडाळी होती . तिथं मोठमोठ्या , अजस्त्र , काळ्याभोर दगडाच्या शिळा पडलेल्या . सभोवती साबरबोंडाचं रान . ही साबरबोंड महारवाड्यात दुष्काळात उपयोगी पडत . अशा या घोडाळीवर आमची दगडी इमारतीची शाळा होती . शाळा मोठी टुमदार . खुप लांबवरून ती दिसायची . त्या शाळेत माझं नाव तिसरीत घातलं गेलं . मास्तर

क्रमशः

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading