दिनांक २९ ऑगस्ट २०२५,श्रीगोंदा:
आज श्रीगोंदा शहरातील श्री संत शेख महंमद महाराज मंदिर प्रांगणात महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मात्र या मेळाव्यात संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी कांदा आणि दूध प्रश्नावर आवाज उठवत निषेध नोंदवला. स्थानिक प्रशासनाने संतप्त ब्रिगेड पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतले.

मेळाव्याच्या प्रमुख पीठावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे भाषण सुरू असताना, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अरविंद कापसे आणि नाना शिंदे यांनी कांदा-दूध प्रश्नावर भाष्य करण्याची विनंती केली. मात्र उपमुख्यमंत्री पवार यांनी संपूर्ण भाषणात यावर एक शब्दही न उच्चारल्याने पदाधिकारी संतप्त झाले. त्यांनी हातात कांद्याची माळ घेऊन शांततेत निषेध दर्शवला.

“कांद्याचा भाव उत्पादन खर्चापेक्षा कमी, गोठे उध्वस्त” – कापसे
निर्भीड कलमशी बोलताना संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अरविंद कापसे यांनी सांगितले की,
“भगवान आबा पाचपुते यांच्या आवाहनानुसार शेतकरी प्रश्न मांडण्यासाठी आम्ही आलो होतो. घनश्याम अण्णा शेलार यांना निवेदनही देण्याचा प्रयत्न केला. पण व्यासपीठावर शेतकऱ्यांनाच बोलण्याची संधी दिली नाही. कांद्याचा उत्पादन खर्च वीस रुपये आहे, मात्र विक्री भाव दोन ते दहा रुपये आहे. आम्हाला किमान २२ ते २५ रुपये दराची अपेक्षा आहे. तूर, उडीद, कापूस विदेशातून आयात होतोय; शेतकरी हवालदिल झाला आहे. अशा गंभीर प्रश्नांवर चर्चा न करता आम्हाला दडपशाही करून ताब्यात घेण्यात आले.”

दुधाच्या पावडरला भाव नाही, जनावरांचा प्रश्न गंभीर
कापसे यांनी पुढे सांगितले,
“भाकड जनावरांचा प्रश्न, दूध उत्पादकांच्या समस्या, आंतरराष्ट्रीय बाजारात दूध पावडरला नसलेला दर याबाबत बोलण्यासाठी उभा राहिलो होतो. पण शेतकऱ्यांच्या मेळाव्याच्या नावाखाली आगामी निवडणुकांचा प्रचार सुरू होता. हा मेळावा शेतकऱ्यांचा होता की राजकीय प्रचारसभा..? हे समजले नाही. कोणताही गोंधळ न घालता आम्ही शांततेत निषेध नोंदवला.”
चौकट:
“शेतकरी मेळाव्यात शेतकऱ्यांनाच बोलू दिले नाही. विनंती केली तरी संधी न मिळाल्याने उठून बोलावे लागले. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाष्य झाल्याने संभ्रम वाटला – शेतकरी मेळावा की प्रचारसभा..?”
— अरविंद कापसे, जिल्हाध्यक्ष, संभाजी ब्रिगेड

📌 मुख्य मुद्दे:
- श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत शेतकरी मेळावा
- कांदा आणि दूध प्रश्नावर भाष्य करण्यासाठी ब्रिगेड पदाधिकाऱ्यांची विनंती फेटाळली
- कांद्याच्या कमी भावाविरोधात शांततेत निषेध, कांद्याची माळ घेऊन आंदोलन
- स्थानिक प्रशासनाने पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतले
- शेतकऱ्यांच्या समस्यांवर चर्चा न होता निवडणुकांवर भाष्य केल्याची टीका
स्रोत:(शेतकरी मेळावा)
