बलुतं..
समज . महार मंडळी अशा वेळी खूप भाव खायची . याच वेळी जुन्या भांडणाला उजाळा मिळे .
सामाजिक चळवळीच्या रेट्यामुळे बदलत होतो . काही जुन्या संकल्पना मातीआड लोटल्या जात होत्या . पूर्वपरंपरेने आमच्या घरात खंडोबाची पूजा व्हायची . आईनं चांदीचे काही नवीन टाक बनवून घेतलेले . वडील वारल्यामुळं आई परिस्थितीच्या दडपणामुळं मनातून कमालीची भेदरली होती . ती रविवारी खंडोबाला आंघोळ घालायला सांगायची . घोड्यावर बसलेला खंडोवा . हातात तलवार . याच्या सोबतीला बहिरोबाही असावा . आंघोळ घालायची म्हणजे ताटात पाणी घालून धुवायचं . विटकरानं त्यांच्यावरचा गंज झटकायचा . लखलखीत काढायचे . धुतलेलं पाणी घराच्या कौलावर फेकायचं . संध्याकाळी तळी भरायची . बेल – भंडार उधळायचा . खोबऱ्याचे तुकडे वाटायचे . कपाळाला भंडार लावायचा . हा जसा आठवड्यातून एक दिवस पूजेचा होता , तसाच , ‘ समाध्याला पाणी घालणे हाही दिनक्रम असायचा . गुरुवारी उपवास धरायला लागे . लहानपणी ह्या समाध्याबद्दल मला खूपच कुतूहल होतं . तेव्हा महारवाड्यात पूर्वेला असलेल्या घोंडाळीवर साबराचं घनदाट रान होतं . काटेरी झुडुपात ‘ समाध्या’ची उघड्यावरच समाधी असायची . काळाकभिन्न चौरस दगड त्यावर दोन पादुका कोरलेल्या . आईला विचारायचो ,

” कोण गं हा समाध्या ? आणि आपण त्याची पूजा का करायची ? ” समाध्याविरुद्ध बोलणं आईला आवडायचं नाही . या भीतीनं ती शहरायची . त्याच्या दिशेनं हात जोडायची . सांगायची , ” अरे , हा बाबा आपला पूर्वज . संन्यासी होता म्हणतात . अनेक तीर्थस्थानं त्यानं केलेली . मरणाच्या वक्ताला पाय पांढरीला येऊन मेला त्याची आहे ही समाधी . त्याचीच आपल्या घरावर पाखर आहे . तो जरा चिडला , तर आपल्या घराचा सत्यानाश होईल !
” आई मग माझ्या लहानपणच्या गोष्टी सांगायची . “ तू लहान असताना झोपेतून उठून चालायचास , अंगणात जाऊन कुणाला समजणार नाही अशा भाषेत बडबडायचास . समाध्याचा अंगारा मी लावायची , तेव्हा तुला आराम वाटायचा . ” आईच्या भाकडकथेवर माझा विश्वास नसायचा . पण आईच्या समाधानासाठी मी ह्याच्यावर पाणी ओतायचो . नैवेद्य दाखवायचो , पाणी ओतताना लक्षात यायचं , कावळ्या – कुत्र्यांनी त्यावर विष्ठा टाकलेली आहे . वाटायचं , एवढा मोठा समाध्या , पण कावळी – कुत्रीही त्याला घाबरत नाहीत . हा कसला देव ? साबराच्या काटेरी जंगलात मला हमखास उमाआज्यानं सांगितलेली निळावंती आठवायची . वाटायचं , समाध्याच्या खाली खोदून पाहिलं तर आपल्याला निळावंती सापडेल . आपल्याला ती वाचायला मिळेल . मग पशू – पक्ष्यांची भाषा आपल्याला अवगत होईल . पण त्या लहान वयात हे धाडस केव्हाच झालं नाही . पुढं जेव्हा आंबेडकरी चळवळीचा जोर वाढला , तेव्हापासून समाध्या म्हणजे भंपक वाटू लागला . वाटायचं , हा कुठला आपल्यापेक्षा हुशार ? आपल्याला तर किती तरी नव्या गोष्टी माहीत आहेत . हळुहळू समाध्याबद्दलचं माझं आकर्षण कमी झालं . मी त्याला जशी आंघोळ घालण्याचं बंद केले , तसं खंडोबालाही बोचक्यात बांधून टाकलं . आईही पुढं माझ्याशी वाद घालत नव्हती . आमची मुंबईची काकू मात्र अजूनही समाध्याच्या सामर्थ्याला घाबरते . मुलानं दारू सोडावी म्हणून तिनं त्याच्या डोक्यावर सावली केली आहे .
मी जसा बदलत होतो , तसा महारवाडाही बदलत होता . महारवाड्यात वरल्या आळीत शंकर नावाचा एक वेडा राहात होता . काळाकभिन्न . डोक्याच्या जटा वाढलेल्या . अंगावर एकही वस्त्र ठेवायचा नाही . फक्त लंगोटी . जवळपासचे कुणीच नातेवाईक नाहीत . त्याच घर एकदा पाहिलं . जणू काय उकिरडा . कुस्तीच्या हौदात माती असते , तशी त्यानं साऱ्या घरात राख पसरलेली . अंगावर काही न घेता त्याच्यातच तो लोळत असे . राखेमुळं बहुधा त्याला थंडी वाजत नसावी . बाहेर पडला म्हणजे निशाचर वाटायचा . कुणाशी फारसा बोलत नसे . आणि कुणाला तसा त्रासही देत नसे . कधीकधी कुणी काही खायला देईल , त्यावरच निर्वाह करायचा ; किंवा रानातली कंदमुळं उकडून खायचा . याच्या अफाट ताकदीला बहुधा गावकरीही घाबरत असावेत . सकाळी उठला म्हणजे विहिरीवर घागर घेऊन जायचा . तोंडानं थू थू करायचा . कंटाळा येईपर्यंत मनसोक्त आंघोळ करायचा . घागर खांद्यावरून घेऊन गावात आला म्हणजे मारुतीच्या देवळापाशी क्षणभर थांबायचा . मोजून दररोज तो देवळाच्या पायरीला लाथा झाडायचा . याचा काय अर्थ होता , हे त्यालाच माहीत . मरेपर्यंत त्याचा हा क्रम चुकला नाही . गावकरी वेडा म्हणून सोडून द्यायचे . ‘ नंगे को खुदा डरता है ‘ ही म्हण त्याच्या बाबतीत खरो ठरायची . महारवाड्यात असेच एक शेंदराचे देवीचे ठाणे होते . तिथं तर हा जाऊन आम्हाला समजणार नाही अशा भाषेत त्या देवाशी भांडायचा . जुन्या खेटरानं त्याचं तोंड सड़कायचा . हा वेडा कशामुळं झाला , त्याचं लग्न झालं किंवा नाही , हे आम्हा मुलांना कळायचं नाही .
ह्या वेड्यावरून दुसरा वेडा आठवतो ; पण तो सुशिक्षित होता . त्याला वेडा कसं म्हणावं , हाही प्रश्नच होता . शिरसाटमास्तर तेव्हा सायकलीवरून आमच्या गावी यायचा . खूप बडबड करायचा . एखाद्या सभेत बोलावं तसं वक्तृत्व . तालुक्यात गणोरे इथं त्याची सासुरवाडी होती . गणोऱ्याला वर्षातून एकदा देवीची फार मोठी यात्रा भरते . देवळाचा पुजारी हा शिरसाटाचा सासरा . सासऱ्यानं देवीची पूजा सोडावी म्हणून शिरसाटानं जंग जंग पछाडलं . पण देवीच्या यात्रेची फार मोठी कमाई . वर्षभर पुरेल एवढी चंदी जमायची . कोंबडी , बोकडं , खण , नारळ , देवीचा गल्ला , हे सारं सासऱ्यालाच मिळायचं . देवीचा पुजारी महार कसा , हा प्रश्न अनेकांना पडेल . पण महारवाड्यातील एक गरीब सून – घरातील जाचाला कंटाळलेली . कच्च्या घागरीनं पाणी वाहायची . तिनं पुढं जीव दिला . कोणत्या काळात ही घटना घडली , हे कुणाला सांगता येत नाही . सूनबाई आता जागती ज्योतदेवी झाली . सारा बहुजन समाज तिच्या पायी लीन झालेला . असं जागृत देवस्थान सोडावं हा सासऱ्याला पोरखेळ वाटतो आहे . सासरा ऐकत नाही म्हणून शिरसाटनं बायकोच सोडलेली . तेव्हापासून सारखा ताळतंत्र सोडून बडबडतो आहे . त्यानं तालुक्यात मोहीम काढलेली . सायकलीला लांब पिशवी लटकावलेली . प्रत्येक महारवाड्यात जाऊन शेंदराचे गोटे गोळा करणे आणि ते तालुक्याच्या गावी नदीच्या डोहात नेऊन बुडवणे , हा याचा छंद . शाळेतून सस्पेंड केला , म्हणतात . सुपरवायझरनं शाळेत सर्व शिक्षकांसमोर घोर अपमान केला . शाळा सुटल्यावर नाक्यावर हा पान खाऊन उभा . समोरून परीटघडीचे पांढरेशुभ्र कपडे घालून सुपरवायझर येतो आहे . मास्तर क्षणाचा विचार न करता सुपरवायझरच्या कपड्यावर पचकन् पानाची पिंक टाकतो आहे . खात्यात खळबळ माजलेली . असा हा मास्तर . त्याच्या बरोबर गावोगावचे शेंदराचे गोटे गोळा करण्यात मात्र आम्हाला कमालीचं ‘ थ्रिल ‘ वाटे .
आमच्या ह्या चळवळीचा बहुजन समाजावर काही परिणाम झाला असेल , असं मला वाटत नाही . उलट त्यांच्यात भौतिक गोष्टींची मुबलकता येत चाललेली . घरावर मंगलोरी कौलं , ऊस – द्राक्षं ह्यांची पैसे देणारी पिकं . फटफटी . झेडपीचं राजकारण . पण त्यांच्या डोक्यात काही बदल होतोय , असं वाटत नसे . त्यांच्याकडे महाराचा माणूस ओळखायचं अजब शास्त्र होतं . जो खूपच स्वच्छ राहत असेल , तो महार . मी गावात देवळात गेलो , तर एखादा मराठा माणूस हटकायचा , ” तुझ्या आयला तुहे ! कुणाचं रं तू ? खुशाल मानसा खेटतोस ? ” एकदा वैतागून मी म्हणालो , “ तुह्या आयला तुहे , मी मारत्याचा ! ” अर्थात त्यांनी शिवी दिली ती लकब म्हणून घ्यायची , आणि मी दिलेल्या शिवीमुळे मराठा भडकला नसेल तरच नवल ! वाटायचं , सालं , आपण शिकलो – सवरलो तरी गावात गेलो म्हणजे – विचारायचे , ” काय रे , मारत्या म्हाराचा ना तू ? ” महारपण जसं गोचडीसारखं चिकटलं होतं . तसं मारत्याचा पोरगा म्हणून करून दिलेली ओळख ऐकून मी ओशाळायचो . मी घाईघाईन सांगायचो , “ मी वरल्या आळीच्या मारुतीचा मुलगा नाही , खालच्या आळीच्या मारुतीचा आहे . ‘ वरच्या आळीच्या मारुतीला महारोग फुटला होता आणि महारोग्याचा मुलगा म्हणून तर आपल्याला समजत नसावेत ना , ह्या केवळ शंकेनं मी अस्वस्थ व्हायचो आणि स्पष्टीकरण करण्यासाठी धावपळ करायचो . आज मला माझंच हसू येतं . खरंच हरीला काय वाटत असेल ?
हा हरी वरच्या आळीच्या मारुतीचा मुलगा . माझ्याच वयाचा . शाळेत जायचा नाही . गावकऱ्यांची गुरं राखोळीनं घेऊन जायचा . सुटी पडली म्हणजे याच्याबरोबर केव्हा केव्हा मी रानात जायचो . ओढ्यावर खेकडे फार छान धरायचा . मी मात्र खेकड्यांना , त्यांच्या पांगोड्यांना खूपच घाबरायचो . हा तेव्हा जिवंत विंचवाच्या माळा तयार करायचा . विंचू पकडणे हा त्याचा हातचा मळ . मी सुट्टीत गावी आलो , म्हणजे हा जिवलग मित्र व्हायचा . आई ह्याच्याबरोबर खेळू द्यायची नाही . पण मला मात्र हरीशिवाय चैन पडायचं नाही .
कधी हरीच्या घरी गेलो , म्हणजे त्याचा बाप अंगणात ऊन खात बसलेला दिसायचा . त्याच्या हातापायांची बोटं टापसलेली होती . नाक चेमटलेलं . रंग गोरा होता ; पण सर्व अंगभर रेषांची जाळी . टरबूज उकलावं तशा त्या अंगभर भेगा पडलेल्या . हरीच्या बापाचा रोग पुढं हाताबाहेर गेला . घरातही त्याची सारे घृणा करीत . महारवाड्यातील मंडळीही त्याला वस्तीतून हलवावं म्हणून गहजब करू लागली . शेवटी हरीच्या बापाची महारवाड्यातून उचलबांगडी केली . हरीनं मात्र त्याची मरेपर्यंत सेवा केली . शेतात दूर माळरानावर त्याला गवताची खोपी बांधून दिली होती . हरी त्याची भाकरी घेऊन जायचा . केव्हा केव्हा हरीबरोबर मीही जात असे . हरी मात्र मला जवळ येऊ द्यायचा नाही . दूर उभा राहायला सांगायचा . हरीच्या बापाचं दुःख पाहवत नसे . तो कुणाशी बोलत नसे . असं म्हणतात , की त्यानं एकदा सापाच्या विळात हात घातला होता . पण साप चावलाच नाही . दिवसेन दिवस त्याचे हातपाय सडत चाललेले . केव्हा केव्हा आपल्या पायांतील जखमांतून काळे किडे वेचून काढताना तो दिसायचा . माळरानावरच खोपीत तो मेला . त्याचं प्रेत महारवाड्यात आणलं गेलं नाही . तिथंच मुरमात खड्डा खोदून , त्याचा देह बारदानात गुंडाळून , त्याला पुरलं म्हणतात . आज तिथं कोणतीच निशाणी नाही … नाही चिरा , नाही पणती .
अगदी अलिकडची गोष्ट . हरी मुंबईला आहे , एवढंच समजलं होतं . मुंबईत कधी गाठभेट नाही . भायखळा ते व्ही . टी . असा लोकलनं प्रवास करीत होतो . मधल्या पॅसेजमध्ये बरीच मंडळी खाली बसलेली असतात . त्यातल्या एका चेहऱ्याकडं माझं लक्ष जातं . मी हरीला ओळखतो . त्याला पाहून मला धक्का बसतो . त्याचे हातपायही त्याच्या बापासारखे भेगाळलेले दिसतात . तोंड टापसलेलं , त्वचा लाल पडत चाललेली . हरीलाही महारोग फुटला म्हणायचं … माझ्याच हातापायांना महारोग फुटलाय , असं क्षणभर वाटलं . ‘ कोंडवाड्या’तील ‘ झाड ‘ ह्या कवितेची आठवण आली . ही पानं कसली ? महारोग्याच्या बोटासारखी झडलेली पानं ! खरंच , हरीला तोंड दाखवू नये , असं वाटलं . त्याच्याबरोबर मारलेल्या गप्पा , माळरानावर खेळलेल्या सूरपारंब्या , डोहात पकडलेले मासे – असं सारं बालपण डोळ्यांपुढं उभं राहतं . मी न राहवून त्याला…
क्रमशः
(स्रोत:दया पवार यांच्या बलुतं या आत्मचरित्रा तुन)
