बलुतं.दया पवार(भाग १७).

बलुतं..

भारतीय समाजव्यवस्थेतील गुंतागुंतीची विलक्षण वीण पाहून माझी तर मतीच कुंठित होते . साऱ्यांचा असा नकळत अहंकार पोसलेला . रायरंद चावडीवरच उतरत . उंटावर त्यांचा सारा संसार ; लेकर – बाळं , झोपायची खाट , गुडगुडी , ढोलकी , तुणतुणं , इत्यादी असायचं . उंट पाहायला गावातली मुलं लोटायची . त्या वेळी आमचा भाव वधारलेला . कधी कधी रायरंद आम्हालाही उंटावरून फिरवायचे .

लहानपणी पाहिलेला रायरंद आठवतोय . डोक्याला रंगीबेरंगी पटका – त्याचा घोळ पाठीवर सोडलेला . अंगात चांदीचं मेडल लटकावलेलं जाकीट . पीळदार शरीर . मिश्यांचे आकडे वळलेले . बोलतानाही त्यांच्या आवाजात एक विलक्षण महारी डकार . अनेक गावांची नावं त्यांना पाठ , बोलता बोलता ते साऱ्यांनाच गुंगवीत . सकाळी चावडीत त्यांचा खेळ व्हायचा . महार मंडळींतील मेहेत्तरे पुढे बसलेले . महारांचा न्याय हे मेहेत्तरे करीत , त्यामुळं त्यांचं समाजात वजन . रायरंदाच्या हाती रिकामा नारळ- तो रंगीत रुमालात धरलेला . रिकाम्या नारळात कवड्या . त्या तालावर ते नाचत , नाचताना तन्मयतेने गात , ” तुंबडीभर देना वो , बाजीरावनाना ? ” मेहेत्तरांच्या डोक्यावरून ते हातातला नारळ आपटीत . गावच्या मेहेत्तरांची स्तुती करीत . त्यांच्या भाषेला कमालीचा गोडवा होता . नुसती शब्दसंपत्ती ते उधळायचे . त्यांच्याकरिता घराघरांतून शिधा गोळा व्हायचा . गाव सोडताना त्यांना नवा कोरा पटका बांधून महार मंडळी खूश करायची . पोस्त द्यायची . पुढं महारमंडळी बौद्ध झाली . त्यांनी जुने रीतिरिवाज सोडले . मला मात्र आजही प्रश्न सतावतो आहे , की एकेकाळी मनोरंजन करणारे हे रायरंद आता कुठे गेले ? आज मी खेड्यापाड्यात गेलो , तर रायरंद औषधालाही सापडणार नाहीत .

बालपणाच्या मन : पटलावर उमटलेलं असं हे गाव आणि असा महारवाडा ! जेवढं सांगावं तेवढं थोडंच . गावात असूनही तसा मनानं मी लहानपणापासून गावापासून फटकूनच राहिलो . गावात आलेली माझी खरी मरगळ नाहीशी झाली ती तालुक्याच्या गावी . दररोज सकाळ – संध्याकाळ शाळेकरिता तीन मैलांची रपेट . शाळेला जाताना चार – दोन मराठ्यांची पोरंही सोबत . तालुक्याला शाळेत जात असलेली आमचीच पहिली पिढी . महारवाड्यातला तर मी एकटाच . गावची मराठ्यांची पोरं माझ्यापेक्षा अंगापिंडानं मजबूत . एकजण तर बाप्या दिसायचा . त्याला दाढीमिशा आलेल्या . मी त्यांच्यात कोकरासारखा दिसायचो . त्यामुळं त्यांच्याशी वागताना दचकून वागायचो . जणू काय आपल्या पायरीनं वागावं हे रक्तातच भिनलेलं . ही मुलं कधीच बरोबरीच्या नात्यानं वागत नसत . त्यांच्या जातीचा अहंकार पदोपदी भरलेला . जातीवरून अपमान झाला , म्हणजे माझं मन सुरुंगाच्या दारूसारखं आतल्या आत उकळायचं . पण तोंडावाटे ब्र काढण्याचं धाडस व्हायचं नाही . रस्त्यानं चालताना मी त्यांच्याबरोबर कधीच चालत नसे . मागं – पुढं अंतर ठेवून मी चालायचो .

पण एकदा शाळेत गेलो , म्हणजे माझं अंत : करण दूरवर आकाशात एखाद्या पक्ष्यानं सुळका मारावा तसं भिरभिरायचं . मुक्तीचा आनंद मिळायचा . गावच्या एका खोलीच्या शाळेपेक्षा तालुक्यातील शाळा टुमदार वाटायची . ‘ बालभारती’च्या धड्यात असावी तशी . छोट्या छोट्या नळ्यांची कौलं . समोर थोरलं मैदान . वडालिंबाची गर्द छाया . पाचवीच्या वर्गात मी प्रवेश केलेला असतो . वर्गावर समुद्र नावाचे एक ब्राह्मण मास्तर असतात . काळी टोपी . स्वच्छ परीटघडीचा पांढराशुभ्र पोशाख . धोतर आणि सदरा , रंगाने खूपच गोरे . खूप छान हसायचे . त्यांच्या बोटातील सोन्यातील अंगठी माझे डोळे नेहमीच दिपवायची .

गावच्या शाळेत जवळजवळ ढ असलेला मी तालुक्याच्या शाळेत एक – दोन महिन्यांतच चमकू लागलो . पाचच्या आत नंबर . मार्क जायचे ते घंट्याचे . गावावरून कितीही धावतपळत आलो , तरी एखादे वेळी उशीर व्हायचा . घंटा मिळायची नाही . तेवढ्या मार्कानीच नंबर खाली जायचा . समुद्रमास्तर माझ्यावर बेहद्द खूश . साऱ्या वर्गासमोर उभे करायचे . म्हणायचे , ” हा बघा महाराचा पोर ! राहतो किती स्वच्छ , बोलतो किती शुद्ध . अभ्यासही चांगला आहे ! ” दिवसभर पिसासारखा तरंगायचो . शाळा सुटली म्हणजे गावी जावंसं वाटायचं नाही . गाव म्हणजे नरक वाटायचा . महारवाड्यांचं जग हे आपलं जग नाही , असं वाटायचं . गावातही ठायी ठायी अपमानल , तुच्छता . गुदमरून जायचो .

तालुक्याच्या शाळेतच मला माझ्या खऱ्या व्यक्तिमत्वाची ओळख झाली . आपल्यात काही कमी नाही , गावच्या कोंडवाड्यातून बाहेर पडलंच पाहिजे ! ह्याकरता शिकायला हवं . शहरातील वाण्याबामणांच्या पोरांनाही आपण अभ्यासात मागं टाकू शकतो , हा शोध अचंबा करणारा वाटत असतो . वर्गातल्या बाकीच्या मुलांपेक्षा हुतुतूही छान खेळायचो . मुलं म्हणायची , ” हा बहुधा अंगाला डुकराची चरबी लावून येत असला पाहिजे ! ” पोरांची फळी फोडून माशासारखा सुळकन सुटायचो . ह्या दरम्यान नाटकातही काम करण्याचं वेड लागलं . ” ह्या रिकाम्या प्याल्यात काय दिसतंय तुला ? ” हा ‘ एकच प्याला’तील संवाद मला पाठ होता . दारुबंदीच्या कार्यक्रमाच्या वेळी गावात चौकाचौकात मी तो न बिचकता म्हणायचो .

एकदा तर १५ ऑगस्टला चौकात स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमाच्या सभेत वक्तृत्व स्पर्धेत बोललो . गर्दीत आजोबा जावजीबुवा होते . स्टेजवरून खाली उतरताच त्यांनी अभिमानानं ओटीपोटी धरलं . त्यांच्या डोळ्यांतून खळकन् अश्रू सांडले . “ आईच्या रांडपणाचं सार्थक झालं ‘ हे उद्गार म्हाताऱ्यानं काढले . “ तुहा बाप हवा होता … ‘ असंही म्हणाले . त्यांनी माझी गावी , महारवाड्यात कमालीची तारीफ केली . रांडकीचं रांडपोरं ही कुचेष्टा हळुहळू संपू लागलेली . महारवाड्यातील बाकीची मुलंही आदरानं पाहू लागली .

त्या वेळी माझा पेहराव मजेशीर होता . डोक्यावर पांढरी टोपी , पांढरा नेहरूशर्ट , पायात चप्पल . खेडेगावात इस्त्री कुठून मिळणार ? तांब्यामध्ये खैराचा विस्तव घातला जायचा . त्याच्या साह्यानं इस्त्री . कपडे जादा नसायचेच , तेच धुऊन घालायला लागायचे . रात्री झोपताना इस्त्री मोडू नये म्हणून उशाखालो घेऊन झोपायची . त्या काळात शाळेच्या वतीने खूपदा प्रभातफेऱ्या निघत . घोषणा द्यायला मीच पुढं . घोषणा देताना सारं अंग ताठरायचं . अंगभर चैतन्य ओसंडायचं . गावची मराठ्याची मुलं मात्र शाळेत अडगळीत पडलेली . ती खूपच द्वेष करायची . दुपारच्या सुट्टीत आम्ही नदीवर जेवायला जायचो . जेवताना त्यांच्यात अंतर सोडूनच बसावं लागे . त्यांच्या दृष्टीनं मी अजूनही धेडपाटच होतो . केव्हा केव्हा ते चटणी किंवा लोणचं द्यायचे ; पण माझ्या भाकरीवरचं काही खायचे नाहीत . पुढे पुढे त्यांची संगत मी टाळू लागलो . तालुक्याच्या गावातील सवर्ण मुलाशी दोस्ती जोडली .

समाजात वागताना मुखवटा घेऊन मिरवावं लागतं . पण आता सगळंच सांगायचंय तशी पुरुष होण्याची कल्पना रोमांचकारी . माझं बालपण हरवत चाललेलं , पण त्याचं मला कधी दु : ख वाटलं नाही . गावच्या ओढ्यावर माझ्याच वयाच्या पोरांबरोबर मी आंघोळीला जायचो . सर्वांच्या आधी मी पुरुष झालेला असतो . हा शोध त्यांना दाखवताना छाती अभिमानानं नुसती फुलून गेलेली असते . निसर्गनियमाप्रमाणे माझ्या शरीरातून वासनेचे लोट वाहू लागले . आजवर स्त्री – पुरुष संबंध खूपदा पाहिले होते ; पण कचकड्याच्या खेळाकडे पाहावं तसं वाटायचं . आतून – बाहेरून तसा थंड असायचो . पण अलिकडे वयात आलेल्या मुलींचं आकर्षण वाटू लागलं .

तालुक्याच्या शाळेत मुलांबरोबर झोपत असताना एक घटना घडली . आजही अंगावर पाल सरकत जावी . असं वाटतं . गावातला एक गोरागोमटा मराठ्याचा मुलगा माझ्या शेजारी झोपायचा . एके रात्री झोपेतच मला जाग आली . तो मुलगा माझ्या इंद्रियाशी चाळा करीत होता . अर्थात , त्या दिवशी चड्डी भिजली . मलाही गंमत वाटली होती . नंतर मी ओशाळायचो . काही तरी घाणेरडं कृत्य आपल्या हातून होतंय , म्हणून दिवसभर बेचैन असायची . त्यानंतर मी माझी झोपायची जागा बदलली . ही घटना नंतर मी एका थोराड मुलाला सांगितली . पुढे त्यानंच त्या मुलाचा ताबा घेतला . तो मुळातच नपुंसक आहे , ह्याची मुलांना खात्री पटली . दिवसा तो माझी नजर चुकवायचा . गंमत म्हणजे , पुढे काही वर्षांनी त्याचं एका छान , ठसठशीत देखण्या बाईशी लग्न झालं . आज त्याचा संसाराचा वेल मांडवाला गेलाय . त्याच्या खात्यावर मुलंबाळं आहेत . मी कधी काळी गावी गेलो , म्हणजे तो आजही आपली नजर माझ्या डोळ्यांना भिडवत नाही , हे मात्र खरं .

शाळेच्या जगामुळं एक मात्र झालं . महारवाड्यातील पोरींचं आकर्षण मला वाटायचं नाही . एकतर त्या दररोज आंघोळ करीत नसत . केसांच्या बटा झालेल्या , घाणेरडे कपडे . त्यांच्यापासून मी फटकून वागू लागलो .

एक प्रसंग आठवतोय . आमच्या घराच्या समोरच रूपवते ह्या माणसाचं घर होतं . त्याला मी मामा म्हणत असे . त्याची १३-१४ वर्षांची एक गोरीपान मुलगी होती . ती सतत आमच्याच घरी असायची . आईला घरकामात मदत करायची . माझी भावी बायको म्हणून काहीजण मला चिडवीत . मी झुरळ झटकावं तसं तिला झटकायचो . एक तर ती खूपच अस्वच्छ राहायची . केव्हा केव्हा तिचं नाक वाहायचं . स्वत : च्या दंडानंच ते फुर्र करून पुसायची . त्याची खूपच किळस वाटायची . एकदा रात्रीच्या वेळी नेमकी माझ्याच बाजूला येऊन झोपली . आई – मामी आम्हाला चिडवत असायच्या . मी त्या दिवशी आईवर खूपच भडकलो . मी माझा विछाना उचलला आणि दुसरीकडे जाऊन झोपलो .

ह्याचा अर्थ मला मुलींचं आकर्षण वाटत नव्हतं असं नाही . जनावरांत आणि माणसांत फरक असावा . त्याचं मन कुठल्याही गोष्टीला तवार व्हायला हवं . दुष्काळातून आल्यासारखे काही वागतात म्हणा . पण माझं तसं नाही . ह्याच दरम्यान तालुक्यातील एका मुलीचं आकर्षण मला वाटू लागलं होतं . नाव काय बरं ? आठवलं , बानू . तिचं का तिच्या जातीचं आकर्षण वाटलं होतं . हे आज सांगता येत नाही . ती जातीनं मराठा होती . रंगानं खूपच गोरी – केतकीच्या पानासारखी . उन्हात चालली म्हणजे तिचे गाल लाल व्हायचे . गावी आलो तरी तिचंच स्वप्न पडायचं . तिच्याशी ओळख होण्यास एक व्यावहारिक कारण घडलं . गावात सोनार मित्राच्या घरी मी जायचो . केव्हा केव्हा अभ्यासाच्या निमित्तानं तिथंच झोपायचो . त्याच्या गॅलरीत उभं राहिलं म्हणजे केव्हा केव्हा ती दारात दिसायची . पाहून खुदकन हसायची . मीही तिच्याकडे ओढला जात होतो . तिनंच ओळख वाढवली . मी मराठी शाळत त्या वेळी सहावीच्या वर्गात होतो आणि तीही मुलींच्या शाळेत . माझ्याच इयत्तत होतो . सकाळी आमची परीक्षा व्हायची . दुपारी तिचा वर्ग भरत असे . आमच्या आणि तिच्या शाळेची प्रश्नपत्रिका एकच असायची . शाळा सुटली म्हणजे मी धावत – पळत नदीकाठी येत असे . तिथं ती एका झाडाखाली माझी वाट पाहत असे . मी तिला खुलासेवार प्रश्नपत्रिका सोडवून द्यायचो आणि दुपारी ती शाळेत जाऊन मी सांगितलेली उत्तरं लिहायचो . एका रोमैंटिक अवस्थेतच मी दिवसभर राहायची . मुंबईत कधी तरी पाहिलेले पिक्चरचे सीन आठवायचे . घोडं घेऊन मी वाळवंट तुडवीत प्रेयसीच्या भेटीला निघाला आहे , असं दृश्य आठवायचं . आमचं खरं म्हणजे ‘ काफ लव्ह होतं . शारीरिक गोष्टी समजत असूनही तसं धाडस माझ्यात नव्हतं . आई कधी कधी मोळी घेऊन तालुक्याला यायची . बानू स्वत : च्या घरापुढं आईला थांबवून घ्यायची . केव्हा केव्हा हाती तांब्या घेऊन पाणी पाजायची . स्वत : च्या आईला काहीबाही सांगून मोळी विकत घ्यायला सांगायची . माझी आई…

क्रमशः
(दया पवार यांच्या जगविख्यात बलुतं या कादंबरीतुन)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading