बलुतं..
आई मोळी विकते आहे , हे मात्र मी तिला कधीच सांगितलं नव्हतं . तिनं ती माहिती कुठून काढली होती कुणास ठाऊक ?
बानूबरोबर आयुष्यात प्रथम मी देवळात गेलो . पुढे तिनं अगस्तीच्या देवळात नेलं . तिथं जाण्याकरिता नदीचा प्रवाह ओलांडावा लागे . देवळाच्या भोवती खूपच मोठी आंब्याच्या झाडांची गर्द राई . रामफळ मी प्रथम तिथंच पाहिलं . अगस्तीच्या देवळापुढं एक मोठं , थंडगार पाण्याचं रामकुंड . सीतेची तहान भागविण्याकरिता रामानं धनुष्यातून बाण सोडून हे निर्माण केलंय , अशी भोवतालची दंतकथा . त्या लहान वयातही ह्या भाकडकथेवर माझा विश्वास बसला नाही . देवळात बानूबरोबर गेलो असताना कमालीचा भेदरलो . अगस्तीचे लालभडक डोळे आपला पिच्छा करीत आहेत , असा भास होत राहिला . बराच वेळ तिनं अगस्तीची पूजा केली . मला देवापुढे हात जोडावेत असं काही वाटलं नाही . तिनं तोंडात कोंबलेला पेढा मात्र खाण्यास विसरलो नाही .
Advertise:

एकदा तिच्या मोसंबीच्या बागेत आम्ही काही मित्र गेलेलो . तिनंच आग्रहानं बोलावून घेतलेलं . तिथं आम्ही लपंडाव खेळलो . मी जिथं लपलो असेन तिथंच बानू मला पकडायला यायची , आणि ती जिथं लपली असेल तिथंच मी शोधायला जायचो . बाकीचे मित्र वैतागले . लग्नात नाव घेतात तसं तिनं माझंच नाव लाजत लाजत सर्व मित्रांच्या समोर घेतलं . मित्र नाही म्हटले तरी वरच्या जातीतले होते . एका महाराच्या पोरानं येऊन आपल्या गल्लीतली राजकन्या भुलवावी , हा त्यांना घोर अपमान वाटत होता . त्यांनी भांडण उकरून काढलं . बानूला आणि मला ते घाण , अश्लील शिव्या देऊ लागले . एका ताटात जेवणारे माझे मित्र असे भडकले कसे , याचा अंदाज मला लागत नव्हता . ह्यांपैकी एका मित्राच्याच घरी मी झोपायला होतो . रात्रभर तो एक अक्षर बोलला नाही . मी सकाळी उठून बघतो तो बानूच्या आणि माझ्या नावांच्या पाट्या शहरात लागलेल्या . कोळशाने , खडूने भिंती रंगवल्या होत्या . ऊसगळिताच्या रिकाम्या लोखंडी कढईवरही लिहिलं होतं . मी हादरून गेलो . एक तर बानूचा बाप तालुक्यातील काँग्रेसचा पुढारी . खादीच्या कपड्यांत तो असायचा . पोपटाच्या चोचीसारखी त्याची बाकदार गांधी टोपी . तिच्याखाली रानटी धसमुसळेपणा आहे , याची जाणीव त्याची नजरच द्यायची . मी कुणाला न विचारता गावी पळून येतो – आजारपणाचं निमित्त करून . तालुक्याला तोंडच दाखवत नाही . सात – आठ दिवसांनी दबकतच मी शाळेला येतो . आता आपल्याला झाडाला बांधून चाबकाचे फटके मिळतील , असं वाटत असतं . गावात फिरताना भिंतीवरची अक्षरं पाठलाग करीत असतात आणि मी खचत जात असतो .
ह्या घटनेमुळे जीवनातील प्रखर वास्तवतेची जाणीव होते ; बानू म्हणजे आकाशाला लागलेलं फळ आहे आणि आपण तिथं केव्हाच पोहोचू शकणार नाही , याची कल्पना येते . मी तिचा नाद सोडून देतो . ती मात्र बराच काळ पाठलाग करीत असते . एकदा – दोनदा रस्त्यात बोलण्याचा प्रयत्न करते . पण आपण बर्फाच्या लादीसारखे गोठलेलो असतो .
बानू पुढं भेटली , तेव्हा २५-३० वर्षे उलटून गेली होती . मोठ्या कष्टानंच मी तिला ओळखलं . अलिकडची गोष्ट . मी गावावरून एस.टी.नं मुंबईला येत होतो . गाडी मेंढरांसारखी खच्चून भरलेली . माझा उभ्यानंच प्रवास चाललेला . एका कोपऱ्यात माझं लक्षं जातं . बानू बसलेली असते . खूपच थकलेली . डोळ्यांभोवती काळी वर्तुळं पडलेली . साधारण माझ्याच वयाची ; पण आहे त्यापेक्षा जादा वयाची भासते . मी गर्दीत वाट काढीत तिच्या दिशेनं सरकतो . हळूच तिला विचारतो , ” तुझं नाव बानू ना ? ” ती केवढ्यानं तरी दचकते . ती काही मला ओळखत नाही . मी काही जुन्या खाणाखुणा सांगतो . भूतकाळाचं मोठं ओझं तिच्या नजरेवरून हलल्यासारखं होतं . तिचे डोळे लकाकतात . बानू ह्या नावानं आता तिला कुणीच ओळखत नसतं . तिच्या आयुष्याची परवड तिच्याच तोंडून कळते . नवऱ्यानं तिला सोडून दिलेलं असतं . सध्या ती विड्यांच्या कारखान्यात विड्या बांधत असते . हे ऐकून मी क्षणभर दुभंगतो . थोडा वेळ काय बोलावं हे समजत नाही . ती घरी चलण्याचा खूप आग्रह करते . आई अजूनही ओळखील , असा विश्वास देते . मी नोकरीचं निमित्त सांगून तिच्यापासून सुटका करून घेतो . पुढल्या स्थानकावर ती खाली उतरते . गाडी दूर जाईपर्यंत ती मजकडे एकटक पाहत असते .
बानूबरोबर अगस्तीच्या यात्रेत भटकत असतानाच ४००-५०० माणसांची मिरवणूक पाहिलेली . एकानं समोर निळा झेंडा धरलेला , काहींनी निळ्या टोप्या घातलेल्या . जवळच मैदानात सभा असते . डॉ . आंबेडकरांच्या नावाचा जयघोष चाललेला . मुंबईला कावाखान्यात असताना डॉ . बाबासाहेबांना पाहिल्याचं आठवतं . गोरापान चेहरा , उंच कपाळ , पायात तंग सुरवार , वर लांब शेरवानी कोट , हातात काठी अशी त्यांची पोझ असते . नेबरहूड हाऊसमध्ये त्यांचं भाषण असतं . लहानपणचं ऐकलेलं भाषण काही आठवत नाही . चेहराही तुरळक आठवतोय . ह्या वेळी बाबासाहेबांच्या पक्षाच्या सभेला हजर न राहता प्रेमाचे चाळे करतोय , ही बोचणी मनाला लागलेली . सभा कोणत्या विषयाची होती हे आज आठवत नाही . त्यावेळी मिरवणुकीचं नेतृत्व करणारे दादासाहेब पाहिलेले . सडपातळ , गोरे , तरुण , डबल ब्रेस्ट कोट . एखाद्या नटासारखे उमदे दिसायचे . त्या दिवसाची चूक पुन्हा केली नाही . पार्टीच्या सभेला हजर राहू लागलो . अगस्तीच्या यात्रेत हमखास पार्टीची सभा व्हायची , ती महार – कुंडापाशी . अगस्तीपुढील कुंडाला रामकुंड म्हणतात . मग ह्या कुंडालाच महार – कुंड का म्हणतात , हे कळायचं नाही . महार मंडळी यात्रेला आली म्हणजे त्यांना रामकुंडाचं पाणी मिळायचं नाही . तेव्हा त्यांनी ट्रस्टशी भांडून हे कुंड मिळवलं , म्हणतात . ह्या कुंडाची खूपच मोठी जमीन भोवतालच्या शेतकऱ्यांनी बळकावलेली . सभेत ह्या प्रश्नाला तोंड फुटायचे . बाबासाहेब कोतूळ येथे येऊन गेलेले असतात . ते गाव तर माझ्या गावाच्या पलीकडे . मध्ये ढग्या डोंगर . बाबासाहेबांच्या प्रखर विचाराचा प्रभाव खेड्यापाड्यांत पोहोचू लागला होता . गावोगावची महार मंडळी कातडी फाडणं , मेलेल्या गुरांचं मांस खाणं सोडीत होती . जलसाकारांची क्रांतिकारक गाणी विद्रोह पेटवीत होती . सापानं कात टाकावी तसा महार समाज सळसळत होता .
शेवग्याच्या शेंगांच्या झाडाची बाबासाहेबांची गोष्ट महार मंडळींच्या घरोघर पोहोचली होती . चार भाऊ असतात ; पण कष्ट करायची त्यांना लाज वाटत असते . त्यांच्या दारामागे शेवग्याचं झाड असतं . ते रात्रीच्या वेळी त्यांच्या शेंगा तोडीत असत आणि त्या शेंगांवर घराचा संसार कसाबसा चालत असे . एकदा एक नातेवाईक कुऱ्हाड घेतो आणि सपासप झाड तोडून टाकतो . झाडच तुटल्यामुळं मंडळी हातपाय हलवतात . ही बाबासाहेबांची गोष्ट . महारकीच्या वतनावर ह्या गोष्टीनं झगझगीत प्रकाश टाकला . गावातील कामं नाकरल्यामुळं गावोगाव संघर्ष उभा राहिला .
लहानपणापासून सामाजिक चळवळीकडे मी ओढला गेलो , त्याचं कारण म्हणजे जावजीबुवा . हा एक करारी म्हातारा . लोखंडी कांबीसारखं त्याचं शरीर . दुसऱ्या नात्यानं आजोबा लागत होता . घराशेजारीच त्याचं टोलेजंग घर . तसंच , महारवाड्यातील लक्ष्मण हाही चळवळीत आघाडीवर . त्या काळात लोकल बोर्डावर सभासद म्हणून निवडून गेलेला . ही जोडगोळी साऱ्या तालुक्यात समाज सुधारण्याच्या चळवळी करीत फिरायची . महारांनी घाण काम सोडावीत , स्वाभिमानानं जगावं , असं ते आपल्या अडाणी भाषेत गावोगाव जाऊन सांगत . ह्यांनी काही तरुणांच्या टोळ्या केलेल्या , हे प्रत्येक गावात जात . जुनी कामे करणाऱ्या मंडळींची पाचावर धारण बसे . कातडं फाडणाऱ्याला किंवा मेलेल्या ढोराचं मांस खाणाऱ्याला चावडीवर बोलावलं जायचं . मेलेल्या ढोरावर रॉकेल ओतलं जाई . कुणी खाऊ नये म्हणून हा बंदोबस्त करीत . त्यानं समजूतदारपणानं ऐकलं तर ठीक . नाही तर त्याच्या तोंडाला काळं फासायचं . खापरात पाणी टाकून त्याला तोंड पाहायला लावायचं . केव्हा केव्हा त्याच्या विरुद्ध सामाजिक बहिष्काराचं शस्त्रही उपसलं जायचं . त्याची हुक्का – गुडगुडी बंद . हे मोठं शासन समजलं जायचं . ह्याच चळवळीचं नेतृत्व पुढं दादासाहेबांना मिळालं . दादासाहेब हे मुंबईतून एलएल . बी . पास होऊन आलेले . बाबासाहेबांची आणि त्यांची प्रत्यक्षात ओळख आहे आणि त्यांनीच दादासाहेबांना गावी पाठवलंय , हे ऐकून आम्हा मुलांना दादासाहेबांबद्दल आदरयुक्त भीती वाटायची . आम्ही त्यांच्या जवळपास जावयालाही बिचकायचो . ते सभेत खूप छान बोलायचे . तमाशातले . खेड्यातल्या रोजच्या जीवनातले दृष्टांत द्यायचे . त्यांच्या भाषणात विनोदाची थुईथुई कारंजी उडायची . ऐकताना हसता हसता मुरकुंडी वळायची . वकील असूनही त्यांच्यात बडेजाव नव्हता . महारवाड्यातील मुलांबरोबर ते विटीदांडू खेळायचे . नदीवर जाऊन तासन् तास पोहायचे . संध्याकाळी ढोलकी वाजव , क्रांतिकारक गाणी गात , ह्या त्यांच्या वृत्तीमुळे आम्ही तरुण झपाटलो नसतो तरच नवल .
एकदा सभेत त्यांच्यावरती जुन्या मंडळीनी कटू प्रसंग आणला . गावात त्यांचेच वडील महारकीची कामं करीत . आठवड्याच्या बाजारात जाऊन ‘ शेव ‘ मागत . शेव हा प्रकार अनेकांना कळणार नाही . दोघे महार दोन दिशांनी धोतर ताणून धरीत आणि प्रत्येक दुकानापुढं जाऊन दुकानात असेल तो माल मागत . दुकानदार किंवा खेड्यातून माल विकायला आलेला शेतकरी पुढ्यात आलेली वस्तू पसा पसा त्या धोतरात टाकीत . त्या धोतरात सारीच भेसळ होई- भारतीय समाजव्यवस्थेचं दर्शन व्हावं , तसं . संध्याकाळी जेव्हा घरी जात , तेव्हा ह्याची वाटणी करीत . दादासाहेब पुढारी असूनही आपल्या गावची ही गुलामगिरी थांबवू शकत नव्हते . खेडी सुधारत चालली ; पण तालुक्याचं गाव सुधारत नाही , ही कार्यकर्त्यांची बराच काळ ओरड होती . सभेत दादासाहेब सामाजिक सुधारणांबाबत बोलत असतानाच कुणी तरी मध्येच त्यांना अडवलं , ” बोच्याखाली श्यान आणि दुसऱ्याला काय ग्यान शिकवतोस ? पहिलं बापाला सांग ! ” झालं , सभेत एकच बाचाबाची सुरू झाली . दादासाहेब चिडले नाहीत . अनेक पातळ्यांवरील संघर्ष त्यांच्या लक्षात आलेला . ते त्या दिवशी सभेत गर्जले , ” कुणी जर मला पिस्तूल आणून देणार असेल तर मी माझ्या बापाचा खून करीन ! ” त्या दिवसाची सभा बराच काळ तालुक्यात चर्चेची झाली . सभेनं दादासाहेबांच्या कर्तृत्वावर आणखी एक शिरपेच खोवला होता .
चळवळीचं हे लोण आमच्याही गावी आलं . महारवाड्यात सिन्नरचा ‘ जलसा ‘ आलेला . जलसा हा काय प्रकार आहे . हे पाहण्यासाठी गावातील मराठा मंडळीही आलेली . तमाशात गवळणी मथुरेच्या बाजाराला निघत असतात . कृष्ण त्यांना अडवतो . पण जलशातील गवळणी काळाराम सत्याग्रह करण्यास निघालेल्या . जलशाचा हा नवा प्लॉट असतो . हिलालांच्या उजेडात कार्यक्रम सुरू होतो . गवळणी आता रामाच्या देवळात जातील आणि आपला देव वाटवतील , ह्या कल्पनेनं मराठा मंडळींचं माथं भडकतं . गंमत म्हणजे त्यांना प्रत्यक्षात ही क्रिया नको असते ; पण स्टेजवरही त्यांना हा प्रकार पाहणं कसंसंच वाटतं . ते बंद करायला सांगतात . बाचाबाची वाढते . ” आम्ही आमच्या वस्तीत नागडं नाचू . तुम्हाला पाहावयाचं तर पाहा ! ” असं जावजी जेव्हा परखडपणे गावकऱ्यांना सांगतो तेव्हा ते निमूटपणे उठून जातात . ह्या क्षुल्लक गोष्टीवरूनही गाव आणि महारवाड्यात तणाव निर्माण होतो .
आता गावाची कामं महारांनी बंद केलेली . मराठ्यांचा नवरदेव वेशीपाशी ओवाळला जात नाही . गावची जत्रा वाजविण्याचं बंद करतात . मरीआईचा गाडा एका गावावरून दुसऱ्या गावाला नेण्याचं बंद होतं . एकदा तर होळीच्या सणाच्या वेळी महारांनी विस्तव द्यायचं नाकारलं , म्हणून तुंबळ भांडण . काहींची डोकी फुटली . गावात काड्याची पेटी नव्हती काय ? पण तसं काहि रूढीपुढं विचारायचं नाही . महारांनी होळीकरता विस्तव दिला नाही , तर गावावर काही गे भयानक गंडांतर येणार , असा गावकऱ्यांचा…
क्रमशः
(दया पवार यांच्या बलुतं या जगप्रसिद्ध पुस्तकातुन)
